पितृतुल्य अटलजी!

सुरेश प्रभू  (केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी हवाई वाहतूक मंत्री)
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
आदरांजली

 

माझ्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर पितृतुल्य प्रेम करणाऱ्या नेत्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान महत्त्वाचे आहे. एक प्रभावी व सर्वमान्य नेता, मितभाषी पण वक्ता दससहस्त्रेषू, कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निर्मळ मनाचा अत्यंत चांगला माणूस या गुणांमुळे अटलजी सर्वांना कायम प्रिय राहिले. अटलजी-अडवानीजी, जॉर्ज फर्नांडिस व बाळासाहेब ठाकरे या चौघांनी मला फार प्रेम दिलं आहे. ‘बेटा, तुझ्या भागात प्रचारसभा ठेव मी भाषणासाठी येतो’ असे ज्या अन्यपक्षीय खासदारांना अटलजी सांगत त्या दुर्मिळ खासदारांत माझा समावेश आहे हे सांगतानाही उर अभिमानाने भरून येतो. गेली काही वर्षे ते फार आजारी होते. त्यावेळी नकोशी माणसे समोर आली की ते तोंड फिरवून घ्यायचे. पण मी गेल्यावर माझा हात पकडून ठेवायचे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात असे. 

अटलजींशी पहिली भेट १९९६ मध्ये झाली, त्यापूर्वी मी त्यांना केवळ दुरूनच सभांमध्ये प्रभावी भाषणे देताना पाहिलेले होते. प्रत्यक्ष परिचय नव्हता. पण तो झाल्यावर त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. किंबहुना दिल्लीसारख्या ठिकाणी मराठी माणसाला सुरवातीला जाणवतो तो परकेपणा व त्याची तीव्रता केवळ अटलजी व अडवानीजींच्या स्नेहामुळे मला भासली नाही. 

एन्रॉन वीज प्रकल्पाच्या प्रकरणात भारतावर अमेरिकेने प्रचंड दडपण आणले होते. त्यावेळी हा प्रकल्प आपणच पूर्ण विकत घेण्याबाबत जे मत मी मांडले व अटलजी माझ्या निर्णयामागे दृढपणे उभे राहिले. 

एकदा ब्रिटनचे उपपंतप्रधान जॉन बेस्कॉट भारतात आले होते. बेस्कॉट माझेही चांगले मित्र होते. ते पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे एक पत्र घेऊन भारतात आले होते. त्यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीला मलाही बोलावून घेऊन बेस्कॉट यांना माझा परिचय करून दिला. ते म्हणाले आम्ही चांगले मित्र आहोत. तेव्हा अटलजी हसतहसत उद्‌गारले, म्हणूनच मी याला बैठकीत बोलावून घेतले आहे ! त्यांच्या एकेका वाक्‍याने बैठकीतील ताणतणाव क्षणात निवळत असे.

एन्रॉनच काय, पण केंद्रीय मंत्री म्हणून माझ्या प्रत्येक निर्णयामागे ते भक्कमपणे उभे राहिले. योगायोग पहा, अटलजींना १९९६, १९९८ व १९९९ अशी तीनदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी राष्ट्रपती भवनात त्यांच्यासह शपथ घेणाऱ्या मोजक्‍या तीन मंत्र्यांमध्ये तिन्ही वेळेस मी होतो. 

सध्या यापैकी डॉ. मुरली मनोहर जोशी व राम जेठमलानी हे सक्रिय नाहीत व मी मंत्रिपदावर आहे हे अटलजींच्याच आशीर्वादाचे फलित. 

वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात माझ्याकडे या ना त्याप्रकारे तब्बल सहा सहा मंत्रालयांचा कार्यभार राहिला इतका विश्‍वास अटलजींना माझ्यावर दाखवला होता. दरवर्षी युरियासाठी शेतकऱ्यांचे हाल व नंतर लाठीमार हा नित्याचा असण्याच्या त्या काळात एकदा सरकारने खत कंपन्यांकडून दोन हजार कोटींचा दंड इतिहासात प्रथमच वसूल केला, तेव्हा अटलजींना नंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत माझ्याकडे अंगुलिनिर्देश करीत त्याचे खास कौतुक केले. 

एका सार्वजनिक कंपनीच्या सर्वोच्च पदावर एका अत्यंत भ्रष्ट अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय अंतिम झाला होता. मला हे समजताच मी अटलजींना त्या महाशयांची पार्श्‍वभूमी सांगितली. तो निर्णय तत्काळ रद्द झाला व ते आदेश खुद्द पंतप्रधान कार्यालयातून आले होते. 

केंद्र सरकारने ‘इलेक्‍ट्रिसिटी कायदा २००३’ करण्याचे ठरविले तेव्हा खुद्द भाजपमधील अनेक मंत्रीही त्याच्या विरोधात होते. पण अटलजींना आधी माझ्याकडून या कायद्यातील महत्त्वाची कलमे ऐकून घेतली, देशास असलेली त्याची गरज समजावून घेतली व नंतर या कायद्याची भक्कम पाठराखण केली. ऊर्जा मंत्रालयाचा मी राजीनामा दिल्यावर अटलजी व अडवानीजींनी मला बोलावून घेतले व नद्या जोडणी या महत्त्वाच्या प्रकल्पाचे अध्यक्षपद मला देऊन ‘रूल ऑफ प्रेसिडेन्ट’ मध्ये माझे नाव आवर्जून समाविष्ट केले.

वाजपेयी मंत्रिमंडळात मी तसा ज्युनिअर होतो व तरूणही होतो. तरीही दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत अटलजी जेव्हा अडवानी, यशवंत सिन्हा, जसवंतसिंह, जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर ज्या चर्चा होत त्यात अटलजी मला आवर्जून बोलावत असत. हे पाहून भाजपच्या अनेक मंत्र्यांनाही असूया वाटे. कारण मी पंतप्रधानांकडे रोज उगाचच्या उगाच चकरा मारणे, कमरेत पूर्ण वाकून नमस्कार करणे वगैरे उद्योग करणारा नव्हतोच. बाळासाहेबांचे संस्कारच तसे नव्हते. पण तरी अटलजी माझ्यावर एवढा विश्‍वास का टाकतात याचे कोडे अनेकांना उलगडत नसे व ते तसे बोलूनही दाखवीत असत !! 

बाळासाहेबांनी १९९६ पासून २००२ मला भाजप आघाडीच्या सुकाणू समितीत कायम ठेवले. याचे एक कारण सांगताना अडवानीजी एकदा म्हणाले होते, की बैठकीत जी राजकीय चर्चा होते, जे निर्णय होतात ते लगेच बाहेर जाऊन पत्रकारांना सांगणाऱ्यांतला तू नाहीस ही गोष्ट आम्हाला व बाळासाहेबांनीही फार महत्त्वाची वाटते.

एकदा कोकणातील माझ्या मतदारसंघातील ५०-६० लोकांना मी दिल्ली दर्शनासाठी बोलावले होते. त्यावेळी एकाच दिवसात राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींपासून किमान १० अतिशय महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटींचा कार्यक्रम होता. अटलजींना त्यांना चक्क १ तास दिला व निघताना सांगितले, 

‘आप बहोत भाग्यशाली होत, सुरेश प्रभू जैसा ‘हिरा’ आप को सांसद के नाते मिला है’.

अनेकदा अटलजींच्या विरोधात प्रचाराची राळ उठायची. ती करण्यात भाजपच्याही काही मंडळींचा वाटा असायचा. मला ते समजल्यावर मी अस्वस्थ होऊन म्हणत असे ‘अटलजी, हे सारे खोटे आहे हे मी त्यांना समजावून सांगू का?’ त्यावर त्यांचे उत्तर असे, ‘सुरेशजी, माझ्यावर टीका केली नाही तर काही लोकांना मोठेपण मिळूच शकत नाही. असे असताना त्यांना बोलण्यापासून का रोखायचे?’ इतक्‍या निर्मळ मनाचा हा नेता होता. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने विदेशात असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अवस्था भावव्याकूळ झाली.

(शब्दांकन : मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली.)

फोटो फीचर

संबंधित बातम्या