खापरपोळी, गवसळ्या, पराठे

गिरिजा वसंतराव काळे, बार्शी
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूडपॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

जमाई पराठा
साहित्य : दोन कप मैदा, १ कप कणीक, २ चमचे तूप, थोडी खसखस, थोडी बडीशेप, कोमट दूध व पाणी भिजवायला.
कृती : नेहमीप्रमाणे पीठ भिजवावे. किचन ओट्यावर मोठी पातळ पोळी लाटावी. त्याचे ६ गोल कापावे. प्रत्येक पोळीवर तेल व पिठी लावावे. एकावर एक तीन पोळ्या रचाव्यात. दोन सेट तयार होतील. तव्यावर टाकताना दोन्ही बाजूला पाणी लावून पोळी टाकावी. वरच्या भागात बडीशेप खसखस थोडी पेरा व जरा दाबावे. मंद गॅसवर तूप सोडून भाजावे. किंवा फुलक्‍याप्रमाणे गॅसवर भाजावे.

पानगी 
साहित्य : एक वाटी तांदळाचे पीठ, १ मोठा चमचा लोणी, अर्धी वाटी दूध, २ चमचे साखर, पाव चमचा खायचा सोडा, मीठ, केळीची पाने, पाणी इत्यादी. 
कृती : दूध थोडे कोमट करून त्यात साखर, लोणी, चवीपुरते मीठ घालावे. त्यात थोडा खायचा सोडा मिश्रण तयार करावे. तांदळाचे पीठ त्या मिश्रणात घालून कालवावे. मिश्रण सैलसर ठेवावे. (इडलीप्रमाणे) जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. केळीच्या पानावर तांदळाचे मिश्रण पसरून दुसरे केळीचे पान त्यावर ठेवावे. तव्यावर पोळीप्रमाणे पानगी भाजावी. पानगीची एक बाजू भाजून झाल्यावर वरचे केळीचे पान काढून टाकावे. आणि पानगीची दुसरी बाजू भाजावी.

नारळाचे कोफ्ते
साहित्य : एक मोठ्या आकाराचा नारळ, लहान दीड चमचा मीठ, १ वाटी डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पनीर, १ वाटी नारळाचे तेल, २ छोटे चमचे भाजलेले चण्याचे पीठ, २ चमचे धनेपूड, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, जिरे, हिंग.
सजावटीसाठी साहित्य : किसलेले खोबरं, बारीक कोथिंबीर, 
कृती : नारळ खवून त्यात पनीर कुस्करून टाकावे. पनीर व किस चांगला एकत्र करून त्याचे गोळे तयार करावे. डाळीचे पीठ पाण्यात कालवून भज्याच्या पीठासारखे मिश्रण असावे. एका कढईत तेल गरम करून पनीर नारळाचे गोळे, भज्यासारखे चण्याच्या पिठात बुडवून तळून काढावे. गोळे सोनेरी रंगात तळावे. नंतर उरलेल्या तेलात हिंग, जिरे टाकून सगळे मसाले खमंग तळून घ्यावे. त्यात भाजलेले चण्याचे पीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालावे. दाट ग्रेव्ही तयार होईल. ग्रेव्हीला उकळी आली, की त्यात गोळे टाकून शिजवावे. या कोफ्त्यावर खोबरे व कोथिंबीर टाकावी. आणि भाताबरोबर खायला द्यावे.

खापरपोळी
साहित्य : दोन वाट्या तांदळाचे पीठ, १ टीस्पून मेथीची पूड, अडीच वाट्या दूध, अर्धा चमचा वाटलेले आलं, तूप, चवीपुरते मीठ, रसासाठी एका मोठ्या नारळाचे दीड ते दोन वाट्या दूध, दीड ते दोन वाट्या गूळ, १ चमचा वेलची पूड.
कृती : आदल्या रात्री तांदळाचे पीठ व मेथीची पूड टाकून जाडसर भिजवावे. सकाळी फुगून आलेल्या पिठात गरजेनुसार थोडे पाणी, थोडे मीठ व आवडत असल्यास आले घालून सरबरीत करावे. नंतर नारळाच्या दुधात गूळ व वेलची विरघळून ते बाजूला ठेवावे. मातीचे खापर किंवा तवा तापवून त्याला तूप लावावे. नारळाच्या शेंडीने तवा पुसून त्यावर २ डाव पीठ घालावे. व मध्यापासून कडेपर्यंत गोल गोल पसरत जावे. जाळी पडली, की थोडे तूप सोडून झाकण ठेवावे. नंतर उलटून दुसरी बाजू भाजावी. थोडा तांबूस रंग आला, की नारळाच्या दुधात भिजत घालून खापरपोळी खायला द्यावी. 

कॉर्न मशरूम स्ट्यू
साहित्य : दोन कप कॉर्न, १ कप ओले काजू, १ कप मोड आलेले मूग, १ कप मशरूम, १०-१२ लहान कांदे, १ चमचा आलं लसूण पेस्ट, ४-५ हिरव्या मिरच्या, २ लवंगा, २ दालचिनी काड्या, ७-८ मिरी, १ नारळ, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा राई, कढीपत्ता, हिंग, मीठ, तेल व १ चमचा कॉर्नफ्लॉवर इत्यादी.
कृती : दोन कप नारळाचा जाड रस व उरलेल्या चवाचा १ कप रस काढून घ्यावा. तेलात संपूर्ण मसाला घालून लहान कांदे परतावे. तिखट व हळद घालावे. आलं, लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसणाचा वास जाईपर्यंत परतून घ्यावे. नंतर नारळाचा रस कॉर्न, काजू, मूग सर्व एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. पातळ रस पूर्णपणे आटल्यावर त्यात नारळाचा जाड रस, मीठ व मशरूम रस्सा जाड होईपर्यंत ढवळत राहावे. कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात मिसळून वरील स्ट्युमध्ये घालावे. पुन्हा ढवळून घ्यावे. एक उकळी येताच बंद करावे. दोन चमचे तेलात राई, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करावी. ती फोडणी रस्स्यात घालावी. हा स्ट्यु भाताबरोबर किंवा डोशाबरोबर सर्व्ह करावा.

गोड वाटी
साहित्य : तीन वाट्या गव्हाची जाडी कणीक, अर्धी वाटी डाळीचे पीठ, १ वाटी गोड घट्ट दही, १ वाटी साखर, अर्धी वाटी तेल, १५० ग्रॅम साखर, २ चमचे भाजलेले तीळ, २ चमचे खसखस, ४ चमचे किसून भाजलेले खोबरे, अर्धे जायफळ पूड, ५-६ काजूचे तुकडे, ४ वेलदोडे, चारोळे, चवीपुरते मीठ, हळद, तेल, थोडी साधी कणीक.
कृती : दह्यात साखर व जायफळ पूड मिसळावी. साखर विरघळेपर्यंत कणीक, डाळीचे पीठ, तीळ, खसखस, खोबरे, चिमूटभर मीठ व पाव चमचा हळद एकत्र करून त्याला तेलाचे मोहन नीट चोळून घेऊन दही घालून भिजवावे. दोन तास झाकून ठेवावे. साट्यांसाठी ५ चमचे तूप पातळ करून दोन चमचे कणीक मिसळून फेसून घ्यावी. भिजलेली कणीक तेल व पाण्याचा हात लावून मळून घ्यावी. हाताला रवाळपणा लागत असल्यास पाणी जास्त वापरावे. मुठीत मावेल एवढा गोळा तयार करावा. असे १७ ते १८ गोळे तयार होतील. प्रत्येक गोळा हातावर नीट मळून पुरीप्रमाणे गोल करावा. त्याला दोन बोटे साटा लावून दुमडून घ्यावे. असे दोनदा करावे. गोळा खोलगट करून काजू तुकडा, २-३ चारोळी, वेलची दाणे, ठेवून चपटा बनवावा. अंगठ्याने दाबून त्या बाजूस खसखस लावावी. अशा सर्व वाट्या करून सोलर कुकरच्या मोठ्या डब्यात तेल लावून रचून ठेवावे. वर थोडा पाण्याचा शिपका देऊन झाकण लावून दोन तास भाजून काढावे. खाली उतरल्यावर स्टीलच्या तरसाळ्यात तूप लावून त्यात प्रत्येक वाटी मुठीने दाबून सोडावी. वरून आणखी तूप सोडावे. दोन तीनदा खालीवर करावे. सोलर कुकर असल्यास ओव्हनमध्ये १६० सेल्सिअस अंशावर अर्धा तास ठेवावे. ओव्हनमध्ये लाल रंग येत नाही. बाहेर काढल्यावर चिरा देऊन तुपात सोडावे. झाकून ठेवावे. या गोड वाट्या मुलांना नुसत्याच आवडतात. थंड झाल्यावर दुधात कुस्करून किंवा जेवणात वरणाबरोबर कुस्करून देता येतात.
पौष्टिक वड्या
साहित्य : एक वाटी शेंगदाण्याचा कूट, १ वाटी तिळाचे कूट, २ वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या, १ वाटी सुक्‍क्‍या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी भाजलेली खसखस, अर्धी वाटी किसलेला गूळ, १ टीस्पून जायफळ पावडर, १ टीस्पून वेलदोडा पावडर, २ टीस्पून तूप.
कृती : गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवावे. त्यात गूळ घालून हलवत राहावे. पाणी अजिबात नको. गूळ विरघळून त्यावर बुडबुडे येतील. तेव्हा तूप सोडावे. गॅस बंद करावा. सर्व साहित्य पातेल्यात ओतावे. ते एकजीव करावे. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रणाचा घट्ट गोळा त्यात ओतावा. एका प्लॅस्टिकच्या कागदाला तूप लावून तो कागद त्या गोळ्यावर ठेवावा व लाटण्याने तो ताटात पसरवा. ताबडतोब सुरीने वड्या पाडाव्यात.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या