सदोष आहार

डॉ. मेधा पटवर्धन 
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
 

आपल्या एकुलत्या एक नऊ वर्षाच्या मुलीला घेऊन भेटायला आलेले दांपत्य अत्यंत काळजीत होते. या मुलीचे वजन प्रमाणाबाहेर वाढलेले होते आणि त्याचे दुष्परिणामही दिसू लागले होते. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार आहाराविषयी सल्ला घेण्यासाठी ते आले होते. हे दांपत्य अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन खेडेगावामधून शहरात राहायला आलेले होते. उच्च पदावर दोघेही कार्यरत होते. आर्थिक सुबत्ता होती. आपल्याला लहान असताना जे मिळाले नाही ते सर्व मुलीला द्यायचे या उद्देशाने अतिशय लाडात वाढवताना रोज क्रिमची बिस्किटे, केक, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्‍स, ब्रेड, क्रिमरोल, मॅगी भरपूर प्रमाणात तिला खायला देत होते. त्याच बरोबर मुलगी तासन्‌तास टीव्ही समोर घालवत होती.

चुकीच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचाली, व्यायाम यांचा अभाव हेच वजन वाढण्याचे कारण होते. मुलीच्या उच्चशिक्षित आईवडिलांना त्यांच्या लहानपणी त्यांनी घेतलेला आहार, दैनंदिन जीवनात त्यांनी केलेले शारीरिक श्रम कसे योग्य होते हे पटवून द्यावे लागले. चुकीच्या आहार पद्धतीमधून बाहेर येण्यासाठी मुलीला त्यांनी गावी शिकायला ठेवले. रोज भाजी, भाकरी, ताजी फळे, दूध आणि शाळेसाठी चालत जाण्याच्या व्यायामाने कोणत्याही औषधाविना वजन कमी झाले. उत्साही आनंदी, सशक्त मुलगी त्यांना परत मिळाली.

वेगवान जीवनशैली, आर्थिक सुबत्ता, अन्नधान्याची भरपूर उपलब्धता, काळाची गरज यामुळे आपली खाद्य संस्कृतीच बदलून गेली. फास्टफूड, तयार पदार्थांनी आपल्या नकळत रोजच्या आहारात जागा पटकावली. आपल्या देशात जागोजागी फास्टफुड जॉईंटस दिसू लागली. खरे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गरज म्हणून अमेरिकेत पहिल्यांदा तीन फास्टफूड तयार झाली. ती म्हणजे हॅमबर्गर, हॉटडॉग आणि पिझ्झा. आजच्या इंटरनेट, गुगलच्या जमान्यात फास्टफुडच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती सर्वांना असतेच. परंतु चविष्ट, भरपूर कॅलरीज देणारी, भूक शमविणारी, एकाच प्रतीची, मिळण्यास सुलभ आणि इकडे तिकडे नेण्यास सुलभ आणि इकडे तिकडे नेण्यास सोपी म्हणून सदोष, असमतोल अशा फास्टफुडचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे हे सत्य स्वीकारावे लागते. 

त्याच बरोबर अनेक आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्यदायी, समतोल पदार्थ हे योग्य प्रमाणात अन्नघटक देणारे असतात. फळे, तृणधान्ये, डाळी, कडधान्ये, भाज्या, दूध आणि कमी स्निग्धांश असलेले नॉनव्हेज योग्य प्रमाणात घेतल्याने स्वास्थ्य लाभते. फास्टफूडमध्ये जास्त कॅलरीज, प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ, मीठ, साखर, मैदा असतो. जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर (चघळचोथा) याची कमतरता असते.

बन्स, रोल्स, पिझ्झा, ब्रेड, फ्रॅंकी या पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड फॅट वापरतात. त्यामध्ये वापरले जाणारे चीझ, मायोनीझ वजन वाढवितात. हे पदार्थ करताना बेकिंग पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे मिठाचे प्रमाण वाढते. फायबरची कमतरता असते. फास्टफूड हे सॉफ्टड्रिंक्‍स, मिल्कशेक बरोबर खाण्याची फॅशन आहे. त्यामुळे पचनक्रिया कठीण होते. केचप्स, सॉस यात पदार्थ टिकविण्यासाठी बरेच रासायनिक पदार्थ घातले जातात ते अनेक आजारांना कारणीभूत ठरतात.

पेस्ट्री, केक, बिस्किटे, बटाट्याचे वेफर्स यामध्ये प्राणिजन्य स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्याच बरोबर साखर, मीठ यांचेही प्रमाण जास्त असते. या सर्वांचा परिणाम म्हणून ह्रदयरोग, स्तनांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा या सारख्या व्याधी जडतात. 

पदार्थ                         प्रमाण                    कॅलरीज
१. चीजपिझ्झा            १ लहान स्लाईस       १४०
२. पोटॅटो चिप्स           १५                         ७०
३. फ्रेंच फ्राईज             लहान पुडा               २२०
४. चीज बर्गर              १०० ग्रॅ.                   २९०
५. सॉफ्ट ड्रिंक             २५० मिली               ८०
६. व्हाईट ब्रेड              १ स्लाईज                १००
७. होल ग्रेनब्रेड            १ स्लाईज                ८१
८. गव्हाचा ब्रेड            १ स्लाईज                ६९
९. समोसा                  १०० ग्रॅ.                   २५६
१०. कचोरी                 १०० ग्रॅ.                   २०१
११. वडापाव                १                           २९०

(कृपया वरील चौकट पहा)
वरील दिलेल्या सर्व पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज, साखर जास्त प्रमाणात स्निग्धपदार्थ व फायबर, जीवनसत्त्वे यांचा अभाव आहे. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशन २००४ यांच्या संशोधनानुसार फास्टफुड आरोग्यास घातक असून जीवनसत्त्वे व खनिजे फायबर यांचा अभाव आढळतो. युरोपियन जर्नल ऑफ क्‍लिनिकल न्यूट्रिशन डिसेंबर २०१३ च्या संशोधनानुसार फास्टफूडमुळे मधुमेह व लठ्ठपणाचे प्रमाण वाढते. पुण्यामध्ये वाढत्या वयाच्या मुलांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार लठ्ठपणा व उच्च रक्तदाब यांचे प्रमाण वाढले आहे. 

आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा नव्याने विचार विनिमय करून आपल्याला जास्तीत जास्त समतोल साधण्याचा प्रयत्न करायला हवा. पारंपरिक खाद्यसंस्कृती म्हणजे नियमित वेळी खाणे. दिवसातून तीन वेळा खाणे, न्याहारी, दुपारचे खाणे व रात्रीचे जेवण.

याआधी सतत स्नॅक्‍स खाणे, चहा, कॉफी पिणे असे प्रकार नव्हते. पदार्थ घरीच तयार केले जायचे. ताजे अन्न आणि ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल केले जात. गोडधोड फक्त सणांच्या दिवशीच केले जात असे. स्वयंपाक करण्यासाठी भरपूर श्रम व वेळ खर्च केला जात असे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे हे शक्‍य होईलच असे नाही. आज अनेक स्त्रिया आपल्या नोकरीनिमित्त ८ ते १० तास घराबाहेर असतात. नोकरीमेध्य टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्वतः किंवा कंपनीकडून फास्टफूड पुरविले जाते. त्याला पर्याय काढणे गरजेचे आहे. गृहिणीसुद्धा सतत घरासाठी राबत असतात. त्यामध्ये केवळ स्वयंपाकासाठी जास्त वेळ देणे शक्‍य नसते. हे सर्व जरी खरे असले, तरी स्त्रियांनी आहाराविषयी जागरूक असणे आणि कुटुंबासाठी योग्य आहाराचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. 

तयार पदार्थ, रेडी टू कुक पदार्थ, टेक अवे, हॉटेलमध्ये खाणे, फास्टफूड, पार्टीज, सेलिब्रेशन याला लगाम लावला पाहिजे.

पौष्टिक व समतोल पदार्थ खाण्याची सवय आपल्या कुटुंबातील सर्वांना लावली पाहिजे. खाण्याची शिस्त जोपासली पाहिजे. आवडी निवडीपेक्षा जास्त महत्त्व पौष्टिकतेला देऊन आहार नियोजन केल्याने खूप चांगल्या गोष्टी साध्य होतील. बाहेरचे खाणे, फास्टफूडचे सेवन कमीत कमी वेळा करण्याचा नियम स्वतःसाठी पाळला पाहिजे.

  • आहारनियोजन करताना आठवड्याचा मेन्यू ठरवावा.
  • मेन्यूमध्ये असलेल्या पदार्थांसाठी लागणाऱ्या भाज्या, फळे, धान्ये इतर गोष्टी उपलब्ध करून ठेवाव्यात.
  • रोजच्या आहारात जास्तीत जास्त अन्नगटांचा समावेश करावा.
  • शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, ताजे ताक घेण्याची सवय लावली तर सॉफ्टड्रिंक्‍सचा विसर पडेल.

नवीन पिढीला आवडतील असे, चमचमीत आणि चविष्ट, पौष्टिक पदार्थ करताना कडधान्ये, छोले, राजमाचाट, निरनिराळी सॅलड, ढोकळा, इडली, धिरडी, गव्हाच्या पिठाचा पराठा करून त्यामध्ये कॉर्न, भाज्या, अंडे, चटणी घालून केलेली फ्रॅंकी. दलिया उपमा, सोयाचक्‍स पनीरचा वापर करून केलेली कटलेटस, कोथिंबीरवडी, कोबीवडी, पालकवडी, चाट असे अनेक पदार्थ करता येतील.

फास्टफूड खाताना योग्य फास्टफूडची निवड करावी. त्यामध्ये मल्टिग्रेन किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ, भरपूर सॅलड असलेले पदार्थ घ्यावेत. चीज, मायोनीज टाळावे. सॉफ्टड्रिक्‍स घेऊ नयेत. एका पदार्थावर एक फ्री किंवा बिग साईजच्या आमिषाला बळी न पडता स्मॉलसाईजची निवड करावी.

आरोग्याची गंभीर समस्या टाळण्यासाठी जुने पदार्थ, नवीन स्वरूपात तयार करून सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न करावा. तरुण पिढी निरोगी, सशक्त होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या