हुर्रेऽऽ..ऽऽ...

किशोर पेटकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी
ऑस्ट्रेलियात ११ कसोटी मालिका खेळूनही भारताला मालिका विजय मिळवता आला नव्हता, मात्र विराटसेनेने २-१ फरकाने ऑस्ट्रेलिया संघास पराभूत करून नवा इतिहास रचला. भारताच्या विजयात कोणाची होती महत्त्वपूर्ण भूमिका? ऑस्ट्रेलियन संघाची रणनीती का फसली? याविषयी... 
 

तब्बल ७१ वर्षांपूर्वी, लाला अमरनाथच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका खेळण्यास गेला होता. २८ नोव्हेंबर १९४७ रोजी ब्रिस्बेनच्या मैदानावर मालिकेतील पहिली नाणेफेक झाली. डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखालील बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटीत चारीमुंड्या चीत केले. ब्रॅडमनच्या १८५ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३८२ धावा केल्यानंतर, भारताचा पहिला डाव ५८, तर दुसरा डाव ९८ धावांत आटोपला. पाच सामन्यांची ती मालिका भारतीय संघाने ४-० फरकाने गमावली. आता ७ जानेवारी २०१९ रोजी त्याच ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकण्याचा अभिमानास्पद पराक्रम बजावला. सिडनी कसोटीत शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही, पण पहिल्या डावात सहाशे धावांचा डोंगर रचून ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की लादलेल्या ‘टीम इंडिया’चा तो नैतिक विजयच मानला पाहिजे. सिडनीत तीन दिवस काळ्या ढगांची दाटी होती, पाऊस आला, त्यामुळे मालिका ३-१ फरकाने जिंकणे शक्‍य झाले नाही, मात्र मेलबर्नची कसोटी १३७ धावांनी जिंकून भारताने अगोदरच २-१ अशा आघाडीसह बॉर्डर-गावसकर करंडकावर कब्जा केला होता. ‘विराटसेने’चे हे यश अभूतपूर्व आहे.
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कांगारूंच्या भूमीवर भारताने आव्हान उभे करण्यासाठी धडपड केली, पण प्रत्येकवेळेस प्रयत्न तोकडेच पडले. बाराव्या वेळेस विराट कोहलीच्या जिगरबाज संघाने कसोटी मालिकेत विजय पताका दणक्‍यात फडकाविली. विराट आणि संघासाठी हे यश अविस्मरणीय आहे.२०१४-१५ मधील मालिकेत सिडनीमध्ये विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व आले होते. महेंद्रसिंह धोनीने तडकाफडफी कर्णधारपद त्यागल्यानंतर विराटने सूत्रे स्वीकारली. त्यानंतरचा कसोटी कर्णधार या नात्याने विराटचा प्रवास स्पृहणीय आहे. त्याला या वाटचालीत रवी शास्त्रीसारखा ‘चाणक्‍य’ ही सोबतीस मिळाला. मैदानावर यशस्वीपणे लढण्याची अफलातून जिद्द, बॅटमधून ओतला जाणारा धावांचा रतीब, सहकाऱ्यांना 
प्रेरित करण्याची हातोटी यामुळे अल्पावधीत विराट कर्णधार या नात्याने यशस्वी ठरला 
आहे. कसोटी कर्णधार या नात्याने ४६ सामन्यांत त्याने २६ विजय मिळविले 
आहेत. 

अखेर मालिका यश
भारताचा क्रिकेट संघ १९४७-४८ पासून ‘डाऊन अंडर’ला जात आहे, पण एकदाही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. १९७७-७८ मध्ये केरी पॅकरच्या वादळामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ जर्जर झाला होता. तेव्हाही भारताला कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. १९८०-८१, १९८५-८६ व २००३-०४ मधील मालिका बरोबरीत राहिल्या होत्या. हे तीन अपवाद वगळता घरच्या मैदानावरील मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला भारी ठरला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आदी महान फलंदाज संघात असतानाही भारताला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकता आली नाही. यावरून कांगारूंच्या देशात यजमान गोलंदाज व फलंदाजांचे प्रभुत्त्व लक्षात येते. तेथील वेगवान खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांनी नेहमीच त्रेधातिरपिट उडाली. सिडनीतील खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे, असे मानले जाते. पण या ठिकाणी केवळ १९७७-७८ मध्येच भारताला कसोटी सामना जिंकता आला होता. बाकी पाच सामन्यांत पराभव स्वीकारावे लागले होते, तर पाच सामने अनिर्णित राहिले होते. यंदा मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स असे दर्जेदार वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात होते. नॅथन लायनची फिरकीही दंश करत होती. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी वरचष्मा राखताना मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजांनी धावांचे डोंगर उभारल्यामुळे गोलंदाजांनाही बळ प्राप्त झाले. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही डावात मिळून वीस गडी बाद करण्याचे सामर्थ्य गोलंदाजांना प्राप्त झाले. विजयश्री निसटू द्यायची नाही याच इराद्याने भारताने खेळ केला. ॲडलेड व मेलबर्नच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारी ठरले. संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांच्या बहारदार कामगिरीचा अपूर्व संगम पाहायला मिळाला आणि त्यामुळेच कांगारूंच्या भूमीत प्रथमच भारताला कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम बजावता आला. मेलबर्नला मध्यमगती जसप्रीत बुमराहच्या अनोख्या शैलीने कमाल केली. त्याने अवघ्या ३३ धावांत ६ गडी टिपले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या दीडशे धावांत उखडला, नंतर त्यांना सावरताच आले नाही. ही कसोटी जिंकून भारताने मालिकेत २-१ फरकाने आघाडी घेताना बॉर्डर-गावसकर करंडकही स्वतःपाशी राखला. भारतीय गोलंदाजी परदेशी भूमीवरही तीक्ष्ण ठरते आणि प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करते हे बुमराहने सिद्ध केले. २१ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे योगदानही अनन्यसाधारण ठरले. सिडनीत त्याने शतक केले, शिवाय यष्टीमागील त्याची कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी आश्‍वासक ठरली. पंतने चार कसोटींत ३५० धावा आणि  २० झेल पकडून महेंद्रसिंह धोनीचा योग्य वारस असल्याचे दाखवून दिले.

पुजाराचा संयम मौल्यवान
हल्लीच्या काळात संथ, संयमी फलंदाजी पाहून नाक मुरडले जाते. तरूण पिढीला आक्रमक, धडाकेबाज फलंदाज आवडतात. चेतेश्‍वर पुजाराची क्रिकेट संस्कृती वेगळीच. त्याच्या फलंदाजीचे चाहते तसेच कमीच, मात्र दर्दी क्रिकेटप्रेमी नेहमीच पुजाराच्या फलंदाजीचा आनंद लुटतात. कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकता हवीच, त्याचवेळी पुजारासारखे संयमी फलंदाजही मौल्यवान ठरतात. ऑस्ट्रेलियात पुजाराच्या दमदार फलंदाजीमुळेच भारताने मैदानावरील युद्ध जिंकले हे मान्य करावेच लागेल. चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळणारा हा सौराष्ट्राचा फलंदाज. त्याची ‘कासव गती’ फलंदाजी ऑस्ट्रेलियास भारी ठरली. तीस वर्षीय पुजारा एका टोकाला टिच्चून खेळला. त्यामुळे भारतीय फलंदाजीवर पूर्ण वर्चस्व राखणे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जमले नाही. ही बाब त्यांच्या दिग्गजांनीही मान्य केली. मेलबर्नच्या कसोटीत भारताने १३७ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. पुजाराने पहिल्या डावात नांगर टाकला. ३१९ चेंडूंत १०६ धावा केल्या. ही खेळी खूपच संथ, पण कमालीची एकाग्र होती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगलाही पुजाराचे अतिसंयमी धोरण आवडले नाही, मात्र अखेरीस हीच खेळी भारताच्या विजयात लाखमोलाची ठरली. मेलबर्नची खेळपट्टी फलंदाजीस त्रासदायक होती हे पुजाराचे म्हणणे सत्यच होते. भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांत आटोपला. भारताची दुसऱ्या डावातील घसरगुंडी लक्षात घेता, मेलबर्नला पहिल्या डावातील आघाडीच निर्णायक ठरली. त्यात पुजाराने शतकी खेळीत किल्ला लढविला, जो ‘गेमचेंजर’ ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत पुजाराने सात डावांत ७४.४२च्या सरासरीने सर्वाधिक ५२१ धावा केल्या. यात तीन शतके व एका अर्धशतकाचा समावेश राहिला. सात डावांत पुजाराने १२५८ चेंडूंचा सामना केला. यावरून त्याने फलंदाजीसाठी घेतलेली मेहनत लक्षात येतात. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी साफच कमजोर नव्हती. पुजाराने एका टोकावरून बचावात्मक खेळाचे सुरेख प्रदर्शन घडविले. तो धैर्याने गोलंदाजांना सामोरा गेला. ॲडलेडची पहिली कसोटी भारताने ३१ धावांनी जिंकली. त्यात पुजाराने अनुक्रमे शतक व अर्धशतक नोंदविले. पहिल्या डावात भारतीय संघ २५० धावांत गारद झाला, त्यात पुजाराच्या २४६ चेंडूंतील १२३ धावा होत्या. पर्थच्या कसोटीत तो दोन्ही डावांत लवकर बाद झाला. ही लढत भारताने १४६ धावांनी गमावली. नॅथन लायनचा फिरकीला तोंड देणे भारताला जमले नाही. कदाचित पुजाराने खिंड लढविली असती तर हा पराभव टळला असता, मात्र त्याची भरपाई त्याने मेलबर्नला आणि नंतर सिडनीस १९३ धावा करून केली. 

बुमराहचा भन्नाट मारा
भारताच्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजयात गोलंदाजांची कामगिरी उठावदार ठरली. यशात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सर्वाधिक श्रेय द्यावे लागेल. त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना डोईजड ठरली. मेलबर्न कसोटीत अहमदाबादच्या या २५ वर्षीय गोलंदाजाने अवघ्या ३३ धावांत ६ गडी टिपले. यजमानांचा डाव १५१ धावांत गारद झाला, त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिलेच नाही. कसोटी जिंकत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.  बुमराहचा कसोटी क्रिकेटमधील कार्यकाळ वर्षभराचा. गेल्यावर्षी ५ जानेवारीस त्याने केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये  पदार्पण केले, तेव्हापासून तो १० सामने खेळला असून बळींच्या अर्धशतकासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज आहे. मेलबर्नला सामन्यात ८६ धावांत ९ गडी बाद करणारा बुमराह सामन्याचा मानकरी ठरला. ‘बॉक्‍सिंग डे’ कसोटी त्याने संस्मरणीय ठरवताना भारताला मिळवून दिलेली मालिकेतील आघाडी निर्णायक ठरली. कारण, सिडनीतील पावसामुळे चौथ्या कसोटीचा निकाल लागला नाही, तरीही अगोदरच आघाडी मिळविल्यामुळे भारताला मालिकेत ऐतिहासिक यश मिळविता आले. पर्थमधील पराभवानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारली, त्यात बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा राहिला. चार सामन्यांच्या मालिकेत त्याने सरासरीने २१ गडी बाद केले. बुमराहची गोलंदाजी शैली अनोखी आहे. सुदैवाने एकाही प्रशिक्षकाने त्याची गोलंदाजी शैली बदलली नाही, बुमराहची हीच शैली आता भारतासाठी ‘मॅचविनिंग’ ठरत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे या गोलंदाजाने झटपट आणि कसोटी क्रिकेटमधील फरक ओळखला असून तो परिस्थितीनुरूप गोलंदाजी करतो. त्यामुळेच तो कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत भारताचा आधारस्तंभ बनला आहे. 

पर्थला गणित चुकले
ॲडलेडच्या कसोटीत बाजी मारल्यानंतर पर्थमधील कसोटीत भारताचे नियोजन चुकले आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली. खरं म्हणजे, भारताच्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियास मुसंडी मारता आली. पर्थच्या खेळपट्टीवरील गवत पाहून भारतीय संघाने ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि महंमद शमी असे चार वेगवान गोलंदाज खेळविले, पण हा प्रयोग फसला. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन दुखापतग्रस्त असल्यामुळे रवींद्र जडेजा खेळण्याची शक्‍यता होती. मात्र तोही खेळला नाही, तसेच कुलदीप यादवच्या फिरकीचाही भारतीय संघ व्यवस्थापनास विसर पडला. जडेजा पूर्ण तंदुरुस्त नव्हता त्यामुळेच त्याला पर्थ कसोटीत खेळविले नाही असा खुलासा नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले, पण कुलदीप का खेळविले नाही याचे उत्तर मिळाले नाही. पर्थच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने पहिल्या डावात पाच, तर दुसऱ्या डावात तीन गडी बाद करून संघाच्या विजयात प्रमुख वाटा उचलला. पर्थचं गवत पाहून भारतीय संघ व्यवस्थापन हुरळून गेले नसते, तर कदाचित भारताने मालिका ३-० फरकाने जिंकली असती.

अपयशाची भरपाई
वर्षभराच्या कालावधीत दोन वेळा परदेशी भूमीवर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विराटच्या नेतृत्वाखालील संघाला यशाने हुलकावणी दिली. दक्षिण आफ्रिकेत मालिका २-१ फरकाने गमवावी लागली.  त्यानंतर इंग्लंडमध्ये फलंदाजीने दगा दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ फरकाने हार स्वीकारावी लागली. हा निकाल कसोटीतील क्रमांक एक संघाच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. उपखंड आणि विंडीजवगळता परदेशी भूमीवर भारत कसोटी मालिका जिंकू शकत नाही या परंपरेस आता छेद गेला आहे. ‘विराटसेने’ने ऑस्ट्रेलियातील विजयी कामगिरीने भारतीय क्रिकेटचे बळ दाखवून दिलेले आहे. देशांतर्गत रणजी क्रिकेट स्पर्धेचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमधील अपयशाची भरपाई ऑस्ट्रेलियात केली. भारत कांगारूंच्या भूमीत कसोटी मालिका जिंकू शकत नाही ही परंपरा इतिहासजमा झालीय. विराट कोहलीच्या संघाचे देदीप्यमान यश भावी पिढीसाठी आदर्शवत आणि प्रेरक आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, १९८३च्या वर्ल्डकपपेक्षाही मोठे यश असल्याचे सांगत ‘विराटसेने’च्या पराक्रमाची महानता पटवून दिली. भारताच्या साऱ्याच दिग्गज खेळाडूंनी संघाला शाबासकी दिली आहे, मात्र काही ऑस्ट्रेलियन्स अपयश पचवू शकलेले नाहीत. ते म्हणतात, ‘आमच्या संघात डेव्हिड वॉर्नर व स्टीव स्मिथ हे प्रमुख फलंदाज नव्हते.’ टोमणेबाजीने प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करणाऱ्या बहुतांश ऑस्ट्रेलियन्सना पराभव झेपत नाही, ते नेहमीच संकुचित वृत्तीने वागतात. दक्षिण आफ्रिकेत संघ पिछाडीवर जातोय हे पाहून वॉर्नर व स्मिथ यांच्या प्रेरणेमुळे ‘बॉल टेंपरिंग’चे प्रकरण घडले. क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या या अखिलाडूवृत्तीमुळे त्यांच्यावर बंदीची योग्यच कारवाई झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉर्नर व स्मिथ असते, तर भारताचा मालिका विजय टळला असता का? या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अफाट गुणवत्ता आहे. हा संघ एका-दोघा खेळाडूंवर अवलंबून नाही. त्यामुळे दोघा खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुबळे मानता येणार नाही. भारतीयांनी खरोखरच श्रेष्ठ खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाला ‘विराटसेने’ चारीमुंड्या चीत करताना सर्व क्षेत्रात वर्चस्व राखले. त्यामुळेच भारताचा परिपूर्ण सांघिक खेळ ऑस्ट्रेलियास भारी ठरला. 

दृष्टिक्षेपात कसोटी मालिका...

 • पहिला सामना, ॲडलेड ः भारत ३१ धावांनी विजयी 
  भारत ः २५० व ३०७ धावा, ऑस्ट्रेलिया ः २३५ व २९१ धावा
 • दुसरा सामना, पर्थ ः ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
  ऑस्ट्रेलिया ः ३२६ व २४३ धावा, भारत ः २८३ व १४० धावा
 • तिसरा सामना, मेलबर्न ः भारत १३७ धावांनी विजयी
  भारत ः ७ बाद ४४३ घोषित व ८ बाद १०६ घोषित, ऑस्ट्रेलिया ः १५१ व २६१ धावा
 • चौथा सामना, सिडनी ः सामना अनिर्णित
  भारत ः ७ बाद ६२२ घोषित, ऑस्ट्रेलिया ः ३०० व फॉलोऑननंतर बिनबाद ६

संबंधित बातम्या