पालकत्वाची जबाबदारी

डॉ. श्रीराम गीत
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

पालकत्व या शब्दाला विविध विशेषणे जोडून त्यावर अक्षरशः शेकडो लेख दरवर्षी विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असतात. संगोपन हा एक विलक्षण कुतूहलाचा, आनंददायी व वेळप्रसंगी तद्दन कसोटी पाहणारा विषय आहे. त्यामध्ये २+२ = असे गृहीत धरले जाते. मात्र कोणाच्या हाती दोनच येतील अन्‌ कोणाचे हाती पाचाचे दान पडेल हे सांगणे खरोखर अशक्‍य असते. पूर्वीच्या काळी संगोपनामध्ये बहुधा आजी आजोबा, काका काकू, मावशी, मामा, आत्या यांचा हातभार जरी लागला नाही तरी एखादं दुसरा मौलिक सल्ला देण्याचा सहभाग नक्की असे. आता सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीतच वाढलेल्या आणि पालकत्वाची जबाबदारी अंगावर पडलेल्या पालकांना सुजाण पालकत्वाचा क्‍लास शोधायची इच्छा झाली तर नवल नाही. 
गंमतीची गोष्ट म्हणजे मुलांच्या पहिलीपासून ट्यूशन, क्‍लास या साऱ्या शब्दांची छान मैत्री झालेले पालक जेव्हा मुलांची शाळा संपते तेव्हा अचानक गांगरून जातात. करियरच्या निर्णयाची जोखीम, निर्णयाची जबाबदारी व निर्णयातून येणाऱ्या बऱ्यावाईटाची काळजी त्यांना पडू लागते. कारण अगदी स्वाभाविक असते. आता कोणावर तरी हा निर्णय पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी सोपविणे शक्‍य नसते. त्याच वेळी स्वतःच्या मुलावर त्या दृष्टीने पूर्ण विश्‍वास टाकावा काय याविषयीसुद्धा कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते. इथे खऱ्या अर्थाने सुरू होते ती पालकत्वाची जबाबदारी. सहसा ती एक दशकभर तरी वरचेवर पालकांची परीक्षा पाहात राहते. त्यामध्ये कधी मुले-मुली पालकांच्या ओंजळीत भरभरून यश टाकतात. कधी त्यांना समाधानाचे सुस्कारे टाकायला अवसर देतात. मुले पदवीधर होतात. तो आनंदाचा क्षण छानशी नोकरी लागली तर द्विगुणित तर होतोच, पण पालकत्वाची जबाबदारी आता छान पार पाडल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नकळत दिसू लागतो. या दशकभराच्या जबाबदारीविषयी आपण थोडक्‍यात या करिअर विशेषांकामध्ये जाणून घेऊ यात. कारण साधेसे आहे. करिअरविषयी सारेच बोलतात, अगदी मीही त्यातलाच आहे. मात्र करिअर विषयक निर्णयातील पालकांची जबाबदारी यावर फारच क्वचित नेमकेपणाने बोलले जाते. 

पालकत्वाची जबाबदारी -एक सुरवात
इयत्ता दहावीची सुरवात झाल्यापासून तू पुढे काय करणार आहेस या प्रश्‍नाची अधूनमधून चर्चा घराघरांतून सुरू होते. त्याला अपवाद असतातच. मात्र दहावीची परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत एक प्रकारचा सन्नाटा असतो. मुलांचे उत्तर असते निकाल पाहू अन्‌ ठरवू. तर पालकांचा हट्ट असतो एखादी तरी दिशा पक्की करायला नको काय?
निवडणुकांमध्ये मतदान संपल्यापासून निकाल हाती लागेपर्यंतच जो सन्नाटा असतो ना, अगदी तसाच हा प्रकार असतो. त्यानंतर थोडासा सावळा गोंधळ होत राहतो तो फक्त ११ वीच्या प्रवेशासाठी मिळालेल्या कॉलेजवरुन. सहसा पालकांची उत्तरे या संदर्भात साचेबद्ध पद्धतीची असतात. 

  • त्याच्यावर/तिच्यावर आमचे कसलेच दडपण नाही. काय हवे ते करू देत.
  • सध्या तरी सायन्समध्ये प्रवेश घेऊ. मग बघू पुढे काय घडते ते.
  • डॉक्‍टर किंवा इंजिनिअर झाला तर बरे. सीएचासुद्धा विचार करायला आमची काही हरकत नाही.
  • पहिली डिग्री इथे घेऊ अन्‌ मग बघू कुठे परदेशात पाठवायचे त्यानंतर!
  • अभ्यासाचा कंटाळा आहे खूप. काय करायचे काही नेमके आम्हालाच कळत नाही. 
  • दहावेळा विचारून झाले. पण काही कळतच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला. 
  • या वयातल्या पोरांना काही कळतय का? आम्हाला पण कळत नव्हतेच. आईवडील सांगतात ते भल्यासाठीच ना? करून टाकू त्याला इंजिनिअर.
  • काहीही शिकला, कुठेही शिकला तरी एवढा मोठा धंद्याचा पसारा मांडून ठेवलाय तो कोणासाठी? त्यालाच तर पाहायचा ना?

या किंवा अशा पद्धतीच्याच अनेक उत्तरातून पालकाची जबाबदारी उचलली जाते, का पार पाडली जाते, का ती विनाकारणच अंगावर ओढवून घेतली जाते? असे प्रश्‍नांचे गुंते गेल्या दशकभरात वाढत चालले आहेत. मुळात हा सारा दशकभराचा प्रवास करताना पालकांची भूमिका काय असावी असा साधा विचार स्वतःच्या मनाशी करायची सुरवात केली तर? त्यासाठी मूल जन्माला आल्यापासून म्हणजेच पालक बनल्यापासूनचे दहावी संपेपर्यंतच टप्पे आपण पुन्हा एकदा मागे वळून पाहूया. 
छोटासा गोंडस गोळा जन्माला येतो. सारे घर त्याच्याभोवती जमा होते. मात्र जागेपणाचे दोन तास सोडले तर, ‘त्याला शांत झोपू दे’ हीच भावना साऱ्यांच्या मनात असते. रडणे व दूध मागणे या क्रियेवरती प्रतिक्रिया म्हणून पालकत्व छान सुरू होते. 

बाळ मान धरायला लागले की हसून दाखवते. वळायचा, रांगायचा प्रयत्न असतो. उठून बसणे, आधाराने उभे राहणे व सुट्टी पाऊले टाकणे यात त्याला आधार देणे, तोल जाऊन पडू न देणे ही एक गरज असते. पण याच वेळी बाळाचे कुतूहल जागृत होऊन त्याला विविध आकर्षणे खुणावत राहतात. यासंदर्भात एक विलक्षण बोलका व्हिडिओ कायम आठवतो. सुट्टी पाऊले टाकायला उत्सुक बालक बाबांच्या आधाराने उभे राहते. सात आठ फुटांवरती हात पसरून बोलावणारी आई त्याला ये ये म्हणते आहे. बाळ एकेक पाय टाकू लागते, तसतसा आईचा चेहरा आनंदाने फुलत जातो. विलक्षण उत्साहाने ती त्याला प्रोत्साहित करते. अन्‌ शेवटच्या क्षणी आपण पाहतो ते अकल्पित सामोरे येते. बाळाला खुणावत असते ते आईच्या मागचे वाहत्या नळाचे पाणी, त्याचा आवाज, त्यानेच ते वेडावलेले असते. आईला ओलांडून जेव्हा ते तिकडे पावले टाकते तेव्हाचा आईबाबांचा चेहरा मला इयत्ता दहावीनंतरच्या दशकभराच्या प्रवासातील विविध टप्प्यावर आठवायला लागतो. 
असाच मुद्दाम आठवावा असा एक टप्पा असतो. जेवण भरवणे हा पालकांसाठीचा आनंदाचा ठेवा म्हणून सुरू होतो. एक घास चिऊचा, एक काऊचा, आता एकच राहिला. फक्त असे घडते तेव्हा आईला कृतकृत्य होत असते. पण प्रत्येक घासाला मुलामागे धावणारी आई किंवा प्रत्येक घासाला विनवणारी आई व शेवटी कातावलेली आई जेव्हा वरचेवर दिसू लागते तेव्हा? दहावीचा निकाल साजरी करणारी आई व बारावीच्या दरम्यान अभ्यासासाठी मुलांना विनवणारी आई मला आठवू लागते. 

मुले मुली इयत्ता तिसरी चौथीत असताना भरभरून मार्क घेऊन येतात. मात्र पाचवी ते सातवी याला ओहोटी लागायला लागते. आठवी ते दहावीच्या दरम्यान तर एकेक विषय काळजीचा बनू शकतो. कोणाचा गणित, कोणासाठी इंग्रजी. काहींना सायन्स तर बऱ्याच जणांना सोशल सायन्स. यावेळची उत्तरे रेडी रेकनरसारखी सोपी असतात. क्‍लास, ट्यूशन, पर्सनल ट्यूशन अशा मधून ती सापडतातही. पण याचीच सवय लागली तर? महाराष्ट्रातील कोणत्याच शहरात इयत्ता तेरावी नंतरचा क्‍लास नावाचा प्रकार शोधूनही सापडत नाही ना? पुन्हा इथे पालकत्वाची जबाबदारी एक ओझे बनू लागते. लहानपणचे प्रथम हाताने भरवणे मग शैक्षणिक स्पून फिडींग बनलेले असते. स्वतःच्या हाताने किंवा स्वतः हातात चमचा घेऊन अंगावर न सांडता जेवायचे असते हेच न कळलेली सारीच मुले मुली या टप्प्यावर भांबावून जातात. 

नुकताच जेईई मेन्सचा व त्याच आसपास युपीएससीचा निकाल लागला. त्यातील अनेक यशस्वी मुलामुलींच्या मुलाखती वाचण्यात, शोधण्यात माझे दोन तीन दिवस गेले. तो एक आनंददायी भाग होता. कारण यशाचे सूत्र त्यात सापडत होते. स्वअभ्यास, संकल्पना समजून घेणे व वेळेचे नियोजन या तीन शब्दाभोवती ते यशाचे सूत्र घट्ट गुंफलेले दिसत होते. पालकत्वाची जबाबदारी या अर्थाने आपण पार पाडतो का? असे मागे वळून पाहताना जाणवले तर? 

स्वअभ्यास व संकल्पना समजून घेणे यामध्ये आम्हाला काय कळते? असा थेट प्रश्‍न असंख्य वाचकांच्या मनात नक्की येईल. अनेक गृहिणी तर हा आमचा प्रांतच नव्हे असे झटकून टाकतील. काही पालक म्हणतील मग क्‍लास व शाळांची फी कशाला भरायची?

स्वअभ्यास नावाची गोष्ट म्हणजेच थेट पुस्तकांमधून वाचन व त्यावर स्वतःच्या शब्दात काढलेल्या नोट्‌स किंवा नोंदी. त्यावरून जो विद्यार्थी विषयाबद्दल किमान दहा पंधरा वाक्‍ये मित्राशी बोलू शकतो त्याला विषयाची समज सुरू झाली असे समजा ना. संकल्पना आईवडिलांना कळण्याची गरज नाही. पण तत्सम सोपे प्रश्‍न तर ते मुलांना विचारू शकतात ना? मात्र दोन्ही गोष्टी अक्षरशः नव्वद टक्के कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलींच्या संदर्भात घडत नाहीत. मुलांची क्रमिक पुस्तके कोरीच राहतात व परीक्षेची तयार उत्तरे देऊन ५० टक्के मिळवता येतात. संकल्पनाबाबत अक्षरशः आनंदीआनंद असतो.

नवीन घेतलेला एलइडी टीव्ही, त्याचे पिक्‍सेल, त्याचे स्मार्ट टीव्हीमध्ये होऊ शकणारे रूपांतर, 3G व 4G, प्लॅस्टिक बंदीची कारणे, अवकाळी पावसाचे स्वरूप, पाच राज्यात त्याचवेळी धुळीच्या वादळाने घातलेला धुमाकूळ असे मेंदूला खुराक देणारे प्रश्‍न तर विचारा. तुम्हाला उत्तरे माहीत असण्याची गरज नाही व समजा मुलांनी ती नाही दिली तर निदान आपल्याला ती शोधायला हवीत हे तर त्यांना जाणवेल. पालकत्वाची जबाबदारी इथे सुरू होत असते. वेळेचे नियोजन हा मोडीत काढण्याचा विषय घराघरांतून बनलेला दिसतो.  मुलांनी कॉलेज असेल तरच वेळेत उठायचे. टीव्ही किंवा लॅपटॉपकडे बघवेना होऊन डोळे मिटू लागले की झोपायचे हे पालकांच्या हताश उद्‌गारातून सरसकट ऐकायला मिळते. मात्र ज्या अमेरिकेची स्वप्ने ही मुले पाहात झोपी जातात तेथे वेळेचे काटेकोर नियोजन मुले स्वतःहून करत असतात. कारण त्यांना उठवायला कोणाचेच पालक तिथे म्हणजे हॉस्टेलवर हजर नसतात. 

अठराव्या वाढदिवसाला घर सोडून स्वतःच्या कुवतीवर शिकायचे वा जगायचे हा तिथला अलिखित नियम! भारतीय पालक वयाच्या पंचवीशीतल्या मुलांसंदर्भात सुद्धा त्याचे शिक्षण व त्याला मिळणारी नोकरी या प्रश्‍नात गुंतून राहतात. विशेषतः प्रश्‍न विचारणाऱ्या मुलांना गप्प बसवणे व त्यांचेवर स्वतःच्या इच्छा लादून त्या पुऱ्या करून घेणारे पालक यातून क्वचितच बाहेर पडू शकतात. 

सोय, गरज व चैन यातील फरक सांगणे
घरातील अनेक गोष्टी गरजेच्या असतात. काही सोयीच्या असतात. चैनीच्या वस्तूंची यादी ज्या घरात वाढत जाते तिथे पालकांची जबाबदारी सुद्धा वाढत जाते. यासंदर्भात राहणीमानाप्रमाणे संदर्भ बदलत जातात. मात्र सोय, गरज व चैन या तीन शब्दांची मांडणी मात्र कोणत्याही घराचे बाबतीत लागू होऊ शकते.

गरजेच्या वस्तू टिकवून, जपून वापरायच्या असतात. मात्र गरजेनुसार त्या बदलाव्या लागतात व ते अपरिहार्य असते. सोयीच्या वस्तू मनात आले म्हणून, परवडतात म्हणून आणल्या जातात. मात्र त्या नसल्या तरी चालू शकते. चैन मात्र निव्वळ हौस असू शकते. गरजा संपल्यानंतर चैनीला सुरवात होते. अगदी सोप्या उदाहरणावरून सांगायचे तर मुलांची सॅक ही गरज, अंगावरची जीन व टी शर्ट ही सोय तर आदिदासचे शू व रेबन गॉगल ही चैन म्हणता येईल. सुट्टीच्या दिवशी बाहेर जेवायला गेल्यास राईसप्लेट ही गरज, स्पेशल थाळी व स्वीट ही सोय, तर आइस्क्रीम ही चैन असते.
अर्थातच शिकताना गरजेची पदवी कोणती व चैनीचे शिक्षण कशाला म्हणायचे याचा अर्थ समजू लागतो. अन्यथा साऱ्याच गोष्टीकडे सोय म्हणून पाहिले जाते. नाव घातले म्हणून कॉलेजात जायचे, तिथे नीट कळत नाही म्हणून क्‍लास हवाच. अभ्यास केला नाही अन्‌ चांगले मार्क मिळाले नाही तर पप्पा ॲडमिशन मिळवून देणारच आहेत ही असते सोय. तरीही नापास होऊन दाखवणारे करत असतात चैन.

स्वतःच्या पदवीचा, नोकरीचा व कामाचा संदर्भ सांगणे हे फारच क्वचित वेळेला होते. याउलट मी कसा खस्ता खात शिकलो, खडतर परिस्थिती किती बिकट होती याची पुन्हा पुन्हा रेकॉर्ड वाजत असते. बीएस्सी झालेले वडील बॅंकेत काय करत आहेत? इंजिनिअर आई एमबीए करून फायनान्स कंपनीत काय करते? डॉक्‍टर काका आज पोलिस ऑफिसर कसा बनला? मित्राचे बिल्डर वडील तर फक्त बी.कॉम. कसे? अशा असंख्य बाबतीत जेव्हा पालक संभाषण करू शकतात त्यावेळी ते समर्थपणे पालकत्वाची जबाबदारी पाडायची सुरवात करत असतात. 

अपेक्षा व वास्तव
सध्याच्या मुलांच्या चर्चेत स्कोप, पॅकेज व फॉरेन या तीन चलनी नाण्यांचा खणखणाट कायम ऐकू येतो. स्कोप निर्माण करायचा असतो. त्यासाठीची स्वतःची पायवाट स्वतःच मळायची असते. अन्यथा नोकरी सारेच करतात. तीच गोष्ट पॅकेजची. हजार मुलांचे एकालाच पॅकेज मिळते हे आहे जगभरातले, विशेषतः भारतातले गेल्या पंधरा वर्षातले वास्तव. या एकाची चर्चा समोर चालत आलेली नोकरी लाथाडण्यात पालक मुलांना प्रवृत्त करतात हे अस्सल भारतीय वैशिष्टच म्हणा ना.
सहा लाख खर्चून आमचा मुलगा/मुलगी एवढी इंजिनिअर बनली ती काय आठ दहा हजारांची फालतू नोकरी करायला? हे वाक्‍य तर मी दर आठवड्याला ऐकत असतो. माझ्या मनात एकच प्रश्‍न येतो. जेमतेम चाळीस हजार फी असलेल्या सरकारी कॉलेजला जर त्यांनी प्रवेश मिळवून दाखवला असता तर फक्त दीड लाखात इंजिनिअर बनून वर्षाला सहा लाखांचे पॅकेज त्यांना नक्की मिळाले असते ना? महाराष्ट्रातील अंदाजे ४०० कॉलेज गुणिले ५०० विद्यार्थी यातून दरवर्षी दोन लाख इंजिनिअर्स बाहेर पडतात. मात्र सरकारी कॉलेजातील दहा हजार व खासगी मधील पाच हजार यांनाच पॅकेज मिळते. एमबीएची कथा याहून वेगळी अजिबातच नाही. पण हे समजून घेऊन मुलांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कोणाची? याउलट मुले मागताहेत ते त्यांना पुरवत राहायचे या भूमिकेतून जे पालक ठामपणे बाहेर येतात ते पालकत्व सुफलपणे पार पाडतात. 
जरा स्पष्ट व कठोर शब्दात सांगायचे तर पदवी घेणे म्हणजे बर्थडेचा भला मोठा केक विकत आणणे नसते किंवा हट्टाने बुलेट विकत घेऊन देणे नसते. ती अभ्यास करूनच घ्यायची असते व त्या अभ्यासाचे संदर्भ आसपासच्या जगाशी लावू शकणारा विद्यार्थी तयार करणे हीसुद्धा पालकांचीच जबाबदारी असते. 

नोकरी, बेकारी, उमेदवारी, कौशल्ये इत्यादी
नोकरी व बेकारीचे चक्र आता सर्वमान्य होऊ लागले आहे. पदवीनंतरची बेकारी व लग्नासाठी सुयोग्य जोडीदाराचा अतिचिकित्सक शोध या दोन्हीची सांगड मला नेहमीच घालावीशी वाटते. काही बेकारांची नोकरीच्या संदर्भातील वाक्‍येच मी इथे लिहीत आहे. 
    बी.कॉम. झालो. पण अकौंटसमध्ये जायचे नाही.
    इंजिनिअर झालोय. पण फक्त डिझाईनमध्येच काम करायला आवडेल.
    एमबीए मार्केटिंग केले. पण फिरती आवडत नाही. 
    बीए होऊन स्पर्धा परीक्षा देतोय. आता सातवा प्रयत्न आहे. काय करू?
    बीए झाले, एम.ए. पण केले. डीएड केले नंतर बीएड पण केले. अजून काय शिकू? वय २७.
    बीसीए किंवा बीसीएस केले आहे.
    पन्नास आय.टी. कंपन्यांत अर्ज केला. कोणी उत्तरच देत नाही. 
याउलट नोकरी लागल्यानंतर उमेदवारी संपताना व नंतर कौशल्ये वाढवणारा प्रत्येकजण प्रगती करत असतो. 

या साऱ्या दरम्यान म्हणजेच वय २१ ते २६ पर्यंत पालकांनी मुलांशी त्यांना माहीत असलेल्या क्षेत्राबद्दल कौशल्यविकास, उमेदवारी, बेकारी याविषयी सहज बोलणे शक्‍य असते. घडले ते उलटच. स्वतःच्या नोकरीतील वास्तव ज्ञात असून, त्यातच पालक मुलांना काही वेळा ढकलत राहतात. 
शिक्षण क्षेत्रात अनुदानित संस्थातील नोकऱ्या नाहीत हे आता सर्वांना माहिती आहे. तसेच सरकारी भरतीसाठी अगदी अल्प जागा असतात हे पण कळले आहे. पोलिस भरतीसाठी हजार जागांना पन्नास हजार जण रांगा लावतात हे फोटोसकट पेपरमध्ये अनेकदा छापून येत असतेच. 
तरीही या तीन निसरड्या क्षेत्रातील अत्यल्प नोकऱ्यांना प्रचंड मागणी आहे. ही पालकांनी टाळलेली जबाबदारी म्हटली तर वावगे ठरू नये. सध्याच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राचे बदलते स्वरूप जाणून घेणे ही सध्याच्या पालकांच्या समोरची फार मोठी कठीण समस्या होऊन बसत आहे. सेवा क्षेत्राचे जगड्‌व्याळ स्वरूप ‘काम करू इछिचणाऱ्या’ प्रत्येक पदवीधराला, बारावी पासाला, कौशल्ये हातात असणाऱ्याला संधी देऊ इच्छित आहे. त्याकडे डोळसपणे पाहणे ही एक यशस्वी पालकत्वाची पहिली पायरी ठरणार आहे. 

संबंधित बातम्या