पर्यावरणपूरक शहरी गृहरचना

अल्पना विजयकुमार
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

केरळ व उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या पुराने झालेले प्रचंड नुकसान! गेल्या १०० वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा प्रचंड पाऊस. काही ठिकाणी ढगफुटी तर काही वेळा उन्हाळ्यात प्रचंड वाढणारे तापमान यासारख्या घटना आपण रोज पाहतो आहोत. या सर्वांमागचे कारण म्हणजे ‘जागतिक तापमान वाढ’ आहे हेही आपण वाचतो.

या घटनांशी आमचा काय संबंध? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येईल. पण अप्रत्यक्षपणे आपण सर्व यासाठी जबाबदार आहोत. केरळमध्ये लोकसंख्या वाढीमुळे लोकांनी भाताच्या शेतातच घरे बांधली. त्यामुळे पाणी जमिनीत जिरायला जागाच उरली नाही.

केरळ व उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या पुराने झालेले प्रचंड नुकसान! गेल्या १०० वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा प्रचंड पाऊस. काही ठिकाणी ढगफुटी तर काही वेळा उन्हाळ्यात प्रचंड वाढणारे तापमान यासारख्या घटना आपण रोज पाहतो आहोत. या सर्वांमागचे कारण म्हणजे ‘जागतिक तापमान वाढ’ आहे हेही आपण वाचतो.

या घटनांशी आमचा काय संबंध? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येईल. पण अप्रत्यक्षपणे आपण सर्व यासाठी जबाबदार आहोत. केरळमध्ये लोकसंख्या वाढीमुळे लोकांनी भाताच्या शेतातच घरे बांधली. त्यामुळे पाणी जमिनीत जिरायला जागाच उरली नाही.

शहरीकरणाच्या वेगानुसार सांडपाणी वा कचऱ्यावरील प्रक्रिया, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी व्यवस्था नसणे. धूर, प्रदूषित पाणी या सर्वांमुळे हवेतील मिथेन, कार्बनडाय ऑक्‍साइड यांचे प्रमाण वाढून पर्यायाने जागतिक तापमान वाढीसारख्या समस्या निर्माण होतात.

यावरून योग्य तो धडा घेऊन आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व नैसर्गिक स्रोतांचा जाणीवपूर्वक वापर करून गृहप्रकल्प व इतर इमारत बांधकामांना (ग्रीन बिल्डिंगना) प्राधान्य दिले पाहिजे.

हरित इमारत म्हणजे अशी इमारत, की जी बांधताना सुयोग्य तंत्रज्ञान, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक साधनांचा वापर केला आहे. सौरउर्जेचा वापर करून नैसर्गिक प्रकाश व उष्णता मिळवणे. नैसर्गिक वायुवीजन, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, पर्जन्य जलसंधारण, ओल्या कचऱ्यापासून खत व बायोगॅस निर्मिती, कंपोस्ट खताचा व पालापाचोळ्याचा वापर करून परसबाग गच्चीवरील बागा हे सर्व ज्या इमारतींमध्ये केलेले असते, असे बांधकाम. यापैकी काही साधने व तंत्रज्ञान याबद्दल माहिती घेऊ.

कचऱ्यापासून खतनिर्मिती
आजकाल घरगुती ओल्या कचऱ्याची समस्या केवळ शहरातच नव्हे तर गावातसुद्धा आहे. साठलेला ओला कचरा दुर्गंधी व आजारांना कारणीभूत होतोच. शिवाय अशा साठलेल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया न केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर मिथेन वायू हवेत सोडला जातो व पर्यायाने जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरतो.

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी घरगुती किंवा सोसायटी पातळीवर प्रकल्प राबवता येतो. यासाठी प्रक्रिया सारखीच असते. फक्त कचऱ्याच्या वजनानुसार प्रक्रिया करण्यासाठी लागणारे कंटेनर, ड्रम यांच्या आकारात फरक होईल. खत निर्मितीची क्रिया वेगाने घडण्यासाठी गांडुळे, कंपोस्ट कल्चर किंवा नुसतेच कल्चर वापरले जाते.

  चार ते पाच जणांच्या कुटुंबाकडे रोजचा १ किलो ओला कचरा तयार होतो. फ्लॅटमध्ये वापरता येईल असे अनेक छोटे तयार कंम्पोस्टर किंवा ड्रम बाजारात उपलब्ध आहेत. शास्त्रीय पद्धतीने यासाठी १ किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३’ x २’ x २’ ची टाकी असावी. ही टाकी बनविण्यासाठी प्लास्टिक, फायबर, सिमेंट व विटा फेरोसिमेंट यापैकी कोणतेही साहित्य वापरता येईल.

  अशाच प्रकारे २०० लिटरच्या प्लॅस्टिक ड्रमला भोकं पाडून ‘कंम्पोस्टर प्लॅस्टर’ 

बनवता येतो. याचा उपयोग ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व झाडे लावणे या दोन्हीसाठी होतो.

  गृहप्रकल्प किंवा मोठ्या प्रमाणावर खत प्रकल्प राबविताना सदनिकांची संख्या व उपलब्ध जागा उदा. बेसमेंट/ गच्चीतील जागा यांचा मेळ घालून प्रकल्प उभा करतात. आठवड्यातील सात दिवसांच्या स्वतंत्र टाक्‍या बांधून किंवा फेरोसिमेंटचा वापर करून टाक्‍या तयार करता येतात. रोज जमा झालेला ओला कचरा टाकीत टाकणे या पद्धतीने हा प्रकल्प राबविला जातो.

  कोणत्याही आकाराचा खत प्रकल्प उभारताना रचना कशी करावी?

पेटी किंवा ड्रमच्या बाजूला तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी ट्यूब, तसेच या पेटीला झाकण असावे. पेटीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पेटीच्या वरच्या बाजूस लहान भोके असावीत. घरगुती ओल्या कचऱ्याबरोबरच बागेतील पालापाचोळा वापरणे उपयुक्त. पेटीच्या तळाशी विटांचे तुकडे, त्यावर वाळूचा थर, नंतर पालापाचोळा व नारळाच्या शेंड्यांचा थर, त्यावर गांडूळखताचे थर व शेवटी ओला कचरा. प्रत्येक थराची जाडी साधारणपणे ४ ते ५ इंचांची असावी. चांगल्याप्रकारे खत तयार होण्यासाठी योग्य प्रमाणात ओलसरपणा राखणे, पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी कोकोपीट व पालापाचोळा यांचा वापर. दुर्गंधी टाळण्यासाठी नीम तेल + पाणी + १ थेंब साबण याचा स्प्रे वापरावा. कचरा खालीवर करणे तसेच कंपोस्टिंग कल्चरचा वापर करावा. मुंग्या/ किडे टाळण्यासाठी नीमपेंड किंवा वेखंड पावडरचा वापर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अशाप्रकारे खतनिर्मितीसाठी पहिल्यांदा ३ ते ४ महिन्यांचा वेळ लागतो. त्यानंतर हा कालावधी कमी होतो.

गांडूळखत निर्मिती ः रचना
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती ः
खेड्यांमध्ये गोबर गॅसचा उपयोग व स्तरीचा शेतीसाठी खत म्हणून उपयोगी गेली पन्नास वर्षे होतो आहे. परंतु, ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस ही संकल्पना गेल्या पंधरा वर्षातील आहे. आपल्या ओल्या कचऱ्यापासून आपापल्या घरीच बायोगॅस तयार करणे व इंधन म्हणून वापरणे हाच ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा सर्वांत चांगला मार्ग आहे. अशाच प्रकारे सोसायटीतील ओला कचरा किंवा पालिकेतील जमा होणारा ओला कचरा एकत्र करून सार्वजनिक बायोगॅस सयंत्रे व त्यापासून वीजनिर्मिती ही संकल्पना चांगलीच मूळ धरते आहे.

घरगुती बायोगॅस सयंत्र तयार करण्यासाठी प्लॅस्टिक, स्टील, सिमेंट, फायबर अशा विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करता येतो. दोन/ पाच/ दहा/ वीस/ पन्नास किलो रोजचा ओला कचरा अशा क्षमतांमध्ये ही सयंत्रे सध्या उपलब्ध आहेत. हे सयंत्रे कार्यरत राहण्यासाठी रोज सात ते आठ तास थेट सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता फार महत्त्वाची. घरगुती वापरासाठी असलेल्या अशा सयंत्रांची क्षमता दोन ते दहा किलो पर्यंत आहे. हॉस्टेल, कॅन्टीन, हॉटेल्स इत्यादींसाठी दहा ते पन्नास किलो क्षमतेचे बायोगॅस सयंत्र उपयोगी पडेल.

शास्त्रीय भाषेत याचे आकारमान ०.२५ क्‍युबीक मीटर एवढे असते. त्याचा व्यास तीन फूट व उंची साडेतीन फूट असते. ओला कचरा आत टाकण्यासाठी व स्लरी बाहेर पडण्यासाठी एक इनलेट व आऊटलेट असते. तयार झलेला बायोगॅस साठविण्यासाठी एक टाकी व गॅस बाहेर नेण्यासाठी नळासारखी रचना.

या सयंत्राचे वजन वीस ते पंचवीस किलो असल्याने ते गच्चीवर न्यायला विशेष त्रास होत नाही.

पहिल्यांदा कल्चर / शेण टाकून ठेवल्यावर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांमध्ये गॅस तयार होतो. यानंतर रोज शंभर ग्रॅम कचऱ्याने सुरुवात करून महिन्याभरात दोन किलो रोज असे प्रमाण वाढवितात. रोज कचऱ्याच्या आकारमानाच्या दुप्पट पाणी घालावे लागते. कचरा बारीक करून टाकल्यास अधिक प्रमाणात बायोगॅस मिळेल. सर्वसाधारणपणे दोन किलोच्या सयंत्रातून एका शेगडीवर रोज अर्धातास चालेल एवढा निळ्या ज्योतीने जळणारा बायोगॅस व रोज दोन लिटर द्रवरूप खत (स्तरी) मिळेत.

कंपोस्ट खत व बायोगॅस स्लरीचा वापर करून परसबाग किंवा गच्चीवरील बाग

पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून गृहरचना करताना गच्ची/ उपलब्ध जागेचा उपयोग करून हिरवाई व भाजीपाला निर्मिती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. घराभोवतीच्या मोकळ्या जागेत गच्चीवर किंवा छोट्याशा गॅलरीत आवडीची झाडे लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. विटांचे वाफे, मोठी झाडे, फुलझाडे, भाजीपाल्याचे वाफे, लॉन इ. वापरून सुशोभित केलेली रचना (ग्रीन लॅंडस्केप तसेच सीमित जागेत कुंड्या, व्हर्टिकल प्लॅन्टर वापरून केलेली बाग किंवा खिडकीमध्ये ठेवलेल्या चार कुंड्या या सर्वांमधून लोकांचे बागकामाविषयीचे प्रेम दिसून येते. तसेच रासायनिक खते, कीटकनाशके यांचे दुष्परिणाम माहिती झाल्याने घरच्या घरी सेंद्रिय/ नैसर्गिक पद्धतीने स्वतःपुरता भाजीपाला वाढविण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. तसेच बागकाम करताना रोजच्या जीवनातील ताण कमी होतो, हे सिद्ध झाले आहे.

अशा प्रकारच्या परसबागेचे/ गच्चीवरील  बागेचे नियोजन करताना विचारात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे -

  •      बागेमध्ये लावण्याची झाडे शोभेची, फळांची किंवा भाजीपाला या पैकी कोणत्या प्रकारची असावीत?
  •      झाडे वाढविण्याचे माध्यम म्हणजे माती किंवा सेंद्रिय खत (कंपोस्ट) इ. चा वापर.
  •      उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर करून केलेली रचना.
  •      सूर्यप्रकाश व पाण्याची उपलब्धता.
  •      गच्चीवरील बागेचे नियोजन करताना वॉटरप्रुफींगचे महत्त्व.
  •      भाजीपाल्याचे नियोजन करताना वर्षभराची आणखी.
  •      बागेमधील कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक किडनाशकांचा वापर.
  •      पाण्याची बचत करण्यासाठी (ड्रीप सिस्टिम) ठिबक सिंचनाचा वापर.

कंपोस्ट खत व त्याच्या जोडीला बायोगॅस स्लरीचा वापर झाडांसाठी करताना लिंबू, अंजीर, डाळिंब, केळी यांसारख्या मोठ्या झाडांना स्लरी व पाणी एकास एक प्रमाणात मिसळून आठवड्यातून एकदा घालावी. भाजीच्या झाडांना अशाच प्रकारे एकास पाच प्रमाणात मिसळून आठवड्यातून एकदा घालतात. कंपोस्ट व स्लरीचा फळझाडांसाठी व भाजीपाल्यासाठी खुपत उपयुक्त विशेषतः फळांचा आकार, फुले गळणे याचे प्रमाण कमी होते.

पर्जन्यजल संकलन व संधारण
(Rain water Harvesting)
यालाच पर्जन्यजल साठवण व पुनर्भरण हे प्रतिशब्द वापरतात. पावसाचे इमारतींच्या गच्चीवर, खिडक्‍यांच्या छतावर पडणारे पाणी पन्हाळी लावून, तसेच इमारतींच्या आवारात पडणारे पाणी एकत्र करून टाकीमध्ये, बोअरवेलमध्ये साठवण व शुद्धीकरण करून त्याचा बगीचा, वाहने धुणे, संडासच्या फ्लॅससाठी वापरणे. अशाच प्रकारे फक्त इमारतींच्या गच्चीवर किंवा छपरावर पडणारे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा उपयोग पिण्यासाठीसुद्धा करता येतो. कच्छ, राजस्थान मध्ये प्राचीन काळापासून असे साठविलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. शहरी भागामध्ये अशाप्रकारे साठविलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून आपल्या गरजेनुसार वापरणे ही पद्धत मोठ्या सोसायटीमधील इमारती, बंगले या दोन्हींकरता उपयुक्त आहे.

अशा प्रकल्पांची आखणी करताना त्या भागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, गच्चीचे क्षेत्रफळ इमारतीच्या आवाराचे क्षेत्रफळ, साठवणूक केलेल्या पाण्याचा विनियोग कशासाठी होणार? साठवणूक टाकीच्या बांधकामाचा खर्च (अंदाजे २० रु./ लिटर) या मुद्याचा विचार करावा लागतो.

या प्रकल्पांच्या रचनेमध्ये छपरावरून पडणारे पाणी गोळा करण्यासाठीची पन्हाळी, पाइप, साठवणूक टाकी, पाणी टाकीमध्ये साठविण्याआधी गाळण्यासाठी फिल्टरची रचना, जास्तीचे पाणी सोडून देण्यासाठी (overflow) व्हॉल्व इ. साहित्य आवश्‍यक. हे पाणी पुन्हा वापरण्यासाठी एका घरासाठीची रचना साधी व सोपी असेल तर मोठ्या इमारतींमध्ये क्‍लिष्ट फिल्टरची संख्या, मोटर्स इ. चा वापर जास्त होतो.

साठवणीच्या पाण्याच्या टाक्‍यांची जागा शक्‍यतो जमिनीखाली करतात व या पाण्यावर सूर्यप्रकाश पडू नये यासाठी झाकण असावे. सर्वांत महत्त्वाचे कारण सूर्यप्रकाश पडल्यास या पाण्यामध्ये शेवाळं वाढेल. पाण्याला वास येईल, असे पाणी वापरायला अयोग्य होईल. साठविलेले पाणी पिण्यासाठी वापरायचे असल्यास विशेष काळजी घेणे अवश्‍य आहे. फक्त छप्पर किंवा गच्चीवर पडलेल्या पावसाचेच पाणी जमा करावे. यासाठी पहिले दोन पाऊस पडलेने पाणी टाकीत जमा न करता बाहेर सोडून द्यावे. नंतरचे पाणी जमा करण्यापूर्वी फिल्टर करून मगच टाकीत सोडावे. पिण्यासाठीच्या पाण्याची साठवणूक टाकी पावसाळ्यापूर्वी आतून घासून घ्यावी. तिला आतून चिरा, फटी नाहीत याची खात्री करावी. अन्यथा जमिनीतील पाण्याबरोबर ड्रेनेजच्या पाण्याबरोबर संपर्क होऊन आतील पाणी दूषित होईल. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी/ जंतुविरहीत होण्यासाठी योग्य प्रमाणात पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करावा. तसेच या पाण्याची नियमित तपासणी करून घेणे (एम.पी.एन. टेस्ट) महत्त्वाचे.

सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर ः यामध्ये बाथरूममध्ये बेसिनमध्ये, भांडी घासण्यासाठी, वॉशिंग मशिनमधील एकदा वापरलेले पाणी शुद्ध करून संडासमधील फ्लशिंगसाठी, बागेसाठी, वाहने धुण्यासाठी वापरता येईल. थोडक्‍यात मैलापाणी मिश्रित न झालेले घरगुती सांडपाणी यासाठी वापरता येईल.

आता नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशिष्ट वनस्पती व जिवाणूंच्या साहाय्याने सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे सोपे झाले आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमधून सोसायटी, हॉटेल्स, मॉल यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करता येते. वापरता येण्याजोगे पाणी परत मिळते व सुंदर फुलांच्या सान्निध्यात परिसर सुशोभित होतो. विशेषतः कर्दळीच्या झाडांना यासाठी उपयोग होतो. अशा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते, ही अडचणी आहे.

सर्वांत शेवटी आपल्याकडे म्हणजे भारतातसुद्धा हरित इमारत (Green Building) मूल्यांकन (Rating) पद्धत आता वापरली जात आहे. सरकारी पातळीवर ‘हरित इमारत’ ही संकल्पना जास्त प्रमाणात वापरली जावी म्हणून करसवलत देणे व शुल्कांमध्ये सवलती देणे सुरू झाले आहे. थोडक्‍यात घरांच्या गृहरचना व कार्यालयांच्या जागी अशा प्रकारच्या ‘हरितरचना’ वापरून पर्यावरणाच्या अनुकूल लागते तर भविष्यात पश्‍चात्ताप करण्याची वेळ जाणार नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या