‘हसवू शकतो यातच आनंद...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 15 मार्च 2021

‘फुकरे’, ‘फुकरे रिटर्न्स’, ‘राब्ता’, ‘किस किसको प्यार करू’, ‘छिछोरे’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता वरुण शर्माचा ‘रूही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना नेहमीच आपल्या भूमिकांनी हसविणारा हा अभिनेता सांगतोय एकूणच आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचालीबद्दल....

‘फुकरे’ या चित्रपटाचा दिग्दर्शक मृगदीप लांबा तसेच अन्य काही दिग्दर्शक तुला रिपीट करत आहेत, यामागचे कारण काय आहे?
वरुण शर्मा : मी स्वतःला नशीबवान मानतो की ते मला पुन्हा पुन्हा त्यांच्या चित्रपटांमध्ये घेत आहेत आणि त्यांनी मला काम देत राहावे अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची व माझी केमिस्ट्री उत्तम जुळते, काम करण्याची पद्धत जुळते. त्यामुळे काम करताना मजा येते. यामध्ये जर त्यांना वाटले की मी एखादी भूमिका चांगली करू शकतो, तर ते मला फोन करतात आणि माझी इच्छा आहे की त्यांनी मला फोन करत राहावे.

तू ‘चोचा’ तसेच ‘सेक्सा’ अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेस आणि त्या भूमिका कमालीच्या लोकप्रिय ठरल्या आहेत. त्याबद्दल तू काय सांगशील....?
वरुण शर्मा : ‘फुकरे’मधील ‘चोचा’ तसेच ‘छिछोरे’मधील ‘सेक्सा’ या व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय ठरल्या ही बाब खरी आहे. मुळातच कोणतीही भूमिका साकारणे ही खूप मजेशीर गोष्ट आहे. मी माझ्या भूमिका मनापासून साकारतो. त्यासाठी मी शंभर टक्के मेहनत घेतो. माझ्यासाठी स्क्रिप्ट नेहमीच महत्त्वाची आहे. स्क्रिप्टमधील पात्र कशा प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याकडेच मी नेहमी लक्ष देतो. माझ्याकडून अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो. शेवटी प्रेक्षकांना कोणती भूमिका आवडते हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.  
‘रूही’ चित्रपटाबद्दल काय सांगशील?

वरुण शर्मा : खूपच ट्विस्टेड लव्हस्टोरी या चित्रपटात आहे. ‘स्त्री’ चित्रपटापेक्षाही थोडे क्रेझी असे रूहीचे पात्र आहे. हा असा चित्रपट आहे की ज्यामध्ये तुम्ही एका मिनिटासाठी घाबरलात तर पुढच्या मिनिटाला हसाल. अशाच एकत्रित इमोशन्सने हा चित्रपट तयार झालेला आहे. हा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण टीमचा मी खूप आभारी आहे. कारण हॉरर जॉनरच्या चित्रपटाची खरी मजा ही थिएटरमध्येच असते, कारण अशा प्रकारच्या चित्रपटासाठी बॅकग्राऊंड म्युझिक खूप महत्त्वाचे असते आणि त्याचा एकूणच फील चित्रपटगृहात घेणे आवश्यक आहे.

या चित्रपटातील भूमिकेसाठी तू काही वेगळी तयारी केलीस का?
वरुण शर्मा : मुळातच मी पंजाबी आहे. त्यामुळे माझ्या हिंदीमध्ये थोडा पंजाबी लहेजा येतो. त्यामुळे या भूमिकेसाठी मला माझ्या भाषेवर खूपच मेहनत करावी लागली. मी या चित्रपटाच्या लेखकांसोबत अनेक महिने बसून भाषेवर मेहनत घेतली. आम्ही सतत या भाषेत बोलायचो. मी टिकटॉकचे व्हिडिओदेखील बघायचो. त्यातील भाषा मला खूप उपयोगी पडली. आता हा चित्रपट पाहताना याची कल्पना तुम्हाला नक्कीच येईल.

बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी चित्रपट खूप कमी येत आहेत. या मागचे कारण काय असावे?
वरुण शर्मा : माझ्या मते ‘स्त्री’ चित्रपटानंतर या जॉनरला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट आला. त्यामुळे आता अशा जॉनरचे चित्रपट यायला सुरुवात झाली आहे. मुळात मी स्वतः हॉरर चित्रपट बघायला घाबरायचो. सुरुवातीला ‘स्त्री’ चित्रपट बघितला तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या. हा चित्रपट बघितल्यानंतर मी थोडा घाबरलो होतो व थोडा हसलो. त्यानंतर माझी हॉरर चित्रपटाविषयीची मनातून भीती गेली आणि तेव्हापासून मला या जॉनरचे चित्रपट आवडायला लागले.

ःतुझ्यामध्ये जो कॉमेडी सेन्स आहे, तो कसा आणि कुठून आला असे तुला वाटते?
वरुण शर्मा : मी पाच वर्ष थिएटर केले आहे. त्यावेळी मी विविध पात्रे साकारली आणि ती सगळी गंभीर स्वरूपाची होती. तेव्हा मी कॉमेडी कधीच केली नव्हती. ‘फुकरे’ हा माझा पहिला कॉमेडी चित्रपट होता. त्या चित्रपटातील माझी भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर माझ्यावर कॉमेडीचा शिक्का बसला. शिवाय माझा चेहराही काहीसा तसा विनोदी ढंगाचा आहे. कुणीही माझ्याकडे पाहिले की त्याला हसू येते आणि त्याबाबतीत मी स्वतःला खूपच नशीबवान समजतो. लोकांना मी हसवू शकतो याचा मला नक्कीच आनंद होतो.

‘फुकरे’च्या आधीचा वरुण आणि ‘फुकरे’ चित्रपटानंतरचा वरुण.. काय बदल जाणवतो?
वरुण शर्मा : ‘फुकरे’च्या आधी वरुणला अनेक गोष्टी करायच्या होत्या, त्या ‘फुकरे’नंतर त्याला करायला मिळाल्या. ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला अभिनय करायचा होता. स्वतःला चित्रपटात पाहायचे होते. स्वतःला चित्रपटाच्या पोस्टरवर बघायचे होते. ही सगळी लहानपणापासूनची माझी स्वप्ने होती आणि ती ‘फुकरे’नंतर पूर्ण झाली आहेत. या चित्रपटानंतर एक ओळख मिळाली. अनेक गोष्टी बदलल्या. परंतु मी माझ्या डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही. मला आजूबाजूच्या लोकांनी बदलू दिले नाही. माझ्या आजूबाजूचे लोक नेहमीच साधे राहतात. त्यामुळे ते मला कधीच मी वेगळा असल्याची जाणीव होऊ देत नाहीत. मला अजूनही अनेक जण सर म्हणून हाक मारत नाहीत ते नेहमी मला त्यांच्यामधील एकजण समजतात. त्यामुळे मला तेच खूप आवडते.

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी प्रेरणा कोठून मिळते?
वरुण शर्मा : मी एक अभिनेता असल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करणे हे माझे काम आहे. आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळी माणसे अशाच वेगवेगळ्या लोकांचे निरीक्षण करून विविध पात्रे साकारण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मी खूप फिरत असतो आणि त्यावेळी काही जणांशी संपर्क साधतो, त्यांच्याशी बोलत असतो. अशा व्यक्तींकडूनच मला काही ना काही अनुभव मिळत असतात आणि तेच अनुभव एखादी भूमिका साकारण्यासाठी कामाला येतात.

ओटीटीवर कोर्ट रूम ड्रामा आणि क्राइम ड्रामा जास्त प्रमाणात दाखवला जातो. याबद्दल तू काय सांगशील आणि ओटीटीवर संधी मिळाली तर काम करणार का?
वरुण शर्मा : मला वेबसीरीजच्या काही ऑफर्स आल्या होत्या. परंतु मी अजूनही कोणतीही सीरीज स्वीकारलेली नाही. परंतु वेबसीरीजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. हा नवीन प्लॅटफॉर्म आहे.आता तो आपल्याकडे अधिक प्रमाणात विकसित होत आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला असेल. त्यामुळे तेथे चांगली भूमिका मिळाली तर नक्की करेन. आता राहिला प्रश्न ओटीटीवर दाखविल्या जाणाऱ्या सीरीजचा. मला वाटते क्राइम ड्रामा वगैरे जॉनरला खूप डिमांड आहे. प्रेक्षकांना असे विषय थ्रिलिंग वाटतात. त्यामुळे तशा प्रकारचे विषय जास्त प्रमाणात हाताळले जात असावेत.

यापुढे कोणत्या जॉनरचे चित्रपट करायला तुला आवडतील?
वरुण शर्मा : मला कॉमेडी जॉनरचे चित्रपट करायला आवडतील. कारण लोकांना हसवायला खूपच मजा येते. मात्र वेगवेगळ्या प्रकारची कॉमेडी करायला 
मला आवडेल. याबरोबरच थ्रिलर व सस्पेन्स जॉनरचे चित्रपट करायलाही आवडतील.

संबंधित बातम्या