बॉलिवूडमधले हमशकल

संतोष भिंगार्डे
सोमवार, 21 जून 2021

प्रीमियर 

हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चनपासून सलमान खान, शाहरुख खान, हृतीक रोशन अशा कित्येक कलाकारांचे ‘हमशकल’ आहेत, म्हणजेच अगदी त्यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे. 

स्टार्ससारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या मंडळींना लुक अलाईक किंवा बॉडी डबल असेही म्हणतात. ते त्या त्या कलाकाराची कार्बन कॉपीच असतात. कधीकधी निर्माते व दिग्दर्शक अशा हुबेहूब दिसणाऱ्या मंडळींना पाहून खरा कलाकार कोण हे विसरतात. या कलाकार मंडळींची लोकप्रियताही एखाद्या स्टार कलाकाराइतकीच असते. सोशल मीडियावरदेखील त्यांच्या अनोख्या शैलीचे अनेक चाहते असतात. ही मंडळी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सातत्याने असतात.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे बॉडी डबल शशिकांत पेडवाल हे

पुण्याचे. व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले शशिकांत अगदी हुबेहूब बिग बी वाटतात. त्यांनी भारताबरोबरच अमेरिका, दुबई, मॉरिशस, कतार, इस्राईल इत्यादी ठिकाणी कार्यक्रम केले आहेत. बच्चन साहेब आणि शशिकांत यांची भेट झाली तेव्हा ‘बिग बी’देखील आश्चर्यचकित झाले. शशिकांत यांनी ‘बिग बी फाउंडेशन’ नावाची एक संस्था स्थापन केली आहे. शशिकांत यांनी कोरोना काळात रुग्णांच्या जीवनात आनंदाचा मळा फुलविण्याचे काम केले आहे. आत्तापर्यंत जवळपास साडेतीनशेच्यावर रुग्णांशी त्यांनी संवाद साधला आहे.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा बॉडी डबल प्रशांत वालदे हा २००७ मध्ये १२०० रुपये घेऊन मुंबईत आला. सुरुवातीचे त्याचे दिवस कमालीचे कष्टाचे आणि हलाखीचे गेले. कोरिओग्राफर म्हणून त्याने या इंडस्ट्रीत आपली वाटचाल सुरू ठेवली. तो मिमिक्रीही करायचा आणि अशातच त्याला एक जाहिरात मिळाली. ती जाहिरात पाहिल्यानंतर ‘ओम शांती ओम’ या चित्रपटासाठी त्याला बोलाविण्यात आले आणि तेथे पहिल्यांदा शाहरुख खानची आणि त्याची भेट झाली. त्यामध्ये शाहरुखचा डुप्लिकेट म्हणून त्याने काम केले आणि त्याचे हे काम किंग खानला कमालीचे आवडले. त्यानंतर तो किंग खानचा बॉडी डबल म्हणून काम करू लागला. ‘डॉन’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘डिअर जिंदगी’, ‘फॅन’ अशा काही चित्रपटांसाठी त्याने किंग खानचा बॉडी डबल म्हणून काम केले. आत्तापर्यंत त्याने चारशेच्या वर जाहिराती आणि पंधरा ते वीसच्या आसपास चित्रपट केले आहेत. शाहरुख खान यांना आपला गॉडफादर मानणारा प्रशांत सांगतो, की शाहरुख खान सर येण्यापूर्वी काही सीन्स माझ्यावर शूट केले जातात आणि ते आल्यानंतर त्यांना दाखविले जातात. खरेतर शूटिंगपूर्वीची ती रीहर्सल असते आणि त्यावरून समजते की आता पुढे काय होणार ते. शाहरुख सरांना आणि प्रॉडक्शन हाऊसला ते सोयीस्कर पडते. त्यांच्या बरोबर पंधरा वर्षे काम करून खूप काही शिकलो आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आता ‘प्रेमातुर’ हा चित्रपट करीत आहे. त्याची कथा-पटकथा आणि संवाद माझे आहेत. या चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारत आहे.

बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनीची लुक अलाईक सीमा मोटवानीही तितकीच लोकप्रिय आहे. सीमा मिमिक्री आर्टिस्ट आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध शोज केले आहेत. त्यांनी देश आणि विदेशात जवळपास दोन हजारच्या आसपास शोज केले आहेत. हेमामालिनीसारखा लुक धारण करण्यासाठी त्यांना दीड ते दोन तास लागतात. ‘जय माता दी’ या मालिकेच्यावेळी हेमामालिनी आणि त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर सीमा यांचे नशीब उघडले. आज त्या ‘हेमामालिनी’ या नावानेच ओळखले जाते. त्या सांगतात, की मी जाहिराती, मालिका व चित्रपट केले आहेत. हेमामालिनीसारखा गेटअप करून जाहिराती केल्या आहेत.  

बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक अभिनेता अनिल कपूरसारखा हुबेहूब दिसणारे आरिफ खान. आरिफ खान मूळचे अकोल्याचे. तेथे असताना ते राम लखन नाईट नावाने कार्यक्रम करीत असत. त्यानंतर ते मुंबईत आले आणि कलाकार ऑर्केस्ट्रामध्ये काम करू लागले. एक दिवस भाईदास हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू होता आणि तेथेच बाजूला अनिल कपूर-माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. अनिल कपूरचे चाहते त्याला भेटण्यासाठी तेथे जमलेले होते. एवढ्यात एका बाजूने आरिफ खान यांनी एन्ट्री केली आणि अनिल कपूर...अनिल कपूर....असा गोंगाट सुरू झाला. काही जणांनी आपल्याकडील वही आरिफ यांची सही घेण्यासाठी पुढे सरसावली. त्यानंतर ती बाब सेटवर अनिल कपूरसह सगळ्यांना समजली. मग आरिफ खान अनिल कपूर यांना भेटले. तेदेखील आश्चर्यचकित झाले. एक कलाकार म्हणून आरिफ यांनी आत्तापर्यंत पंधरा-वीस चित्रपट केले आहेत. अनिल कपूर यांची मिमिक्री ते करतात. आत्तापर्यंत त्यांनी देश-विदेशात जवळपास तीन हजारच्या आसपास शोज केले आहेत. ते म्हणतात, कलाकार ऑर्केस्ट्राचे सुधीर सिन्हा आणि दत्ता कोळी यांना मी गुरुस्थानी मानतो. त्यांनीच सर्वप्रथम मला संधी दिली आणि आज मी छान वाटचाल करीत आहे. आत्तापर्यंत अनेक सीरियल आणि चित्रपटही केले आहेत. मी  २०१८मध्ये ऑल इंडिया लुक अलाईक असोसिएशन (एआयएलए)ची स्थापना केली आणि त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करीत आहे.

भाईजान सलमान खान आणि बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता हृतीक रोशन यांचेही बॉडी डबल किंवा लुक अलाईक आहेत. शांतनू घोष हुबेहूब सलमान खान आहे, तर अमन कुमार हुबेहूब हृतीक रोशन. 

डॅशिंग आणि बिनधास्त शांतनू घोष हा हुबेहूब भाईजानसारखा दिसतो. शांतनू लहानपणापासूनच सलमान खानचा चाहता आहे. भाईजानप्रमाणेच तोदेखील सामाजिक कार्यात पुढे असतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील. तो ज्वेलरी डिझाइनर आहे आणि त्याच कामासाठी आपल्या कंपनीतर्फे तो नागपुरात आला होता. तेथील एका हॉटेलात सलमान खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी शांतनू कसाबसा सलमानला भेटला. ही घटना २०१०मधली. शांतनू म्हणाला, की तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण भाईजानची पहिली भेट तेथे झाली होती. त्यानंतर हळूहळू मी माझे काही फोटो सोशल मीडियावर टाकले आणि ते फोटो पाहून मला एका चित्रपटासाठी बोलाविण्यात आले. ‘बिइंग भाईजान’ या चित्रपटामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मी त्यांच्यासारखा मेंटेन राहण्याचा प्रयत्न केला. भाईजानसारखी समाजसेवा करण्याचेही ठरविले. भाईजानने जसे अनेकांचे आयुष्य बदलले आहे तसेच माझेदेखील संपूर्ण आयुष्य बदलले आहे. 

संबंधित बातम्या