यंत्रमानवाचा अभिनय

संतोष भिंगार्डे
सोमवार, 14 जून 2021

प्रीमियर 

आत्तापर्यंत व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून रोबोट दाखवले जायचे. परंतु आता हा यंत्रमानवच अभिनय करणार आहे. चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका असणार आहे.

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात आज तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसत आहे. माणूस तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक प्रगत होत आहे आणि त्याचवेळी माणूस तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबूनही राहू लागला आहे. भविष्यात हा वापर अधिक प्रमाणात होणार आहे. मनोरंजनसृष्टीही याला काही अपवाद नाही. मनोरंजन क्षेत्रामध्येही दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. निर्माते व दिग्दर्शक अशा नव्या तंत्राचा वापर करीत आहेत. प्रेक्षकही नव्या तंत्राचे चांगले स्वागत करीत आहेत. 

आत्तापर्यंत यंत्रमानवाचा (रोबोट) वापर हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसला होता. हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येही अशा प्रकारचे रोबोट घेऊन चित्रपट आलेले आहेत. आत्तापर्यंत व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून हे रोबोट दाखवले जायचे. परंतु आता हा यंत्रमानवच अभिनय करणार आहे. त्यांची चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे आणि हे पहिल्यांदाच घडणार आहे. हॉलिवूड चित्रपटाचे निर्माते अनौश सादेघ आणि सॅम खोझे अशा एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. यामध्ये रोबोट मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बी’ असे आहे. या चित्रपटात ‘एरिका’ नावाची रोबोट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ही एरिका एखाद्या जपानी मुलीसारखी दिसते. एरिकाची त्वचा सिलिकॉनची आहे. तिला चौदा इन्फ्रारेड सेन्सर लावलेले आहेत. तिच्या आवाजाच्या निर्मितीसाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. जपानी शास्त्रज्ञ हिरोशी इशीगोरो आणि कोएट ओगावा यांनी एरिका या मानवसदृश रोबोटची निर्मिती केली आहे. हा वैज्ञानिक चित्रपट जवळपास पाचशे कोटी रुपये बजेटमध्ये करण्यात येणार आहे. या महिन्यापासूनच युरोपमध्ये रोबोटबरोबर शूट सुरू होणार असल्याचे समजते आहे. 

 आणखी एक यंत्रमानव तुर्की चित्रपटातदेखील झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘आयपेरा’ ही रोबोट आपल्याला अभिनयाचा जलवा दाखवणार आहे. ‘डिजिटल ह्युमन’ या तुर्की चित्रपटातून ती अभिनय करणार आहे. या चित्रपटात आयपेरा मुख्य भूमिका साकारणार आहे. पटकथा लेखक आणि निर्माते बिरोल गुव्हेन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. आयपेरा ही रोबोट अतिशय खास आहे. कारण चित्रपटात पदार्पण करण्याआधीच एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे तिचे सोशल मीडियावर सतरा हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स पाहून आपला गोंधळ उडेल, कारण तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये ती एखाद्या सुंदर मॉडेलसारखी पोज देताना दिसते. तिची अनोखी स्टाइल बघून नक्की ती रोबोटच आहे की एखादी मॉडेल असा प्रश्न पडेल.

या यंत्रमानवांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येही अशा प्रकारच्या यंत्रमानवाचा वापर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. परंतु प्रेक्षकांसाठी ही कुतूहलाची बाब असेल. सुरुवाती- सुरुवातीला केवळ आकर्षण किंवा कुतूहल म्हणून प्रेक्षक याकडे पाहतील. मुळातच अभिनय ही एक कला आहे आणि ही कला सगळ्यांनाच येते असे काही नाही. येथे अनुभवाची आणि मेहनतीची कसोटी लागते. एखादी भूमिका साकारायची म्हटली की त्याची तयारी करावी लागते. त्या भूमिकेतील बारकावे शोधावे लागतात. त्या भूमिकेच्या भावभावना समजून घेऊन ती प्रेक्षकांपर्यंत उत्तम प्रकारे कशी पोहोचेल हे पाहावे लागते. त्यामुळे यंत्रमानव हा एक वेगळा प्रयोग आहे आणि प्रयोग म्हणूनच त्याकडे पाहावे लागेल.

ऑस्कर ॲकॅडमी सदस्य उज्ज्वल निरगूडकर सांगतात, की हॉलिवूडच्या चित्रपटांसाठी व्हीएफएक्सचा वापर बऱ्याच वर्षांपासून होत आहे. ‘टर्मिनेटर २’ आणि ‘ज्युरासिक पार्क’ या गाजलेल्या चित्रपटांत त्याचा वापर प्रकर्षाने जाणवतो. याचीच पुढची पायरी म्हणून जपानी शास्त्रज्ञांनी एरिका या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. रोबोट असल्यामुळे कोरोनाचा कोणताही परिणाम होणार नाही. यंत्रमानव असणारा भारतीय चित्रपट येण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा खर्च खूप असतो (एरिकाच्या चित्रपटाचाच खर्च पाचशे कोटी रुपयांच्या आसपास आहे.) आणि तो सध्या आपल्याकडे कुणाला परवडेल असे वाटत नाही.

 चित्रपट समीक्षक संतोष पाठारे म्हणाले, ‘चित्रपटात यंत्रमानव अभिनय करणार हे एक प्रयोग म्हणून चालू शकते. परंतु आपल्याकडे ते कितपत चालेल ही शंका आहे. मुळातच आपल्याकडे साय-फाय चित्रपटांना प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. शाहरूख खानचा ‘रा वन’ चित्रपट आला होता. त्याला कितीसा प्रतिसाद मिळाला हा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या