कपाट आवरण्याची गोष्ट 

 प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 22 मार्च 2018

ब्लॉग      

तुम्ही, निवांत पसरलेले असता गादीवर... रविवारची सकाळ ही देवाने फक्त आणि फक्त उशिरापर्यंत झोपण्यासाठीच निर्माण केलीये अशी समजूत असते तुमची आणि या समजुतीवर नितांत श्रद्धाही! ’रविवारी सकाळी कोण आणि कशासाठी माझ्या खोलीत येईल’ असा फालतू आत्मविश्वास तुमच्या डोक्‍यात भिनलेला असतो. आणि हीच संधी साधून, तुम्हाला बेसावध गाठून ’आई’ नामक गनिम तुमच्या खोलीवर हल्ला चढवतो. तिला अचानकच तुमचं कपाट-कपडे वगैरे आवारायची खुमखुमी चढते. 

क्‍लाएंट मीटिंग १० वाजता असतानाही अंगावरचं पांघरूण ९.३० ला क्‍लाएंटवर उपकार केल्यासारखं दूर करणारे तुम्ही, उसेन बोल्टला मागं टाकत नॅनो सेकंदात कपाट आणि आईमध्ये स्वतःची भिंत उभी करू पाहता. पण मग खोलीकडं नजर गेल्यावर तुमच्या लक्षात येतं, की तुमचे कपडे कपाटात आहेतच कुठं? ऑफिसमधून आल्यावर काढलेल्या कुर्ती खुर्चीवर, जीन्स दारामागं लटकलेल्या, इस्त्रीचे कपडे कूलरवर, रात्री घालायला म्हणून घेतलेला टीशर्ट बेडखाली असा गावभर मुक्त वावर असतो तुमच्या कपड्यांचा.

 मुळातच कपडे कपाटात आवरून वगैरे ठेवणं ही अंधश्रद्धा आहे, त्यातही कुर्ती या बाजूला, जीन्स इकडं, शॉर्ट कुर्ती तिकडं, रुमाल या कोपऱ्यात, स्कार्फ या बाजूला, जीन्स इकडं, इस्त्रीचे कपडे या कप्प्यात हे असं करणं म्हणजे कपड्याकपड्यात भांडण लावून देण्यासारखं आहे असं प्रामाणिक वगैरे मत आहे माझं. कशाला रिस्क घ्या. सगळं कसं मिळून मिसळून राहायला हवं आणि होतं कसं माहितीय का? हे असं सगळं वेगवेगळं ठेवलं, की उलट काहीच वेळेवर सापडत नाही आणि त्यापुढं जर तुम्ही हिंमत करून आईला विचारलंच ’आई ग.. ती माझी निळ्या रंगाची कुर्ती सापडत नाहीये, कुठं ठेवली ग तू..?’ तर त्यावर...’कोणती कुर्ती.. एवढे कपडे आहेत तुझ्याकडं.. तीच कशाला पाहिजे.. निळी म्हणजे नक्की कशी निळी... तर अशी कोणती कुर्ती आठवत नाहीय इथपासून ते कपाट उघड, खालून तिसऱ्या कप्प्यात उजवीकडं ठेवलीय बघ..’ अशी सगळी उत्तर मिळतात. 

 तुम्ही कपाट उघडता. खालून तिसरा कप्पा शोधता. उजवीकडं बघता. डावीकडं बघता. निळ्या रंगाचा मागमूसही दिसत नाही तुम्हाला. वैतागून तुम्ही तिला बोलावता आणि ती त्याच तिसऱ्या कप्प्यातून तुम्हाला ती कुर्ती काढून देते. चेहऱ्यावर ’कसं होणारं तुझं.. स्वतः काही करायला नको...उद्या लग्न झाल्यावर पण मलाच विचार फोन करून’ इत्यादी भाव तुम्हाला दिसून येतील. याकडं पुरेपूर लक्ष देऊन ’हां’ एवढंच म्हणायचं. आईनं कपाट आवरणं हा तुमच्यासाठी भयानक प्रकार असतो. कपाटातला जिवापाड जपलेला खजिना तिच्या हाती सोपवताना जिवावर येतं तुमच्या. तरीही समजा तिनं आवरायला सुरवात केलीच तर तुम्ही तिथंच एका बाजूला बसून राहता, बापुडा, बिचारा चेहरा करून. कपाट उघडलं, की तिला जाणीव होते जगभरातले सगळेच कपडे तिच्या मुलीकडं आहेत आणि मग सुरू होतं ’एवढे कपडे असताना कधीच कसं काही घालायला नसतं तुझ्याकडं’चं प्रवचन.  

मग ती काही बेसिक प्रश्न विचारायला सुरवात करते.

’काळा आणि निळा हे दोन रंग सोडून दुकानांमध्ये कधी काही नसतं का ?’

’हा दोन वर्षांपूर्वी घेतलेला टॉप तू एकदाच घातलायेस, असं का ?’

’हे प्रकरण मुळात घेतलंच का होतं?’

’हे असे कपड्यांचे बोळे करून चुरगाळून कप्प्यात कोंबून ठेवण्यामागं तुझा नक्की उद्देश काय होता?’

’या फाटक्‍या जीन्स नकोयेत का तुला... राणीचा (कामासाठी येणाऱ्या बाईंचा) मुलगा यांच्या हाफ चड्ड्या तरी करून वापरेल..’

’कधी घेतला होता हा टॉप .. तू अजून एकदाही आवडीनं घातला नाहीयेस ’

जीन्सच्या खिशात चुकून एखादं बिल मिळालं, की इटरी ॲण्ड बार... तू दारू पिते ?’

’इथं कपड्यांच्या मागे लायटर का आहे? तू स्मोक करते का? तरीच खोलीचा दरवाजा लावून बसलेली असते सतत...’

’हे कशाला हवंय तुला .. जुना झालाय देऊन टाकं’

’ते कशाला हवंय तुला.. देऊन टाक.’

एकूण काय तर सगळंच देऊन टाक. 

या जिवावरच्या प्रसंगातून कसेबसे निभावून नेता तुम्ही. ती कौतुकानं तुमच्या नीटनेटक्‍या लावलेल्या कपाटाकडं बघत असते. तुम्हाला सगळे नियम, नव्या रचना समजावून सांगत असते. झालंच तर वरच्या घड्या न हलवता हवा तो टॉप कसा अलगद बाहेर काढायचा याचं प्रात्यक्षिक दाखवून तुम्हाला प्रशिक्षणही देते. तुम्ही बिचाऱ्या चेहऱ्यानं सगळं ऐकता आणि ती खोलीबाहेर जाते. 

’बासच झालं आता, पुढच्या आठवड्यात आली ना कपाट बघायला, की बघूनच शॉक होईल एवढं नीट ठेवणारे मी कपाट. बघेलच ती. ’तुम्ही कपाटाच्या आरशात स्वतःकडं पाहत भीष्मप्रतिज्ञा केल्याच्या थाटात उभं राहता. इतक्‍यात फोन वाजतो. त्याचा मेसेज.  १२ वाजता भेटतोय ना आपण? अरे बाप रे.. तासभरच राहिलाय.. काय घालू.. तो ब्लॅक टीशर्ट इथंच तर ठेवला होता...’आई गं.. तो टीशर्ट कुठेय..कोणता  कप्पा ..नाही दिसते इथं.. तू का आवरते माझं कपाट...तू हातच का लावते माझ्या कपड्यांना?’  

संबंधित बातम्या