कॅन्सरचा धोका टाळा!

डॉ. चेतन दिलीप देशमुख 
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
वर्ष २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार त्यावेळच्या १२५ कोटी लोकसंख्येपैकी १० लाख लोक कॅन्सरग्रस्त होते. दर एक लाख लोकसंख्येमागे ९४  लोक कॅन्सरग्रस्त होते, तर २०१७ मध्ये हेच प्रमाण १०८ वर गेले आहे. कशामुळे इतक्‍या लोकांना कॅन्सर होत असावा? बदललेली जीवनशैली, जंक फूड इतकीच याची कारणे आहेत का?
 

कॅन्सर हा अल्पावधीत होणारा आजार नाही. सतत तंबाखू चघळणाऱ्या किंवा सिगारेट ओढणाऱ्या माणसाला सुद्धा काही वर्षांनंतरच कॅन्सर होतो, लगेच होत नाही. कॅन्सर घडवणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरावर हळूहळू परिणाम घडवत असतात. आपल्या शरीरातील जीर्ण झालेल्या किंवा मरण पावलेल्या पेशी भरून काढणे आवश्‍यक असते. जुन्या, जीर्ण किंवा नादुरुस्त पेशी शरीरासाठी घातक ठरू शकतात कारण त्यांच्यापासून अति-आक्रमक, अनेक त्रुटींनी भरलेल्या पेशी किंवा मूलभूत जनुकीय बिघाड असलेल्या सदोष पेशी तयार होऊ शकतात. यासाठी सतत नव्या पेशी तयार होऊन या जुन्या पेशी नष्ट होणे गरजेचे असते. याच कामासाठी अनेक पेशींचे दररोज, दर तासाला किंवा दर मिनिटाला विभाजन आणि वाढ होत असते. या विभाजनादरम्यान पेशींमधील जनुकीय (जेनेटिक) सामुग्रीचे योग्य आणि समान वाटप होत असते. पण जेव्हा लाखोंच्या संख्येने विभाजन होते तेव्हा यात काही जनुकीय चुका (जेनेटिक म्युटेशन्स) राहून जातात किंवा होतात. काही रसायने, शरीरातील इतर बदल, क्ष-किरण किंवा कॅन्सर घडवणारे इतर अनेक घटक यामुळेही अशी म्युटेशन्स होऊ शकतात. या म्युटेशन्स मधून पेशींना वाढीसाठी आणि विभाजनासाठी चुकीचे संदेश (अनियंत्रित वाढणे, आक्रमकता, शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून बचाव) दिले जातात. शरीराची अंतर्गत प्रतिकारशक्ती असे म्युटेशन्स वेळीच ओळखून त्यांचा नायनाट (आपल्या नकळत) करत असते. एकमेकाला पूरक असलेली म्युटेशन्स जास्त प्रमाणात वाढली तर मात्र शरीराला त्यांना नष्ट करणे शक्‍य होत नाही. मग या म्युटेशन्समुळे कुचकामी, नादुरुस्त आणि सदोष पेशी अनियंत्रित आणि अनावश्‍यकरीत्या वाढत राहतात, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. 

वाढत्या वयानुसार ही म्युटेशन्स ओळखणारी यंत्रणा शिथिल होऊ लागते. अनेक वर्षांचा रसायनांचा किंवा इतर घटकांचा मारा सोसून म्युटेशन्सचे प्रमाण वाढलेले असते. हा भार नष्ट करता न आल्यास पेशींची अनिर्बंध वाढ सुरू होते. यामुळे वाढते वय हे कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. भारताची लोकसंख्या एकूणच जास्त आहे, त्यात वृद्धांची संख्याही जास्तच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेल्या आयुर्मानापेक्षा (सरासरी ४८ वर्ष) आजचे आयुर्मान २० वर्षांनी जास्त आहे. म्हणजे येणाऱ्या काळात वृद्धांची संख्याही वाढत जाणार आहे. अप्रत्यक्षरीत्या या वाढत्या संख्येमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत जाणार आहे. वय वाढत जाते तसे कॅन्सर घडवणाऱ्या घटकांना शरीरावर परिणाम करण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त वाव मिळत राहतो. त्यामुळे अनेक कॅन्सर हे पन्नाशी किंवा त्यानंतरच्या दशकांमधे होतात.  

आयुर्मान वाढण्यासाठी वैद्यकशास्त्राच्या इतर शाखांनी बरीच प्रगती केली आहे. धूम्रपान/मद्यपान करणारे लोक पन्नाशीतच हृदयविकाराला बळी पडायचे. आता त्यांची ॲन्जिओप्लास्टी/बायपास सहज होते. पण धूम्रपानामुळे होणारी म्युटेशन्स तयार होत राहतात आणि काही वर्षानंतर त्यांचे कॅन्सरमध्ये रूपांतर होते. काही वर्षांपूर्वी एच.आय.व्ही/एड्‌ससाठी प्रभावी उपचार नव्हते किंवा अतिशय खर्चिक होते. या आजारांचे रुग्ण त्या व्हायरसच्या दुष्परिणामांमुळे किंवा जंतुसंसर्गाला बळी पडत होते. कॅन्सरसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजाराला वाढायला त्याकाळी वावच मिळत नव्हता. आता या आजारावरची प्रभावी औषधे मोफत उपलब्ध झाल्याने एच.आय.व्ही ग्रस्त रुग्णांचेही आयुर्मान वाढले आहे. त्यांच्यात कॅन्सर घडवणाऱ्या  म्युटेशन्सला वाढायला वाव मिळू लागला आहे. एच.आय.व्हीग्रस्त रुग्णांमधे जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी होऊन कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे.  

व्यसनाधीनता - (विशेषकरून तंबाखूचे वाढलेले व्यसन) याचा कॅन्सर घडवण्यात फार मोठा वाटा आहे. तंबाखूचा शरीराला कोणताही फायदा होत नाही फक्‍त तोटा होत राहतो. असे असतानासुद्धा तंबाखूचे व्यसन दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पूर्वी लोकांना तंबाखू/सिगारेटचं व्यसन नव्हतं असं नाही पण त्याकाळी तंबाखूचे इतके प्रकार सहजरीत्या उपलब्धही नसायचे. पूर्वी लोक घरातल्या मोठ्या माणसांसमोर सिगारेट ओढत नसत किंवा चोरून ओढत. आता खैनी, जर्दा, पान मसाला, गुटखा, मिश्री, सिगारेट, विडी असे अनेक प्रकार सर्रास मिळतात, त्यांची जाहिरात आणि विक्री मोठ्या प्रमाणात होते. हुक्का/पानमसाल्याच्या मार्गाने शाळकरी आणि कॉलेजातील मुलांना तंबाखूकडे आकर्षित केले जाते. आधी सहज गंमत म्हणून किंवा इतर मित्रांच्या आग्रहाखातर यांची चव घेतली जाते आणि हळूहळू व्यसनाची सुरवात होते. मग पानमसाल्यावरून तंबाखूयुक्‍त गुटखा,

हुक्‍क्‍यावरून सिगारेट अशा वरच्या पायऱ्या चढत तरूण तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जातात. 
लहान वयात लागलेल्या व्यसनामुळे तंबाखूतील विषारी रसायनांना शरीरावर घातक परिणाम करायला पुष्कळ वेळ मिळतो आणि मग काही वर्षांनंतर याच तरुणांना कॅन्सरचा त्रास होतो. जर गुटखा/तंबाखू/मिश्री याचे व्यसन शाळकरी वयात (साधारण १२-१८ वर्षात) लागले असेल तर पुढची १० - १२ वर्ष तरी ते सुरू राहते.  हा कालावधी शरीरात घातक म्युटेशन्स घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे अगदी तिशीतच किंवा चाळिशीतच या व्यसनाधीन तरुणांना कॅन्सर होतो. 

भारतात तरुणांमधे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे असे म्हटले जाते. याची  कारणे असू शकतात. ज्याप्रमाणे आयुर्मान वाढल्याने वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारतात जास्त आहे तशीच तरुणांचीही संख्या मोठी आहे. पंचेचाळीस वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या लोकांच्या संख्याबळात भारताचा क्रमांक फार वरचा आहे. जर इतक्‍या प्रमाणात देशात तरूण असतील तर टक्केवारीप्रमाणेच त्यांचे एकूण प्रमाणही जास्त असेल हे उघड आहे. दुसरे कारण (ज्याच्यावर अजून संशोधन सुरू आहे) म्हणजे गुणसूत्राच्या (क्रोमोझोम) टोकाकडील भागाची (टेलोमिअर) लांबी कमी असणे हे असू शकेल. पेशीच्या प्रत्येक विभाजनाबरोबर ह्या टेलोमिअरची लांबी कमी होत जाते आणि एका मर्यादेनंतर विभाजन होणे पूर्ण थांबते. आता मुळातच या टेलोमिअरची लांबी कमी असेल तर पेशींच्या विभाजनाला लवकर आळा बसतो आणि जीर्ण, नादुरुस्त पेशी भरून काढल्या जात नाहीत. या पेशी मग तशाच सदोष पद्धतीने वाढत राहतात आणि कॅन्सर होण्याची शक्‍यता वाढते. भारतात अनेक कॅन्सरचे सरासरी वय पश्‍चिमात्य देशांपेक्षा एक दशक कमी आहे, यामागे टेलोमिअरची घटलेली लांबी हे कारण असू शकेल. 

बदलती जीवनशैली हे कॅन्सरचे कारण आहे हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. पण बदलती जीवनशैली म्हणजे नेमके काय? अगदी आपल्या रोजच्या जगण्यातला गोष्टी आठवून पाहा. पूर्वी आपण शाळेत चालत जायचो, आता ’स्कूल-बस’ किंवा रिक्षावाले काका येतात. पूर्वी घराजवळ किरकोळ कामासाठीही आपण चालत जायचो, आता दुचाकीवर टांग मारून जातो. पूर्वी स्वत:ची चारचाकी किती जणांकडे असायची? बस, रेल्वे हीच प्रवासाची साधने होती ज्याच्यासाठी भरपूर चालावे लागायचे. जीवनशैली बदलल्याने रोजच्या जगण्यातला सहज होणारा व्यायाम बंद झाला. पूर्वी ’नॉन-व्हेज’ किती वेळा आणि किती प्रमाणात खाल्ले जायचे? आठवड्यातून एकदा किंवा फारतर दोनदा. आता आपण किती सहज(आणि किती प्रमाणात) नॉन-व्हेज खातो? किती वेळा आपण पिझ्झा खातो? जेवणानंतर स्वीट डिश म्हणून फळे किती वेळा खातो आणि आईसक्रीम किती वेळा खातो ? या सर्व सवयींमुळे वजन वाढू लागते, शरीरातली चरबी वाढते. वाढती चरबी ही ब्रेस्ट(स्तनांचा) आणि मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. हे झाले रोजच्या जीवनातले बदल. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहा आणि ५० वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवा. शेतात फवारली जाणारी रसायने, कीटकनाशके, हवा, पाणी यातील प्रदूषण, जैवतंत्रज्ञान वापरून केलेली शेती, दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, आहारात, कामाच्या वेळेत झालेले बदल इथपासून ते पहिल्या बाळंतपणाचे वाढलेले वय, कमी किंवा अजिबात मूल न होऊ देणे, गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर यातील प्रत्येक गोष्ट कॅन्सरशी थोड्याफार प्रमाणात निगडित आहे. या सर्व आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत आणि हीच आपली आजची जीवनशैली आहे. जीवनशैली म्हणजे काय असते? आपण आपले रोजचे जीवनातले जगणे-वागणे, खाणे-पिणे, राहणे या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे जीवनशैली. फार लांब जायची गरज नाही, अगदी आपल्या लहानपणीचा काळ आठवून पाहिला तरी त्यावेळचे आपले जगणे आणि आजचे जगणे यातला फरक लक्षात येईल आणि आपली जीवनशैली कशी बदलली आहे हे कळून येईल. यातील सर्वच गोष्टींवर आपले प्रत्यक्ष नियंत्रण असेल असे नाही त्यामुळे आताची जीवनशैली चूक की बरोबर यावर फार चर्चा करण्यात अर्थ नाही. पण ५० वर्षांपूर्वी कॅन्सरचे प्रमाण कमी होते त्यामुळे ती जीवनशैली अधिक निरोगी होती असे मानायला हरकत नाही.  

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रोगनिदान सोपे आणि अचूक झाले आहे. पूर्वी अनेकवेळा कॅन्सरचे निदान अचूक किंवा वेळेत होत नसे. काही गाठी या शरीरात खोलवर असल्याने शस्त्रक्रिया करून काढता येत नसत. कधी रुग्ण शस्त्रक्रिया करण्यायोग्य नसे. आता अद्ययावत सीटी किंवा पेट स्कॅन, गाठीचा तुकडा काढण्याच्या (बायोप्सी) तंत्रातील सुधारणा, रक्त आणि पेशींवरच्या रासायनिक आणि जनुकीय चाचण्या यामुळे कॅन्सरचे निदान झाल्यावाचून राहात नाही. 
कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे आणि वाढत जाणार आहे हे खरी गोष्ट आहे. पण कॅन्सर टाळण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनातही काही बदल करता येतात. नियमित व्यायाम, वजन आटोक्‍यात ठेवणे, आहारात ताजी फळे-भाज्या घेणे, तंबाखू/मद्यसेवनापासून दूर राहणे आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी दक्ष राहून वेळोवेळी चाचण्या करणे यामुळे कॅन्सरचा धोका टळू शकतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. या गोष्टी करणे सोपे आणि आरोग्यदायी आहे. किमान या गोष्टींमुळे कॅन्सरची वाढ रोखायला मदत होईल आणि निरोगी जीवन जगता येईल.

संबंधित बातम्या