मालिकांचे शूटिंग आता महाराष्ट्राबाहेर

संतोष भिंगार्डे
सोमवार, 3 मे 2021

प्रीमियर

कोरोनामुळे लागू झालेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रात चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला होता. परंतु अशा वेळी प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये, तसेच महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मंडळींची रोजीरोटी बुडू नये याकरिता विविध वाहिन्या आणि निर्मात्या व दिग्दर्शकांनी आपापल्या मालिकांचे चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गोवा, हैदराबाद, गुजरात, राजस्थान, सिल्वासा वगैरे ठिकाणी चित्रीकरण सुरूदेखील झाले आहे. 

दैनंदिन मालिका म्हटली की रोज बारा ते चौदा तास शूटिंग करावे लागते. अशा मालिकांचा तामजामदेखील मोठा असतो. एकेका मालिकेच्या सेटवर शंभर ते दीडशेच्या आसपास मंडळींचे एक युनिट असते. मुंबई आणि परिसरात तसेच सातारा-कोल्हापूर इत्यादी ठिकाणी जवळपास नव्वदच्या आसपास मालिकांचे दैनंदिन काम चालते. मोठमोठे सेट्स तसेच अन्य साधनसामग्री यांचा खर्च मोठा असतो. मराठीपेक्षा हिंदीचे आर्थिक गणित वेगळे असते. तेथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. एका मालिकेवर शंभर ते दीडशे जणांचे कुटुंब अवलंबून असते. 

आता हिंदीतील ‘स्टार प्लस’, ‘झी’ तसेच ‘कलर्स’, त्याचप्रमाणे मराठीतील ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’ इत्यादी वाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण बाहेरगावी सुरू झाले आहे. कलाकार तसेच अन्य मंडळी खूप काटेकोरपणे काळजी घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे आता शूटिंगची जागा बदललेली आपल्याला दिसणार आहे. अन्य बाबीदेखील नव्याने पाहता येणार आहेत. तेथील सेटवरील फोटो, व्हिडिओ कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. नवीन जागा आणि नवा सेट पाहून कलाकार तसेच अन्य टीमला नवा हुरूप आला आहे. प्रेक्षकदेखील त्यांचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 

‘बायो बबल’ या संकल्पनेच्या आधारावर मालिकेचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित वातावरणात आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला सेटवर येण्यास तसेच कलाकारांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. अगदी स्वयंपाकसुद्धा सेटवरच केला जातो. कलाकारांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. कमी युनिटमध्ये काम केले जात आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना असल्या तरी कलाकार जुन्या सेटला मात्र मिस करत आहेत. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत कीर्तीची व्यक्तिरेखा साकारणारी समृद्धी केळकर म्हणाली, ‘आमचा गुजरातमधला सेट भव्य-दिव्य आणि हवेशीर आहे. मात्र जुन्या सेटची आठवणही येत आहेच. नव्या सेटवर दाखल होताच नव्या धमाकेदार ट्रॅकचे शूटही आम्ही केले आहे. मालिकेत नवा ड्रामा पाहायला मिळेल.’ स्टार प्रवाहच्याच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही अरुंधतीचे खंबीर रूप पाहायला मिळणार आहे. 

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे शूटिंग अहमदाबाद येथे सुरू आहे. संपूर्ण टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे. तर स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांचे शूटिंग गोव्यामध्ये सुरू आहे. अशा नयनरम्य ठिकाणी शूटिंग करणे म्हणजे मेजवानीच आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का?’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकांचे गुजरातमधील सिल्वासा येथे शूटिंग सुरू आहे.

‘झी मराठी’वरील ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकांची टीमदेखील गोव्यामध्ये गेली आहे. या मालिकादेखील वेगळ्याच वळणावर असून आता गोव्यात काय नवीन कमाल करणार हे बघणे महत्त्वाचे असेल. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ दमण येथे, तर ‘माझा होशील ना’ या मालिकेची संपूर्ण टीम शूटिंगसाठी सिल्वासा येथे आहे. सगळ्यांना खळखळून हसवणारी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम जयपूरला रवाना झाली आहे. ‘देवमाणूस’चे शूटिंग बेळगावमध्ये सुरू आहे. ‘देवमाणूस’ ही मालिका अत्यंत कमी वेळेत लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील पोलीस अधिकारी दिव्या आता डॉ. अजित कुमारचे खरे रूप जगासमोर आणणार का, हे आता समजणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचा तिसरा भाग काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आणि ही मालिकादेखील लोकप्रिय ठरली आहे. आता यातील रहस्य अधिकाधिक गडद होणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘व पाहिले न मी तुला’ या टीव्ही मालिकांबद्दल कोठारे व्हिजनचे आदिनाथ कोठारे म्हणाले, ‘सध्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे आता कोठारे व्हिजनच्या मालिकांचे शूटिंग गोव्यामध्ये सुरू आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार आमच्याकडे खूप आहेत. त्यांच्यासाठी हे काम सुरू ठेवावेच लागणार आहे. कारण दीडशे ते दोनशे लोक एका वेळेला प्रत्येक सेटवर काम करत असतात. एवढ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. मात्र आता कोरोनामुळे आम्ही आमच्या युनिटचा आकार कमी केला आहे. आमच्या सगळ्या युनिटची जाताना कोरोना चाचणी झाली आणि त्यानंतरच ते गेले. तेथील सरकारच्या सगळ्या नियमांचे पालन करून चित्रीकरण केले जात आहे.

अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रेक्षकांचे मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यासाठी मनोरंजन खूप महत्त्वाचे माध्यम आहे. म्हणून मनोरंजनाला ब्रेक लागला कामा नये. आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला कठीण नियम लागू करा आणि योग्य ती गाईडलाईन द्या, पण मुंबईत चित्रीकरणास परवानगी द्या. आता ते काय निर्णय घेतील ते बघू. मात्र आम्ही सेटवर सगळ्या गाईडलाईनचे पालन करून शूटिंग करत आहोत.’

‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेचा कार्यकारी निर्माता विनोद महाडीक म्हणाला, ‘आम्ही नव्या लोकेशनवर नवी कथा नव्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने दिलेल्या सगळ्या नियमावलीचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत. सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना अशा मालिकांमधून काही तरी सकारात्मक संदेश पोहोचेल आणि घरी असलेल्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.’

मराठीबरोबरच हिंदी मालिकादेखील आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या आहेत. अनेक मालिका आता नवीन वळणावर येऊन ठेपल्या आहेत. हिंदी मालिकांचा लवाजमादेखील खूपच मोठा असतो. त्यामुळे संपूर्ण युनिटला दुसऱ्या राज्यात शिफ्ट करणे हे मोठे आव्हान होते. मात्र तरीही सगळ्या गोष्टी उत्तमरीत्या जुळून आल्या आहेत आणि महाराष्ट्राबाहेर अॅक्शन आणि कॅमेऱ्याचा आवाज आता खणखणू लागला आहे. हिंदी मालिकेत सध्या अनेक मराठी कलाकार काम करत आहेत. त्यांनीदेखील तेथील शूटिंगचे आणि मौजमस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. स्टार प्लसवरील ‘मेहंदी है रचने वाली’, ‘गुम है किसीके प्यार मै’, ‘इमली’ या मालिकांची टीम हैदराबादमध्ये रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करीत आहे. तर कलर्स टीव्हीवरील ‘छोटी सरदारनी’, ‘नमक इश्क का’ या लोकप्रिय मालिकांचे शूटिंग हैदराबादमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’, ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकांचे  शूटिंग गोव्यामध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या