दाक्षिणात्य कलाकारांचा बॉलिवूड धमाका

संतोष भिंगार्डे
सोमवार, 29 मार्च 2021

प्रीमियर 

सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक येत आहेत. विशेष म्हणजे सध्या अनेक दाक्षिणात्य कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत आहेत. कारण व्यवसायाची गणिते आता बदललेली आहेत. हिंदी चित्रपट हिंदीबरोबरच तामीळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये साउथच्या या कलाकारांचा मोठा सहभाग असणार आहे आणि भविष्यात हा सहभाग वाढणार आहे.

दाक्षिणात्य-साउथच्या चित्रपटांचा हिंदीमध्ये किंवा हिंदीतील यशस्वी चित्रपटांचा दाक्षिणात्य रिमेक होणे किंवा डब होणे हा प्रकार तसा काही नवीन राहिलेला नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांची ही देवाणघेवाण गेली कित्येक वर्षे सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. कारण शेवटी तो मनोरंजनाचा एक भाग आहे. दाक्षिणात्य कलाकार हिंदीमध्ये आणि हिंदीतील कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणे यामध्येही फारसे नावीन्य राहिलेले नाही. परंतु आत्ताच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीत एक नजर टाकली, तर सध्या अनेक चित्रपट एकाच वेळी हिंदीबरोबरच दाक्षिणात्य भाषांमध्येही तयार होत आहेत. त्याकरिता मोठमोठ्या दाक्षिणात्य स्टार्सना हिंदी चित्रपटात घेतले जात आहे. त्यांना भरभक्कम रक्कमदेखील दिली जात आहे. हे कलाकार चित्रीकरणासाठी कधी हैदराबाद, तर कधी मुंबई अशा चकरा मारीत आहेत. त्यांना साईन करण्यासाठी हिंदीतील निर्माते कमालीचे धडपडत आहेत. त्यामुळे भविष्यात हिंदी चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांचा अधिकाधिक बोलबाला दिसला तर नवल वाटायला नको.

खरे तर यापूर्वी अनेक दाक्षिणात्य कलाकार हिंदीमध्ये आले आणि ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटविला आहे. परंतु सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक येत आहेत. विशेष म्हणजे सध्या अनेक दाक्षिणात्य कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत आहेत. कारण सध्या व्यवसायाची गणिते बदललेली आहेत. दाक्षिणात्य प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अभिरुची पाहता हिंदीतील निर्माते व दिग्दर्शकांनी चांगलीच शक्कल लढविली आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने तसे करणे क्रमप्राप्त आहे. 

दाक्षिणात्य प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सध्या अनेक निर्माते व दिग्दर्शक एखाद्या बड्या दाक्षिणात्य स्टारला आपल्या चित्रपटात घेत आहेत आणि तो चित्रपट एकाच वेळी हिंदीबरोबरच तामीळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड वगैरे भाषेत तयार होत आहे. थोडक्यात ही सगळी व्यावसायिक गणिते आहेत. कारण आपला चित्रपट भव्य स्तरावर प्रदर्शित व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच आज अभिनेता प्रभास, धनुष, विजय देवरकोंडा, महेश बाबू, अल्लू अर्जुन, विजय सेतूपती, अभिनेत्री रश्मिका मंदाना आदी कित्येक दाक्षिणात्य सुपरस्टार्स हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत आहेत.

‘बाहुबली’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला प्रभास आता दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात भगवान श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. त्याचा हा चित्रपट अतिशय भव्य स्तरावर तयार होत असून तो तामीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषांमध्येही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. प्रभासची जगभरातील लोकप्रियता कॅश करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहते नेहमीच दाद देत असतात. आता सुपरस्टार नागा चैतन्य अभिनेता अमीर खानच्या बहुचर्चित ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटात झळकणार आहे. तो या चित्रपटामध्ये अमीर खानच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा कुणीही केलेली नाही.

‘अर्जुन रेड्डी’ हा सुपरडुपर हिट चित्रपट देणारा दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा निर्माता करण जोहरच्या ‘लायगर’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले आहे. विजयबरोबर बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. राम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी हेदेखील कलाकार काम करीत आहेत. या चित्रपटात विजय देवरकोंडा वेगळ्या स्टाइलमध्ये दिसणार आहे. यासाठी विजयने थायलंडला जाऊन खास मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणदेखील घेतले आहे.

‘कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ यांसारख्या चित्रपटांनी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत कोट्यवधी लोकांची मने जिंकणारी ग्लॅमरस अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती काम करीत आहे. रश्मिकाने लखनौमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग केले आहे. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होईल. रश्मिकाचा  प्रवास ‘कर्नाटक क्रश’ ते ‘नॅशनल क्रश’ होत असून तिला तसा ‘टॅग’ही मिळाला आहे. तिची बॉलिवूड एंट्री धमाकेदार होणार यात शंकाच नाही.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मात्र ती कोणत्याही चित्रपटातून नाही, तर वेबसीरीजच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. तिने तामीळ सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरीजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘रांझणा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी धनुष सज्ज आहे. ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटात धनुष, सारा अली खान आणि अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट ६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये येणार आहे. यात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्यातील प्रेमाचा ट्रँगल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आणखीन एक दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणजे अल्लू अर्जुन. त्याचा सध्या ‘पुष्पा’ हा तेलगू भाषेतील चित्रपट येणार आहे. या चित्रपटातील सहा मिनिटांच्या एका अॅक्शन दृश्यासाठी सात की आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती आहे. या चित्रपटाची नायिका रश्मिका मंदाना आहे. अल्लू अर्जुनने अलीकडेच केजीएफ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशात नील यांची भेट घेतली. हैदराबाद येथे ही भेट झाली आणि आता तोदेखील हिंदी चित्रपटात लवकरच झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील अतरंगी स्टाईलबाज अभिनेता साजिद नाडियादवालाच्या एका हिंदी चित्रपटात काम करीत आहे आणि त्याच चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूदेखील काम करणार आहे. साजिदने महेश बाबूला एका प्रोजेक्टमध्ये भूमिका देण्याचे ठरविले आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपट निर्माते सध्या या दोन कलाकारांशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे आणि जर ते मान्य झाले तर महेश बाबू आणि रणवीर सिंग एकाच चित्रपटात एकत्र दिसू शकतात आणि या चित्रपटाच्या निमित्ताने महेश बाबू बॉलिवूडमध्ये आपला अभिनयाची झलक दाखवू शकतो.

संबंधित बातम्या