दिवाळी फराळ आरोग्यमय होवो
दिवाळी फराळ
दिवाळी म्हणजे सर्व भारतीय सणांचा राजा. दिवाळी ओळखली जाते ती दिव्यांची आरास, फटाके आणि तोंडाला पाणी सुटेल असा फराळ यामुळे. एरवी सकाळी नाश्ता आणि दोन वेळा जेवण, अशी जी आहाराची सर्वमान्य पद्धत असते त्यामध्ये अचानक बदल होतो. रोजच्या पोळी-भाजी आणि वरणभातामध्ये अधून मधून तोंडात टाकायला लाडू, चिवडा, करंज्या, चकल्या यांची स्वादिष्ट जोड मिळते. या दिवसात सुट्या असतात, त्यामुळे कुणा मित्राकडे, स्नेह्यांकडे किंवा नातेवाइकांकडे गेले, की ताट भरून येणाऱ्या पदार्थांची पोटात तडस लागेपर्यंत भर पडते. शिवाय दिवाळी भेट म्हणून येणाऱ्या असंख्य प्रकारच्या मिठाया, चॉकलेट्स यांची धूमधाम वेगळीच असते.
‘ही दिवाळी आपल्याला आनंदाची जावो’ अशी कामना व्यक्त होणाऱ्या भेटकार्डांनी आणि संदेशांनी सगळ्यांच्या आनंदात जशी भर पडते, तशीच दिवाळीच्या या स्वादिष्ट पदार्थांनी साऱ्यांच्या वजनातसुद्धा भर पडते. दिवाळीनंतर रक्तातली साखर तपासायला येणाऱ्या बहुतेक साऱ्या मधुमेहींची शुगर लेव्हल वर गेलेली असते आणि वजने वाढलेली असतात. पण म्हणून काय दिवाळीत काही फराळ करायचाच नाही? छे! छे! असे मुळीच नसते. तर हे पदार्थ घरी बनवताना आणि खाताना त्यांच्यामधील कॅलरीजचा आणि पोषणमूल्यांचा विचार करायचा असतो.
फराळाचे जिन्नस आणि कॅलरीज
सर्वसामान्यपणे निरोगी पुरुषाला दिवसाला २००० कॅलरीज आणि स्त्रीला १७०० कॅलरीज एवढी ऊर्जा आपल्या रोजच्या अन्नातून मिळणे गरजेची असते. पण या दिवाळीच्या काळात अशा चमचमीत आणि स्वादिष्ट फराळावर ताव मारल्यामुळे नाही म्हटले तरी रोजच्या कॅलरीजची ३५०० कमाई होते. हे समजण्यासाठी खाली दिलेला तक्ता पहा:
पदार्थ कॅलरीज
रव्याचा १ लाडू १८५
१ बेसन लाडू १७०
१ बुंदीचा लाडू १८५
१ अनरसे १९०
१ चकली ७०
चिवडा १ बशी २५०
१ वाटी शेव २००
१ वाटी शंकरपाळे
(२० तुकडे) ४५०
१ चिरोटा २४५
बर्फी १ चौकोन २५०
काजू कतली १ चौकोन ५८
१ पेढा ८५
२ चमचे हलवा १००
काजू ५० ग्रॅम ४५०
जिलबी १ वेढा १५०
म्हैसूरपाक १ तुकडा ३५०
१ गुलाबजाम २००
१ रसगुल्ला १२५
रसमलाई १ तुकडा २००
१ वाटी खीर २७०
सोहन हलवा ४० ग्रॅम २५०
१ करंजी २२५
१ तुकडा चमचम १७५
हे पाहिल्यावर लक्षात येते, की रोजच्या आहारातले कॅलरीजचे गणित दिवाळी साजरी करण्याच्या आनंदात कसे भरकटत जाते.
दिवाळीमध्ये केवळ वजनवाढच होते असे नाही, तर इतरही त्रास या काळात होत असतात. दिवाळीच्या काळात बनवले जाणारे तेलकट, तिखट-गोड पदार्थ, डाळीचे पीठ हे सर्व बऱ्याचदा पचायला जड असतात. त्यामुळे आपल्या पचनशक्तीपेक्षा जास्त खाल्ले गेले तर; अपचन, छातीत जळजळणे, पोट दुखणे, उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात गॅसेस होणे,बद्धकोष्ठता असे विकार हमखास बळावतात आणि दिवाळीची सारी मजाच निघून जाते. त्यात हे पदार्थ एकदा बनवले, की दहा पंधरा दिवस साठवून ठेवले जातात, त्यामुळे होणारे आजार वेगळेच.
दिवाळीत पाळावयाची पथ्ये
दिवाळीत फराळामुळे आरोग्य बिघडू नये म्हणून काही पथ्ये पाळणे नितांत गरजेचे असते.
- एकदम जास्त पदार्थ खाऊ नये. एखाद्या छोट्या बशीत एखाद-दुसरा पदार्थ घ्यावा.
- फराळ शक्यतो सकाळी लवकर करावा. फराळ जास्त खाल्ल्यास, दुपारचे जेवण अगदी कमी घ्यावे. रात्री भुकेपेक्षा कमी खावे.
- डाळीचे पदार्थ उदा. बेसन लाडू, चकल्या खाल्यावर भरपूर पाणी प्यावे.
- जास्त खाल्ल्याने पोट फुगल्यासारखे किंवा घट्ट झाल्यास, ताज्या फळांचा रस, (विशेषतः संत्री, मोसंबी) घ्यावा.
- छातीत किंवा पोटात जळजळ वाटल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा खायचा सोडा घालून प्यावा.
- फराळाच्या अतिसेवनाने उलट्या झाल्यास, त्यानंतर लंघन करावे. खाण्याचा सोडा घालून लिंबू सरबत प्यावे.
- जुलाब झाल्यास पुढचे दोन दिवस खाणे कमी खावे, पाणी जास्त प्यावे, दिवसातून दोन वेळा एक केळे खावे.
- पहाटे एक-दोन ग्लास कोमट पाणी प्यावे.
- सकाळच्या व्यायामाचे वेळापत्रक शक्यतो बदलू नये. बाहेर जाणे शक्य नसेल तर किमान १५ ते २० मिनिटे चालावे. योगासने, सूर्यनमस्कार नेमाने करावेत.
- व्यायाम करत नसाल, तर दिवाळीच्या मुहूर्तावर व्यायाम सुरू करावा.
- फराळाचे पदार्थ एकदम एकाचवेळी खाण्याऐवजी चवीपुरते घ्यावेत.
- मिठाई गाईच्या तुपात बनवावी. बाहेरून मिठाई घेत असाल तर खात्रीशीर दुकानातून घ्यावी. गाईचे तूप आरोग्यासाठी हितकर मानलेले जाते.
- बाहेरून खरेदी केलेल्या दुधाच्या मिठाईपेक्षा घरी बनवलेले बेसनाचे, खव्याचे, डिंकाचे किंवा रव्याचे लाडू आणि मिठाईला प्राधान्य द्यावे.
- दिवाळीमध्ये दोन्ही वेळेचे जेवण हलके घ्यावे. तळलेले पदार्थ, खीर, पुरणपोळी यासारखे पदार्थ किमान एक वेळच्या जेवणात समाविष्ट करावे.
- दिवाळीच्या काळात जर रात्री उशिरापर्यंत जागरण होणार असेल तर अधेमधे ४ ते ५ काजू किंवा बदाम खावे आणि झोपताना न विसरता १ ग्लास कोमटपाणी पिऊन झोपावे.
- दिवाळीमध्ये कॅलरीज कमी करण्याच्या नादात ‘शुगर फ्री’ मिठाई किंवा ‘फॅट फ्री’च्या आहारी जाऊ नये.
- दिवाळी हा आनंदाचा सण आहे. आनंद वाटल्याने वाढतो. तेव्हा आपला फराळ गोरगरीबांसोबत वाटावा. तेव्हा मनही प्रसन्न राहील. आनंद द्विगुणित होईल.
सध्या दिवाळीचे तयार जिन्नस अगर तयार डबाबंद मिठाया घेण्याकडे वाढता ओढा दिसून येतो. पण अशा मिठायांमध्ये काही रसायने ( प्रिझर्वेटिव्हज) वापरलेली असतात. त्यामुळे मूत्रपिंडे, यकृत अशांसारख्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत आणि धोकादायक परिणाम होऊ शकतात. अशी रसायने गर्भवती स्त्रीच्या शरीरात त्या मिठाईद्वारे गेल्यास तिच्या गर्भामध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकतात. अशा रसायनांमुळे दमा, बरा होण्यास खूप अवधी घेणारा खोकला आणि क्वचित प्रसंगी कर्करोगसुद्धा होऊ शकतो. कित्येकदा अशा मिठायांवर असणाऱ्या चंदेरी कागदाच्या अल्युमिनियमपासून बनलेल्या आवरणामुळेदेखील असेच परिणाम मूत्रपिंडे, यकृत, मेंदू,गर्भवती स्त्रिया यांच्यावर होण्याची संभावना असते.
काही आरोग्यदायी सूचना
- दिवाळीचे जिन्नस बनवताना तेल आणि साखर मर्यादित वापरा.
- दिवाळीत रोजचे जेवण करा, साधा पण चौरस आहार हवाच. एखादी पोळी किंवा भात कमी करून एखादा आवडता जिन्नस मर्यादित स्वरूपातच खा. जेवणाला पर्याय म्हणून फराळ नको.
- या दिवसात भरपूर पाणी प्या. तैलयुक्त आहार आणि थंडी यामुळे पाणी कमी पिण्याकडे कल राहतो; पण त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठ संभवते.
- व्यायामावर भर द्या. थंडीच्या दिवसात नुसते तैलयुक्त खाणेच नव्हे तर भरपूर व्यायाम करा असेही सांगितले जाते. खाण्याचे सगळ्यांच्या लक्षात राहते, पण व्यायामाचे सोईस्करपणे टाळले जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर व्यायाम सुरू करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरेल.
- या एकविसाव्या शतकात स्थूलत्व आणि त्या संबंधातले आजार या आपल्या देशासमोरील सर्वात गंभीर आरोग्य समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करायचे असेल तर सर्वगामी बदल करावे लागतील.
आरोग्याला पोषक असा दिवाळी फराळ बनवायचा तर तो मैद्याशिवाय बनला पाहिजे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर केला पाहिजे. साखरेऐवजी गुळाचा वापर व्हायला पाहिजे. तळलेले पदार्थसुद्धा कमी व्हायला पाहिजेत. जे दैनंदिन व्यायाम करत नाहीत, ज्यांना रोजच्या धंदा-व्यवसायात शारीरिक कष्ट-परिश्रम करावे लागत नाहीत, जेदिवसभरातून एक हजार पावलेसुद्धा चालत नाहीत, त्यांनी असा अतिपौष्टिक फराळ खाऊ नये.
बदलू या दिवाळी सेलिब्रेशन
दिवाळी म्हटलं, की डोळ्यांना मोहवणारी सजावट आकाशकंदील, पणत्या, किल्ले. त्या जोडीला वसुबारसेला गायीचे, धनत्रयोदशीला धनाचे, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन होते. नर्कचतुर्दशीला अभ्यंग स्नान, प्रतिपदेला नवे वर्षाचे स्वागत, भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. हे सर्व आनंदाचे क्षण असतात. यामध्ये आनंदाला एका धार्मिकतेची आणि प्राचीन परंपरेची जोड आहे.
दिवाळीचा काळ हा हिवाळ्यातील हेमंत ऋतू असतो. या दिवसात भूक चांगली लागते आणि त्यामुळे तेला-तुपाचे आणि गोडाचे पदार्थ खावेत असे सांगितले जाते. दिवाळी साजरी करताना होणाऱ्या आनंदाची आणि परस्परांच्या प्रेमाची वाट पोटातून जाते. मात्र या फराळाचे नियोजन योग्य रीतीने केले, तर आरोग्यात त्याची बाधा येणार नाही.
आजच्या जागतिक पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे दिवाळीच्या काळात पूर्वीसारखी थंडी पडत नाही. उलट वातावरणातील गर्मी कित्येकदा वाढलेली आढळते. त्यामुळे हे भरपूर उष्मांक देणारे पदार्थ खाण्याची पद्धत बदलायला हवी. जर आजच्या काळातील हवामान बदलले असेल तर फराळाच्या खाद्यपध्दती नक्कीच बदलायला हव्यात. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायूचे आणि ध्वनीचे प्रदूषण, फटाके उडवण्यावर नियंत्रण कायद्याचा बडगा आणून केले गेले आहे. त्यासाठी कोर्टाचे आदेश यावे लागले. पण अनियंत्रित फराळामुळे होणारे आरोग्यप्रदूषण प्रत्येकाने आपल्याखाण्यावर नियंत्रण आणूनच करायला लागेल.
मागील वर्षी पाहिलेले एक दिवाळी शुभेच्छा पत्र खूप बोलके होते.
दिवाळी म्हणजे आनंद
दिवाळी म्हणजे अतूट नात्यांचा बंध
दिवाळी म्हणजे फराळाचा सुगंध
अशा उत्साह पूर्वक
दिवाळीच्या सर्वाना शुभेच्छा!