गोड गोड पक्वान्न

निर्मला सु. देशपांडे 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
आपल्याकडे पूर्वी लाडू, करंज्या अशी पक्वान्न फक्त दिवाळी, सणासुदीला, पाहुण्यांकरता केली जात. पण आता कधीही ही पक्वान्ने घरी करतात करतात अगर बाहेरून विकत आणली जातात. त्यामुळे या पक्वान्नांमधले नावीन्य कमी होत आहे. तसेच प्रवासात परप्रांतातील पदार्थ खाल्ले जातात. दुसऱ्या प्रांतातली काही पक्वान्न आपल्या सणांना केली तर नक्कीच नावीन्य येईल...

राधाविलास लाडू
साहित्य : दोन कप बारीक रवा, दोन टेबल स्पून तूप, एक कप पिठीसाखर, थोडे खडीसाखरेचे तुकडे, तळलेले काजू, थोडे दूध, चिमूटभर केशर, चिमूटभर जायफळ पूड.
कृती : तूप पातळ करून रव्याला चोळून लावावे. दूध गरम करून त्यात केशर घालावे. आवश्‍यक तेवढ्या दुधाणे तूप चोळलेला रवा भिजवावा. मग त्याचे चपटे वडे बनवून गुलाबी तळून घ्यावे. वडे कुस्करावे. मिक्‍सरवर फिरवून पुन्हा रवा करावा. परातीत दोन मोठे चमचे साजूक तूप फेसून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून फेकावे. मग त्यात तयार रवा, जायफळपूड, काजू, खडीसाखर घालून चांगले मिसळून घ्यावे व लाडू वळावेत.

खोयेकी गुजिया (उत्तर प्रदेश)
साहित्य : पारीकरता ः- पाव किलो मैदा, दोन ते अडीच टेबल स्पून तूप, निरसे दूध.
सारणाकरिता ः- प्रत्येकी सव्वाशे ग्रॅम रवा व खवा, शंभर ग्रॅम पिठीसाखर, वेलची पूड, बदाम-पिस्त्याची भरड पूज, ३०० ग्रॅम साखर पाकासाठी, तळण्याकरता तूप.
कृती : परातीत तूप फेटून घ्यावे. चिमूटभर मीठ व मैदा घालून घट्टपीठ भिजवावे व झाकून ठेवावे. रवा थोडा तुपावर भाजून घ्यावा. खवा मोकळा भाजून घ्यावा. गार झाल्यावर दोन्ही एकत्र करावे. त्याच पिठीसाखर, वेलचीपूड व बदामपिस्त्याची पूड घालून सारण बनवावे. भिजवलेला मैदा चांगला मळून घ्यावा. जरा जाडसर पारी लाटून सारण भरून करंजी-गुजिया - बनवावी. मुरड घालावी व तळावी. साखर बुडेल इतके पाणी साखरेत घालून पाक करावा. तळलेली गुजिया पाकात बुडवून काढून ठेवावी. पाकातली करायची नसल्यास सारणात पिठीसाखर जास्त घालावी व गुजिया बनवून तळावी.

खाज्याचे कानवले
साहित्य : एक वाटी तांदूळ, दोन वाट्या मैदा, सुक्‍या खोबऱ्याचे सारण, तळण्यासाठी तूप.
कृती : सुक्‍या खोबऱ्याचे सारण करताना भाजलेलं २ वाट्या खोबरे मिक्‍सरवर फिरवावे. पाव वाटी रवा अगर कणीक तुपावर भाजावी. पाववाटी खसखस भाजून पूड करावी. थोडीशी बदामपूड करावी. वेलची पूड घ्यावी. खोबरे चुरगाळून घ्यावे. त्यात एक वाटी पिठीसाखर व इतर सर्व साहित्य घालून सारण बनवावे.
साट्याकरता ः तांदूळ तीन दिवस भिजवून, वाळवून त्याचे कुटून वस्त्रगाळ पीठ करावे अगर त्याच्याऐवजी आरारुटही वापरू शकता. मैद्यात दोन चमचे तुपाचे मोहन घालून दूध घालून चिमूट मीठ घालावे व घट्ट भिजवावे. ३ तास झाकून ठेवावे. परातीत चार चमचे तूप घेऊन फेटावे. त्यात तांदळाचे पीठ अगर आरारूट घालून फेटावे. (आरारूट पटकन कोरडे होते.) मैदा मळून घ्यावा. नेहमीपेक्षा जरा जाड पोळी करावी. त्या पोळीला बोटाने टोचे मारावे. पोळीकरता घेतलेल्या गोळ्यापेक्षा निम्मा गोळा साट्याचा घेऊन तो पोळीवर सगळीकडे सारखा पसरावा व पोळीची घट्ट वळकटी करावी. त्याचे एक इंचाचे तुकडे करून दोन्ही बाजू पिरगाळून त्याची गोळी करावी. हे तुकडे थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावेत. नंतर त्याची पारी लाटून सारण भरावे व करंजी बनवून कडा दाबून बंद करावी. कातू नये. नंतर तापल्या तुपात मंद गॅसवर तळावी. मात्र रंग शक्‍यतो पांढराच असावा.

पाकातले चिरोटे
साहित्य : प्रत्येकी पाव किलो रवा, मैदा, अर्धीवाटी तूप, आंबट दही, तळण्याकरता तूप, ७५० ग्रॅम साखर, केशर अगर खाण्याचा केशरी रंग.
कृती : परातीत तूप फेटून घ्यावे. त्यात रवा, मैदा व चिमूटभर मीठ घालून कुस्करावे. आंबट दह्यात भिजवून ठेवावे. साखरेत पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात केशर घालावे. रवा-मैदा चांगला कुटून मऊ करून घ्यावा. तांदळाच्या पिठीत अगर कॉर्नफ्लॉवरमध्ये पातळ तूप घालून साटे बनवावे. पिठाच्या पातळ पोळ्या लाटाव्यात. पहिल्या पोळीवर साटे लावून त्यावर दुसरी पोळी त्यावर साटे त्यावर तिसरी पोळी ठेवून घट्ट गुंडाळी करावी. वरीलप्रमाणेच एक इंचाचे तुकडे कापून डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावेत. बाहेर काढल्यावर लाटून तूप उडवीत तळावेत म्हणजे छान पदर सुटतात. मग ते तयार गरम पाकात सोडावेत. बाहेर काढून उभे करून ठेवावेत. हे चिरोटे दह्यामुळे खूप खुसखुशीत व चवदार होतात.

खव्याच्या साटोऱ्या
साहित्य : अर्धाकिलो खवा, तीन वाट्या पिठीसाखर, अर्धाकिलो मैदा, वेलची-जायफळ पूड, वाटीभर तूप, पाववाटी तेलाचे मोहन, काजू-बदाम पूड ऐच्छिक.
कृती : मैदा चाळून त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालावे व घट्ट भिजवून ठेवावे. रवा मोडून सारखा करावा व भाजून घ्यावा. गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची-जायफळ पूड व काजू-बदाम पूड करावी. चांगले मिसळून सारण बनवावे. भिजवलेल्या मैद्याची लाटी घेऊन पुरी लाटावी. तिची वाटी करून त्यात सारण भरून तांदळाच्या पिठीवर पुरी लाटावी. दोन तवे तापत ठेवावे. एका तव्यावर साटोरी अर्धवट भाजावी. लगेच शेजारच्या तव्यावर टाकून दोन्ही बाजूंना तूप सोडून भाजावी. अगर तुपात तळावी.

खोया लड्डू (बंगाल)
साहित्य : एक लिटर म्हशीचे दूध, चमचाभर कॉर्नफ्लॉवर, १०० ग्रॅम पिठीसाखर, पाव चमचा लिंबाचा रस, चिमूटभर तुरटीपूड, वेलची पूड, बदाम-पिस्ते काप, चांदीचा वर्ख.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. उकळल्यावर तुरटी पूड घालावी, गॅस मोठा करून हलवत राहावे. थोडा थोडा लिंबाचा रस घालावा. खवा रवाळ बनेल. मग त्यात साखर व कॉर्नफ्लॉवर घालून हलवावे. साखर विरघळल्यावर हलवून खाली घ्यावे. गार झाल्यावर सुकामेवा, वेलची पूड घालून लाडू वळावेत.

गुलकंद करंज्या
साहित्य : पारीसाठी ः- दोन वाट्या बारीक रवा, तीन टेबल स्पून तुपाचे मोहन, चिमूट मीठ, नारळाचे अगर निरसे दूध, थोडा गुलाबी रंग, रोझ इसेन्स.
सारणाकरिता ः- अर्धीवाटी गुलकंद, तीन वाट्या नारळाचा चव, अडीच वाट्या साखर, अर्धीवाटी साय, डावभर बारीक रवा, थोडे साजूक तूप.
कृती : एक वाटी रवा व एकवाटी मैदा एकत्र करावा. त्यात मोहन व रंग घालून दुधाणे घट्ट पीठ भिजवून ठेवावे.
सारणाकरता ः रवा भाजून घ्यावा. साखर व खोबरे मिक्‍सरवर फिरवून घ्यावे. त्यात सायही घालून फिरवावी. त्यात गुलकंद व असल्यास गुलाब कळीच्या पाकळ्या कुस्करून घालाव्यात व कढईत घालून सारण शिजत ठेवावे. भाजलेल्या रव्यात थोडा गुलाब इसेन्स घालून तो सारणात मिसळावा. सारण साधारण कोरडे होईपर्यंत शिजवावे. फार कोरडे झाल्यास करंज्या फुटतात. भिजवलेला रवा- मैदा चांगला कुटून मऊ करावा. सारण भरून नेहमीसारख्या करंज्या कराव्यात व रिफाइंडमध्ये किंवा तुपात तळाव्यात. पारी दुसऱ्या पद्धतीनेही करता येते. पीठ भिजवताना निम्म्या भागात लाल रंग थोड्या पाण्यात ३-४ थेंब घालून भिजवावे. उरलेल्या पांढऱ्या रंगाच्या व लालरंगाच्या लांबट लाट्या कराव्यात व त्यांचा एकमेकांना पीळ घालावा. मग पेढे करून लाट्या कराव्यात. या पांढऱ्या-गुलाबी पारीत गुलकंदाचे सारण भरून गुलकंदी करंज्या बनवाव्यात व तुपात तळाव्यात.

तंबीटाचे लाडू (कर्नाटक)
साहित्य : अर्धाकिलो पंढरपुरी डाळे, वाटीभर सुक्‍याखोबऱ्याचा कीस, अर्धीवाटी तीळ, पाव वाटी खसखस, ५० ग्रॅम डिंकपावडर, ५० ग्रॅम, बिब्याच्या बिया, पाऊण किलो गूळ, २ वाट्या साजूक तूप, काजू. बेदाणे.
कृती : डाळे मिक्‍सरवर किंचित रवाळ दळावे. खोबरे, खसखस भाजून घ्यावी. डिंक पावडर तुपात तळावी. खोबरे चुरगळावे. खसखस कुटावी. डिंकाची लाही हाताने चुरगळावी. गूळ चिरून त्यावर थोडे पाणी शिंपडून मंद गॅसवर विरघळून घ्यावा. विरघळल्यावर त्यात निम्मे तूप घालावे. मग त्यात डाळ्यांचे पीठ, खोबराकीस, डिंकपूड, भाजलेले तीळ, बिब्ब्याच्या बिया, खसखस पूड, काजू-बेदाणे वगैरे सर्व साहित्य घालावे. कोरडे वाटल्यास थोडे पातळ तूप घालावे. खाली उतरून सर्व मिश्रण एकजीव करून लाडू वळावेत. वळताना खालची व वरची बाजू चपटी करावी.

श्रीखंड
साहित्य : अर्धाकिलो मलईचा चक्का, अर्धाकिलो साखर, वेलची-जायफळ पूड, केशर अगर पिवळा रंग, चारोळ्या, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, अर्धाकप दूध.
कृती : चक्का व साखर एकत्र करून ठेवावे. मग ते पुरणयंत्रातून काढावे. केशर किंचित कोमट करून दुधात खलावे व श्रीखंडात घालावे. त्यात वेलची-जायफळ पूड घालावी. घट्ट वाटल्यास गरजेप्रमाणे दूध घालावे. वरून काजू-पिस्त्याचे काप घालावेत. श्रीखंड करून फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे मुरून छान लागते. 
आम्रखंड ः श्रीखंड करताना आंब्याचा रस घालून आम्रखंड केले जाते. साधारणपणे एक किलो चक्‍क्‍याला पावकिलो आंब्याचा रस घालावा. आवडत असल्यास अधिक घालू शकता.
अननस खंड ः तयार डब्यातल्या अननस फोडीत साखर घालून मिक्‍सरवर त्या थोड्या फिरवून घेऊन तो श्रीखंड करताना घालून अननस खंड बनवता येते.
फ्रूटखंड ः आंब्याच्या, सफरचंदाच्या, चिक्कूच्या फोडी, काळी व पिवळी द्राक्षे, सुकामेवा घालून फ्रुटखंड बनवले जाते.

जिलबी
साहित्य : अर्धाकिलो मैदा अगर प्रत्येकी पाव किलो बारीक रवा व मैदा, केशर अगर केशरी रंग, अर्धीवाटी चण्याच्या डाळीचे पीठ, पाऊण किलो साखर, तूप तळण्यासाठी, लिंबू, दही.
कृती : आदल्या दिवशी रात्री मैदा अगर रवामैदा, अर्धीवाटी दही, २ चमचे तेल व कढत पाणी एकत्र करून पीठ किंचित सरसरीत भिजवून ठेवावे. थंडीच्या दिवसांत उबेच्या ठिकाणी ठेवावे, म्हणजे पीठ चांगले आंबते व फुगते. दुसऱ्या दिवशी करतेवेळी त्यात अर्धीवाटी चण्याच्या डाळीचे पीठ घालून ते मिश्रण खूप फेटावे. साखरेचा दोन तारी पाक करावा. त्यात केशरी रंग घालावा. केशर खलून घालावे. लिंबू पिळून घालून पाक मंद आचेवर ठेवावा. नारळाच्या करवंटीचा डोळा काढून जिलबीचे भांडे तयार करावे. ते आतून-बाहेरून घासून घ्यावे. आतल्या बाजूला सगळीकडे तेलाचा हात पुसावा. पसरट पॅनमध्ये तूप तापवावे व गॅस मंद करावा. नारळाच्या करवंटीत तयार पीठ घालून तापल्या तुपात जिलबी घालावी. पीठ चांगले जमले असेल तर जिलबी लगेच वर येऊन तरंगते. खाली अजिबात चिकटत नाही. तळल्यावर जिलबी लगेच गरम पाकात सोडावी. दुसऱ्या जिलब्या तळून होईपर्यंत पाकात ठेवाव्यात. एकावेळी पॅनच्या आकाराप्रमाणे ४-५ अगर अधिक घालाव्यात. उलथण्याच्या मागच्या टोकाने एकमेकींना चिकटलेल्या जिलब्या तोडून उलटून तळाव्यात.

रसगुल्ले (बंगाली)
साहित्य : एक लिटर गाईच्या दुधाचे पनीर, स्निग्धांश अजिबात नको. एक चमचा मैदा, एक चमचा रवा, चिमूट बेकिंग पावडर, एक भांडे साखर.
कृती : साखरेत चार भांडी पाणी घालून पाक करावा. पाक करताना अधूनमधून हलवावे. झाकण ठेवावे म्हणजे पाक लवकर होईल. गॅस मंद ठेवावा. पूर्ण कोरड्या पनीरमध्ये रवा, मैदा, बेकिंग पावडर घालून मिक्‍सरवर फिरवावे. भरपूर मळून घ्यावे. तुपकट वाटल्यास मैद्याचा हात घ्यावा. त्याचे छोटे सुपारी एवढे गोळे करून पाकात सोडावेत. गॅस मोठा करून झाकण ठेवावे किंवा पाक कुकरमध्ये करून त्यात गोळे सोडावेत व झाकण लावावे. उकळताना अधूनमधून पाण्याचा हबका द्यावा म्हणजे पाक घट्ट होणार नाही. भांड्यात पाणी घेऊन त्यात रसगुल्ला टाकावा. एकदम तळाला गेला तर तयार झाला असे समजावे. नाहीतर आणखी उकळावी.
टीप्स : १) झाकण न ठेवताही रसगुल्ले उकळत्या पाकात छान उकळून होतात.  २) पाक घट्ट झाल्यास रसगुल्ल्यात शिरत नाही.

रसमलाई (बंगाली)
साहित्य : तयार रसगुल्ले, एक लिटर दूध, पाऊण भांडे साखर, चवीप्रमाणे कमीजास्त पिस्ता-बदाम काप, गुलाब जल, दूध मसाला.
कृती : दूध आटवून पाऊण लिटर करावे. सतत ढवळावे. साय येऊ देऊ नये. आटवलेल्या दुधात साखर, दूधमसाला, पिस्ताबदाम काप व वेलची पूड घालावी. तयार रसगुल्ले हातावर दाबून पाक काढून टाकावा. पूर्वस्थितीला आल्यावर ते तयार दुधात सोडून एक उकळी आणून मग खाली उतरावे. रसमलाई जितकी थंड तेवढी छान लागते. म्हणून शक्‍यतो आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवावी. देताना आवडत असल्यास गुलाबजल शिंपडावे.
टीप्स : १) रसमलाईमध्ये टाकताना रसगुल्ले थंडच असावेत. गरम नसोत.
२) रसगुल्ले ८ ते १० तास दुधात मुरले पाहिजेत.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या