Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 

"निर्माणा'त गुंतलेले हात
प्रतीक पुरी
Saturday, March 31, 2012 AT 12:00 AM (IST)

समाजातील सर्व प्रश्‍नांना सरकारच जबाबदार आहे असे मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. समस्यांची केवळ दुरूनच चर्चा करायची; पण कृती मात्र शून्य, अशी यांची भूमिका असते. याच पार्श्‍वभूमीवर एक असाही वर्ग आहे जो या समस्यांविषयी केवळ बोलण्याऐवजी त्यांना थेट भिडू पाहतो आहे. मुख्य म्हणजे हा युवा वर्ग आहे. शब्दांचे इमले उभारण्यापेक्षा प्रत्यक्ष "निर्माणा'त गुंतलेल्या या हातांच्या जडणघडणीमागची कहाणी.

 
 
 
 
भारत हा युवाप्रधान देश आहे. युवा पिढीच देशाचे भवितव्य ठरवणार आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी युवक सक्षम आहेत का, त्यांना खरोखरच ही जबाबदारी उचलायची आहे का, या प्रश्‍नाकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात एक अभिनव चळवळ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. तरुणाईचेच भविष्य नव्हे, तर समाजाचे आणि देशाचे भविष्य घडविण्यासाठीही ही चळवळ मोठे काम करत आहे. या चळवळीला भक्कम अशी नैतिक आणि सामाजिक बैठकही आहे. ही चळवळ आहे अर्थातच नवनिर्माण. म्हणजे युवकांची युवकांसाठी युवकांद्वारा चालवण्यात येणारी सामाजिक बदलासाठीची चळवळ.
अमृत बंग हा तरुण "निर्माण'च्या समन्वयाचे काम गेली चार वर्षे करत आहे. बंग घराणे महाराष्ट्राला अपरिचित नाही. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांची गडचिरोलीतील "सर्च' संस्था गेली तीन दशके राज्यातील सामाजिक चळवळीत अग्रस्थानी आहे. आई-वडिलांची पुण्याई पाठीशी असली, तरी अमृतवर या पुण्याईचे दडपण नाही. त्याने त्याची स्वतंत्र वाट निवडली. "बी.ई.' झाल्यानंतर पुण्यात सिमॅंटेक कंपनीत घसघशीत पगाराची नोकरी करत तो स्थिर झाला होता. या व्यावहारिक स्थिरतेबद्दल मात्र त्याच्या मनात प्रश्‍न पडत होते. आपण आपल्यासाठी नाही, तर कंपनीसाठी राबतोय, ही जाणीव त्याच्या मनात होती. कंपनीत काम करत असताना त्याला प्रश्‍न पडायचे, ""माझ्या कामाचा उपयोग काय? तो कोणाला होत आहे? परक्‍या देशातील लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी माझी बुद्धी का झिजवतोय? माझ्या अवतीभवती किती तरी लोक उपाशी आहेत, निरक्षर आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग मी का करत नाही?'' असे प्रश्‍न अमृतला सतत छळत होते.
या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी अमृतने राजीनामा दिला. राजीनामा दिला, पण पुढे काय करायचे, हा प्रश्‍न अनुत्तरितच होता. सुदैवाने अमृतला जे प्रश्‍न पडत होते, ते इतर तरुणांनाही पडत होते. या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनाही मिळत नव्हती. ती देण्याचा प्रयत्न केला डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग आणि विवेक सावंत यांनी. प्रश्‍न पडला, तर भावनेच्या आहारी न जाता त्यावर बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिक समाधान शोधून काढणे, याकडे या तिघांचाही कल असायचा. समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या तरुणांना एक दिशा व व्यासपीठ देण्याचे काम बंग दांपत्य आणि सावंत यांनी केले.
"ज्यांना समस्या सोडवायच्या आहेत, त्यांच्यासाठी समस्यांहून अधिक काय पाहिजे,' ही डॉ. अभय बंग यांची भूमिका, तर "अर्थवादी युवकांना अर्थपूर्णतेकडे न्यायला हवे,' असे विवेक सावंत सांगत. दोघांच्या या म्हणण्यातच "निर्माण'ची भूमिका लपलेली आहे.
जे तरुण भौतिकदृष्ट्या स्थिर झाले आहेत, पण मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत, त्यांना अर्थपूर्ण जगण्यासाठी दिशा दाखवावी, या भूमिकेतून जून 2006 मध्ये "निर्माण'ची स्थापना करण्यात आली. सभोवताली दिसणाऱ्या समस्यांनी अस्वस्थ होणारे तरुण शोधणे, त्यांना एकत्र करून या समस्या सोडविण्यासाठी उद्युक्त करणे- मदत करणे, हाच "निर्माण'च्या कामाचा उद्देश होता. निर्माण ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. अमृत हा "निर्माण'च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी. तो सांगतो, ""ज्यातून "स्व'ची ओळख होईल, अशी तरतूद सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत नाही. स्वतःला स्वतःची ओळख व्हावी, तसेच समाजाची गरज ओळखून त्यातील काही प्रश्‍नांवर काम करायला उत्सुक असणाऱ्या तरुणांना आपल्या आयुष्याचा हेतू कळावा, यासाठी "निर्माण' मदत करते.''
"निर्माण'च्या प्रक्रियेतून गेल्यानंतर 2008 पासून अमृतने "निर्माण'च्या संघटनात्मक कामात लक्ष घालायला सुरवात केली. आज "निर्माण'ला तो स्वतःचा प्रकल्प समजतोय, स्वतःच्या अर्थपूर्ण जगण्याचा.
"निर्माण' हा सर्चचा उपक्रम असला, तरी तो सर्चपुरता किंवा गडचिरोलीपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातील तीसपेक्षा जास्त नामवंत संस्था "निर्माण'शी जोडल्या गेल्या आहेत. महात्मा गांधी आणि विनोबांनी जी "नयी तालीम' नावाची शिक्षणपद्धती सुचवली होती, तिचे एकविसाव्या शतकातील स्वरूप म्हणजे "निर्माण'. नयी तालीमच्या "जगण्याकरिता शिक्षण, जगण्याद्वारा शिक्षण आणि जीवनभर शिकत राहणे,' या तत्त्वावर निर्माणची मांडणी केलेली आहे. वैज्ञानिक संस्कारांवर ही मांडणी आहे. अमृतसोबत अमिताभ खरे, सायली ताम्हणे आणि उमेश खाडे हे निर्माणचे संघटन व समन्वयाचे काम सांभाळतात. सर्वांशी चर्चा करून "निर्माण'च्या कामाची दिशा व धोरणे ठरवली जातात. तिच्या अंमलबजावणीची जबाबदारी या संघटन समितीवर असते. निर्माणची निवडप्रक्रियाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यांना निर्माणला जॉइन व्हायचे आहे, त्यांना आधी एक प्रश्‍नावली भरून निर्माणकडे पाठवावी लागते. यातून निवडलेल्या तरुणांची निर्माणचे समन्वयक त्या त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेतात. कोणत्याही मुलाला त्यासाठी गडचिरोलीला जावे लागत नाही. या मुलाखतींमधून निर्माणच्या शिबिरासाठी म्हणून अंतिम 60 जणांची निवड करण्यात येते. आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे, आपल्या जगण्याचे प्रयोजन काय आहे, याविषयी विचार करायला लावणे, हेच निर्माणच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य. शिवाय या पद्धतीच्या परस्पर संवादामुळे सामाजिक कामांविषयी त्यांचे गांभीर्य किती आहे आणि ते यात कायमस्वरूपी उतरणार आहेत की नाहीत, याचा अंदाजही येतो.
निवड झालेल्या तरुणांची (निर्माणींची) प्रत्येक तुकडी ही दर सहा महिन्यांनी होणाऱ्या 8-10 दिवसांच्या चार शिबिरांत प्रशिक्षण घेते. पहिल्या शिबिरात प्रत्येकाला स्वतःची ओळख, दुसऱ्या शिबिरात आजूबाजूच्या समाजाची ओळख, तिसऱ्या शिबिरात समाजातील वेगवेगळ्या प्रश्‍नांचे बौद्धिक विश्‍लेषण व त्याच्या केस स्टडींचा अभ्यास, असे मार्गदर्शन केले जाते. शिबिराचा चौथा टप्पा हा सगळ्यांत महत्त्वाचा यात आपण काय करायचे, हे ठरवायचे असते. शिबिर संपल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत या निर्माणींनी परत गेल्यावर काय करावे, याचीही आखणी केली जाते. या शिबिरांतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे या तरुणांना चार ते पाच दिवस एका खेड्यात, एका कुटुंबात राहावे लागते. यात ते कुटुंब आपले मानून त्यांच्यासारखेच राहणे अपेक्षित असते. याचे कारण लोकांचे प्रश्‍न प्रत्यक्षात काय असतात, ते काय असतात, ते सोडवण्यासाठी काय करावे लागेल, याची जाणीव निर्माणींना व्हावी, जी एरवीच्या जगण्यातून होत नाही.
""शिबिराच्या काळातच हे निर्माणी समाजातील वेगवेगळ्या समस्यांना भिडायला लागतात. त्यांना ज्या समस्या सोडवायच्या आहेत, त्यात काम करणाऱ्या संस्था व लोकांना ते भेटतात, त्यांच्यासोबत काम करू लागतात. या प्रश्‍नांकडे भावनेने नव्हे, तर बुद्धीने पाहता यावे, यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करतात. सामाजिक काम म्हणजे काही क्रांतिकारक, जगावेगळे काम नसून आपल्या समस्या व्यावसायिक पद्धतीने सोडवण्यावर इथे भर दिला जातो. आपल्या बौद्धिक क्षमतेचा समाजासाठी व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अर्थपूर्ण उपयोग व्हावा, यावर निर्माणचा भर असतो. हीच निर्माणची मुख्य प्रेरणा आहे,'' असे अमृत सांगतो.
निर्माणच्या शिबिरांतून तावूनसुलाखून निघालेल्या निर्माणींपैकी ज्यांना पुढे जाऊन खरेच काही करायचे आहे, त्यांच्यासाठी चार पर्याय उपलब्ध असतात. पहिला ः त्यांनी एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे.
दुसरा ः त्यांनी सरकारी यंत्रणेत सहभागी होऊन काम करावे.
तिसरा ः त्यांनी स्वतःच एखादे काम सुरू करावे आणि
चौथा ः एखाद्या समस्येची सोडवणूक करू इच्छिणाऱ्या निर्माणींना एक वर्षासाठी देण्यात येणारी "निर्माण फेलोशिप'.
निर्माण समुदाय
सामाजिक प्रश्‍न सोडवणे आणि नेतृत्वाची नवीन फळी तयार करणे हे "निर्माण समुदाय'चे काम आहे. या माध्यमातून निर्माणच्या कामाची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या समुदायात राज्यातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था एकत्र आलेल्या आहेत. यांच्यासोबत राहून निर्माणी सामाजिक समस्या सोडवण्याचे व्यावहारिक शिक्षण घेत असतात. सामाजिक बदल व ते घडवून आणणारे लोक यांच्याशी या मुलांची भेट घडवून त्यातून त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम येत्या काळात राबविण्यात येणार आहे.
निर्माणची ही प्रक्रिया आतापर्यंत 350 तरुणांनी अनुभवली आहे. त्यातील 40 तरुण-तरुणी कोणता तरी प्रश्‍न घेऊन त्यावर पूर्णवेळ काम करत आहेत. गाई-बैलांचे वाण कसे सुधारता येतील, यावर सजल कुलकर्णी काम करतो आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया आटोक्‍यात कसा आणता येईल, यावर चारुता गोखलेचे संशोधन सुरू आहे. माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रमोद पाटील धडपडतो आहे. संतोष गवळे आपल्या गावाचा विकास करण्यासाठी नवनवे प्रयोग करतो आहे. हे काम करताना त्यांच्यात कसलाही दांभिकपणा नाही, की आपण जे करतोय त्यासाठी चांगले म्हणावे, अशी अपेक्षाही नाही. "निर्माणमध्ये मी आहे, कारण माझ्यात धैर्य आहे. ज्याच्या बळावर मला मान्य नसणाऱ्या गोष्टी बदलण्यासाठी मी संघर्ष करतो आहे. मला हव्या असणाऱ्या बदलांसाठी मी झगडतोय. हे माझ्या आवडीचे काम आहे,' हीच या साऱ्यांची भूमिका आहे. निर्माणमुळे आजच्या युवकांमध्ये वाईटाला वाईट म्हणण्याचे व चांगल्या कामात स्वतःला झोकून देण्याचे धैर्य निर्माण होत आहे. आपल्याला नक्की काय करायचेय, याची स्पष्टता त्यांच्या मनात तयार होत आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अर्थपूर्ण आयुष्य जगण्याच्या पारंपरिक कल्पना बदलून वास्तव व व्यावहारिक, सांस्कृतिक बदल घडत आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने यातील तरुणांची संख्या वाढतच आहे. समाजासाठी, देशासाठी युवा पिढीने भविष्याची जबाबदारी पेलण्यासाठी पुढे यावे ही निश्‍चितच आश्‍वासक बाब असते आणि "निर्माण' ती पूर्ण करत आहे.
 
निर्माणमध्ये सहभागी व्हायचंय?
निर्माणची पुढची बॅच डिसेंबर 2012 पासून सुरू होत आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे ते  सायली ताम्हणे : 9422937884 अमृत बंग : 9422501496 यांच्याशी संपर्क करू शकतात.
 

 


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: