‘शेवंताने संयम शिकवला..’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 17 मे 2021

प्रीमियर 

‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमधील अण्णा नाईक, शेवंतासह सगळ्याच व्यक्तिरेखांना लोकांनी डोक्यावर घेतले. आत्ताच्या तिसऱ्या सीझनमध्येही शेवंता अधूनमधून दिसते. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरबरोबर मारलेल्या गप्पा...

‘शेवंता’ एवढी लोकप्रिय होईल असे तुला वाटले होते का?
अपूर्वा नेमळेकर : अजिबात नाही. कारण या मालिकेच्या पहिल्या भागात तिच्याविषयी केवळ बोलले जात होते. त्यामुळे तेव्हाच प्रेक्षकांना शेवंता कोण असेल याची उत्सुकता लागली होती. मला या भूमिकेबद्दल विचारणा झाली, तेव्हा छोटीशीच भूमिका आहे असे सांगण्यात आले. मात्र हळूहळू ही भूमिका लोकांना आवडायला लागली. ही भूमिका छान लिहिली गेली आणि तिचे सादरीकरणही उत्तम करण्यात आले. मात्र मला या भूमिकेसाठी तयारी खूप करावी लागली. सर्वप्रथम मला माझे वजन बारा किलोने वाढवावे लागले. केसांना रंग द्यावा लागला. कारण ती बाई पंचेचाळीसच्या आसपास वयाची दिसली पाहिजे, याकरिता लूकमध्ये बदल करावा लागला. हा लूक जवळपास दीड वर्षे मला तसाच ठेवावा लागला. मालवणी भाषा मला काही बोलायची नव्हती. त्यामुळे अन्य बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागला. माधवसर, शकुंतलाबाई यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.

लूक तसाच ठेवावा लागल्यामुळे अन्य प्रोजेक्टवर तुला पाणी सोडावे लागले, असे तुला वाटत नाही का?
अपूर्वा नेमळेकर : ही गोष्ट निश्चित की एखादा कलाकार जेव्हा एक प्रोजेक्ट करीत असतो, तेव्हा त्याला वाटत असते की आपल्याकडे अजून दोन-तीन प्रोजेक्ट असले पाहिजेत. परंतु कोणतेही काम आपल्या नशिबाने आणि कर्तृत्वाने येत असते. त्यामुळे आपण पहिले काम जे स्वीकारलेले असते त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक असते. मी शेवंताच्या भूमिकेवरच अधिक लक्ष केंद्रित केले. अन्य कोणत्याही कामाचा विचार केला नाही. मला एकाच वेळी दहा दगडांवर पाय ठेवायचा नव्हता. त्यामुळे ही भूमिका करीत असताना एखादे प्रोजेक्ट माझ्याकडून गेले असले, तरी त्याचे मला काही दुःख नाही.

भूमिका छोटीशीच आहे असे सांगण्यात आले होते, तर मग ही भूमिका वाहिनीच्या टीआरपीसाठी पुढे खेचण्यात आली का? काय कारण होते? 
अपूर्वा नेमळेकर : तसे काहीही नाही. मुळात या मालिकेची कथा तशा प्रकारची होती. शेवंताची भूमिका तशीच लिहिलेली होती. त्यांनी मालिकेची कथा अगोदरच बांधलेली होती. त्यामुळे टीआरपीचा काहीही मुद्दा नव्हता आणि समजा तसे असते, तर ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती त्यामुळे ही मालिका अजून काही वर्षे चालली असती. तिसरा भागदेखील आला नसता. त्यामुळे हा मुद्दा मला गौण वाटतो.

या मालिकेचे शूटिंग सावंतवाडीतील अकेरी गावात झाले. तेथील वातावरणात तू कशी काय रमली होतीस?
अपूर्वा नेमळेकर : वातावरण माझ्यासाठी काही नवीन नव्हते. कारण लहानपणापासून मी तेथील वातावरणात वाढलेले आहे. सावंतवाडी (नेमळा) माझे गाव आहे. आता मुंबईत राहत असल्यामुळे कोकणात जाता येत नाही. परंतु या मालिकेच्या निमित्ताने दीडेक वर्ष कोकणात राहता आले. तेथील जीवन पुन्हा अनुभवता आले. खूप मजा आली तेथे शूटिंग करताना.

‘शेवंता’ लोकप्रिय ठरली. तुला नावलौकिक मिळाला. परंतु अपूर्वाला शेवंताने काय दिले?
अपूर्वा नेमळेकर : शेवंताच्या भूमिकेमुळे लोकप्रियता, पैसा असे सगळे मिळाले. पण सगळ्यात प्रथम या भूमिकेने मला संयम शिकविला. मी सुरुवातीला खूप चिडचिड करायचे. कारण मी मुंबईत जेथे राहते तेथून शूटिंगला जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागायचे. एखाद्या मालिकेचे शूटिंग मालाड-मढ किंवा वसई-नायगाव येथे असायचे. माझा खूप वेळ ट्राफिकमध्ये जायचा. त्यामुळे मनाचा सतत त्रागा व्हायचा. एखादा सीन असला तरी एवढा प्रवास. त्यामुळे कंटाळा यायचा. परंतु शेवंताने मला संयम शिकविला. एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याकडे जबरदस्त संयम हवा. झटपट पैसा किंवा प्रसिद्धी मिळत नाही. त्याकरिता संयम असावा लागतो.  

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा विचार तू लहान असतानाच केला होतास का?
अपूर्वा नेमळेकर : अजिबात नाही. त्यावेळी मी चित्रपट वगैरे पाहायचे. पण भविष्यात या क्षेत्रात यावे असे कधी वाटले नव्हते. शाळेत असताना एका नाटकात मी झाड झाले होते. बाकी अभिनयाचा आणि माझा दुरान्वयानेही संबंध नव्हता. मला चित्रकलेचीही खूप आवड होती आणि त्याच्या परीक्षा मी दिल्या होत्या. वांद्रे येथील नॅशनल कॉलेजात माझे शिक्षण झाले. त्यानंतर रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतले. तेथे अभिनयाला खूप वाव होता. रुपारेलमध्ये कल्चरल अॅक्टिव्हिटीज अधिक. परंतु तेथेही मी कधी सहभागी झाले नाही. मी अगदी योगायोगानेच अभिनयाच्या क्षेत्रात आले. त्याचे असे झाले, की माझे काही फोटो सोशल मीडियावर पाहून मला ‘आभास हा’ या मालिकेत पहिला ब्रेक मिळाला. आयरिश प्रॉडक्शनचे विद्याधर पाठारे यांची ही मालिका. तेथूनच माझी अभिनयाची बाराखडी सुरू झाली. लोकेश गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर असे मोठे कलाकार या मालिकेत होते. त्यांनी तसेच या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांनी मला खूप काही शिकविले. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांना मी गुरू मानते. कारण त्यांनीच मला ‘आभास हा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर काही दिवस अभिनयाचे धडे शिकविले. त्यानंतर ‘आराधना’ या मालिकेत काम केले आणि मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि हिंदीचा माझा प्रवास सुरू झाला. आता या क्षेत्रात माझा दहा वर्षांचा प्रवास झाला आहे आणि अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

तुझा इमिटेशन ज्वेलरी डिझायनिंगचा व्यवसाय आहे. एकीकडे हा व्यवसाय आणि दुसरीकडे अभिनय यांची सांगड तू कशी घालतेस?
अपूर्वा नेमळेकर : अपूर्वा कलेक्शन या नावाने एक शॉप आता सातारा येथे सुरू करणार आहे. तसेच आणखीन शॉप्स सुरू करण्याचा विचारही आहे. अपूर्वा कलेक्शनमध्ये वेगवेगळी डिझाईन्स केलेली इमिटेशन ज्वेलरी आणि विविध प्रकारच्या साड्या आहेत. विशेष करून वेगवेगळ्या पद्धतीच्या पैठणी आहेत. त्यामध्ये मी कॉटन पैठणी लाँच करण्याचा विचार करीत आहे. खरे तर हा व्यवसाय आणि अॅक्टिंग यांची सांगड घालणे खूप अवघड असते. परंतु, जेव्हा जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी डिझायनिंग करते आणि स्केचेस काढते. बाकी माझ्याकडे काही कारागीर आहेत. माझी एक टीम आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही दागिने तयार करतो.

संबंधित बातम्या