मृत्यू... माझा सखा

डॉ. विद्याधर बापट,
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

‘मृत्यू’ ही जीवनातील अटळ सत्यता असते, पण या विषयी आपण पुरेसे जागरूक असतो का? मृत्यू पावलेली व्यक्ती अापल्या भावनिक दृष्ट्या किती जवळची होती, यावर दु:खाची तीव्रता आणि कालावधी अवलंबून असतो. अशावेळी आपल्या भावभावनांचे नियोजन कसे करायला हवे? या  याविषयी...​

श्रीगणेश विसर्जन, अनंत चतुर्दशी झाली की पितृपक्ष सुरू होतो. पितरांना स्वस्थता मिळावी म्हणून परंपरेने काही गोष्टी काही व्यक्ती करतात. काहीजण श्रद्धापूर्वक करतात तर काहीजण नाही केलं तर उगीच काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून करतात. काहीजण अजिबात काही करत नाहीत. काहीजणांना नवीन गोष्टी करायला हे दिवस फारसे चांगले नाहीत असं वाटतं. बाकीच्यांना तसं नाही वाटत. सत्य कुणालाच छातीठोकपणे सांगता येत नाही. पण ‘मृत्यू’ या सत्याची जाणीव, आठवण सगळ्यांना होऊन जाते हे खरं.

माझाही मृत्यू कधीतरी होणारच आहे. ते एक अटळ सत्य आहे हे नेणिवेच्या पातळीवर प्रत्येकाला समज आल्यापासून ठाऊकच असतं. आपण जन्माला येतानाच बरोबर आपल्या मृत्यूचा क्षण घेऊन येतो. आपल्या कळायला लागल्यापासून, पुरेशी अस्तित्वाविषयी जाणीव झाल्यापासूनच, आपल्याला हे ठाऊक असतं; पण जाणीवपूर्वक आपण हे सत्य आपल्यापासून जितक्‍या दूर ठेवता येईल तेवढं ठेवत असतो. पण कुणाच्या मृत्यूविषयी काही कळलं, जवळच्या, माहितीतल्या कुणाचा मृत्यू झाला, की हे सत्य पुन्हा काही क्षण नेणीवेतून आपल्या जाणिवेच्या पातळीवर येतं. एकूण जीवन आणि त्याच्या अस्तित्वाबद्दलचं आपलं जेवढं समज जेवढी मॅच्युरीटी असेल तितका आपल्याला त्रास होतो. त्याचबरोबर मृत्यू झालेली व्यक्ती भावनिक दृष्ट्या आपल्या किती जवळची होती हेही महत्त्वाचं असतं. दु:खाची तीव्रता आणि दु:खाचा कालावधी व्यक्तीगणिक बदलत असतो. संशोधन सांगत, की प्रत्येक व्यक्तीचा जेनेटिक (आनुवंशिक) मेकअप, लहानपणापासून ती कशी वाढवली गेलीय, तिचा स्वतःचा भावनिक मेकअप, मानसिक जडणघडण या गोष्टींवर तिचं दु:ख वाटणं आणि व्यक्त करणं अवलंबून असतं. काही व्यक्ती निसर्गत:च जास्त भावनाप्रधान असतात, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत तशी असते तर काहींची विचार करण्याची प्रकृती बुद्धी किंवा विवेकाधिष्ठीत असते त्या बॅलेन्सड व्यक्त होतात. कुठलीच पद्धत बरोबर किंवा चुकीची मानता येत नाही. काहीजण मोकळेपणाने दु:ख व्यक्त करतात तर काही आतल्याआत घुसमटत राहतात. काहीजणांना अशावेळी खूप माणसं आसपास असावी असं वाटतं तर काहींना एकटं राहणं हवं असतं.

दु:ख व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी काही घटक नेणिवेच्या पातळीवर महत्त्वाच्या असतात, विशेषत: कुटुंबातील व्यक्ती असेल तर -

मृत व्यक्तीशी असलेलं भावनिक नातं  मृत व्यक्ती पुन्हा कधी दिसणार नाही, तिच्याशी संवाद होणार नाही, भावनांचं आदान प्रदान करता येणार नाही ही जाणीव मृत्यू या न टाळता येऊ शकणाऱ्या सत्याविषयी अनामिक भीती आसपासचे सर्व आणि आपण स्वतः: कधीतरी मृत होणार आहोत हे सत्य. (आणि ‘कधी’ हा प्रश्न ) या गोष्टी खूप आत दडलेल्या असतातच. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर आर्थिक व्यवस्था, मुलाबाळांची शिक्षणं, मुलींची लग्न इत्यादीचे ताण लगेचच जाणवू लागतात. इतर मार्ग निघू शकतील हा विवेकाधिष्ठित किंवा practical, Solution oriented विचार या वेळी स्पर्श करीत नाही.

अर्थात व्यक्ती भावनिक दृष्ट्या कणखर असेल तर असं विचार होतोही आणि परिस्थिती पटकन काबूत येते. मृत्यू झाल्यानंतर जसे जसे दिवस जातील तसं सत्य स्वीकारायला मन तयार होतं. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत या साठी खूप काळ जावा लागतो. काहीवेळा व्यक्ती गेलीय हे मानायलाच मन तयार होत नाही. ती आसपास आहे. पुन्हा अचानक भेटेल अशा पद्धतीचे विचार काही जणांच्या मनात येऊ शकतात. अतिभावनाप्रधान व्यक्तींच्या बाबतीत असहाय्य वाटणं, भीती वाटणं, आयुष्यातला रस नष्ट होणं अशा गोष्टी घडू शकतात. काहीजणांना तीव्र धक्‍क्‍याने वाचा बसणं, बेशुद्धी येणं, तीव्र डोकेदुखी, बरेच दिवस झोप न येणं अशा गोष्टी घडू शकतात.

सुतकाचे दिवस 
व्यक्तीच्या मृत्यूनंतर करायच्या विधींबद्दल अनेक विचार मनात येत राहतात. त्यातले काही प्रातिनिधिक विचार पुढील प्रमाणे असू शकतात.-
दिवा, दहावा, तेरावा  वगैरे आपण केवळ कुठल्यातरी भीतीपोटी करतोय का? केवळ रूढी म्हणून हे करतोय की खरोखरच मृत व्यक्तीला (आत्मा मुक्त होण्यासाठी, शांती लाभण्यासाठी) त्याचा फायदा होणार आहे? गुरुजी सांगतायत, की नारद पुराणात, गरूड पुराणात वगैरे असं लिहिलं आहे. ते खरच तसं आहे, की गुरुजी लोकांचा आर्थिक फायदाच यात आहे? याचं खरं उत्तर माहिती नसल्यामुळे करून टाकलेलं बरं. झाला तर आपल्या मृत व्यक्तीला त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीचे विचार काहीजणांच्या मनात येत असतात.  क्‍लॅयारिटी नसल्याने अशी लोकं मग हे विधी गोंधळलेल्या अवस्थेत का होईना करून टाकतात. त्यामुळे घरातल्या मोठया व्यक्ती, नातेवाईक, ओळखी पाळखीचे ह्यांना रुढीप्रमाणे सर्वं पार पडल्याचं समाधान मिळते.

     काही जणांचा धार्मिक विधींवर पूर्ण विश्वास असतो. ते गुरुजी सांगतील ते ते पूर्ण श्रद्धेने करतात.
     काहीजण ठामपणे नंतरच्या अवडंबराला विरोध करतात आणि सुतकातले काहीही करत नाहीत. अशांना बऱ्याचदा टीकेचे धनी व्हायला लागतं. पण ते ठाम असतात.

     घरातल्या एखाद्या व्यक्तीला, लहान मुलांना, वाढत्या वयातील मुलांना मृत्यूविषयी आणि नंतरचे तेरा दिवस, घाटावरचे विधी, केस कापणे, चौदाव्या दिवशी नवीन वस्त्र मिळणे वगैरे गोष्टींविषयी बऱ्याचदा त्यांना कळेल अशा पद्धतीने समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे हे काहीतरी अशुभ चाललंय अन् ते लवकर संपावं असंही वाटतं. या सगळ्यांना मृत व्यक्तीविषयी वाईट वाटणं, तीव्र दुख: असतंच पण बाकीचे, रुढींचे  अवडंबर नको वाटतं.

जवळच्या नातेवाइकांच्या मनात येणारे प्रातिनिधिक विचार 
माझ्याच बाबतीत हे का घडावं? माझं काही चुकलं का? उपचारांमधे काही कमी पडलं का? आता मृत व्यक्ती कुठं असेल? तिला हे चाललेलं कळत असंल का? मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे? परमेश्वराने, निसर्गाने जन्म आणि मृत्यू निर्माण का केला असावा? त्यातून त्याला काय अपेक्षित असावं? गेलेल्या व्यक्तीला मृत्यू कधी येणार आहे, हे आधी कळलं असेल का? मृत्यूनंतर पुनर्जन्म नक्की आहे का? प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या गोष्टी कशा आणि का सांगितल्या आहेत? गेलेली व्यक्ती आपल्याला आपल्या पुढच्या जन्मात पुन्हा भेटेल का? चुकून घरात लावलेला दिवा त्या दिवसात विझला तर काही विपरीत घडलं नसेल ना? मला रडायला का येत नाहीय? मला पुरेसं रडायला येतंय ना? मी लवकर कामाला जाऊ लागले/लागलो तर लोक काय म्हणतील? मी रहात असलेलं घर अपशकुनी नाही ना? घरातील इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने जागा बदलावी काय? हे आणि असे असंख्य प्रश्न मनात येऊ शकतात. 

वास्तवाचा स्वीकार 
 आपली श्रद्धा कुठल्याही तत्वज्ञानावर असो एक गोष्ट निश्‍चित लक्षात घ्यायला हवी, की घडलेली दु:खद घटना ही बदलता न येणार आहे. मृत व्यक्ती कधीही परत येणार नाही. सत्याचा स्वीकार आपल्याला निसर्गाचा मान राखून करायलाच हवा. ज्या व्यक्तीचं जवळचं कोणी गेलंय तिला तिला इतर आप्तांनी व मित्र मैत्रिणींनी जरूर भेटावं, या दु:खद प्रसंगी तू एकटी/एकटा नाहीस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत याची जाणीव द्यावी. मोकळेपणानं रडू द्यावं. त्याचबरोबर प्रत्येकाची दु:ख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते याची जाणीव ठेवावी. नेमकं काय घडलं (मृत्यूच कारण, घटना इ.) विषयी प्रत्येकानं विचारत बसू नये. ते काम त्या व्यक्तीच्या मागे कोणी दुसऱ्याने करावं. व्यक्तीला उभारी येण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी पण त्याच बरोबर हेही लक्षात असू द्यावं, की प्रत्येकाचा भावनिक, मानसिक मेकअप वेगळा असतो. त्यानुसार प्रत्येकाला दु:खातून पुन्हा उभं रहायला, वेगवेगळा कालावधी लागणारच. काळ आणि वेळ ही औषधे आहेच. लहान मुलांनाही त्यांना समजेल अशा भाषेत हळू हळू या निसर्गप्राप्त अटळ घटनेची ओळख करून द्यावी. त्यांना या घटनेविषयी भीती निर्माण होता कामा नये. एक गोष्ट नक्की, की जवळच्या माणसाच्या मृत्यूचं दु:ख होणारच आणि त्या व्यक्तीच्या आठवणी येत राहातातच. पण या दु:खद परंतु अपरिहार्य घटनेला, जाणीवपूर्वक unconditional acceptance आपण दिली, की या आठवणी आपल्यासाठी शक्ती बनून राहातात.

खरं तर ‘मृत्यू’ प्रत्येकानेच ‘शिकून’ घ्यायला हवा. ती एक अटळ, अपरिहार्य आणि सहज अशी नैसर्गिक घटना आहे. कॉस्मिक इंजिनिअरिंग प्रोसेस मधला एक भाग आहे, जिचा आपण सगळे एक घटक आहोत. आणि ‘मृत्यू’ म्हणजे एका अर्थी केवळ ॲनर्जी ट्रांसफॉरमिशनचा एक प्रकार आहे. हे सत्य नेहमीच लक्षात ठेवलं तर ‘मृत्यू’ ची भीती वाटत नाही आणि तो स्वीकारायला मदत होते. तो आपला सखा बनून जातो. 

संबंधित बातम्या