मौसम है आशकाना... 

अंजोर पंचवाडकर 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

पावसाचे नाते खाण्याइतकेच गाण्याशीही जुळलेले असते नाही? मनाला हर्षोत्फुल्ल करणाऱ्या पावसाच्या कौतुकाची किती गाणी न्‌ कविता! आता आम्ही कवी नसल्याने, ‘हल्की बौछारे’, ‘भारी वर्षा’, ‘छुटपुट बरसात’, ‘घने बादल’... असे काहीही वातावरणीय बदल झाले तरी त्यानुरूप गाणी मनात रुंजी घालू लागतात. माझ्या लहानपणी आकाशवाणी मुंबईच्या ‘आपली आवड’मध्ये ‘आला पाऊस मातीच्या वास्सात गं’, ‘घन घनमाला नभी दाटल्या’, ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ आणि ‘ए आई मला पावसात जाऊदे’ या गाण्यांची हजेरी लागल्याशिवाय पावसाला ‘एनओसी’ मिळत नसे म्हणे. तसेच, विविध भारतीच्या ‘मधुमालती’मधे तर ‘नाचे मन मोरा’, ‘घिर घिरके आसमां पर’, ‘ओ सजना’ आणि ‘रिमझिम गिरे सावन’ ही चार गाणी आलटून पालटून दोन महिने रोज लावली जायची. त्यामुळे पाऊस आणि या चार गाण्यांचे अद्वैत डोक्‍यात पक्के बसले आहे. त्यावेळच्या आपल्या दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीवर लागणारे सुरेश वाडकर-हेमलता यांचे ‘सोनाऽऽऽ करे झिलमिल झिलमिल... ब्रिष्टी पड़े टापुर टुपुर’ हे सर्वांगसुंदर गाणे पावसाच्या आठवणीत दडले आहे. 

हिंदी सिनेसंगीतात ‘बारिश के नग़मे’ची मोठी रेंज आणि रेलचेल आहे. १९४४ मध्ये आलेल्या ‘रतन’मध्ये जोहराबाईने ‘रुमझुम बरसे बादरवा, मस्त घटाए छायी, पिया घर आजा’ अशी जी सुरेल साद घातली ती अगदी ऐश्‍वर्याच्या ‘बरसो रे मेघा मेघा’पर्यंत! सिनेमातला रोमान्स पावसाच्या साक्षीने किती खुलतो ना? अगदी राज-नर्गीसचे एका छत्रीतले ‘प्यार हुआ इकरार हुआ’, मधुबालाचे ‘एक लडकी भिगी भागीसी’, श्रीदेवीचे ‘काटे नहीं कटती’, सोनालीचे ‘सावन बरसे दिल तरसे’, रविनाचे ‘टीप टीप बरसा पानी’ आणि ज्या गाण्याने स्मिताला आर्ट फिल्ममधून अगदी व्यावसायिक सिनेमाने आपलेसे केले ते ‘आज रपट जाए तो..’ साध्यासुध्या सोज्ज्वळ नट्या पावसाच्या संगतीत कशा मादक दिसू लागतात. 

कोसळणारा पाऊस मनातल्या दडलेल्या भावना वर आणत असावा का? ‘ओ सजना बरखा बहार आयी’ म्हणून डोळ्यांत प्रेम जागवणारा पाऊस ‘पानी पानी रे खारे पानी रे’ नींदें खाली कर जा म्हणतो. ‘काली घटा छाए’ हुरहूर आणि ‘जिंदगी भर नही भुलेगी वो बरसातकी रात’ पहिल्या प्रेमाची चाहूल, कुठे ‘ये रात भिगी भिगी’ प्रेमाची तृप्ती, तर कुठे ‘ती गेली तेव्हा रिमझिम’मधले शाश्‍वत दुःख. कधी एस. डी. बर्मन यांच्या गूढ आवाजातली ‘रामा मेघ दे पानी दे छाया दे रे अल्ला मेघ दे..’ची हेलावणारी आळवणी, तर कधी ‘लगी आज सावनकी’ असफल प्रेमाची आर्तता आणि ‘जलता है जिया मेरा भिगी भिगी रातोमे’मधले ‘आजा, अब तो रहा नहीं जाए रे,’ असे आव्हान! 

प्रत्येकाचे ‘आपले’ असे एक खास पावसाचे गाणे असते. त्या गाण्यातून कुणाच्या तरी हळुवार आठवणी, मोरपिसे क्षण घेऊन येतात. म्हणून या ऋतूला मॉन्सून किंवा पावसाळा असे गद्यात्मक नाव देण्यापेक्षा ‘आशकाना मौसम’ म्हणावेसे वाटते. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे असे एक पावसाचे गाणे आहे.. लताने गायलेले ‘रिमझिम गिरे सावन...’ हे गाणे बघताना लक्षात येते, की अमिताभ-मौशुमीच्या बरोबरीने तिसरी एक कलाकार यात आहे ज्यावर समस्त मुंबईकर आपला जीव ओवाळून टाकतात; ती म्हणजे ‘पाऊस-वेडी मरिन ड्राईव्ह’ची मदहोश ओलेती मुंबई! हे गाणे म्हणजे अक्षरशः कान आणि डोळ्यांना मेजवानी आहे. आपल्यातल्या अनेकांच्या आठवणीत लुप्त झालेले मरिन ड्राइव्हवरचे हळुवार ओले क्षण वर येतात. ‘तुम जो मिल गए हो’मधेही अशीच भिजलेल्या रात्रीतून वायपर लावून फिरणाऱ्या टॅक्‍सीतून ओलेत्या मुंबईची झलक दिसते. पावसाच्या साक्षीने केलेल्या शहरी प्रेमाची धुंदी जागवतात ही गाणी. 

मराठी मनाला भावणारी पावसाची गाणी सांगायची झाली, तर शाळेत ओळख झालेल्या ‘नाच रे मोरा’पासून ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘वासाचा पयला पाऊस आयला’, ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’, ‘पाऊस कधीचा पडतो’, ‘पाऊस पहिला जणू सानुला’, ‘आला आला वारा’, ‘रिमझिम झरती श्रावण धारा’, ‘नभ मेघानी आक्रमिले’, ‘सरीवर सर’, ‘पाऊस असा रुणझुणता’ ते अगदी पावसाला साक्षी ठेवून सौमित्रने विचारलेला ‘बघ माझी आठवण येते का’ हा चिरंतन प्रश्‍न; किती वैविध्य आहे पाहा! 

पावसाला त्याचा एक नाद, आवाज असतो. तसाच नाद ‘पाऊस-गाण्यां’नासुद्धा असतो ना? काव्यामध्ये, जेव्हा शब्दांच्या नादामधून अर्थाचा आभास होईल अशी रचना केली जाते त्या अलंकाराला, Onomatopoeia म्हणजेच अर्थानुकरण अलंकार म्हणतात. आता पावसाच्या गाण्यांत याची उदाहरणे बघा किती आहेत... ‘रिमझिम पाऊस’, ‘टप टप पानात’, ‘झिर झिर बदरवा’, ‘टापुर टुपुर’, ‘धिन तक तक मनके मोर’, ‘घनन घनन घन घिर आये बदरा’, ‘मेहा झर झर, उमड़ घुमड़ कर आयी रे घटा’, ‘रुमझुम रुमझुम नाचे मनका मोर’, ‘ओ सावन राजा कहाँसे आये तुम चक दुम दूम चक दुम दूम’, ‘घिर घिरके आसमां पर’, ‘घनघन माला’... ताल-नाद-शब्दांची पर्वणीच ही तर! 

शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातसुद्धा ‘मल्हारी’ पावसाला अग्रस्थान आहेच. पंडित भीमसेनजींचा सूर मल्हार आणि संजीव अभ्यंकरांचा मेघ ऐकताना अंतर्बाह्य भिजायला होते. शुभा मुद्‌गल यांचे ‘अबके सावन ऐसे बरसे’ हे बऱ्याच जणांचे लाडके गाणे आहे. पूर्वी म्हणे संगीत सम्राट तानसेन मेघमल्हार राग आळवून पाऊस पाडत असत. आमचे भीमसेन जेव्हा ‘बादरवा गरजत आये’ आळवतात तेव्हा हाच पाऊस आमच्या हृदयात बरसू लागतो. 

आता माझी काही खास आवडती गाणी.. पहिले - वीणाताई सहस्रबुद्धे यांचे मीरा भजन - ‘बादल आयो रे..’ त्यातले ‘दादुर मोर पपिहा बोले रे, कोयल सबद सुनायो रे/कारी अंधियारी बिजुरी चमके’ ही विरहिणी मीरेची आवडती रूपके वीणाताई काय नजाकतीने आपल्यासमोर पेश करतात. ‘बिजुरी चमके’वर घेतलेल्या हरकती नुसत्या चमकदार नाहीत, त्यात विरही भावही स्पष्ट उठून दिसतो. दुसरे - ‘दृष्टी’ चित्रपटातल्या किशोरीबाईंच्या ‘मेहा झर झर बरसो रे’ने असेच माझ्या मनावर गारुड केले आहे. काय क्‍लास आहे त्या गाण्याचा! ‘मन आनंद तन आनंद आनंद आनंद उमगत रे’ या एका ओळीत आख्खे पाऊस माहात्म्य सांगून होते. शास्त्रीय गायकी जेव्हा अर्थवाही होते तेव्हा ती स्वरांबरोबर भावातही गुंतवते ते असे. ‘बरसे बुंदिया सावन की’ आणि ‘निसदिन बरसत नैन हमारे’ लताबाई-हृदयनाथ यांची ही दोन नितांत सुंदर गाणी कशी विसरून चालतील? 

नन्हे नन्हे बूंदन मेघा बरसे। 
शीतल पवन सुहावन की।।
मीरा के प्रभु गिरिधर नागर।
आनंद मंगल गावन की ।। 

सावन आणि हरी दोघांच्या येण्याने सुखावलेली मीरा ‘बरसे बुंदिया’मध्ये भेटते, तर ‘सदा रहत पावस ऋतु (डोळ्यातील श्रावण) हमपर जबसे शाम सिधारे। अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।’ अशी विरहिणीची व्यथा सूरदास ‘निसदिन बरसत’मध्ये सांगतात. (सैगलने गायलेले ‘भक्त सूरदास’ चित्रपटातले गीतही छान आहे.) 

.. आणि रफीसाहेबांचे ‘मेरी सुरत तेरी आंखे’मधले एसडी-शैलेंद्र या सदाबहार जोडीचे ‘नाचे मन मोरा मगन तिक ता धिगी धिगी’ हे माझं all time favorite गाणे आहे. पावसाचे आणि शास्त्रीय गाणे असूनही एखादा ‘मल्हार’ न घेता ‘एसडीं’नी याची रचना भैरवी रागात केली आहे. पं. समता प्रसादांचा तबलाही कसला बोलतो! आणि रफीसाहेबांनी ‘बदरा घिर आए’ म्हणून एकदा सांगितले, की भर उन्हाळ्यातसुद्धा सरी बरसल्यासारखे वाटते. 

बाकी अजून बरेच उल्लेख राहिलेत. खरे तर पाऊस-गाण्यांवर निबंधच काय प्रबंधही लिहिता येईल. तुमची प्रत्येकाची आपापली पाऊस गाण्यांची लिस्ट असेलच की! काढा ती मनाच्या कप्प्यातून बाहेर आणि घ्या आस्वाद वाफाळत्या चहा/कॉफीबरोबर! 

बाहेर दाटून आलेला अंधार, कोसळणारा पाऊस, गरजणारे ढग, तुमच्यापाशी निश्‍चिंत आणि भरपूर वेळ, हातात वाफाळती कॉफी आणि घरभर पसरलेले तुमच्या आवडत्या गाण्याचे सूर... स्वर्गसुख म्हणतात ते आणि काय वेगळे असते?  

फोटो फीचर

संबंधित बातम्या