क्रिकेटमध्ये ‘पृथ्वी’राज

किशोर पेटकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कसोटीतील युवा शतकवीर

कसोटीतील युवा शतकवीर

  •  महंमद अश्रफुल (बांगलादेश, १७ वर्षे ६१ दिवस)
  •  मुश्‍ताक महंमद (पाकिस्तान, १७ वर्षे ७८ दिवस)
  •  सचिन तेंडुलकर (भारत, १७ वर्षे १०७ दिवस)
  •  हॅमिल्टन मसाकादझा (झिंबाब्वे, १७ वर्षे ३५२ दिवस)
  •  इम्रान नझीर (पाकिस्तान, १८ वर्षे १५४ दिवस)
  •  सलिम मलिक (पाकिस्तान, १८ वर्षे ३२३ दिवस)
  •  पृथ्वी शॉ (भारत, १८ वर्षे ३२९ दिवस)
  •  शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान, १८ वर्षे ३३३ दिवस)

‘तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले,’ असेच १८ वर्षीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्याबाबत म्हणता येईल. वयाच्या  चौदाव्या वर्षी त्याने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी धावसंख्या रचली. रणजी पदार्पणात शतक नोंदविले. दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्याच लढतीत दीडशतक नोंदविले. आता कसोटी क्रिकेटमध्येही पहिल्याच डावात शतकी खेळी सजवून १८ वर्षे ३२९ दिवसांच्या ‘मुंबईकर’ पृथ्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्‍यात पाऊल टाकले आहे. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक विजेत्या संघाचा हा कर्णधार. प्रचंड आत्मविश्‍वास आणि फटक्‍यांचे विपुल भांडार सोबतीला घेऊनच हा युवा फलंदाज खेळपट्टीवर उतरतो. राजकोटला गतवर्षीच्या त्याने रणजी क्रिकेट पदार्पण संस्मरणीय ठरविले. याच शहरात त्याने विंडीजविरुद्ध कसोटी क्रिकेटचा ‘श्रीगणेशा’ केला. विंडीज संघाचा पूर्वीप्रमाणे दरारा नसला, तरी गोलंदाज निश्‍चितच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. सलामीला उतरलेला पृथ्वी कमालीचा आक्रमक होता. सहजसुंदर, नयनरम्य फटकेबाजीच्या बळावर त्याने ९९ चेंडूंत शतकी वेस गाठली. सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी तो भारताचा २९३वा कसोटीपटू ठरला. काही तासांतच या मुलाने विश्‍वास सार्थ ठरविला. कसोटी पदार्पणात शतक नोंदविणारा तो भारताचा पंधरावा फलंदाज ठरला. कुठेच गोंधळला नाही किंवा दबावाखाली खेळताना दिसला नाही. त्याच्या बॅटमधून वाहणाऱ्या फटक्‍यांचा ओघ पाहून, विंडीजचे गोलंदाजही गडबडले. नयनरम्य पदलालित्यास शास्त्रोक्त फटकेबाज खेळाची जोड देत पृथ्वीने आगेकूच राखली. हा मुलगा कसोटी क्रिकेटमधील पहिलाच डाव खेळतोय असे अजिबात वाटत नव्हते. बालपणी क्रिकेट ‘किटबॅग’ सांभाळत विरार ते वांद्रे हा त्रासदायक प्रवास करून क्रिकेट गुणवत्तेला दर्जेदार बनविलेल्या पृथ्वीचे भविष्य उज्ज्वल आहे.

लहान वयातच यशोशिखरावर
हॅरिश शील्ड शालेय क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून खेळताना पृथ्वीने २०१३ मध्ये ३३० चेंडूंत ५४६ धावांची खेळी केली आणि तो प्रकाशझोतात आला. मातृछत्र वयाच्या चौथ्या वर्षी गमावले, पण वडील पंकज यांनी उणीव जाणवू दिली नाही. मुलाच्या क्रिकेटला खतपाणी घालताना भरपूर त्याग केला, कष्ट उपसले. त्यामुळेच राजकोटला पहिले कसोटी शतक केल्यानंतर, ही खेळी पृथ्वीने वडिलांना समर्पित केली. शॉ यांचे मूळ आडनाव गुप्ता, कौंटुबीक पाळेमुळे बिहारमधील गया येथील. पृथ्वीचा जन्म व बालपण विरारमध्ये गेले. पृथ्वीची गुणवत्ता नैसर्गिक आणि फलंदाजीतील शैली लोभस. भारतीय क्रिकेटमध्ये लगेच त्याची दखल घेतली गेली, त्याने अजिबात निराश केले नाही. यावर्षी त्याला ‘जॅकपॉट’ लागला. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेतील फलंदाजी, नेतृत्वगुण, तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील फलंदाजीतील धडाका यामुळे प्रभावित होत आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी पृथ्वीसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १.२ कोटी रुपये मोजले. या रकमेला प्रतिभाशाली युवा फलंदाजाने पुरेपूर न्याय दिला. यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत त्याने नऊ डावांत १५३.१२च्या स्ट्राईक रेटने २४५ धावा केल्या. भारत अ संघाकडून, त्यापूर्वी १९ वर्षांखालील संघातून खेळताना पृथ्वीला राहुल द्रविडच्या रूपात दिग्गज ‘मेंटॉर’ लाभला. द्रविड यांच्या सहवासात पृथ्वी आणखीनच बहरला. 

सचिनशी तुलना!
पृथ्वीची सचिन तेंडुलकरशी तुलना होते. सचिनप्रमाणेच पृथ्वीही शालेय क्रिकेटमधूनच प्रकाशझोतात आलेला आहे. सचिनने पहिले कसोटी क्रिकेट शतक केले, तेव्हा तो १७ वर्षे व १०७ दिवसांचा होता. सचिनने १८ वर्षे व २८३ दिवसांचा असताना कसोटीत तीन शतके नोंदविली. सचिनप्रमाणे पृथ्वीलाही गोलंदाजांवर वर्चस्व गाजविणे आवडते, फक्त तो जास्त आक्रमकता दाखवतो, क्रिकेटमध्ये ही बाब काहीवेळा अंगलटही येते. वय व अनुभवागणिक पृथ्वी निश्‍चितच संयमी आणि परिपक्व होईल. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर कोण या प्रश्‍नाचे उत्तर शोधत असतानात विराट कोहलीचा उदय झाला, भविष्यात विराटनंतर कोण या प्रश्‍नाला ‘पृथ्वी शॉ’ हे उत्तर असू शकेल.

संबंधित बातम्या