वेबसीरीज आणि वाद 

संतोष भिंगार्डे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

प्रीमियर 

‘तांडव’ या वेबसीरीजमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्मलाही सेन्सॉरचे नियम असले पाहिजेत अशी मागणी जोर धरत आहे. एकूणच हा वाद आणि आत्तापर्यंत ओटीटीवर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सीरीज यावर टाकलेला प्रकाशझोत...

कोरोना महामारीमध्ये चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडलेले होते. त्यातच काही निर्मात्यांनी आर्थिक फटका अधिक बसू नये म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याला अधिक पसंती दिली. कारण काही जणांनी व्याजाने पैसे घेऊन चित्रपट निर्मिती केली होती. त्यामुळे त्याचे व्याजावर व्याज वाढत चाललेले होते. साहजिकच सोपा मार्ग म्हणून त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म पत्करला. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मला आता भारतात अतोनात महत्त्व प्राप्त झालेले आहे. गेल्या वर्षी काही हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आणि या वर्षीदेखील येतील अशी चिन्हे नक्कीच आहेत. परंतु, आता भारतात हाच प्लॅटफॉर्म वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे आणि हा वाद आता अधिक चिघळला आहे तो ‘तांडव’ या सीरीजमुळे. 

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची ‘तांडव’ ही वेबसीरीज एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजमध्ये सैफ अली खानबरोबरच डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल आदी कलाकारांनी काम केले आहे. ही नऊ भागांची सीरीज आहे आणि याचे निर्माते आहेत हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर. या सीरीजचे बहुतेक चित्रीकरण दिल्लीतील पतौडी हाउसमध्ये झाले आहे. या सीरीजमुळे सुरू झालेला वाद अधिकाधिक चिघळणार अशी चिन्हे दिसत आहेत. या वादामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मला आता सेन्सॉरचे नियम लावले पाहिजेत अशी मागणी जोर धरत आहे. कारण आपल्याकडे चित्रपट तसेच नाटकांनादेखील सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. सेन्सॉरच्या संमतीशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. मात्र ओटीटीला अजूनही सेन्सॉरचे प्रमाणपत्र लागत नाही. त्यामुळे तेथे काही बाबींचा अतिरेक होतो आणि मग वादग्रस्त प्रकरणे उद्‍भवतात.

कशावरून सुरू झाला वाद?
या सीरीजमधील अभिनेता मोहम्मद झीशान अयूब्ब याच्यावरील एका दृश्यामुळे वाद सुरू झाला आहे. या दृश्यामुळे हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी निर्मात्यांना माफी मागण्यास सांगितली आहे. त्यानंतर संपूर्ण टीमने माफी मागितली होती. तरीही प्रकरण अजूनही धुमसत आहे. 

 ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वादविवाद
ओटीटीवरील काही सीरीजमुळे याआधीही वाद निर्माण झालेले आहेत. प्रकाश झा यांची ‘आश्रम’ नावाची सीरीज आली होती. अभिनेता बॉबी देओलने या सीरीजमधून वेबविश्वात पदार्पण केले होते. पहिला सीझन यशस्वी झाला होता आणि दुसरा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘सॉक्रेड गेम्स’च्या बाबतीत तोच प्रकार घडला. काही नेत्यांच्या बाबतीत चुकीचे भाष्य करण्यात आल्यामुळे सीरीजच्या निर्मात्यांना प्रचंड रोषास सामोरे जावे लागले होते. सोशल मीडियावर खूप टीका करण्यात आली होती. एकता कपूरच्या बहुतेक वेबसीरीज वादविवादामध्ये अडकल्या. ‘ट्रिपल एक्स’ ही त्यापैकीच एक सीरीज. या सीरीजमध्ये काही बोल्ड दृश्ये होती, शिवाय भारतीय सैनिकांची बदनामी केली गेली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. ‘पाताल लोक’ या सीरीजवरदेखील हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आणि धर्माच्या नावाखाली अतिरेक दाखवल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरूनच अनेक वाद निर्माण झाले. 
‘अभय २’ या सीरीजच्या एका दृश्यात स्वातंत्र्यसेनानी खुदिराम बोस यांचा फोटो आरोपीच्या फोटोबरोबर भिंतीवर दिसल्याने या सीनमुळे या सीरीजवर टीका सुरू झाली. मात्र यानंतर लगेचच या सीनमध्ये सुधारणा करण्यात आली आणि जाहीर माफीदेखील मागण्यात आली. ‘अ सुटेबल बॉय’ या सीरीजमध्ये एका सीनमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. ‘हसमुख’ या सीरीजमध्ये  वकिलांची प्रतिमा मलीन केल्याचा, तसेच उत्तर प्रदेश पोलिस आणि राजकारणी यांना वाईट प्रकारे दाखविल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ही सीरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली. ‘दिल्ली क्राईम’ ही सीरीज दिल्लीतील निर्भया प्रकरणावर आधारित होती व ही वेबसीरीजदेखील वादात सापडली. 

 ओटीटीसाठी सेन्सॉर असावे का?
कोणताही भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या संमतीविना प्रदर्शित केला जात नाही. सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले तरीही कधीकधी चित्रपटातील एखाद्या संवादावरून किंवा दृश्यावरून मोठा गदारोळ उठतो. कधी कधी राजकीय विरोधही होतो. कधी कधी एखादा चित्रपट ट्रिब्युनलमध्ये जातो. नंतर तो प्रदर्शित होतो. ओटीटी हे आपल्याकडील आत्ताच कुठे अधिक प्रमाणात चर्चेत आलेले माध्यम आहे आणि या माध्यमाला सेन्सॉर बोर्डाचे बंधन नसल्यामुळे काही भडक दृश्ये किंवा अतिहिंसाचार दाखविला जात आहे. आता तर वादाला तोंड फुटले असल्यामुळे या माध्यमालादेखील सेन्सॉर बोर्डाचे नियम लावणे अधिक गरजेचे आहे, अशी मागणी आता केली जात आहे. 

‘कुठल्याच माध्यमाला सेन्सॉर नसावे असे मला वाटते. पण त्याचबरोबर लेखक व दिग्दर्शक यांनी कलाकृती तयार करताना भान पाळले पाहिजे. कुठल्याच धर्माच्या व पंथाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सेन्सॉरची गरज भासणार नाही. प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. सगळ्यांनी व्यक्त व्हायलाच हवे. त्यामुळे ओटीटीच काय, कुठल्याही माध्यमाला सेन्सॉरचे बंधन नसावे असे माझे मत आहे. परंतु सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे आणि सगळ्यांनी एकोप्याने काम केले पाहिजे,’ असे मत लेखक व दिग्दर्शक सचिन दरेकरने व्यक्त केले.

अभिनेता व दिग्दर्शक विजय पाटकर म्हणाले, की सेन्सॉरचे नियम ओटीटीलादेखील असले पाहिजेत. त्यामुळे फारसे वाद होणार नाहीत. कारण ओटीटीवर सध्या खूप हिंसाचार असलेल्या सीरीज येत आहे. काही बोल्ड दृश्येही असतात. चित्रपटांसारखे कडक सेन्सॉर नसले, तरी थोड्या प्रमाणात वेबसीरीज सेन्सॉर झाल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या