आगळेवेगळे पदार्थ

शेफ नीलेश लिमये 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, 
शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. यंदाच्या 
दिवाळी फराळासाठी नामवंत शेफ्सनी त्यांच्या काही खास पाककृती 
'सकाळ साप्ताहिक'च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि रुचकर पदार्थांच्या पाककृती दिवाळीची रंगत नक्कीच वाढवतील.

स्ट्रॉबेरी मलई बर्फी 
साहित्य : तीनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी, १०० ग्रॅम स्ट्रॉबेरी पल्प, १ लिटर म्हशीचे दूध, १ टी स्पून व्हिनेगर, २५० ग्रॅम साखर, २ टेबल स्पून तूप. 
कृती ः सर्वप्रथम स्ट्रॉबेरीजची देठे काढून घ्यावीत. १०-१२ स्ट्रॉबेरीज बाजूला काढून उरलेल्या स्ट्रॉबेरीज चिरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा. दुधाला उकळी येईपर्यंत तापवावे. थोडी साय जमू लागली, की त्यात व्हिनेगर घालावे आणि दूध फाडून घ्यावे. त्यातले पाणी वेगळे झालेले दिसले, की मलमलच्या कपड्यातून गाळून घ्यावे. मलमलच्या कपड्यातला दूध म्हणजे छेन्ना. ते गरम असेपर्यंत कुस्करून घ्यावे. त्यातला २ टेबल स्पून छेन्ना सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यावा. थोडे तूप एका ट्रेला लावून घ्यावे. एका पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घालाव्यात आणि थोडे परतून घ्यावे. त्यामध्ये छेन्ना मिक्‍स करावे आणि स्ट्रॉबेरी पल्प आणि साखरेचा पाक मिक्‍स करावा. हे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यावे. मिश्रण घट्ट होऊ लागेल. मिश्रणाचा गोळा होऊ लागला की समजावे बर्फी तयार आहे. लगेच मिश्रण एका ट्रेमध्ये ओतून घ्यावे. गरम असताना वड्या पाडाव्यात. त्यावर मिक्‍स्ड ड्राय फ्रूट्‌स घालावेत.

नारळाच्या दुधाची बासुंदी
साहित्य : दोन शहाळी मलई आणि पाणीयुक्त, अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क, १ वाटी नारळाचे दाट दूध, १ चमचा गुलाब पाणी/रोझ इसेन्स, अर्धी वाटी साखर, दाण्याची चिक्की चुरून घ्यावी. 
कृती ः शहाळ्यातले पाणी आणि मलई वेगळी करावी. मलई दाट असावी. मलईचे बारीक काप करावेत. नारळाचे दूध आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून मध्यम आचेवर उकळून घ्यावे. त्यात साखर घालून विरघळेपर्यंत ढवळत राहावे. हे दूध फ्रीजमध्ये थंड करावे. त्यात रोझ इसेन्स किंवा गुलाब पाणी घालावे आणि चव पाहावी. नारळाच्या चवीबरोबर गुलाबाचा सुगंध खूप छान येतो. सर्व्ह करताना त्यात मलई मिक्‍स करावी. दाण्याची चिक्कीही घालावी. बासुंदीऐवजी एकदा एल नीर पायसम सर्व्ह करून पाहा. नक्की पाहुणे खुश होतील. (रोझ सिरप किंवा आंब्याचा पल्पही घालू शकता.)

कॉर्न क्‍लब कबाब 
साहित्य : दोन वाट्या स्वीट कॉर्न/मक्‍याचे दाणे, २-३ लेमनग्रास/गवती चहाच्या पाती (देठापासून बारीक चिरून घ्याव्या), २-३ टी स्पून तीळ, १-२ ताज्या लाल मिरच्या, १ टी स्पून हळद, २ टी स्पून आल्याची पेस्ट, अर्धी वाटी ब्रेडक्रम्ब्स, थोडीशी कोथिंबीर, १ टेबल स्पून बटर, तेल तळण्याकरिता, मीठ - मिरपूड चवीनुसार. 
कृती ः बटरमध्ये स्वीट कॉर्न चांगले परतून घ्यावेत. त्यात आल्याची पेस्ट, लेमनग्रास, हळद, लाल मिरची घालून पुन्हा थोडा वेळ खमंग परतून घ्यावे. मीठ - मिरपूड घालून चव बघावी. एका बाऊलमध्ये ब्रेडक्रम्ब्स, कोथिंबीर, तीळ एकत्र करून ठेवावे. गार झालेल्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करावे आणि ब्रेडक्रम्बच्या मिश्रणात घोळून घ्यावे. दोन्ही हातांनी टिक्की करावी किंवा उसाच्या कांड्यांना लॉलिपॉप सारखे लावून घ्यावे. गोल्डन ब्राऊन क्रिस्पी तळून घ्यावे आणि चिली सॉस किंवा चिंचेच्या सॉसबरोबर सर्व्ह करावे. 

डाळिंबी मिसळ 
साहित्य : दोन वाट्या बिरडे भिजवून, सोलून वाफवून घ्यावे, ३ कांद्यांची पेस्ट, २ मोठे चमचे लसणाची पेस्ट, १ टी स्पून आल्याची पेस्ट, २ टी स्पून कांदा-लसूण मसाला, १ टी स्पून हळद, १ टी स्पून धणे-जिरे पूड, १ वाटी नारळाचे दूध, ३-४ आमसुले, ६-७ कढीपत्त्याची पाने, २ टी स्पून तेल, मीठ-मिरपूड चवीनुसार. 
टॉपिंगसाठी ः बारीक चिरलेला पातीचा कांदा, फ्राइड कांदा, फ्राइड लसूण, कोथिंबीर, भाजके शेंगदाणे, तळणीतली मिरची, तळलेल्या कुरडया. 
कृती ः एका कढईत तेल गरम करावे. त्यात कढीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालावी आणि परतून घ्यावे. आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परतून घ्यावे. त्यात धणे-जिरे पूड आणि कांदा-लसूण मसाला घालावा आणि थोडा वेळ परतून घ्यावे. मग त्यात बिरडे घालावे आणि थोडे पाणी घालून एक उकळी आणावी. त्यात आमसूले घालावीत. उसळ शिजल्यावर त्यामध्ये नारळाचे दूध मिक्‍स करावे आणि एक उकळी देऊन आच बंद करावी. 
सर्व्हिंगसाठी ः उसळ एका बाऊलमध्ये वाढावी. त्यावर तळलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, पातीचा कांदा, भाजलेले शेंगदाणे, तळणीतली मिरची टॉपिंग म्हणून घालावी आणि शेवटी कुरडया घालाव्यात.

ग्रीन टी हॉलिडे पंच 
साहित्य : १०-१२ ग्रीन टी बॅग्स, २ लिटर पाणी, २ दालचिनीच्या काड्या, ३-४ लवंगा, अर्धा इंच आले, अर्धा कप सफरचंदाचा ज्यूस, १ संत्रे, ७-८ पुदिना पाने. 
कृती ः ग्रीन टी बॅग्स एकत्र बांधून घ्याव्यात. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. त्यात एकत्र बांधलेल्या टी बॅग्स घालाव्यात. दालचिनीच्या काड्या, लवंगा आणि आले पाण्यात घालावे व लहान आचेवर पाणी उकळून घ्यावे. पाण्यातून इतर मसाला व टी बॅग्स काढून टाकाव्यात व ते फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. संत्रे सोलून घेऊन त्याच्या फोडी बारीक कापाव्यात. मॉकटेल सर्व्ह करताना, ग्रीन टी व सफरचंदाचा ज्यूस एकत्र करून घ्यावा. त्यात संत्र्याच्या फोडी घालाव्यात आणि पुदिन्याची पाने घालून गार्निश करावे. थंड सर्व्ह करावे. 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या