Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 

'संम्मीलना'त ठिकाणाचा अडसर कशाला ?
- वंदना कोर्टीकर
Saturday, July 12, 2014 AT 12:00 AM (IST)
88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान या ठिकाणी होणार, हे निश्‍चित झाले आणि गदारोळ उठला. "घुमानला मराठी वाचक फारसे नाहीत; तिथे संमेलन घेऊन फारसे काही हाती येणार नाही,' अशी चर्चा रंगू लागली. प्रकाशकांनी तर आर्थिक ताळेबंद मांडून या संमेलनाला जाणे हे कसे परवडणारे नाही, अशी री ओढली. ही सगळी चर्चा पाहिल्यावर "अखिल भारतीय' मराठी साहित्य संमेलनाच्या मूळच्या उद्दिष्टांपासून आपण दूर जात आहोत का, हेही तपासायला हवे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाबाबत सध्या जी वैचारिक जुगलबंदी सुरू आहे ती पाहता, साहित्य संमेलनांच्या उद्दिष्टांबद्दल फक्त सर्वसामान्यांमध्येच नाही, तर विचारवंतांमध्येही संदिग्धावस्था असल्याचे लक्षात येते. साहित्य संमेलने म्हणजे एकत्र येऊन साहित्यविषयक साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित असताना, अशा संमेलनांच्या आयोजक, साहित्यिकांसह आपण वाचकही मूळ उद्दिष्टांबाबत संभ्रमित झाल्याचे चित्र आता प्रसारमाध्यमांतून दृग्गोचर होऊ लागले आहे. साहित्य संमेलनांबाबत असे गोंधळाचे वातावरण तयार होणे ही फक्त वाचकांची, साहित्यिकांचीच नव्हे, तर प्रत्यक्ष त्या भाषेचीही हानी आहे.

या वेळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबच्या ईशान्य सीमेवरील गुरुदासपूर जिल्ह्यातील "घुमान' या संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या गावी होणार असल्याच्या बातम्यांपाठोपाठ या निर्णयाच्या विरोधातील सूरही कानी पडू लागले आहेत. अनेक प्रकाशकांनी तेथे जाणे प्रकाशन व्यवसायाच्या, पुस्तकविक्रीच्या दृष्टीने कसे हानिकारक आहे, याचे तुणतुणे वाजवायला सुरवात केली आहे. मराठीची साहित्यपताका महाराष्ट्राबाहेर, अटकेपार नेण्यास विरोध करणाऱ्या या मंडळींचे हे व्यावसायिक गणित, हीच संमेलने जेव्हा परदेशांत आयोजिली जातात, तेव्हा कुठे जाते, हा कळीचा प्रश्‍न आहे. साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश साहित्यिक विचारांचे, संस्कृतींचे आदान-प्रदान करणे, हा आहे. पुस्तकविक्री ही साहित्यनिर्मितीची, प्रसाराची उपांगे आहेत. मूळ उद्दिष्टांना हरताळ फासून जर उपांगांना महत्त्व येत राहिले, तर भाषावृद्धीला, विचारांच्या आदानप्रदानाच्या प्रक्रियेला खीळ बसणार, हे निश्‍चित आहे. तेव्हा साहित्य संमेलने ही जरी लोकशाहीची, विचारांच्या मोकळेपणाने केलेल्या देवाणघेवाणीची प्रतीक असली, तरी क्षुल्लक स्वार्थासाठी संमेलनांच्या उदात्त हेतूंना हरताळ फासायचा का, याचा निर्णय आता प्रकाशकांनी घ्यायचा आहे. मध्यंतरी लाखभर मराठी भाषकांनी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये दिवाळी साजरी केली. यात फटाके उडविण्याच्या आनंदापेक्षा, माझा शंभर टक्के मराठी सण मी अमेरिकेतील अत्यंत महत्त्वाच्या शहरात माझ्या मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर तेवढ्याच आनंदात साजरा करतोय, हे संस्कृतिप्रेमच होते, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही.

"घुमान' या गावी माझे दोन वेळा जाणे झाले, तेही संत नामदेवांच्या साहित्याच्या प्रेमापोटी. पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर जसे सर्वत्र आपणास पांडुरंगाचे अस्तित्व जाणवते, तद्वतच घुमानच्या कोनाकोपऱ्यामध्ये नामदेवांचे अस्तित्व जाणवते. बाबा नामदेव म्हणून प्रेमाने त्यांना संबोधले जाते. गावातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आपणास नामदेवविचार प्रकर्षाने जाणवतो. महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यात पंढरपूरहून आलेल्या एखाद्या पांथस्थास पांडुरंगाच्या गावाहून आला म्हणून साष्टांग दंडवत घातला जातो, तसेच महाराष्ट्रातून आलेल्या नामदेवभक्तास संत नामदेवांच्या जन्मभूमीतून आलेला भक्त म्हणून घुमानमध्ये त्याचा विशेष आदर सत्कार केला जातो. अक्षरशः घराघरातून गुरू नानकांच्या बरोबरीने संत नामदेवांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. त्यांचे नित्य पूजनही केले जाते. नामियाना या तलावाजवळ असलेल्या व साधारणपणे 25 ते 30 हजार लोकवस्ती असलेल्या घुमानमध्ये असलेली स्वच्छता मात्र आम्हा सर्वांच्याच लक्षात राहिली.

"घुमान' या नावाची उत्पत्ती सांगताना असे म्हटले जाते, की नामदेव महाराज घुमक्कड (विरागी) वृत्तीने सर्वत्र संचार करीत असत म्हणून त्यांचे निवासस्थान असलेल्या नामियाना तळ्यानजीकच्या जागेस "घुमान' हे नाव प्रचलित झाले. या ठिकाणी रामगढच्या जस्ससिंग सरदार याने नामदेवांच्या स्मरणार्थ एक नामदेव मंदिर बांधले आहे. या मंदिरात आता गुरुग्रंथसाहिबही आहे. श्री विठ्ठलाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या नामदेवांना बहोरदास या पंजाबी भक्ताने पुन्हा महाराष्ट्रात आणून पोचविले. सहृदय, प्रेमळ पंजाबी भक्तांनी संत नामदेव महाराजांच्या पादुकांची स्थापना करून त्यावर समाधी बांधली आहे. संत नामदेवांच्या विरहदिनानिमित्त येथे "घुमान यात्रा' भरते. आजही झंडासाहिब श्री नामदेवजी हे भागवतधर्माचे निशाण घुमानमध्ये फडकते आहे. संत नामदेवांच्या असंख्य पद्यांपैकी निवडक 61 पदे शिखांच्या आदिग्रंथात श्री गुरू अर्जुनदेव यांनी समाविष्ट केली आहेत. नामदेवांनी पंजाबमध्ये प्रदीर्घ वास्तव्य केले. त्यांच्या पदस्पर्शाने पंजाबमधील अनेक गावे पुनीत झाली आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट छाप पंजाबी संस्कृतीवर उमटवली.
नामदेव महाराज खरे तर मराठी भाषेचे राजदूतच आहेत. बाजीराव पेशव्याने आपल्या क्षात्रतेजाने जसा सारा उत्तर भारत झळाळून सोडला, तसेच नामदेवांनी विठ्ठलभक्तीची, भागवतधर्माची पताका उत्तरेत फडकविली. हरियाना, पंजाब, पाकिस्तानातील काही तीर्थक्षेत्रे येथे नामदेवबाबाजींची मंदिरे, मठ, गुरुद्वारे आहेत. ते ज्या प्रांतात गेले, तेथील स्थानिक भाषेतून त्यांनी आपल्या शिष्यांना परोपकाराचा, विठ्ठलभक्तीचा, सहिष्णुतेचा उपदेश दिला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ईश्‍वरभक्तीचे ते प्रतीक बनले. त्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविले. ज्या वेळी इस्लामधर्माची लाट उत्तरेत बळकट होत होती, अनाचाराचे, अत्याचाराचे सावट वाढत होते, अशा पार्श्‍वभूमीवर सततच्या हिंसाचाराला कंटाळलेल्या जनतेला नामदेव महाराजांचा साधेपणा, त्यांची विठ्ठलाप्रती असलेली प्रेमळ भक्ती भावली आणि नामदेवांनी या जनतेची मने जिंकली व त्यांच्यातील भ्रातृभाव जागवला. एक मराठी संत एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन हजारो मैल दूर असलेल्या पंजाब प्रांतात जातो काय, अक्षरशः शून्यातून आपल्या भागवतधर्माचा प्रसार, प्रचार करतो काय, अन्‌ हेही कोणतीही प्रचार, प्रसाराची साधने नसताना, सारेच अतर्क्‍य. म्हणूनच नामदेवांना भागवतधर्माचेच नव्हे, तर मराठी भाषेचे राजदूत म्हणायला हवे.
विविध धर्मांना, विचारप्रवाहांना आपल्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणुकीने एका धाग्यात बांधणाऱ्या नामदेव महाराजांना विश्‍वसंत का म्हटले जाते, हे त्यांचे विविधांगी कार्य पाहिले, की प्रत्ययाला येते. संत नामदेवांना कोणत्याही भाषेच्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांच्या विश्‍वबंधुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करण्यासारखे होईल. संत नामदेवांना जसा दलितोद्धार अपेक्षित होता, तसाच त्यांना विश्‍वोद्धारही अभिप्रेत होता. जगाच्या कल्याणासाठी, "आधी केले, मग सांगितले' या तत्त्वाबरहुकूम चालणारा महात्माच संत कोटीत गणला जातो. संत नामदेवांचे संतपण असे कृतार्थ होते. म्हणूनच आपल्या अंगीकृत कार्याने, ईशसेवेने संतपदाला पोचलेल्या नामदेवांचे स्मरण मराठीजनांनी त्यांच्या कर्मभूमीत करणे, या साऱ्याच प्रक्रियेला एक भावनिक पदर आहे. पुस्तकविक्रीच्या व्यवहाराची कसर मराठी साहित्य संमेलनाच्या या रेशीमवस्त्राला लागू द्यायची का, हा प्रश्‍न संमेलनाच्या संयोजकांनी, साहित्यिकांनी आणि वाचकांनी आता एकमेकांना विचारायची वेळ आली आहे. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे वापरात नसलेला अवयव हा कालांतराने नष्ट होतो, त्याच अनुषंगाने चलनवलन नसलेली भाषा मृतप्राय व्हायला वेळ लागत नाही. इंग्रजी भाषेची त्सुनामी आलेल्या आपल्या सांस्कृतिक विश्‍वात मराठी संवर्धनाच्या प्रयत्नांचे हे होडके टिकले, तरच आपल्याला, आपल्या भाषेला व पर्यायाने मराठी संस्कृतीला भवितव्य आहे, हे सर्वांनीच लक्षात घेणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यामुळेच संत नामदेवांची विश्‍वबंधुत्वाची पताका खांद्यावर घेऊन घुमानमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे आपण स्वागत करणे समयोचित ठरेल.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2014 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: