हाड व सांध्यांचे विकार

डॉ. नीरज आडकर, स्पेशालिस्ट हिप आणि नी जॉइंट सर्जन
गुरुवार, 21 जून 2018

कव्हर स्टोरी : आरोग्य विशेष
 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ राहिलेला नाही. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण आपल्या घरातल्या, बाहेरच्या कामांमध्ये व्यस्त असतो. यामध्ये आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. याबरोबरच आजच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आहारामधून पोषक तत्त्व व मिळाल्यामुळे हाडांच्या व सांध्यांच्या विकारामध्ये वाढ झालेली दिसून येते. या अनुषंगाने आपण हाडांचे व सांध्यांचे विकार, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार यासंबंधी माहिती घेणार आहोत.

हाडांची ठिसुळता : याला ‘ऑस्टीओपोरोसिस’ असे संबोधले जाते. हाडांमध्ये कॅल्शिअम कमी प्रमाणात तयार होणे किंवा जास्त प्रमाणात कॅल्शिअम हाडांमधून निघून जाणे, यामुळे आज तरुण लोकांमध्येसुद्धा ऑस्टीओपोरोसिस आढळून येतो.

प्रमुख कारणे :  व्यायामाचा अभाव ः दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहण्याची सवय स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे  जंकफूड, सॉफ्ट ड्रिंक्‍स, कॉफी इ. चे सेवन  धूम्रपान  आहारामधील अतिरिक्त मिठाचे प्रमाण  व्हिटॅमिन्सची कमतरता  स्टेरॉईडच्या औषधांचा वापर  हार्मोनल इनबॅलन्स 

निदान : याचे निदान ‘बोन मिनरल डेन्सिटी’ या चाचणीद्वारे करण्यात येते.

प्रतिबंधात्मक उपाय व उपचार : नियमित व्यायाम, संतुलित आहार व आहारामध्ये प्रोटीन्सची मात्रा जास्त असावी. व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास व्हिटॅमिन सप्लिमेंट घेणे. नुसते फिरायला गेल्याने किंवा कार्डिओ एक्‍सरसाईज करून स्नायूतील ताकद वाढत नाही. त्यासाठी नियमित योगा किंवा लाइट वेट असे व्यायामप्रकार करून स्नायूमधील व हाडातील ताकद वाढते. त्याचबरोबर जास्त प्रमाणात हाडे ठिसूळ असल्यास व स्त्रियांमध्ये मेनॉपॉझनंतर कॅल्शिअम सप्लीमेंट नियमित स्वरूपात सेवन करण्यात यावी.

संधिवात : संधिवात म्हणजे सांध्यांचा रोग. आपल्या शरीरात सुमारे २०० सांधे आहेत. त्यामध्ये अर्धेअधिक सांधे मणक्‍यांमध्ये असतात. सांध्यांचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल करणे होय. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे यालाच संधिवात असे म्हणतात. संधिवातामध्ये प्रामुख्याने गुडघ्याचा, खुब्याचा आणि खांद्याचा संधिवात अधिक प्रमाणात आढळून येतो.

प्रमुख कारणे : खेळाडूंमध्ये होणाऱ्या सांध्यांची इजा : यामध्ये सांध्यांच्या आतील लिगामेंटस, कुर्चा (Meniscus), कार्टिलेज स्नायू याला इजा होऊन सांध्याला सूज येऊन सर्व हालचाली वेदनादायक होतात. असा प्रकारच्या संधिवातामध्ये वेळेत योग्य निदान व उपचार होणे अत्यंत जरुरी असते.

ऑस्टिओ आर्थायटीस : म्हणजे वयोमानापरत्वे होणारी सांध्यांची झीज. यामध्ये हाडावरील कार्टिलेजची झीज होऊन हाडावरील ल्युब्रिकंट नाहीसे होते. हाडे एकमेकांवर घासायला लागून सांध्यांच्या हालचाली वेदनादायक होतात. हे उतारवयामध्ये बघायला मिळते. पण व्यायामाचा अभाव व योग्य उपायांअभावी काही तरुण लोकांमध्येसुद्धा हा आजार बघायला मिळतो. कार्टिलेजवरील ल्युब्रिकंटची झीज झाली, की ते परत तयार होत नाही. त्यामुळे एकदा झीज झाली, की ती कायमस्वरूपी असते.

गाऊट (Gout) : रक्तातील युरिक ॲसिड वाढल्यानंतर ते सांध्यांमध्ये जाऊन जमा होते. सांध्यांना सूज येऊन सांधे दुखायला लागतात. आपल्या आहारातील प्रोटीन्सचे पूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून युरिक ॲसिड तयार होत असते. युरिक ॲसिडमुळे गुडघा, घोटा व पायाचे सांधे हे प्रामुख्याने बाधित होतात. साधारणपणे गाऊट हा प्रकार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळला जातो.

Rheumatoid Arthritis : या प्रकारच्या संधिवातामध्ये आपल्या रक्तातले काही घटक आपल्या सांध्याविरुद्ध काम करत असतात. याला Autoimmune Disorder असे संबोधले जाते. हा प्रकार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. उतारवयामध्ये बघायला मिळणारा हा आजार कधी कधी तरुण लोकांमध्येसुद्धा आढळून येतो. यामध्ये सकाळी उठल्यानंतर सांधे आखडलेले असतात.त्याच्या सर्व हालचाली वेदनादायक असतात. या प्रकारच्या संधिवातामध्ये गुडघे, खुबे, खांदे, कोपर व हाताचे सांधे हे जास्त प्रमाणात बाधित झालेले दिसून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय व उपचार : संधिवात कुठल्या प्रकारचा आहे याचे एकदा योग्य निदान झाल्यानंतर त्याचे पुढचे उपाय ठरविता येतात. बहुतांश संधिवाताच्या रुग्णांमध्ये सुरवातीच्या स्टेजमध्ये नियमित व्यायामाद्वारे त्यावर नियंत्रण आणता येते. काही प्रकारच्या संधिवातामध्ये खाण्याची पथ्ये पाळावी लागतात. जेणेकरून सांध्यांना वारंवार येणारी सूज व वेदना टाळता येतात. सांध्याला इजा झालेली असल्यास (कुर्चा, लिगामेंटला मार लागलेला असल्यास) त्याला दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून पूर्ववत करता येते. सांधा जास्त प्रमाणात झिजला असल्यास त्यावर Parital किंवा Total joint Replecement शस्त्रक्रियेद्वारे उपाय करता येतात. यामध्ये रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ३ ते ४ दिवसात घरी जाता येते. या ऑपरेशननंतर सांध्यांच्या हालचाली अतिशय सहजरीत्या होऊन पूर्ववत सर्व कामकाज करता येते.

हाडांचे व सांध्यांचे विकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार याला पर्याय नाही. आपल्याला कुठल्याही सांध्यांचा आजार असल्यास त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधून वेळेत उपचार घेता येतात.

संबंधित बातम्या