कोणाची ‘सीता’ होणार सरस...?

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 25 मार्च 2021

प्रीमियर 

रामायणावर आधारित अनेक कलाकृती यापूर्वी आलेल्या आहेत आणि आताही रामायण या महाकाव्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक यांना चांगलीच भुरळ घातलेली दिसते आहे. त्यामुळे आता रामायणावर आधारित चित्रपट एकापाठोपाठ एक पुढील वर्षी येत आहेत.

या  चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ओम राऊतचा ‘आदिपुरुष’. दिग्दर्शक ओम राऊतने गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली. कारण ओम राऊत सध्याच्या घडीचा हिंदीमधील मराठी चेहरा म्हणून एकेक पाऊल पुढे टाकीत आहे. मराठीमध्ये त्याने ‘लोकमान्य...एक युगपुरुष’ चित्रपट केला आणि त्यानंतर ओमने चक्क हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केले. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान आदी कलाकारांना घेऊन त्याने ‘तान्हाजी... द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आणि ओमचे हिंदीतील पदार्पण यशस्वी ठरले. त्यानंतर दिग्दर्शक ओम नेमकी कोणती कलाकृती साकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आणि गेल्या वर्षी कोरोना काळात त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. 

या नवीन चित्रपटात साउथचा सुपरस्टार प्रभास रामाची भूमिका साकारत आहे, तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. मात्र सीतेची भूमिका कोण करणार याची उत्सुकता लागलेली होती. त्याचीदेखील घोषणा आता झाली आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

ओम राऊतपाठोपाठ निर्माता मंजू मंटेना जवळपास तीनशे कोटी रुपये खर्च करून ‘रामायण’ हा चित्रपट करणार आहेत. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत हृतीक रोशन आहे, तर सीतेची भूमिका दीपिका पदुकोन साकारत असल्याचे बोलले जात आहे. थ्रीडी स्वरूपात येणारा हा चित्रपट अतिशय भव्य-दिव्य असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नीतेश तिवारीकडे सोपविण्यात आली आहे. नीतेशने ‘दंगल’सारखा सुपरहिट चित्रपट दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून सगळ्यांना कमालीच्या आशा आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये तयार होणार आहे. 

बाहुबलीफेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी गेल्या वर्षी त्यांच्या रामायणावर आधारित ‘आरआरआर’ या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. बिग बजेट अशा या चित्रपटात अजय देवगण, राम चरण, रामा राव, आलिया भट, ऑलिव्हिया मोरिस असे अनेक सुपरस्टार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलियाच्या संपूर्ण करिअरमधील ही अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक अशी भूमिका आहे. आलियाला याकरिता खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. या चित्रपटातील तिचा लुक रीलिज झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता वाटते आहे. 

या तिन्ही चित्रपटांपाठोपाठ अलौकिक देसाई यांनी ‘सीता- द इनकार्नेशन’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून सीतेची पडद्याआड असलेली कथा मांडण्यात येणार आहे. ‘बाहुबली’ तसेच ‘मणिकर्णिका... द क्वीन ऑफ झांशी’ यांसारख्या चित्रपटाची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी ‘सीता - द इनकार्नेशन’ या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटातील सीतेचे संवाद आणि गीते मनोज मुंतशीर लिहिणार आहेत. अलौकिक देसाई हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा एक भव्य आणि मेगा बजेट प्रोजेक्ट असून यामध्ये व्हीएफएक्सचा वापर अधिक करण्यात येणार आहे. यातील सीतेची भूमिका करिना कपूर-खान करणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी अनेक नायिकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. परंतु दिग्दर्शक अलौकिक देसाईची पहिली पसंती करिना कपूर-खान आहे. दिग्दर्शक तसेच लेखकाला सीतेच्या भूमिकेसाठी करिनाचे नाव परफेक्ट वाटत आहे आणि ते लवकरच तिला कथा ऐकविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यदाकदाचित करिनाने नकार दिला तर दुसरी नायिका कोणती याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे समजते आहे. आता या चित्रपटातील सीतेची भूमिका कोण पटकावणार हे लवकरच समजणार आहे. बॉलिवूडमध्ये कोणती भूमिका कधी कोणाच्या पारड्यात जाईल याचा काही नेम देता येत नाही. येथे दररोज खोखोचा खेळ चालत असतो. कधी एखादी नायिका दुसऱ्या नायिकेला खो देईल आणि एखादा नायक दुसऱ्या नायकाला खो देईल हे सांगता येत नाही. याकरिता नशिबाचा भाग आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मोठा वशिलाही तितकाच महत्त्वाचा आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच मल्याळी, तेलगू आणि तामीळ या भाषांमध्येही येणार आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक रामायणावर चित्रपट येत आहेत. या चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका दीपिका पदुकोन, आलिया भट, क्रिती सेनॉन या आघाडीच्या नायिका साकारत आहेत. करिना कपूर-खानचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही आणि 

ते जर खरोखरच जाहीर झाले तर चार नायिकांमध्ये कमालीची चुरस लागलेली दिसणार आहे. त्यांचे चाहतेही त्यांच्या चित्रपटांची तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.

संबंधित बातम्या