जयंतचे ’डोळस’ यश

रोशन मोरे
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

जगात सर्वाधिक काठिण्य पातळी असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (युपीएससीही) आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. ही परीक्षा पास होणं कोणा येढ्या गबाळ्याच काम नाही, मात्र ही कठीण परीक्षा ९२३ रॅंक मिळवून पास होण्याचा किमया जयंत मंकले या तरुणाने केली. ७५ टक्के अंधत्व असताना हे यश मिळवणं जयंतसाठी नक्कीच सोपं नव्हतं. ऐन उमेदीत आलेल्या दिव्यांगत्व आणि घरची गरिबी यावर मात करत जयंतने हे यश मिळवले आहे.    

 जयंतच्या वडिलांचे २००३ मध्ये अचानक निधन झाले, ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पंपचालक म्हणून कामाला होते. वडिलांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनासह शेवया, चकल्या, भाजणी करून घराचा भार जयंतच्या आईने पेलला. त्यांना साथ मिळाली ती जयंतच्या दोन मोठ्या बहिणींची.  त्याची जाणीव ठेवूनच जयंतने पुणे विद्यापीठाच्या अहमदनगरमधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी त्याने शैक्षणिक कर्ज काढले. पुण्याजवळच तळेगाव येथे एक मोठ्या कंपनीत जयंतला काम मिळाले होते. त्यामुळे आता सगळं सुरळीत सुरू होईल अशी त्याला अपेक्षा होती. आईला कष्टातून आता आराम मिळाले या विचाराने जयंत खूष होता. मात्र सगळं सुरळीत चालू असताना त्याला अचानक रेटिनायटिस पिगमेंटोसा या व्याधीने ग्रासले. या आजारात हळूहळू दृष्टी क्षीण होते. विशेष म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. दृष्टी क्षीण झाल्यामुळे जयंतला नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडली तरी जयंतचे शैक्षणिक कर्ज फिटलेले नव्हते. या परिस्थितीमध्ये त्याच्या आईने आणि दोन बहिणींनी त्याला आधार दिला. 

या विषयी बोलताना जयंत म्हणतो, की  ’या आजारावर कोणताही उपाय नसल्याने मी नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला आई आणि बहिणीने खंबीर पाठिंबा होता. सन २०१५ पासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर मुलाखतीसाठीही पात्र ठरलो. मात्र, अंतिम यादीत अवघ्या काही गुणांनी नाव हुकले. त्यानंतर आलेले नैराश्‍य झटकून नव्याने तयारी सुरू केली.  

पहिली नोकरी 
आलेल्या अंधत्वामुळे खासगी नोकरी जयंतला करणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळते का? याचा शोध त्याने सुरू केला. मुंबई महापालिकेकडून शिपाईपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने जयंत पास झाला. त्यामुळे ही नोकरी जॉईन करायची की नाही याच्या विचारात होता. त्यावेळी मनोहर भोळे सरांनी आपला सल्ला दिला की कोणतेही काम कमी प्रतीचे नसते पण तुझी क्षमता यापेक्षा जास्त आहे. तु युपीएससी परीक्षेवर फोकस कर. त्यांचा सल्ला ऐकूण जयंतने पूर्णवेळ युपीएससीच्या परीक्षेवरच फोकस करायचे ठरवले. त्यामुळे शिपाई ते युपीएससी हा त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असाच आहे

अभ्यासाचे वेगळे तंत्र
जयंतला ७५ टक्के अंधत्व असल्यामुळे त्याने वाचण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिला. जयंत म्हणतो, मी रेडिओ, वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम आवर्जून ऐकले. आवश्‍यक साहित्याचे मोबाईल फोनमध्ये फोटो काढून ते झूम करून वाचले. स्पर्धा परीक्षांच्या साहित्यासाठी इंग्रजी साहित्य, इंग्रजी वृत्तपत्रे वाचणे आवश्‍यक असल्याचा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र, मी मराठी वर्तमानपत्रे वाचण्यावर भर दिला.

परतीचे दोर कापले 
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजेसाठी गरज होती. कारण अंधत्वामुळे माझे परतीचे दोर कापले गेले होते. जन्मजात अंधत्व आलेल्यांना सिक्‍स सेन्स तरी असतो. मात्र माझे तसे नव्हते. त्यामुळे इतरांकडून सहानुभूतीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वतःच यावर मात करणे गरजेचे होते. याची पूर्ण जाणीव आपल्याला असल्याचे जयंत सांगतो. केंद्र सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये दिव्यांगांसाठीच्या कायद्यात सुधारणा करून सरकारी सेवेत चार टक्के आरक्षण ठेवले आहे. याची आपल्याला आधी मािहती नव्हती त्यामुळे पहिल्या प्रयत्नात मी खुल्या प्रवर्गातून मुलाखती पर्यंत धडक मारली होती. मात्र माझे यश थोडक्‍यात हुकले. मनोहर भोळे सरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला दिव्यांगांसाठी असणाऱ्या आरक्षणाची बाब लक्ष्यात आणून दिली. 

आईची साथ
जयंतच्या वडिलांचे निधन अगदी तो लहान असतानाच झाले. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी त्यांच्या आई छाया मंकले यांनी घेतली. जयंतला आलेल्या अंधत्वामुळे खचून न जाता त्या ठामपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याचा या निर्णयाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. घराची कोणतीच जबाबदारी त्याच्यावर पडणार नाही याची खबरदारी घेतली.

संबंधित बातम्या