द्राक्षबागेतील एमू!  (एक रुपककथा!) 

ब्रिटिश नंदी 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

कव्हरस्टोरी

नाशिकजवळच्या एका फार्ममधील ही घटना आहे. नाशिकचा फार्म म्हटला, की तो भुजबळ फार्मच असला पाहिजे असे काही नाही. तिथे इतर अनेक द्राक्षबागा आहेत. तसलाच हा एक फार्म. त्या द्राक्षबागेत शेळीपालन, कोंबडीपालन व अंडीउबवणी केंद्र, गुरांचा गोठा अशी स्थावर मालमत्ताही होती. या फार्मवर गुण्यागोविंदाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये काही घोडे, बैल, गायी, गाढवे, डुकरे, शेळ्या, कोंबड्या, उंदीर, घुशी असे अठरापगड प्राणी असत. फार्ममालकाचे दोन सशक्‍त राखणदार कुत्रेही होते. काही प्राणी येऊन जाऊन असत. उदाहरणार्थ, लगतच्या डोंगरावरून मोर-बीर येत आणि नाचूनबिचून जात. इतर काही बोलघेवडे पक्षीबिक्षी येत, गाऊनबिऊन जात. हे झाले येणारे! एखाद्या सणावारी किंवा गटारी अमावस्येच्या दिवशी एखादी कोंबडी वा बोकड ‘जात’ही असे. एकंदरीत फार्म बरा चालला होता. कारण फार्ममालक लोकशाही तत्त्वावर फार्म चालवत असे. त्याची पंचतत्त्वे अशी - 
१.     सर्वप्राणीसमभाव हेच चिरंतन तत्त्व असून प्राणी एकजुटीचा आदर केला जाईल. 
२.     चार पायांचे आणि दोन पायांचे असा भेदभाव शिक्षेस पात्र असेल. 
३.     सर्व प्राण्यांनी एकमताने व सहमतीने व चर्चेने प्रश्‍न सोडवावेत. 
४.     सर्व प्राण्यांस भुकेचा अधिकार आहे. 
५.     फार्मवर हिंसाचारास थारा नाही. 

असे का? असे तुम्ही अर्थातच विचाराल. तर त्याचे उत्तर असे - फार्ममालकाने जॉर्ज ऑर्वेल नामक एका ब्रिटिश लेखकाची ‘ॲनिमल फार्म’ नावाची (बरीच बरी) कादंबरी वाचली होती व तो भारावला होता. 

परंतु, असे सारे दृष्ट लागण्यासारखे चाललेले असतानाच एक दिवस फार्ममालकाला अवदसा आठवली! त्याने एक एमू पक्षी फार्मवर आणून ठेवला. एमू पक्ष्याचे एक अंडे पन्नास रुपयाला विकले जाते व एका एमू अंड्याच्या आमलेटात तीन पैलवान गारद होऊ शकतात, अशी लोणकढी त्याला कुणीतरी मारल्याने फार्ममालकाला हाव सुटली. एमू पक्ष्याला फारसा मेंटेनन्सही नसतो, वाट्‌टेल ते खाऊन तो बेमुर्वतपणे जगतो, असेही त्याने कुठे तरी ऐकले. आता तुम्ही ‘एमू हा कुठल्या जातीचा पक्षी?’ असे विचाराल! (वाटलेच होते...) तर एमू हा एक शहामृगासारखा दिसणारा, पण शहामृग नसणारा असा एक पक्षी असून त्याला दोन पाय असतात व त्याला उडता येत नसल्याने त्याची अवस्था कायम अतिवाईट असते. धड ना पक्षी, धड ना गाढव असला प्रकार! असे असले तरी तो एक अत्यंत मस्तवाल असा पक्षी आहे. त्याच्या जवळ गेले तरी तो डोळा मोठ्‌ठा करून चोच मारतो. 

या अगडबंब पक्ष्याला नांगराला जुंपून पाहावे म्हणून फार्ममालकाने प्रयत्न करून पाहिला, पण त्याच दिवशी एमूने त्याला असा काही लाथलला, की त्याला नाशिकच्या सरकारी इस्पितळात पलाष्टर घालून पडावे लागले. थोडक्‍यात हा पक्षी काही कामाचा नाही, उलटपक्षी हे एक लोढणेच आहे, एवढे फार्ममालकाच्या लौकरच लक्षात आले. परंतु, तोवर उशीर होऊन एमूचा आकार पाच फूट पाच इंच झाला होता. पुढील शोकांतिका सांगण्यात हशील नाही. फार्ममालक तूर्त परागंदा असून एमू पक्ष्याने त्याच्या फार्महाऊसमध्ये बस्तान बसवले आहे, येवढे सांगितले तरी पुरे. 

फार्ममालक गायब झाल्यानंतर एमूने फार्मचा कब्जा करून कारभार हाकण्यास सुरवात केली. आपणांस यापुढे एमू अधिकारी म्हणावे, असा फतवा त्याने काढला. (खुलासा ः हेमु अधिकारी नव्हे, एमू अधिकारी!) फार्मप्रजेने मान तुकवली. ‘प्राणी एकजुटीतच जादू आहे’ असा सुविचार एमू अधिकाऱ्याने मोठ्या फलकावर लावून तो दर्शनीभागात टांगला. 

‘एमू अधिकारी तर एमू अधिकारी... आपल्याला काय?’ असे फार्मवरील एक गाढव म्हणाले. एमुचा स्वभाव भयंकर कडक असून तो फार न्यायप्रिय असल्याची वावडी काही चहाटळ कबुतरांनी उठवली. फार्मला शिस्त-बिस्त लावून बर्कतीला आणून तो फार्ममालकास परत करील, अशी अट एमुसाहेबांना घालण्यात आली असून त्यांची नियुक्‍तीच चौकीदार म्हणून करण्यात आल्याची माहिती एका चोंबड्या कोंबड्याने दिली. सदर चौकीदार प्राण्यांचे भले करील, असे सारे म्हणत होते. असे ते का म्हणत होते, त्याचा तपशील उपलब्ध नाही! उगीचच म्हणत असावेत, असा तज्ज्ञांचा कयास आहे. 

‘असेल बुवा चौकीदार... आपण काय ओझ्याची गाढवे. इथून हिर्रर्र केले की तिथे जाऊन उभे राहायचे..!’ हे त्याच गाढवाचे भाष्य पुढे कमालीचे बोलके ठरले. काही का असेना, चौकीदार ऊर्फ एमू अधिकाऱ्याने सुरवात तर दणक्‍यात केली. सर्वप्रथम सूक्ष्म निरीक्षण करून त्याने असे शोधून काढले, की शेतात उंदीर फार झाले असून कोठारातील धान्यधुन्य सफाईने उचलून बिळात नेत आहेत. उंदरांच्या बिळात धूर सोडून त्यांना घुसमटवून मारावे, असा सल्ला एमू अधिकाऱ्यास एका पाहुण्या मोराने दिला. पण उंदीर वस्ताद होते. त्यांनी आपल्या बिळाची दुसरी तोंडे शेजारच्या सर्व्हे नंबरात उघडी ठेवली होती, त्यामुळे ते सुखात निघून गेले!! कुणी म्हणाले की एमू चौकीदारानेच बाजूच्या ‘सातबाऱ्या’च्या मालकांशी संधान बांधून उंदरांना पळून जाण्यास मदत केली. 

त्यानंतर एमू अधिकाऱ्याने सरळ नवे फर्मान जारी केले. त्यात म्हटले होते, ‘फार्मवासीय मित्रांनो, उंदरांची धन करण्यासाठी आपण धान्य पिकवतो का? नाही! दरवडेखोर कोल्ह्यांसाठी द्राक्षबाग फुलवतो का? नाही. कावळ्यांनी टोचा माराव्यात म्हणून आपण अंडी देतो का? नाही! (इथे घोड्यांनी बैलांकडे चमकून पाहिले! असो.) तेव्हा यापुढे आपण अन्नधान्य पिकवणेच बंद करून टाकू व येथे काचसामानाचा कारखाना टाकू. उंदीर काचा खात नसल्याने उपाशी मरतील! तेव्हा कामाला लागा!’ 

‘आपण आता काचा खाऊन जगायचे का?’ असे फार्मवरील लडिवाळ शिंगराने आपल्या घोडबापाला विचारले. पण त्याच्याकडे उत्तर नव्हते. घोडआईने आपल्या नशिबाला दूषणे दिली. 

‘कुठून तुमचे ऐकून या नर्कात येऊन पडले...,’ ती शिंगराच्या बापाला म्हणाली. 

‘मी कुठे काय म्हणालो?’ घोडा कुरकुरला. 

‘तुम्हीच म्हणाला होतात, तेरे नाल लव्ह हो गया म्हणून...हुंः!!,’ घोडीने मानेला झटका देत म्हटले. घोड्याने सुस्कारा सोडला. 

तेवढ्यात चौकीदाराचे दुसरे फर्मान आले की कोंबड्यांनी अंडी देणे थांबवावे, अन्यथा कारवाई केली जाईल. संपूर्ण फार्म हा शाकाहारी म्हणून घोषित करण्यात येत असून एकही प्राणी सामिष खाताना आढळला तर त्याची सागुती करणेत येईल!!’ 

‘सागुती केली तर ती खाणार कोण?’ असे एक बोकड शेळीला म्हणाला. ‘कर्म माझं’ असे म्हणत तिनेही शिंगाला हात लावला. 

आणखी एका फर्मानाने फार्मजनांची बोबडीच वळली. वाट्टेल तेथे उत्सर्जन केल्यास दंडात्मक कारवाई होईल. प्रत्येक प्राण्याने नेमून दिलेल्या ठिकाणीच विधी उरकावेत, असा फतवा निघाला. फार्मवर हाहाकार उडाला. आता काय करायचे? याला मुस्कटदाबी म्हणायचे की... आणखी काही? अखेर प्राण्यांनी शिष्टमंडळ नेऊन एमू अधिकाऱ्याकडे दाद मागायचे ठरवले. प्राण्यांचे शिष्टमंडळ तसे गेलेही, पण एमुने मोठ्ठा डोळा करून त्यांच्याकडे एकदा पाहिले मात्र, सारे जण चुपचाप काही न बोलता तबेल्या-गोठ्यात परतले. 

एमू अधिकाऱ्याने रातोरात फार्मची पंचतत्त्वे बदलली. ती अशी ः 

१. यापुढे चौकीदार सोडून इतर कुणीही ‘व्हेरी इंपॉर्टंट प्राणी’ (व्हीआयपी) असणार नाही. 

२. एमू हे मानवाप्रमाणे दोन पायाचे असल्याने त्यांस बुद्धिमान समजण्यात यावे. 

३. एमुचा शब्द अखेरचा मानावा. 

४. प्रत्येक प्राण्याला भुकेचा अधिकार असला तरी अन्नाचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे. 

५. फार्मवर (काही प्रसंग सोडल्यास) हिंसाचारास थारा नाही. 

दमनाचे काटेरी चक्र फिरू लागले की भूमी उखणली जाऊन त्यातूनच क्रांतीची बीजे अंकुरतात, असे एक सुभाषित आहे. तसेच घडले. एमू अधिकाऱ्याच्या एकाधिकारशाहीविरुद्ध बंड पुकारावे लागेल, अशी कुजबूज फार्मवरील प्राण्यांत सुरू झाली. अखेर एक दिवस घोड्यांच्या तबेल्यात क्रांतिकारक प्राण्यांची मीटिंग भरली. या मीटिंगसाठी वेषांतर करून बंडखोर प्राणी धडकले. उदाहरणार्थ, डुकराने बैलाचे सोंग घेतले होते, तर खुद्द बैलाने घोड्याचा आव आणला होता. बोकडशेळ्यांनी कुत्र्यांचे अवसान आणले होते, तर कोंबड्यांनी आपण मोराची पिल्ले आहोत, असा दावा केला. 

‘मेरे प्यारे मित्रहो, या फार्मदेशात लोकशाही नावाची काही गोष्ट आहे की नाही?’ नुकतेच वयात आलेले शिंगरू तावातावाने म्हणाले. सर्व प्राणी सावरून बसले. हे शिंगरू परागंदा फार्ममालकाचे लाडके होते. त्यामुळे क्रांतीची मशाल आपल्याच हातात आहे, हे त्याने गृहीत धरले होते. शिंगरू पुढे म्हणाले, ‘फार्मवासीयांनो, आपण सारे कष्टकरी बांधव आहोत...’ 

‘तू कुठला कष्टकरी लेका, उगाच काईबी बोलू नुको! व्हट पिळलं तर दूध निंगल अजूनबी!’ गाढवाला कुठे व काय बोलावे हे कळले तर ते गाढव कसले? तरीही शिंगरू गप्प राहिले. 

‘...दिवसभर शेतात, मळ्यात, बागेत राबावे... दोन वेळा हक्‍काने जेवावे, हा आपला जन्मसिद्ध हक्‍क आहे, पण तो सध्या हिरावून घेतला जात आहे. एमू अधिकाऱ्याची अन्याय्य राजवट उलथून टाकण्यावाचून आपल्यासमोर काहीही इलाज नाही. खरेखुरे अच्छे दिन आणायचे असतील, तर आधी एमू अधिकारी जायला हवा. ते सहज शक्‍य आहे... मात्र त्यासाठी आपल्याला एकी दाखवावी लागेल...’ शिंगरू म्हणाले. 

‘असं सगळ्यांसंबुर एकी दाखवनं बरं दिसनार न्हाई, दादा!,’ एका डुकराने शंका मांडली. डुक्‍करच ते, त्याला काय माहिती एकीचा अर्थ? 

‘वैरणीऐवजी काचा खाण्याचे दिवस आले... असे किती काळ जगणार?’ शिंगरू खवळले होते. 

‘परिस्थितीचा काच बाबाऽऽ... काय सांगावं?’ एक दाढीधारी बोकड हताशपणे म्हणाला. बोकड लोकांना एकंदरीत जीवनासक्‍ती कमीच असते. जन्मापासूनच आपण पिकले पान आहो, अशा समजुतीत वाढणारी ही जमात! जाऊ दे झाले!! 

...अखेर हो-ना करता करता क्रांतीची मशाल पेटवून यापुढे फार्महाऊसमधून नव्हे तर घोड्याच्या तबेल्यातून फार्मचा कारभार हाकला जाईल, असे ठरले. ‘प्राणी एकजुटीचा विजय असो!’, ‘एमुराज मुर्दाबाद’, ‘फार्म फार्म पे शोर है, एमू अधिकारी चोर है...’ अशा घोषणा दिल्या गेल्या. त्या ऐकून फार्मचे राखणदार कुत्रे धावत आले. त्यांनी रीतसर पंचनामा करून सर्व प्राण्यांना ताब्यात घेतले आणि एमू अधिकाऱ्यापुढे उभे केले. 

‘साहेब, या लोकांनी राष्ट्रद्रोह केला आहे. सत्ता उलथवण्याचा कट या प्राण्यांनी रचला आहे...’ एक बलदंड कुत्रा म्हणाला. 

‘काय पायजे तुम्हाला मित्रांनो?’ एमू अधिकाऱ्याने प्रेमाने क्रांतिकारकांच्या खांद्यावर थेट आपला बिनकामाचा पंख टाकला! सगळे गारदच झाले. 

‘आपल्या शतप्रतिशत लोकशाहीवादी कारकिर्दीत सर्वांना काम मिळणार असून सर्वांचे पोट भरणार आहे. इतकेच नव्हे, तर शेजारच्या सर्व्हे नंबरातली द्राक्षबागही आपण ताब्यात घेत आहोत. आपल्याला आणखी प्रशस्त जागा मिळेल... सारे काही छान आहे की!’ असे एमू अधिकारी ठामपणाने म्हणाला. 

‘या शुद्ध थापा आहेत, थापा! गादी खाली करा...!!’ शिंगरू भडकले. 

‘असं? तुम्ही असं करा की तुमच्यात मतदान घ्या. कुणाला फार्मवर राहायचे आहे त्याने राहावं आणि ज्याला आवडत नाही त्याने दुसरीकडे निघून जावे..! मी पायउतार व्हायलाही तयार आहे, पण तसे तुम्ही एकत्र येऊन सांगायला हवे! म्हटले ना, प्राणी एकजुटीतच सारी जादू आहे...’ एमू अधिकारी मखलाशीने म्हणाला. 

पुढे काय झाले? काहीच झाले नाही! ‘एमुपेक्षा शिंगरू बरे,’ असे म्हणणाऱ्यांची संख्या सध्यातरी कमीच आहे. ‘शिंगरापेक्षा एमूच बरा’ असेही काही प्राणी म्हणू लागले आहेत. ‘एमू नको, शिंगरूही नको, मी काय वाईट आहे?’ असे बाकीचे प्राणी एकमेकांना विचारू लागले आहेत! इतकेच नव्हे, तर गाढवानेही ‘माझ्या नावाचा विचार व्हायला हरकत नाही’ असा प्रचार सुरू केला असून कुत्र्यांची मजा चालली आहे. त्यांना एमू अधिकाऱ्याकडून खायला मिळतेच, शिवाय बाकीचे प्राणीही आपला वाटा थोडासा काढून देतात. सगळीकडून राखणदाराचे फावते ते असे! 

फार्मवर एमू अधिकाऱ्याचे राज्य अजूनही चालू आहे. एमू अधिकारी रोज योगासने करून प्राण्यांना उपाशीपोटी बरे वाटते, असे सांगत फिरत असतो. 

‘साहेब, आपन म्हंता एकीत जादू असती... एक दिस गुल हुईल ना तुमची खुर्ची!’ कुठेही बडबडणारे गाढव एक दिवस एमू अधिकाऱ्यालाच म्हणाले. त्यावर एमू अधिकारी गालातल्या गालात हसत जे म्हणाला, ते लोकशाहीतले पहिले सत्य मानावे लागेल. एमू अधिकारी डोळा मोठ्ठा करून म्हणाला, ‘एकजुटीत जादू आहे हे खरे, पण ती जादू कुणाला यायला तर पाहिजे ना?’ 

तात्पर्य ः आजकाल एमू लोकसुद्धा जॉर्ज ऑर्वेलची बरीच बरी कादंबरी जी की ‘ॲनिमल फार्म’ वाचून मगच कारभार हाती घेतात!

संबंधित बातम्या