ग्राफिक्स ॲनिमेशन
करिअर विशेष
शिक्षण - करिअर हे प्रत्येकालाच महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यामुळेच मुले दहावी-बारावीला आली, की प्रत्येकाला त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना कोणता अभ्यासक्रम द्यावा, याची चिंता वाटू लागते. तुमचे करिअर तुमचे भविष्य निश्चित करणारे असल्याने त्याची चिंता वाटणे स्वाभाविक असले तरी आपण करिअरची निवड करताना किती सजग असतो? हे बघायला हवे.
आपल्याला पुढे काय शिकायचे हे ठरवताना आपण आपल्या आवडीचा विचार करतो. ते बरोबर आहे, परंतु त्या बरोबरीने मला काय चांगले जमू शकते, कोणती कौशल्ये मी चांगल्या रीतीने आत्मसात करू शकतो याचा विचार करणेही गरजेचे असते. क्षेत्र आवडीचे असले तरी बऱ्याच वेळा त्या क्षेत्रात आपल्याला काही जमत नसल्यास आपण यशस्वी होऊ शकत नाही. तसेच, मी आज ज्या क्षेत्रात करिअर करणार आहे त्या क्षेत्रात माझे शिक्षण जेव्हा पूर्ण होणार आहे तेव्हा करिअरसाठी मला किती स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे किंवा त्या उद्योग क्षेत्रात किती रोजगार निर्माण होणार आहेत, याचाही विचार व्हायला हवा.
येत्या काळात उद्योगाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ज्या उद्योगाला प्रचंड मनुष्यबळाची गरज निर्माण होईल असे एक क्षेत्र म्हणजे ग्राफिक्स ॲनिमेशन. जगात आणि भारतात उद्योग जगताविषयी विविध सर्व्हे करणाऱ्या संस्थांच्या अहवालानुसार या क्षेत्राची प्रतिवर्षी वीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार आहे आणि या क्षेत्रात भारत जागतिक केंद्रही बनू शकेल असे असूनदेखील खरे आव्हान असणार आहे ते कुशल मनुष्यबळाची! एवढी मनुष्यबळाची मागणी असतानादेखील या क्षेत्रात येण्याविषयी पालक आणि विद्यार्थी काही गैरसमज निर्माण करून घेताना दिसतात. त्याची उत्तरे प्रथम आपण घेऊयात. ग्राफिक्स ॲनिमेशन हे केवळ कलात्मक क्षेत्र राहिले नसून ते आता संगणकावर आधारित तंत्रज्ञान बनले आहे. १. या क्षेत्रात चांगल्या नोकरीबरोबर चांगल्या व्यवसायाच्या संधीदेखील आहेत. २. हे क्षेत्र केवळ कार्टून चित्रपट आणि जाहिराती एवढ्यापुरते मर्यादित नसून आज प्रत्येक क्षेत्रात या कलात्मक तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाली आहे.
संगणकाच्या क्रांतीमुळे ग्राफिक्स ॲनिमेशन हे नवे सादरीकरणाचे साधन माणसाच्या हाताला गवसले. वॉल्ट डिस्ने या महान कलाकाराने चित्राच्या माध्यमातून ॲनिमेशन या साधनाची जगाला ओळख करून दिली त्या क्लासिकल ॲनिमेशनचा सुरवातीच्या काळात मनोरंजन आणि जाहिरातीसाठी जरी उपयोग केला गेला असला तरी संगणकाच्या या क्षेत्रासाठी उपयोग सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानाचा उपयोग मेडिकल, विज्ञान, बांधकाम, मेकॅनिकल, गृहसजावट, वाहन उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात ग्राफिक्स ॲनिमेशन तंत्राचा वापर होतो. डिजिटल युगात ग्राफिक्स ॲनिमेशनच्या तंत्रज्ञानाने एका नव्या उद्योग विश्वाची निर्मिती केली असून ती सर्वच उद्योगासाठी आवश्यक ठरत आहे.
डिजिटल युगात ग्राफिक्स ॲनिमेशन या पर्वाला फार महत्त्व आहे, जग डिजिटल तंत्राच्या आधारे प्रगती करणार आहे आणि डिजिटायझेशनला ग्राफिक्स ॲनिमेशन शिवाय पर्याय नाही. त्यातूनच मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी निर्माण होणार आहेत फक्त गरज असणार आहे ती योग्य ती कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची. आधुनिक काळात ग्राफिक्स तंत्रज्ञानामुळे प्रिंटिंग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होतो आहे. प्रिंटिंग, डिजिटल, मोशन ग्राफिक्स सोबत यु आय ही नवी संकल्पना आहे. प्रिंटिंगपासून फोटो एडिटिंगपर्यंत विविध रोजगाराचे पर्याय केवळ ग्राफिक्ससारख्या तंत्रज्ञानातून निर्माण होतात. माहिती संप्रेषणच्या डिजिटल युगात वेब डिझाईन तंत्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहे. आज प्रत्येक व्यक्तीला आणि उद्योगाला स्वतःला जगाशी जोडण्यासाठी वेब या संकल्पनेशिवाय पर्याय नाही. त्यातूनच निर्माण होणाऱ्या वेब डिझायनर म्हणून रोजगाराच्या संधी आपण दुर्लक्षित करू शकत नाही. ॲनिमेशन या तंत्राचा वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध क्षेत्रातल्या उद्योगाबरोबरच गेमिंग आणि सिम्युलेशन तंत्रासाठीदेखील उपयोग होतो. ॲनिमेशन तंत्राच्या बरोबरीने चित्रपट जाहिरातीसाठी संजीवनी ठरावे असे तंत्रज्ञान म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स. ‘अवतार’पासून ‘बाहुबली’सारखे सर्वच चित्रपट या तंत्रज्ञानाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. आज चित्रित झालेली कोणतीही कलाकृती सादरीकरणासाठी या तंत्रज्ञानाशिवाय अपूर्णच आहे.
ग्राफिक्स ॲनिमेशन क्षेत्रातील योग्य शिक्षण प्रत्येकालाच करिअरच्या संधी निर्माण करून देते. ग्राफिक्स ॲनिमेशन शिक्षणाचा पर्याय निवडताना योग्य अभ्यासक्रमाची निवड, योग्य शिक्षण पद्धती, प्रशिक्षक, पूरक उपक्रम आदींचा विचार करायला हवा. पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळ्या वाटेने जाणारे शिक्षण ग्राफिक्स ॲनिमेशन क्षेत्रात गरजेचे आहे.