विंचवाचं बिऱ्हाड 

मृणालिनी वनारसे  
गुरुवार, 22 मार्च 2018

गंमत गोष्टी  

पडक्‍या भिंतीतले रहिवासी म्हणजे एक मिश्र समाज होता. तिथं रात्रपाळी करणारे प्राणी होते, दिनपाळी करणारे होते. शिकार करणारे होते, शिकार होणारेही होते. रात्री तिथले शिकारी होते छोटे जाडेभरडे बेडूक आणि गटाणे डोळे असलेले सरडे. त्यांचं सावज होत्या भिंतीत गुं गुं करत हिंडणाऱ्या मूर्ख माश्‍या, पोपड्यांना चिकटून बसणारे विविध आकारांचे पतंग, काळ्या सुटातले टिपटॉप राहणारे भुंगे.. त्यांना त्यांचं काम वेळेत संपवायची कोण लगबग. एखाद्या चमचमत्या काजव्यानं रात्रभर उघडमीट करून थकलेलं आपलं अंग हिरव्या शेवाळ्याच्या बिछान्यावर लोटून दिलं, की सूर्योदय होई. मग इथं जे जग अवतरत असे त्यात शिकारी कोण आणि सावज कोण हे ठरवणं फार अवघड होतं. गांधीलमाश्‍या अळ्या आणि कोळी यांच्या शोधात असायच्या, कोळी माश्‍यांची शिकार करायचे. विविधरंगी चतुर माश्‍यांवर आणि कोळ्यांवर ताव मारायचे. दबा धरून बसणाऱ्या आणि वेळ आल्यावर अति चपळाई दाखवणाऱ्या पाली सगळंच फस्त करायच्या. 

या सगळ्या भाऊगर्दीत ते सगळ्यात लाजरे आणि तरीही सगळ्यात खतरनाक होते. सहजी दिसायचे नाहीत, शोधावं लागायचं आणि एकदा दिसू लागल्यावर शेकडोंनी दिसायचे. भिंतीपासून विलग होत आलेला एखादा पोपडा हातानं अलगद सुटा करावा आणि खाली काय दिसतंय बघावं.. एक इंचभर लांबीचा, जणू काही चॉकलेटचा बनला असावा असा विंचू! अत्यंत विचित्र दिसणारा प्राणी. त्याचं ते अंडाकृती धड, फेंगडे पाय, खेकड्यासारखे पंजे, मण्यांच्या माळेसारखी दिसणारी दंशाला सज्ज शेपटी.. सारंच मोठं बघण्यासारखं. बघू द्यायचं ते मला, न्याहाळू द्यायचं अगदी मनसोक्त.. माझा श्‍वास त्यांच्या अंगावर जरा भारी झाला तर मधून मधून शेपटी उंचावून नम्रपणं सावध सूचना द्यायचे, ‘गड्या, कुणाला बघतोयस, कळतंय ना!?’ त्यांना मी खूप वेळ उन्हात ठेवलं तर मात्र ते सावकाश आपला पाय काढता घ्यायचे आणि माझ्याकडं पाठ फिरवून भिंतीच्या दिशेनं चालू लागायचे. एखाद्या पोपड्याखाली अदृश्‍य व्हायचे. 

मला या विंचवांचा फारच लळा लागला, त्यांची संगत अगदी आवडू लागली. किती छान होते ते, कुठल्याही अवास्तव मागण्या नाहीत, खायला हेच हवं तेच नको नाही आणि एक वेगळाच डौल चालण्यावागण्यात! अर्थात त्यांच्यावर तुम्ही बेपर्वाईनं हातबित ठेवलात तर मग संपलंच सगळं. पण त्यांची खरी गोम एकच होती, तुरुतुरु चालून भिंतीत लपून बसण्याची. मी म्हणजे त्यांना अगदी डोक्‍यावर बसलेला प्राणी वाटत असलो पाहिजे. मी सर्वकाळ भिंतीचे पोपडे काढत राहायचो, त्यांना काचेच्या बाटलीत चालायला लावायचो. मला त्यांचं निरीक्षण करायचं होतं. त्यांना हे मोठं संकट वाटत असलं पाहिजे. भिंतीच्या पोपड्यांच्या आत मी असे अनेक विंचू पाहिले होते. त्यांचं खाणं वैविध्यपूर्ण होतं, ते काहीही खाऊ शकायचे.. चतुर, माश्‍या, पतंग... अगदी एकमेकांनासुद्धा ते खाऊ शकायचे. या इतक्‍या सद्‌गुणी प्राण्यांची ही सवय काही मला अर्थातच फार पसंतीला यायची नाही. 

गंमत म्हणजे मी त्यांचा नर-मादी नाच पण पाहिला होता. शरीरं आकाशाच्या दिशेनं उंचावलेली, पंजे एकमेकांत गुंतवलेले असे ते एकमेकांसोबत नाच करायचे. मी विजेरीच्या प्रकाशात ते नृत्य बघण्याचा प्रयत्न करायचो. पण मी बघतो आहे हे कळताच त्यांचा नाच थांबायचा आणि ते शांतपणं भिंतीच्या आत निघून जायचे. मोठे प्रायव्हसी जपणारे प्राणी होते ते. तो नाच नीट पाहायचा, तर मला एकट्यादुकट्या नाही, विंचवांची सबंध वसाहत पाळणं भाग होतं.. आणि या गोष्टीला मला घरून कधीच परवानगी मिळाली नसती. कधीच!!

 

संबंधित बातम्या