सर्वसामान्यांचे अटलजी

भगवान दातार
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
आदरांजली

 

अटलजींचं निधन झालं आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला जणू आपल्याच घरातल्या एखाद्या  वडीलधाऱ्या या माणसांचं  निधन झालं असं वाटलं.  अटलजी अमोघ वक्ते होते,  अनेक दशकं राजकारण गाजवलेले धुरंधर राजकीय नेते होते, जगात आपल्या कार्यशैलीचा आणि मुत्सद्दीपणाचा  ठसा उमटवणारे जनता राजवटीतले परराष्ट्र मंत्री होते,  सरकारला जेरीस आणणारे विरोधी पक्षनेते होते, देशामध्ये सुशासनाचं नवं पर्व सुरू करणारे प्रभावी प्रशासक होते, पाकिस्तानसारख्या विश्वास घातकी शेजाऱ्याला धडा शिकवणारे कणखर पंतप्रधान होते आणि संपूर्ण देशाला विकासाची, आत्मविश्वासाची  आणि चैतन्याची एक नवी दिशा दाखवणारे राष्ट्र नेते होते. हे सर्व खरं आहे; पण अटलजींची सर्वात प्रभावी गोष्ट कुठली असेल तर ते इथल्या जनसामान्याला ते आपले वाटत  होते. एवढंच  नव्हे तर ते अनेकांना किंबहुना सगळ्यांनाच  ते आपल्या घरातलेच एक ज्येष्ठ कुटुंबीय वाटत होते. त्यांची जवळीक लाभलेले अनेक जण त्यांना ’बापजी’ म्हणत  असत. ते अशा काळात  वाढले, की जेव्हा  राजकीय पक्षाचे नेते आणि सामान्य अनुयायी यांच्यात फार मोठी दरी नव्हती. त्यामुळे अनेक गावातल्या अनेक कुटुंबांशी अटलजींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा दौरा असला म्हणजे आपलेपणाने त्यांची वाट पाहणारी अनेक कुटुंबं  त्या गावात असत. त्यापैकीच एखाद्या कुटुंबात त्यांचा मुक्काम योजिलेला असे, आणि मग ते त्या कुटुंबाचे होऊन जात. त्यांना आवडणाऱ्या पोह्यांची  किंवा पुरणपोळीची  योजना केली जाई. घरात सगळेजण त्यांचं  हवं-नको बघण्यात धन्यता मानत.

अटलजीही आपल्या  दिलखुलास  स्वभावाने आणि  लाघवी वाणीने सर्वांना  आपलंस  करीत. पक्ष मोठा झाला, अटलजी ही मोठे झाले, अगदी पंतप्रधान पदापर्यंत पोचले; पण त्यांच्या स्वभावातला हा नैसर्गिक जिव्हाळा कधी आटला नाही. याचे दोन अगदी  वेगळे अनुभव मला आले.  पुण्यातील एका दैनिकात मी सामान्य उपसंपादक म्हणून काम करत असताना लता मंगेशकरांच्या  वाढदिवसानिमित्तच्या एका विशेष पुरवणीची  जबाबदारी माझ्याकडे आली.  ही पुरवणी संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने मी अनेक मान्यवरांशी संपर्क साधला. सहजच मला अटलजींची आठवण झाली. राजकारणात असूनही साहित्य आणि कला या प्रांतात  रमणारे  आणि स्वतः कवी असलेले अटलजी खरेखुरे रसिक आहेत हे मला माहीत होतं. लतादीदींच्या अंकात अटलजींनी लिहिलं तर?, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. सगळा भारत ज्यांना दैवत मानतो अशा दोन विभूतींचा स्पर्श यानिमित्ताने माझ्या अंकाला होणार होता. अटलजी नक्कीच लिहितील अशी मला खात्री वाटत होती.  माझ्या सहकाऱ्यांनी या कल्पनेतली अशक्‍यता मला जाणवून देण्याचा बराच प्रयत्न केला; पण माझं मन मला ग्वाही देत होतं. एक प्रयत्न करून बघू म्हणून मी सहजच अटलजींना पत्र लिहिलं. काही दिवस असेच गेले, आणि अचानक एक दिवस अटलजींचं पत्रच माझ्या हातात पडलं. ५ सप्टेंबर १९८९  तारीख त्या पत्रावर आहे.  मला स्वर्ग जणू दोन बोटं उरला होता. अधीरतेनं मी पत्र फोडलं.  लतादीदींविषयी  छोटासा  पण अतिशय  हृद्य  मजकूर  अटलजींनी  लिहिला होता.  त्यांच्या लेटरहेडवर लिहिलेल्या त्या पत्राखाली त्यांची परिचित स्वाक्षरी होती.  एखाद्या व्यक्तीकडून थोडासा मजकूर  मिळवण्यासाठी किती मिनतवाऱ्या कराव्या लागतात हे वृत्तपत्र क्षेत्रातल्या लोकांना चांगलंच माहीत आहे. प्रतिथयश लोकांपर्यंत पोचणं तर  अनेक वेळा अशक्‍य बनतं. मात्र कुठलाही परिचय नसलेल्या, एका सामान्य उपसंपादकाच्या पत्राची  दखल घेऊन  त्याला एवढा मोठा प्रतिसाद देण्याचं असामान्यत्व  अटलजींकडे  होतं. त्यांच्या उंचीच्या नेत्याने  हा  जिव्हाळा  दाखविणं  खरंतर अनपेक्षित होतं; पण ही सहजता,  हा मनाचा 

उमदेपणा हेच अटलजींचं वैशिष्ट्य होतं.  हा राष्ट्र नेता सामान्य  माणसालाही आपलासा  का वाटत होता याचं रहस्य या प्रसंगातून  कळू शकेल. लताजींविषयी अटलजींनी लिहिलं होतं, ’’उनका स्वर एक  दैवी देन  है,  किंतू उनका गायन उनके  सतत्‌ साधना का सुफल है.  विभिन्न भाषाओं,  यहां तक की नितांत अपरिचित  विदेशी भाषाओं के गीतों को भी  सुमधुर स्वरलहरी  में बांधने में उन्होंने जो सफलता पाई है वह उनकी असाधारण प्रतिभा और अटूट एकाग्रता का ही परिचायक है.’’ 

अटलजींचं भाषाप्रभुत्व या पत्रातल्या शब्दा शब्दातून व्यक्त होतं; पण त्याहीपेक्षा जाणवतो तो लतादीदींविषयी त्यांच्या मनात असलेला प्रचंड आदर. दैवी प्रतिभा, अजोड भाषाप्रभुत्व आणि कमालीचा हजरजबाबीपणा लाभलेला हा नेता होता. कोणत्याही भाषणात ’’शुरुसे शुरुवात  करू  या  अंतसे  आरंभ करू’’ असा नादमधुर अनुप्रास साधणारे अटलजीं काश्‍मीर  समस्येचा  उल्लेख करून काश्‍मीर भारतापासून  कधीच वेगळे  होऊ शकणार नाही,  असं सांगताना ’’आखो से रोशनी कैसी  अलग  हो सकती है? , होटोसे  से मुस्कान  कैसी  अलग हो सकती है?’’ असं काव्यमय  रूपक  मांडायचे. नुकतंच ज्यांचं निधन झालं ते माजी सभापती सोमनाथ चटर्जी लोकसभेच्या बोलपूर मतदारसंघातून निवडून यायचे. ते सभापती झाल्यावर त्यांचं स्वागत करतांना अटलजी म्हणाले होते, ’’आप बोलपूर संसदीय क्षेत्रसे ते आते है.  पण सभापती झाल्यावर आता स्वतः बोलण्याऐवजी जास्त बोलण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे.’’ अशी कोटी फक्त अटलजीनाच सुचू शकते. भाषेचं हे अनोखं सौंदर्य ते साध्या व्यवहारा बरोबरच पत्रातही जपायचे हे मला प्रकर्षाने जाणवलं.

अटलजींच्या  मनाच्या मोठेपणाचा  आणखी एक अनुभव मला आला.  राममंदिराच्या आंदोलनाच्या वेळी मी  वृत्तांकनासाठी  अयोध्येला गेलो होतो.  एकदा अटलजी लखनौमध्ये  येणार असल्याचं  मला समजलं.  दुसऱ्या दिवशी सकाळीच मी लखनौ ला पोचलो.  धडपडत  विश्रामगृहावर गेलो.  पण तेवढ्यात अटलजी एका  कार्यक्रमासाठी  बाहेर पडत होते.  विश्रामगृहाच्या कॉरिडॉरमध्ये धावत पळत जात मी त्यांना गाठलं,  नमस्कार केला.  मी पत्रकार असल्याचं सांगितलं आणि थोडंसं बोलण्याची विनंती केली. ’’अभी समय  कहा है,  हम तो निकले है’’ असं म्हणत अटलजी चालायला लागले.  मीही अस्वस्थ होऊन त्यांच्या बाजूने चालत होतो. अटलजींशी  बोलण्याची एक संधी हतची जाणार अशी भीती मला वाटत होती.  मी पुन्हा एकदा विनंती केली,  पण अटलजी निर्विकार होते.  एवढ्यात त्यांच्या भोवतीच्या  घोळक्‍यात चालणाऱ्या किरीट सोमय्यांचं  माझ्याकडे लक्ष गेलं.  सोमय्या मला ओळखत होते.  ते क्षणार्धात पुढे आले आणि म्हणाले, ’’अटलजीं, ये पुणे के  पत्रकार है.  केवल आपके लिये ही आये है.’’ त्यांच्या म्हणण्याचा काय परिणाम झाला माहीत नाही,  पण अटलजींनी क्षणभर माझ्याकडे रोखून पाहिलं आणि आश्वासक आवाजात  म्हणाले, ’’ऐसा है  तो चलो हमारे साथ.’’ मला हुरूप  आला. मी त्यांच्याबरोबर गेलो.  पण गाडी भोवतीच्या सुरक्षा रक्षकांनी मला अडवलं.  मी गडबडलो.  पण अटलजींच्या ते लक्षात आलं.  त्यांनी हस्तक्षेप करून सुरक्षारक्षकांना मला येऊ देण्यास सांगितलं.  मी त्यांच्या गाडीत त्यांच्या शेजारी बसलो.  ज्येष्ठ नेते लालजी टंडनही  त्यावेळी गाडीत होते.  गाडीत बसताच  ’’सभास्थान आनेतक अब जो चाहे वो  पूछो’’  असं  अटलजी म्हणाले आणि मला थोडा  वेळ का होईना  पण  त्यांची प्रत्यक्ष मुलाखत  घेता आली.

स्वतःच्याच मिजाशीत वावरणारे आणि अहंकारात नखशिखांत बुडालेले असंख्य राजकीय नेते आपण पदोपदी पाहतो. पण  धडपडणाऱ्या एखाद्या सामान्य पत्रकाराचीही बूज  ठेवणारे अटलजींसारखे  महानायक  विरळच असतील. अटलजींनी त्यांच्या एका कवितेत म्हटलं आहे की,
जरूरी यह है की
उँचाई के साथ विस्तारभी हो,
जिससे मनुष्य ठूठ-सा खडा न रहे,
औरोंसे घुले -मिले,
किसीको साथ ले,
किसीके संग चले,
भीडमे खो जाना
योदोंमे डूब जाना, 
स्वयंको भूल जाना,
अस्तित्वको अर्थ, 
जीवन को सुगंध देता है.
मेरे प्रभू मुझे इतनी ऊॅचाई 
कभी मत देना,
गैरोंको गले न लगा सकू
इतनी रुखाई कभी मत देना.... 

अटलजीं नुसत्या कविताच करत नव्हते, तर तसं जगतही होते.

संबंधित बातम्या