करिअरच्या वाटेतील धोके

डॉ. श्रीराम गीत
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

भारतातील प्रत्येकाला हिमालयाचे कायम आकर्षण वाटत राहिले आहे. तरुणवयात तिथली शिखरे खुणावतात. किमान उंचउंच हिमाच्छादित शिखरांचे मनःपूत दर्शन घडवणारे खडतर ट्रेक तरी करावेसे वाटतात. त्यातील काहीजणांनी रीतसर गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले असतात. मात्र बहुतांशी हौशी ट्रेकर्सची संख्या स्वतःला एखाद्या अनोळखी, ऐकीव संस्थेतर्फे काढलेल्या मोहिमेत सामील करून टाकते. अशा मोहिमांच्या कथा महाराष्ट्राच्या कातळकड्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमधे काढलेल्या अक्षरशः दरमहिन्याला वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. तीच बाब शाळकरी वा कॉलेज विद्यार्थ्यांच्या काढलेल्या सहलींची. धरणाचे पाणी, समुद्राचे पाणी, तलावाच्या काठी केलेल्या कॅंपींगच्या सहली किंवा शिबिरे यांतून येणाऱ्या बातम्या तर आता नित्यनियमाने वाचायची सवय वाचकांना झाली आहे. काय असतात या संदर्भातल्या बातम्या?

  • रस्ता चुकला, भरकटला, फरपट झाली. मोबाइलची रेंज नव्हती, पाणी संपले मात्र शहाण्यासुरत्या गुराख्याच्या मदतीने जीव मात्र वाचला.
  • अनोळखी दऱ्यांचे आकर्षण, सेल्फीचा अनावर मोह आणि त्यानंतर अक्षरशः शेकडो फूट दरीमधून प्रचंड मेहनतीने काढलेली प्रेते यांचे सविस्तर वर्णन.
  • कधीतरी पोहणे शिकलेली उत्साही पोरेपोरी तलाव, धरणे, समुद्राच्या अनोळखी पाण्यात धडाधडा उड्या  मारतात. भान विसरून पाण्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू होतो. आणि क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते.
  • दुर्दैवाने बातम्या मात्र नित्यनेमाने येतच राहतात!

१९७० च्या दशकापासून या साऱ्या बातम्यांची नोंद घ्यायला मी सुरवात केली, त्याला आता पन्नास वर्षे होतील. प्रत्येक दशकानुसार या बातम्यांत वाढ होत होती. मात्र त्याची गती भूमिती श्रेणीने वाढायची सुरवात झाली, ती इंटरनेट व गुगलबाबाच्या मदतीचे बोट मिळायला लागले तेव्हापासून त्यालाच एक्‍पोनेन्शियल ग्रोथ किंवा वाढ असाही एक शब्द आहे. माहितीचा ओघ धबधब्यासारखा अंगावर कोसळण्याचा तो परिणाम होताना? साप्ताहिकच्या करिअर विशेषांकात या साऱ्या माहितीचा काय संदर्भ? लेखाची जागा तर संपादकांनी चुकवलेली नाही ना? का ट्रेकिंगमधील करिअर्स अशा विषयाची ही सुरवात आहे? अशा विविध शंका एव्हाना जाणकार वाचकांच्या मनात यायला लागल्या असतील याची मला खात्री आहे. १९७० च्या दशकापासून जशा या बातम्यांची नोंद घेत होतो, त्यापेक्षा जास्त वेगळ्या नोंदींचा अभ्यास माझा सुरू झाला होता. त्या नोंदी होत्या करिअरविषयक. ऐकीव माहितीतून, एखाद्या उदाहरणातून, आकर्षक चकचकीत माहितीपत्रकाच्या वाचनातून त्या-त्या काळी झालेली करिअरविषयक आकर्षणे आता मोबाइलवरच्या स्क्रीनवर सुद्धा सहज उपलब्ध होऊ लागली. त्यातूनच ही करिअरबद्दलची धोकादायक वाटा, वळणे खुणावू लागली. प्रथम मुलामुलींना नंतर त्यांच्या हट्टातून पालकांना काहीवेळा अगदी उलटेसुद्धा. माझ्या मुलाला मी हे आणि हेच शिकायला सांगणार, तेच तो करणार त्यासाठी काय वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे, असा वेडा हट्ट धरणारे सुद्धा आजकाल सहज भेटतात.

प्रश्‍न एवढाच असतो, या हट्टाचे रूपांतर जेव्हा अपघाती वळण घेते, त्यावेळी मदतीला कोणीच येत नसते. अपघाती वळणात कोणकोणते शैक्षणिक व मानसिक टप्पे येतात? न झेपणारा अभ्यासक्रम लादल्याने ’न आवडणारा नव्हे’ काय काय घडू शकते, त्याची माझी गेल्या पंधरा वर्षांतली निरीक्षणे इथे नोंदवत आहेत. ती प्रत्येक टप्प्यातून गंभीर वळणे घेतात. 

    अभ्यासातील लक्ष उडणे व कॉलेज/ क्‍लासला दांड्या मारणे. कारण वर्गात बसून काही कळत नसले तर? न कळणाऱ्या इंग्रजी सिनेमाला थिएटरात पैसे देऊन तिकीट काढून बसलेल्या पालकांनी त्यावेळी काय विचार केला, ते इथे आठवले तर? अभ्यास कळत नसेल तर उपाय कोणता?

    परीक्षेची भीती वाटणे किंवा पेपर कोरे देणे मात्र त्याची कल्पना पालकांना न देणे. निकालानंतर रिचेकिंगचा आग्रह धरणारी मुले या गटात येतात. विद्यापीठ व बोर्ड यांचे गोंधळ गृहीत धरले तरी ९५ टक्के रिचेकिंगच्या मार्कात बदल होत नाहीत. मात्र पुन्हा परीक्षेला नीट अभ्यास करून बसणे व कदाचित पास होणे येथे शक्‍य असते.

    परीक्षेचे निकालपत्र पालकांच्या हाती पडते, त्यात परीक्षेला अनुपस्थित अशा शेरा वाचायला मिळतो. रोज पेपरला जाणारा मुलगा/ मुलगी व असे निकालपत्र याचा मेळ बसत नाही. पालकांच्या अट्टहासाने घातलेल्या एखाद्या कोर्ससंदर्भातील परीक्षांसंदर्भात असे अनेकदा घडत असते. यावर नीट विचार कोणी करायचा? त्यातच उत्तरसुद्धा दडलेले असते.

    चार वर्षांचे इंजिनिअरिंग सात वर्षे झाली तरी न संपणे. कसेबसे संपलेले इंजिनिअरिंगनंतर घरीच बसून, वर्ष वर्ष विविध प्रवेशपरीक्षांची तयारी करण्याचे फसवे प्रयत्न करणे. उदाहरणार्थ ः एमबीएची प्रवेशपरीक्षा, गेटची पदव्युत्तरसाठीची तयारी, परदेशी जायचे म्हणून जीआरईचा क्‍लास या गटात दरवर्षीचे किमान दहा हजार तरी महाराष्ट्रातील इंजिनिअर पदवीधर मोडतात. बेकारी मान्य न करण्याची ही एक पळवाट असते. मात्र यातून यश मिळण्याऐवजी इंजिनिअरिंग विसरून त्यावर गंज चढणे यापलीकडे फारसेकाही क्वचितच घडते. सामान्य पालक मात्र सहा लाख खर्चून बनवलेल्या या इंजिनिअरकडे हताशपणे पाहत असतो.

    स्वतःच्या मनाशी पक्के ठरवून, विचार करून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हळूहळू त्या दिशेने वाटचाल करतात. मात्र अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे ‘आता मी पद काढणार आणि अधिकारी बनणार’ अशांचे काय होते, ते त्यांचे पालकच जाणोत. गावोगावी तिशी ओलांडलेल्या मुलामुलींचे अक्षरशः लाखो पालक हताशपणे आपल्या मुलांसाठी पोटाला चिमटा घेऊन मनीऑर्डरी पाठवत राहतात.

    मॉडेलिंगचा किडा चावलेले विद्यार्थी व हट्टाने कमर्शिअल पायलटचा कोर्स संपवलेले ‘पायलट’ काही वर्षे स्वप्नात तरंगत राहून निराशेच्या, बेकारीच्या गर्तेत सापडतात. नाटक, सिनेमा, ॲक्‍टिंग संदर्भात टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून सटरफटर कामे करत, स्ट्रगल करत उदरनिर्वाह तरी शक्‍य झाला आहे. मात्र मॉडेलिंग व पायलट यांची रवानगी थेट गोदामातच होत जाते. तरीही यासाठीचा हट्ट धरणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. आपण वरून रणवीर, रणबीर सारखे दिसतो किंवा मला कोणीतरी मित्र अलिया म्हणतो, यातून हा किडा चावतो. मग अभ्यास नाकारून स्वप्ने पाहणे सुरू होते. दिवास्वप्नातून जागे करणे अवघड नसून, अशक्‍य असते. अशा स्वप्नांच्या पूर्तीचे चोचले पुरवणाऱ्या ‘कार्यशाळा’ आता सर्वच मोठ्या शहरांतून सुरू झाल्या आहेत ना?

    वर लिहिलेल्या सहा प्रकारांतून गंभीर वळण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वरवरपाहता लक्षात येत नाही, पण त्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, असे सर्वच मनोविकार तज्ज्ञ यांचेशी बोलताना सतत जाणवत आहे. गंभीर वळणाचे प्राथमिक स्वरूप म्हणजे झोप उडणे/ कमी होणे. भूक वाढणे/ कमी होणे. स्वमग्नता, चिडचिड. आक्रमकता किंवा कोषात जाणे. यानंतर सुरू होते ते डिप्रेशन. कदाचित चार महिने, कदाचित चार वर्षे असा याचा कालखंड असू शकतो. अर्थातच पदवीचा महत्त्वाची वर्षे त्याने झाकोळली तर सारेच आयुष्य त्यामुळे बदलते.

    सर्वांत तीव्र प्रतिक्रिया म्हणजे आत्महत्या किंवा त्याचा प्रयत्न. याचे प्रमाण कित्येक टक्‍क्‍यांनी वाढत असून, वयोगट पूर्वीचा वीस वर्षे आसपासचा होता. तो कमीकमी होत तेरा-चौदापर्यंत खाली उतरत आहे. साऱ्यांनाच हादरवणारा हा प्रकार शैक्षणिक जबरदस्तीतून होणे हे जास्तच विचित्र नाही काय? कोटा येथे आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा सामान्य विषय व्हावा हे आपले सर्वांचे दुर्दैव आहे. मात्र कोटा, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई येथील कोणीतरी कंपनी फ्रॅंचाइजी देऊन तुमच्या शहरात क्‍लास काढते व आपले पालक त्याला भुलून पाल्याच्या मागे लागतात, याचा गांभीर्याने विचार करायची गरज आली आहे.

    सुमारे साठ लाख खर्चून मुलांना खासगी कॉलेजातून डॉक्‍टर बनवले, पण पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेत सातत्याने येणाऱ्या अपयशाने नैराश्‍यग्रस्त डॉक्‍टरांची संख्या प्रचंड वाढत आहे. ‘चक्रव्यूह’ नावाची डॉक्‍टरने त्याच्या मुलासंदर्भात लिहिलेली कादंबरी प्रसिद्ध होऊन वीस वर्षे झाली, तरीपण हा रस्ता खडतर आहे, याचा विचारसुद्धा न करणारी मुलेमुली व त्यांचे पालक आज सहजपणे भेटतात. त्याचे एक विदारक उदाहरण म्हणजे जेमतेम त्रेसष्ठ टक्के इयत्ता दहावीला मिळालेली कन्या म्हणते मला डॉक्‍टरच व्हायचे आहे. सायन्सला प्रवेश मिळणे हे सुद्धा कठीण असताना तिचे व्यावसायिक वडील म्हणतात, ‘नो इश्‍यु, फक्त तीन कोटीच लागतात ना?’ तिचे बारावी सायन्सला सारेच विषय राहिल्याने इश्‍युच राहिला नव्हता. फक्त मुलगी तीव्र नैराश्‍यामुळे पुण्यातील तीन मानसोपचार तज्ज्ञांकडे फिरून पुन्हा माझ्यासमोर येऊन बसली होती. दर महिन्याला अजून फरक दिसत नाही म्हणून डॉक्‍टर बदलणारे आईवडील तिचे काय करायचे म्हणून मला विचारायला आले होते. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात, सत्तेतील लोकांचा  तर त्यावर ठाम विश्‍वासच असतो, पण त्यासाठी शिक्षणातले अनेक अपवाद आजही अस्तित्वात आहेत ना?

    भारतातील शिक्षण फालतू! इथे राहणे अशक्‍य! इथे कसल्याच संधी नाहीत! आम्ही त्याला किंवा तिला दहावीनंतर/ बारावीनंतरच पल्याडच्या देशात पाठवू इच्छितो. याउलटसुद्धा इंटरनॅशनल शाळांत शिकणाऱ्या मुलामुलींचे असते. तीच मनाशी ठरवून तसा हट्ट धरतात. कारण आठवीत शाळेतून सिंगापूर तर नववीत नासाची ‘ट्रीप’ करून झालेली असते. आईबाबांबरोबर युरोप तर चौथी-पाचवीतच भटकून झालेला असतो.

गरजेनुसार अभ्यास, मात्र चर्चा गॅझेटस्‌ची अन्‌ नवनवीन टेक्‍नॉलॉजीची. याला पूरक खतपाणी घालणाऱ्या अनेक एजन्सी सध्या उपलब्ध आहेत. प्रश्‍न एकच असतो, ही मुले या अडनिड्या वयात जेव्हा पल्याडच्या देशात जातात, तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसतो. आईवडिलांच्या पैशावर शिकणारे वर्गातील अन्य अक्षरशः शोधावे लागतात. खरे हुषार विद्यार्थी जे इथेसुद्धा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवू शकतात, ते तिथेही चमकतातच. देशाचे नाव काढतात. मात्र अन्य साऱ्यांचे काय होते हा सारा संशोधनाचा विषय ठरावा.

गांधी, बच्चन, कपूर, अंबानी, खान यांच्या मुलांनी कुठेही शिकले अन्‌ काहीही केले तरी बिघडत नसते. मात्र चार-पाच कोटींची मर्यादा, (होय, ही सुद्धा छोटी नाही हे नीट लक्षात घ्या.) असलेल्यांचा मात्र खेळ होतो अन्‌ फसगत होते, ती विद्यार्थ्यांची.

स्वतःची क्षमता ओळखा, प्रयत्नपूर्वक वाढवा 
आत्तापर्यंत काही मोजक्‍या क्षेत्रातील कुवत नसताना केलेल्या भ्रमंतीतील उदाहरणे आपण पाहिली. सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे कुवत नसताना, तयारी नसताना, तयारी मागची तपश्‍चर्या जाणून न घेतल्यामुळे भलत्याच साहसातून जसे अपयशाचे तडाखे बसतात तसे टाळण्याचे काही ठोकताळे पाहूयात. थोडक्‍यात अपेक्षा आणि वास्तव यांची सांगडसुद्धा घालता येऊ शकते यासाठीच.

आपल्याकडे काही शब्द जोडीजोडीनी वापरायची एक जुनी पद्धत रूढ आहे. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे आयआयटीतूनच करायचे अन्‌ दहावीला ७५-८० टक्केमार्क पडले तरी त्यासाठीचा क्‍लास लावून टाकायचा. मॅनेजमेंट म्हणजे आयआयएमला जायचे अन्‌ लठ्ठ पॅकेज घेऊन सुखात राहायचे. ॲक्‍टिंगसाठी एफटीआयआयला प्रवेश घेऊन टाकायचा किंवा नाटकात जायचे तर एनएसडीला दिल्लीत पोचायचे. डिझाईन म्हणजे एनआयडी व फॅशन म्हणजे एनआयएफटी. संशोधनाचा रस्ता पकडायचा तर आयसरमध्ये जायचे नाहीतर टीआयएफआरला. ॲस्ट्रोनॉमीसाठी आयुका तर अंतराळ विज्ञान इस्त्रोमध्ये सुरवात. चुकून-माकून परदेशीचे नाव निघाले तर गेला बाजार हार्वर्ड, एमआयटी आहेतच ना? लॉसाठी टेंपल इन व म्युझिकसाठी ट्रिनिटी कॉलेज.

  अशी सारी नामावली पाढे म्हटल्यासारखी मुले-मुली म्हणतात व पालक म्हणतात त्याची तयारी करायला क्‍लासेस कोणते? फिया किती? सारी फसगत इथेच सुरू होते. मग कोणीतरी सुचवते आठवीपासूनच आयआयटीची तयारी सुरू करावी लागते. नववी-दहावीपासूनच आयएएससाठी प्रयत्न करावे लागतात. मग त्याचे क्‍लासेस कोण घेते? ते आमच्या  गावात आहेत काय? नसतील तर पुण्यामुंबईला फ्लॅट घेऊन भाड्याने दोन वर्षे राहता येईलच की? असे हे जोडीजोडीचे शब्द आपण नक्की ऐकलेले असतात. ऐकून ऐकून पाठही झालेले असतात. मात्र तिथे शिकायला गेलेला कुठे भेटतो का? आसपास सहजी सापडतो का? नसेल तर तशी व्यक्ती शोधायचा आपण प्रयत्न तरी करतो का? का फक्त आम्ही तिथे नेऊन सोडतो. असे सांगणाऱ्या क्‍लासच्या शोधातच अडकतो? असे सारे कोणाला समजावायचा प्रयत्न केला तर एक गंमतीचे उत्तर मिळते. ‘तो/ ती नक्की अभ्यास करून प्रवेश मिळवेल. खूप हुशार अन्‌ मेहनती आहेत. फक्त तुम्ही क्‍लासचे नाव सांगा. प्रयत्न करायला तर काय हरकत आहे तुमची? कोणीच  हरकत घेण्याचा प्रश्‍न नसतो. मात्र पर्वतीची पायऱ्यांची चढण चढताना धापा टाकणारा मुलगा थेट हिमालयातील ट्रेकला निघालेला असतो, त्याचे काय होईल हे दृष्य समोर येत असते. एप्रिल शेवटच्या आठवड्यात आयआयटी क्‍लासेस घेणाऱ्या एका पाच शाखा असणाऱ्या क्‍लासची जाहिरात माझ्यासमोर आहे. त्यांनी पुण्यातील सहा क्‍लासेसमधील सारे आकडेच समोर ठेवले आहेत. ते फक्त काय बोलतात ते पाहू यात.

एकमेकांना स्पर्धक समजून सखोल माहिती मिळवून हे आकडे काय सांगतात? तर २०१७ मध्ये पुण्यातून  आयआयटीसाठी हव्या त्या शाखेत प्रवेश मिळवू शकणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या फक्त ४९ भरते. कारण एकूण उपलब्ध जागांमध्ये शाखानिवडीची संधी फारतर पहिल्या दोन हजारांनाच मिळते. अन्य क्रमांकांना काय मिळाले आहे, त्यात काय शिकायचे आहे हे सुद्धा कळत नाही इतके गहन कोर्सेस तिथे चालतात. त्यातही प्रमुख सात आयआयटीसाठी पहिल्या हजारात येणे जास्त महत्त्वाचे.

आता  दुसरा गमतीचा आकडा पाहूयात. पर्वती चढण्याची स्पर्धा करणाऱ्यांचा. हा असतो किमान बारा हजार जणांचा. यातील सुमारे अकरा हजार गारद होतात. पर्वती चढेपर्यंतच म्हणजे जेईई मेन्समध्येच तिथे क्‍वालिफाय होण्याचा. आकडा असतो साधारणपणे फक्त ३३-३५ टक्के मार्कांचा. २०१८ चा क्वालिफाय होण्याचा आकडा फक्त ७४ मार्कांचा आहे, ३६० पैकी तरीसुद्धा क्वालिफाय होऊन विद्यार्थी ॲडव्हान्सला पोचतो. हे सारे प्रयत्न जिद्दीने, चिकाटीने करणारा एखादा अभ्यासू विद्यार्थी मनाशी पक्के ठरवतो, की आत्ता आयआयटी हुकली तरी मी प्रथम बीई होणार व गेटची परीक्षा देऊन एमटेक करायला नक्की तिथे पोहचणार. अक्षरशः असे पोचणारे अनेकजण आहेत. पण त्यांच्या किमान शंभर पट विद्यार्थी ना धड आयआयटी मेन्स, ना धड सीईटी व ना धड बारावी सायन्सचे चांगले मार्क अशा त्रिशंकू अवस्थेत पोचतात. संवादातून मिळणारी उत्तरे मोठी मासलेवाईक असतात.

‘आयआयटीचा क्‍लास लावला होतास ना? जेईईमधे किती मिळाले?’ -

 ‘साठ मार्क पडले, कारण पेपर फार कठीण होता यावेळी!’

‘बारावी सायन्स पीसीएम किती मिळाले?’

 ‘साठ टक्के फक्त, कारण आयआयटीचा अभ्यास खूप होता.’

‘मग निदान सीईटीमध्ये तरी किती मिळाले दोनशेपैकी?’

 ‘तिथे नव्वद मिळाले. कारण सीईटीचा अभ्यास करायला वेळच मिळाला नाही?’

आयआयटी क्‍लासच्या नादी लागून सीईटीमधे फक्त ४५ टक्के मिळालेले असतात. अभ्यास फिजिक्‍स, केमिस्ट्री, गणिताचा. तो बारावीसाठी, बोर्डासाठी वर्णनात्मक. सीईटीसाठी त्यातूनच मल्टिपल चॉइस प्रश्‍नोत्तरातून जेईईसाठी सखोल व आव्हानात्मक प्रश्‍नांतून. असे असताना सगळीकडेच घसरण होते, ती स्वतःची कुवत लक्षात न घेता फक्‍त क्‍लासेस लावण्याचा अट्टाहास करणाऱ्या विद्यार्थ्यांची. फसगत होते पालकांची. नैराश्‍याची कडवट चव मात्र आपण ओढवून घेत राहातो विनाकारणच.

मग यावर रामबाण नसला तरी उपाय आहे. खेळात जसे प्रथम शाळेत मग इंटरस्कूलला मग जिल्ह्यांमध्ये नंतर राज्यात व शेवटी राष्ट्रीय स्पर्धेत जाता येते अगदी तसेच असते इथे. वर्गामध्ये कायम प्रथम, सर्व तुकड्यांमध्ये पहिल्या पाचात किंवा शास्त्र व गणितात सर्वोत्तम असा किंवा पाचवी किंवा आठवी स्कॉलरशिप मिळवलेला विद्यार्थी या स्पर्धेसाठी किमान कुवतीचा विद्यार्थी समजावा. त्याचवेळी शास्त्रीय संकल्पनांची मांडणी व स्पष्टता त्याच्या बोलण्यात येणे महत्त्वाचे. दहावीचे,. अकरावीचे मार्क टिकवून बारावीत ८५ टक्के मिळवणेही गरजेचे. अन्यथा बिटस पिलानीला प्रवेशपरीक्षेत यशस्वी पण बारावीत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी म्हणून प्रवेश नाकारला असे दरवर्षी एकदोनजण भेटतातच. हे सारे किमान गरजेचे. मग नंतरची स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरू होते. ती असते संपूर्ण भारतातून अव्वल पंधरा हजारात पोचण्याची. जोडीजोडीने येणाऱ्या शब्दांच्या संदर्भातील अजून फक्त एकाच करिअरचा, त्याच्या कुवतीचा उल्लेख करून थांबणे गरजेचे आहे. नाहीतर तो एका पुस्तकाचा विषय बनू शकतो. युपीएससीची परीक्षा देऊन आयएएस बनणे. त्याचा निकाल दि. २८ एप्रिल २०१८ रोजीच लागला. महाराष्ट्रातून पहिला आलेला डॉ. बडोले हा अत्यंत हुषार डॉक्‍टर आहे, तर अनुदीप दुरीशेट्टी हा भारतात पहिला आला आहे. अनुदीपचा हा पाचवा प्रयत्न होता. चौथ्या प्रयत्नात त्याला रेव्हेन्यू खाते मिळाले. त्यात नोकरी करताना त्याने पुन्हा परीक्षा दिली व यश मिळवले होते. यंदा यश मिळवणाऱ्यांत अनेकजण नामवंत संस्थेतून पास झालेले इंजिनिअर्स आहेत. याचाच अर्थ स्पर्धा अतीतीव्र आहे. मग त्याची तयारी तितकीच चिकाटीने व दमदारपणे नको काय? विषयांची व्याप्ती, परीक्षेचा आवाका समजून घेताना प्रथम उत्तम पदवी, तीही प्रथमवर्गातून मिळवा. नंतर राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन कुवत अजमावा. अर्थातच नंतरचा टप्पा यूपीएससीचा. २०१० मध्ये रमेश घोलपने राज्यसेवा परीक्षेत अव्वल गुण मिळवले तर युपीएससीतून आयएएस. याउलट एखादी पदवी, अवांतर वाचन शून्य मात्र क्‍लासची फी किती व कोणत्या क्‍लासमधून किती जणांनी पदे काढली अशी चर्चा करणारेच जास्त आहेत. अक्षरशः एमपीएससी व युपीएससीची समग्र माहिती ‘न’ छापणारे दैनिक वा नियतकालिक सध्या शोधावे लागते. तरीही पदवी हाती येऊन त्याबद्दल बाळबोध शंका विचारत स्पर्धा परीक्षांची तयारी करतो असे सांगणारे गल्लोगल्ली सापडतात. याविषयी गेली दीड वर्षे साप्ताहिकच्या प्रत्येक अंकात येणारे क्विझ जर सोडवायला घेतले तर परीक्षेचे काठिण्य समजते. वीसपैकी पाच प्रश्‍न सुद्धा न सोडवता येणारा विद्यार्थी मी पद काढणारच म्हणतो तेव्हा पुन्हा प्रश्‍न उभा राहतो, तो पर्वती चढण्याचा.

  लो एम इज क्राइम, असे एक सुबोध वचन आहे. अक्षरशः खरेच आहे. मात्र त्यासाठीचे कष्ट, चिकाटी, सातत्य राखणे याची कुवत प्रथम तपासायला हवी. तसेच शैक्षणिक गुणवत्ता विषयानुरूप वाढवणेही गरजेचे असते. मुख्य म्हणजे जोडीजोडीने येणारे फसवे शब्द उच्चारण्याऐवजी सेवाक्षेत्रात शिरले तर स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी कोणीच अडवत नाही. अशा सुंदर करिअर्सची माहिती याच अंकात पानोपानी तुम्हाला सहज सापडणार आहेच. तिचे वाचन, त्याची माहिती घेणे व तो रस्ता शोधणे हे केलेत तर... यश तुमचेच!

फोटो फीचर

संबंधित बातम्या