उद्याच्या संधी ‘त्यांच्या’साठी...

केतकी जोशी
सोमवार, 10 जानेवारी 2022

‘ती’ची गोष्ट

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, हे वाक्य आपण असंख्य वेळा ऐकलं असेल. पण जेव्हा प्रत्यक्षात संधी देण्याची वेळ येते तेव्हा तिच्या क्षमतांवर अजूनही शंका घेतली जाते. अर्थातच ही परिस्थिती बदलेल असं चित्र आता निर्माण होऊ लागलं आहे.

नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन वर्ष म्हणजे नवी स्वप्नं, नव्या अपेक्षा, नवी उमेद आणि नवीन संधीही… आपल्यापैकी काहीजणांना मागचं वर्ष म्हणजे २०२१ काहीसं कठीणच गेलं असेल. कोरोनाची महासाथ, लॉकडाउन, आर्थिक संकट, कमी होणाऱ्या रोजगाराच्या संधी, जीवलगांचे मृत्यू, आजारपणं... अशी अनेक संकटं होती. या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय शोधण्यात आला. जगभरात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला. घरून काम करताना महिला कर्मचाऱ्यांवर ताण जास्त आल्याचंही स्पष्ट झालं होतं. पण हातातील नोकरी जाऊ नये यासाठी बायकांनी जिवाचा आटापिटा करून ही तारेवरची कसरत केली. पण या नवीन वर्षानं मात्र महिलांसाठी आणि विशेषतः भारतातल्या महिलांसाठी एक गुड न्यूज आणली आहे...ही गुड न्यूज आहे नोकरीच्या संधींबद्दलची...

खरंतर महिला कितीही मोठ्या पोस्टवर काम करत असल्या तरी वेतन किंवा पगाराबाबत पुरुष आणि स्त्रियांमध्ये असमानता जगभरातच दिसते. पण आता मात्र संधींचा विचार केला तर भारतातील महिलांना रोजगाराच्या अधिक संधी असल्याचं ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२२’ मधून स्पष्ट झालं आहे. ‘व्हीबॉक्स’नं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतात रोजगारक्षम असणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही वाढ पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. भारतातील जवळपास ५५.४४ टक्के महिला रोजगारक्षम असल्याचं या अहवालामधून पुढे आलं आहे. पुरुषांपेक्षा ही संख्या १० टक्क्यांनी जास्त आहे. वर्ष २०२१मध्ये रोजगारक्षम महिलांची टक्केवारी ४१.२५ इतकी होती.

ही आकडेवारी सकारात्मक चित्र निर्माण करणारी असली तरीही महिलांना नोकरी देण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजेच अजूनही नोकरीसाठी पुरुषांना प्राधान्य दिलं जातं. २०२१मध्येही महिलांपेक्षा पुरुषांना नोकरी देण्याचं प्रमाण ३२ टक्के जास्त होतं असंही या अहवालात म्हटलं आहे. आता रोजगारक्षम असणं म्हणजे काय? तर त्या ठरावीक जॉबसाठी आवश्यक ते कौशल्य त्या उमेदवाराकडे असायला पाहिजे. यामध्ये महिलांनी बाजी मारली आहे. अगदी व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते एमबीए, बीटेक किंवा असं आवश्यक कौशल्य महिलांनी मिळवलं आहे. मात्र एखाद्या नोकरीसाठी आवश्यक ती सर्व कौशल्ये असूनही  केवळ महिला असल्याच्या कारणावरून तिला नोकरी नाकारली जाते, हे अजूनही आपल्याकडचं अत्यंत कटू वास्तव आहे. प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध करणाऱ्या, संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या, मेहनतीनं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्नं बघणाऱ्या लाखो तरुणींना अजूनही केवळ मुलगी आहे म्हणून संधी नाकारली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया स्किल्स’चा हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण यापुढे भविष्यात जेव्हा अशा कौशल्य असणाऱ्या, रोजगारक्षम कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल तेव्हा महिलांना प्राधान्य द्यावंच लागेल अशी परिस्थिती आहे. 

उद्याच्या संधी ‘त्यांच्याच’ असतील...

महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचं या अहवालामधून समोर आलं आहे. याचाच अर्थ जास्त प्रमाणात मुली आता उच्चशिक्षण घेऊ लागल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार ह्या अहवालासाठी जवळपास ६५ हजार उमेदवारांचं सर्वेक्षण करण्यात आलं.  ‘सीआयआय’, ‘एआयसीटीई’, ‘एआययू’, आणि ‘यूएनडीपी’ या सगळ्यांनी मिळून हे सर्वेक्षण केलं आहे.

महिलांना रोजगार देण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे हा अहवाल सांगतो. महाराष्ट्रासोबत तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातही महिलांना रोजगार देण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक आहे. खरंतर हरियानात रोजगारासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले तरीही रोजगार देण्यामध्ये हरियानाचा नंबर बराच खाली आहे.

भारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ६४ टक्के पुरुष आहेत तर ३६ टक्के महिला आहे. महिला कर्मचाऱ्यांचं सगळ्यांत जास्त प्रमाण बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे. इंटरनेट बिझनेस सेक्टरमध्ये महिलांचं योगदान ५४ टक्के आहे, असंही या अहवालामधून स्पष्ट होतं. सॉफ्टवेअर, फार्मा, इंटरनेट बिझनेस आणि बँकिंग, फायनान्शियल सर्विसेस आणि इन्शुरन्स या क्षेत्रांत कौशल्याची सर्वांत जास्त मागणी असल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. 

खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलं. अगदी ग्रामीण भागातही मुलींना आवर्जून शिकवलं जातं. किमान पदवी घेऊन तिनं आपल्या पायावर उभं राहावं असं मानणाऱ्या पालकांची संख्याही वाढली आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रांत शिक्षण घेऊन करिअर घडवणाऱ्या मुलींच्या संख्येतही वाढ होत आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या या मुली उद्याच्या ‘करिअर वूमन’ होऊ पाहताहेत. मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा एखाद्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इतर अनेकींना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. काही वेळा कामाची संधी देण्यात आली तरी नोकरीत वेतनातील असमानता, तिथे मिळणाऱ्या संधी, काम करण्याची पात्रता असूनही विश्वास न ठेवणं, कामच करू न देणं, एखादी सहकारी महिला आपल्यापुढे जाऊ नये यासाठी अनेक प्रकारांनी तिची कोंडी करणं या गोष्टी तर सर्रास घडतात. ‘पुरुषी मानसिकता’ हे यामागचं सगळ्यांत मोठं कारण आहे. अर्थातच ते एका दिवसात नष्ट होणारं नाही. कुटुंबाचा आधार, पाठिंबा, जोडीदाराची सोबत हे सगळं असेल तर या सगळ्यांना महिला तोंड देतात.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, हे वाक्य आपण असंख्य वेळा ऐकलं असेल. पण जेव्हा प्रत्यक्षात संधी देण्याची वेळ येते तेव्हा तिच्या क्षमतांवर अजूनही शंका घेतली जाते. अर्थातच ही परिस्थिती बदलेल असं चित्र आता निर्माण होऊ लागलं आहे. आज मात्र ‘इंडिया स्कील्स’च्या अहवालानुसार भारतातली रोजगारक्षम महिलांची संख्या वाढतच जाईल, असं चित्र आहे. जशी अनेक शिखरं महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पादाक्रांत केली आहेत, त्यात त्यांचा ठसा उमटवला आहे. तसंच रोजगारक्षम होणंही अचानक घडलेलं नाही. त्यासाठी कित्येक पिढ्यांतील महिलांनी लढा दिला आहे. आधी शिक्षण आणि आता समान संधीसाठी गेली कित्येक वर्ष कित्येक महिला आपापल्यापरीनं लढा देत आहेत, यापुढेही देतच राहतील. रोजगारक्षम महिलांची ही वाढणारी संख्या नक्कीच आशादायी आहे. त्यामुळेच उद्याच्या भारतात एखाद्या नोकरीसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला ती फक्त महिला आहे म्हणून नाकारलं जाणार नाही. दयेपोटी मिळणारी संधी तिलाही नको असेल... फक्त आणि फक्त कौशल्याच्या आणि पात्रतेच्या जोरावर महिलांना नोकरीच्या संधी मिळतील... वो दिन दूर नही, इतकी अपेक्षा तर आपण नक्कीच करू शकतो.

संबंधित बातम्या