उपवासाची लोणची
लोणचे विशेष
उपवास करणाऱ्यांना उपवासाच्या दिवशीही लोणच्याची लज्जत चाखता यावी तसेच ज्यांना पथ्य आहेत, त्यांनाही लोणच्याचा अस्वाद घेता यावा यासाठी लोणच्याच्या रेसिपीज...
कैरीचे उपवासाचे लोणचे
साहित्य : २५० ग्रॅम कैऱ्या, १०० ग्रॅम साखर (१० ते ११ चहाचे चमचे शिग लावून भरावेत), ५० ग्रॅम मीठ, दोन मोठे चमचे बेडगी वा काश्मिरी लाल मिरचीचे तिखट
(याने लोणच्याला लाल रंग छान येतो.) एक चहाचा चमचा जिरेपूड, एक मोठा चमचा आले तुकडे.
कृती : प्रथम कैरीचे साल काढून बारीक फोडी कराव्यात. आल्याचे साल चमच्याने खरवडून बारीक तुकडे करावेत. नंतर या फोडी एका बोलमध्ये घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून एकत्र करावेत. चांगले मिक्स करुन साखर एकत्र करावी. अर्धा तास तसेच झाकून ठेवावे. मग हे मिश्रण एका मोठ्या तोंडाच्या बाटलीत भरुन ती बाटली झाकण लावून शक्यतो उन्हात ठेवावी. दररोज हे मिश्रण चांगले ढवळावे. असे सहा दिवस करावे, मग सातव्या दिवशी या मिश्रणात तिखट घालून पुन्हा चांगले ढवळून झाकण लावावे. ही बाटली आता घरातच (सावलीत) ठेवावी. साधारण ९ ते १० दिवसांनी लोणचे छान मुरेल. त्यानंतर ते खाण्यायोग्य होते.
फणसाच्या गऱ्यांचे लोणचे (उपवासी लोणचे)
(काप्या फणसाचे कच्चे गरे घ्यावेत. त्याच्या आठ्याही सोलून त्यांचे बेताचे तुकडे करावेत.)
साहित्य : १ मोठी वाटी गऱ्याचे तुकडे+ आठळ्यांचे तुकडे, अर्धी वाटी कैरीच्या सालासकट फोडी, जिरे १ मोठा चमचा, २ मोठे चमचे बॅडगी वा काश्मिरी लाल मिरचीचे तिखट व तेवढेच मीठ (तिखट व मीठ आवडीप्रमाणे घ्यावे), १/४ वाटी साखर.
कृती : गऱ्यांचे व आठळ्यांचे तुकडे एकत्र करुन कुकरमध्ये चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावेत. छान, मऊ झाले, की ते एका मोठ्या ताटात पसरवून ठेवावेत. म्हणजे अगदी कोरडे होतील. चार तासांनी नंतर तुकडे बोलमध्ये घेऊन त्यात भाजलेली जिऱ्याची अर्धी जाडसर पूड, तिखट व मीठ तसेच साखर आणि कैरीच्या फोडी चांगले एकत्र करुन बरणीत भरुन ठेवावे. साधारण ४-५ दिवस तसेच ठेवावे व रोज चमच्याने मिश्रण ढवळावे व घट्ट झाकण लावावेत. सहा दिवसांनी हे लोणचे मस्त मुरेल.
टीप : ४ चहाचे चमचे मेथीदाणे, २ मोठे चमचे मोहरी पूड, १ चहाचा चमचा सुगंधी हिंग, २ चहाचे चमचे हळद व १ डाव तेल. मेथी दाणे तेलात लालसर तळून घ्यावेत व जाडसर वाटावेत. आता तेलात वरील मसाल्यांची फोडणी करुन गार झाल्यावर ती गऱ्यांच्या मिश्रणात ओतून लोणचे चांगले कालवावे व बरणीत भरुन ठेवावे. लोणच्याचा हा नवीन प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल.
लिंबाचे गोड लोणचे
साहित्य : ६ मध्यम आकाराची पातळ सालीची पिवळी धमक ताजी व रसाळ लिंबे, २०० ग्रॅम साखर, अर्धा चमचा बॅडगीचे लाल तिखट, १ चमचा मीठ, आल्याचा १ मोठा तुकडा.
कृती : लिंबाच्या अगदी बारीकच फोडी कराव्यात. आले स्वच्छ करुन त्याच्या पण बारीक फोडी कराव्यात किंवा किसून घ्यावे. नंतर सर्व साहित्य एकत्र करुन कालवून मोठ्या तोंडाच्या बाटलीत भरुन ठेवावे. नंतर बाटली आठ दिवस उन्हात ठेवावी. रोजच्या रोज बाटलीतले मिश्रण हलवावे व झाकण लावावे. हे लिंबू लोणचे आजारी व्यक्ती व लहान मुलांना फार आवडेल व तोंडाला छान चव येते.
आजारी व्यक्तींसाठी खास लोणचे
साहित्य : १/४ वाटी आल्याचा कीस, १/२ वाटी ओली आंबेहळद, १/४ वाटी ओली हळद, १/४ वाटी आवळ्याचा कीस, १ मोठी वाटी लिंबूरस, १ वाटी आवळे फोडी, २ हिरव्या मिरच्या.
मसाला : २ मोठे चमचे मेथीदाणे, २ मोठे चमचे सौंफ (बडीशेप) , १ मोठा चमचा ओवा, २ चहाचे चमचे मोहरीची डाळ, अर्धा चमचा हळदपूड, १ चमचा लाल बॅडगीचे तिखट, २ मोठे चमचे कलोंजी, १ वाटी देशी गूळ, १ वाटी शेंगदाणे तेल, १ चमचा पांढरे मिरे, २ चहाचे चमचे मीठ, एक चमचा हिंग पावडर.
कृती : प्रथम आवळे उकडून त्याच्या फोडी घेणे, आंबे हळद व ओली हळद किसून घ्यावी. आले किस + हिरव्या मिरच्या व आवळा किस एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून त्याचा मऊ लगदा करुन घ्यावा. प्रथम तेलात मेथीदाणे व बडीशेप (सौंफ) तळून घ्यावे. ते आख्खे ठेवावे वा पावडर करुन घ्यावी. आता कढईत तेल ओतावे व त्यात आले वाटण (लगदा) हळद घालून चांगले परतावे. त्यात थोडे मीठ घालावे. नंतर त्यात आवळे फोडी, किसलेली ओली आंबे हळद व ओली हळद घालावी. मिश्रण पाच मिनिटे परतावे. मग त्यात लाल तिखट हिंग, तळलेली मेथी व बडीशेप यांची पुड घालून परत परतावे. लिंबूरस, २ चमचे मीठ (स्वादानुसार), मोहरीची डाळ, भाजलेला ओवा, पांढऱ्या मिऱ्याची पूड हा मसाला घालून पाच मिनिटे परतावे. आता देशी वा वाळवलेला व बारीक चिरलेला गूळ घालून परतावे. दहा मिनिटे मिश्रण परतून त्यात कलौंजी घालून चांगले पाच मिनिटे ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर झाले, की लोणचे तयार झाले. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरावे. खूपच स्वादिष्ट होते. या लोणच्याने तोंडाला छान चव तर येईलच व अन्नपचन छान होईल.
टीप : खूप दिवस टिकण्यासाठी तेल जास्त घालावे.
मोडाच्या मेथीचे लोणचे
साहित्य : एक मोठा बोल भरुन मोडाचे मेथीदाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेला खजूर, अर्धी वाटी काळ्या मनुका, अर्धी वाटी देशी गूळ बारीक चिरुन घेणे, अर्धी वाटी लिंबाचा रस, एक चहाचा चमचा मीठ, एक चहाचा चमचा ब्याडगी वा काश्मिरी लाल मिरचीचे तिखट, एक वाटी शेंगदाणा तेल व फोडणीचे साहित्य, मोहरी, हिंग, हळद व ५-६ सुक्या मिरच्या.
कृती : प्रथम तेलात मोहरी, हिंग, हळद व मिरच्या यांची चांगली चरचरीत फोडणी करुन घ्यावी. ती गार होऊ द्यावी. आता एका बोलमध्ये मोडाची मेथी, खजूर, मनुका, गुळ, लिंबूरस, तिखट, मीठ हे सर्व एकत्र करावे. त्यात तयार फोडणी ओतावी. तयार लोणचे व्यवस्थित हलवून एका काचेच्या बरणीत वा बाटलीत भरुन झाकण लावून चार दिवस लोणचे मुरु द्यावे. हे मेथी लोणचे खूपच पौष्टिक, स्वादिष्ट आहे.
टीप : १. हे लोणचे औषधी आहे. कंबर दुखणे, संधिवात, पाय दुखणे यावर उपयुक्त आहेच. पण बाळंतिणीसाठी पण गुणकारी आहे.
२. मेथीला मोड आणले असल्याने मेथी अजिबात कडू लागत नाही. लहान मुले पण आवडीने खातील.
खजुराचे आंबट गोड लोणचे
साहित्य : २५० ग्रॅम बीन बियांचा खजूर, १ वाटी लिंबाचा रस, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, मिरेपूड थोडी व चहाचा चमचा गरम मसाला, दालचिनी, वेलची, जायपत्री मिळून, १ मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, २०० ग्रॅम साखर वा देशी कोरडा गूळ.
फोडणीसाठी : १ वाटी तेल, मोहरी, हिंग, २-३ तमालपत्र, एक चमचा मेथीदाणे व ३-४ लाल मिरचीचे तुकडे.
कृती : प्रथम खजुराचे लांबट आकाराचे तुकडे करावेत. मग एका बोलमध्ये खजूर, तिखट, मीठ, जिरे पावडर, साखर वा गूळ, गरम मसाला, लिंबूरस, मिरेपूड हे सर्व साहित्य एकत्र घेऊन ते कालवावे. बाटलीत भरुन दोन दिवस तसेच झाकण लावून ठेवावे. नंतर त्यात गार झालेली फोडणी घालून ढवळून चटकदार लोणचे वापरावे.
गोड टोमॅटो लोणचे
साहित्य : दीड किलो हिरवे टोमॅटो, ५०० ग्रॅम कांदे, ५-६ मिरे, १० ग्रॅम मिरच्या, १ आल्याचा तुकडा, अर्धा चमचा मिरेपूड, १ मोठा चमचा मीठ, ५०० ग्रॅम साखर, व्हिनीगर २-३ कप.
कृती : टोमॅटो ओल्या कपड्याने पुसून घ्यावेत व पुन्हा कोरड्या कपड्याने पुसावेत. नंतर एकेका टोमॅटोचे चार तुकडे करावेत. कांद्याची साले काढून बारीक चिरावेत. आले व मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. टोमॅटो, कांदे, मिरच्या एकत्र करुन ७-८ तास तसेच ठेवावेत. पाणी सुटेल ते काढून टाकावे. नंतर टोमॅटो, कांदे मिरच्या एका भांड्यात घालून त्यात साखर, मिरेपूड घालावी. व्हिनीगर घालून उकळी आणावी. टोमॅटो शिजेपर्यंत गॅसवर ठेवावे व गार झाल्यावर रुंद तोंडाच्या बाटलीत लोणचे भरावे.
कोबीचे लोणचे
साहित्य : ५०० ग्रॅम लाल कोबी, ३ चमचे मीठ, २ कप व्हिनेगर, १ जायपत्रीचा तुकडा, २ लाल मिरच्या, २-३ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, ७-८ काळे मिरे, लहानसा आल्याचा तुकडा.
कृती : कोबीची बाहेरची पाने काढून टाकावीत. नंतर तो बारीक पण लांबट चिरुन त्याला मीठ चोळून रात्रभर तसाच झाकून ठेवावा. सकाळी पाणी निथळून टाकावे व कपड्याने जरा पुसून घ्यावा. बाकी सर्व मसाला बारीक वाटून घ्यावा. वाटताना थोडे व्हिनेगर घालावे व हा सर्व मसाला एका लहान पिशवीत घालावा. भांड्यात व्हिनेगर घालून त्यात मसाला पुरचुंडी टाकून, भांड्यावर झाकण ठेवून उकळून घ्यावी. नंतर गॅसवरून खाली उतरवून दोन तास तसेच ठेवावे. मग आतील मसाला पुरचुंडी काढून टाकावी. कोबी बाटलीत भरुन त्यावर गार मसालेदार व्हिनेगर ओतून बाटलीला झाकण लावून बंद करावी. २-३ दिवसांनी उपयोगात आणावे. हे लोणचे फार दिवस टिकत नाही.