कुरकुरीत चकली

सविता रवींद्र कुर्वे 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
फराळाच्या पदार्थांमध्ये सर्वांत आवडता पदार्थ म्हणजे चकली. खमंग, खुसखुशीत व उत्तम चवीची चकली करणं हे फार कौशल्याचे काम आहे. दरवर्षी चकली आपण करतच असतो, पण ती अधिक उत्तम कशी करता येईल. नावीन्यपूर्ण व निराळ्या चवीच्या कशा बनवता येतील, हे पाहूयात...

भाजणी
भाजणी प्रकार १
साहित्य : चार वाट्या तांदूळ, २ वाट्या चणाडाळ, १ वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मूगडाळ, १ वाटी जाड पोहे, जिरे, १ चमचा धने, ओवा, तीळ, मीठ, तिखट, हळद, तेल.
कृती : तांदूळ धुऊन घेऊन कपड्यावर पसरावे. सुकले, की भाजून घ्यावेत. चणाडाळ, उडीद व मूग डाळ पण वेगवेगळे भाजून घ्यावेत. धने-जिरे पण भाजून घ्यावेत. गार झाले, की चक्कीवरून दळून आणावे. चकल्या करताना ४ वाट्या भाजणी घ्यावी. ३ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात अर्धा वाटी तेल, ३ चमचे तीळ, १ चमचा ओवा, पाव चमचा हळद, तिखट किंवा १ चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून उकळत्या पाण्यात भाजणी घालावी. ढवळून घेऊन ढाकण ठेवावे. अर्धा ते १ तासाने थंड पाण्याच्या हाताने पीठ मळून घ्यावे. चकल्या करायला घ्याव्यात. मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. गार झाल्यावर डब्यात भराव्यात. ३५ ते ४० चकल्या होतात.

भाजणी प्रकार २
साहित्य : सहा वाट्या तांदूळ, २ वाट्या चणा डाळ, दीड वाटी उडीद डाळ, ३/४ वाटी मूग, ३ चमचे जिरे, ३ चमचे धने, लोणी, तीळ, ओवा, तिखट, मीठ, तेल.
कृती : तांदूळ धुऊन वाळवावे. मग तांदूळ व डाळी वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. धनेजीरे पण भाजावे. गार झाल्यावर दळून आणावे. ४ वाट्या भाजणी घ्यावी. त्यात ४ टेबल स्पून लोणी मोहन म्हणून घालावे. ३ वाट्या पाणी उकळावे. त्यात तिखट, मीठ, ओवा, तीळ घालून भाजणी घालावी. २ तास झाकून ठेवणे. गार झाले, की पीठ चांगले मळून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे.

भाजणी प्रकार ३
साहित्य : चार वाट्या तांदूळ, १ वाटी चणाडाळ, १ वाटी उडीद डाळ, ३/४ वाटी मूग डाळ, अर्धा वाटी तुरीची डाळ, ४-५ चमचे धने, २ चमचे जिरे, ३ वाटी जाड पोहे.
कृती : तांदूळ, चणाडाळ, मूग व तुरीची डाळ धुऊन सुकवणे. नंतर भाजून घेणे. गार झाल्यावर दळून आणणे. ४ वाट्या पिठात अर्धा वाटी गरम तेलाचे मोहन घालणे. तिखट, मीठ, हळद, तीळ व हिंग घालून १ वाटी उकळीचे पाणी घालून झाकण ठेवावे. २ तासांनी लागेल तसे गार पाणी घालून पीठ मळून घेणे. चकल्या करून घेणे. चकली करुन झाल्यावर शेवटचे टोक दाबून बंद करावे, म्हणजे तळताना ती सुटत नाही.

भाजणी प्रकार ४
साहित्य ः चार वाट्या ज्वारी, २ वाट्या चणाडाळ, दीड वाटी उडीद डाळ, १ वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी धने, ४ चमचे जिरे, १ चमचे मेथीदाणा.
कृती : ज्वारीला पाण्याचा हात लावून बांधून ठेवावी. मग हलकेच हाताने २ गडवी म्हणजे त्याचा कोंडा निघेल. नंतर ज्वारी व इतर धान्ये वेगवेगळे भाजून घ्यावे. एकत्र करून दळून आणावे व नेहमीप्रमाणे चकल्या कराव्यात.

टिप्स ः

  • भाजणी करताना घेतलेले तांदूळ जुने नसावेत. चकलीसाठी लहानदाणा व जाड तांदूळ वापरावा.
  • भाजणी भाजताना मंद आचेवर भाजावी. फार लालसर भाजू नये. पीठ भिजवताना घट्ट भिजवले तर चकल्या कडक होतात. 
  • पाण्याचा अंदाज न ठेवता मोजून पाणी घालावे.
  • तिखट चकली चवीला छान लागते, पण रंगाला चांगली दिसत नाही. म्हणून कमी लाल रंग असलेले तिखट वापरावे. नाहीतर हिरवी मिरची वाटून घालावी, लवंगपूड, जिरेपूड पण घालता येते.
  • हळद जरा कमीच घालावी. जास्त झाली तर चकली काळसर दिसते. चकलीत धने-जिरे, ओवापूड आपल्या आवडी व चवीप्रमाणे घालावे.
  • पीठ भिजवताना उकळीचे पाणी वापरावे. ते खाली उतरवून त्यात पीठ घालून हलवावे व अर्धा तास झाकून ठेवावे. चकल्या करायच्या वेळेस थोडे थोडे पीठ थंड पाण्याचा हात घेऊन चांगले मळून घ्यावे. पीठ गार झाल्यावर चकल्या कराव्यात.
  • पीठ सैल झाले तर काटे चांगले येत नाही. सगळे पीठ एकदम मळले तर चकल्या मोडतात. तुकडे पडतात.
  • चकल्या तळताना प्रथम तेल चांगले तापवून घ्यावे. मग मध्यम आचेवर ठेवून चकल्या तळाव्यात. जास्त आचेवर तळल्यास चकल्या वरून लाल होतात व आतून कच्च्या राहतात व मग मऊ पडतात. पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भराव्यात.

मेथी चकली
साहित्य : कुठल्याही प्रकारची भाजणी किंवा असतील ती तयार पिठे ४ वाट्या. १ वाटी मेथीची बारीक चिरलेली पाने, २ लसूण, मिरची, पुदिना यांची पेस्ट, ३ चमचे चाट मसाला, एका लिंबाचा रस.
कृती : सर्व जिन्नस एकत्र करावेत. ४ चमचे गरम तेलाचे मोहन घालून पाण्याने पीठ भिजवावे व चकल्या कराव्यात.

चणाडाळ तांदूळपीठ चकली
साहित्य : एक वाटी चणाडाळ, तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, तीळ, ओवा, हिंग, तळण्यासाठी तेल.
कृती : डाळीत २ वाट्या पाणी, हिंग व हळद घालून मऊ शिजवून घ्यावे. गार झाल्यावर घोटून घ्यावे. मग त्यात ओवा, तीळ, हिंग व मीठ घालावे. तसेच तिखट किंवा लसूण, मिरचीचा ठेचा पण घालावा. लगेच तांदळाचे पीठ घालून गोळा करावा व चकल्या करुन मध्यम आचेवर खमंग तळाव्यात.

बटाटा चकली
साहित्य : माध्यम आकाराचे ५ बटाटे, १ वाटी तांदळाचे पीठ, १ लसूण, जिरे, मिरच्या वाटून, मीठ, तेल.
कृती : तांदळाच्या पिठाची सैलसर पुरचुंडी करून २ शिट्या कराव्यात. गार झाले, की हाताने सारखे करावेत. त्यात उकडून सोलून किसलेले बटाटे घालावेत. मीठ व मिरचीचा ठेचा घालून गोळा करावा. त्यानंतर चकल्या करुन तळाव्यात.

आंबट-गोड चवीची चकली
साहित्य : दोन वाट्या तांदळाचे पीठ, २ वाट्या बेसन, अर्धा वाटी उडदाचे पीठ, पाववाटी भाजलेल्या पोह्यांचे पीठ, २ चमचे कोळ, २ चमचे साखर किंवा गूळ, १-१ चमचा बडीशोप, धने व जिरे पूड, तिखट, मीठ, २ चमचे तेलाचे मोहन, अर्धा चमचा बेकिंग पावडर.
कृती : सर्व पिठे हलकेच भाजून घ्यावीत. ४ वाट्या पाणी उकळावे, त्यात चिंचेचा कोळ, साखर, मीठ घालावे. पिठात धने-जिरे,तिखट व बेकिंग पावडर घालून एकत्र करावे. त्यात तयार उकळीचे पाणी घालून. पीठ भिजवावे. त्यानंतर १ तास ते झाकून ठेवावे. त्यानंतर चकल्या करुन मध्यम आचेवर तळाव्यात.

मसाला चकली
साहित्य : एक वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी कणीक, अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी तांदूळ पीठ, ३ चमचे आले, लसूण, मिरच्या, कोथिंबिरीची पेस्ट (हे सर्व चवीप्रमाणे कमी-जास्त घेऊ शकता),  २ चमचे बारीक चिरलेला कढीपत्ता, २ चमचे कोथिंबीर, अर्धा वाटी दही, हळद, तिखट, दोन चमचे तेलाचे मोहन, मीठ, ओवा, तीळ,  तेल, धनेजीरे पूड.
कृती : सर्व पीठे एकत्र करावीत. चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, तीळ, मिरची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, दही, तेल घालून जरुरीप्रमाणे  पाणी घालून पीठ भिजवा व चकल्या तळाव्यात, या चकल्या जरा मऊच होतात; पण चवीला अतिशय चांगल्या लागतात.
    मसाला चकली प्रमाणेच कोणतीही पीठ किंवा भाजणी घ्यावी. त्यात किसलेला कांदा, कोथिंबीर, मोहन, हळद, तिखट, मीठ घालून पीठ भिजवावे व चकल्या कराव्यात.

बिना भाजणीच्या चकल्या
साहित्य : चार वाट्या कणीक, १ चमचा तीळ, १ चमचा धने व  जिरेपूड, तिखट, मीठ, तेल.
कृती : मलमलच्या कपड्यात कणकेची सैलसर पुरचुंडी बांधून कुकरच्या डब्यात ठेवावा. ३ शिट्या करून उकडून घ्यावा. गार झाल्यावर तो गोळा फोडून घेऊन चाळणीने चाळून घ्यावा. मग त्यात ३ चमचे मोठे गरम तेलाचे मोहन घालावे. तिखट, मीठ, धने-जिरेपूड, तीळ घालून पाण्याने गोळा भिजवावा. अर्धा तासाने चकल्या कराव्यात व मध्यम आचेवर तळाव्यात.

मका चकली
साहित्य : तीन वाट्या मक्‍याचे पीठ, अर्धा वाटी तांदूळ पिठी, १ चमचा बडीशोपची भरड, १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, तिखट, मीठ, हिंग, तेल.
कृती : २ वाट्या पाणी उकळायला ठेवा. त्यात बडीशोप, जिरेपूड, तिखट, मीठ, हिंग चवीनुसार घालावे. गॅस बंद करावा. त्यात मक्‍याचे व तांदळाचे पीठ घालून ढवळावे. नंतर ते १५ मिनिटे  झाकून ठेवावे.ते परातीत घेऊन तेलाच्या हाताने मळावे. त्यानंतर चकल्या कराव्या व मध्यम आचेवर तळाव्यात.

नारळाच्या दुधातील चकली 
साहित्य : तांदूळ ६ वाट्या, ३ वाट्या उडदाची डाळ, ३ वाट्या  नारळाचे दूध, ३ चमचे लोणी, मीठ, मिरेपूड, जिरे, तेल.
कृती : डाळ व तांदूळ धुऊन सावलीत वाळवावे. गुलाबी रंगावर भाजावे व दळून घ्यावेत. त्यात जिऱ्या-मिऱ्याची भरड, मीठ व फेसलेले लोणी घालावे. पीठ घालून मिक्‍स करावे. लगेच नारळाचे दूध घालून भिजवावे. त्यानंतर चकली करून तळावी.

नारळाच्या दुधातील चकली प्रकार २
साहित्य : अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी तांदूळ पिठी, अर्धा वाटी फुटण्याच्या डाळ्यांचे पीठ (भाजके डाळ), २ चमचे तेल, जिरे, ओवा, मीठ, नारळाचे दूध.
कृती : सर्व जिन्नस एकत्र कराव्यात. लागेल तसे नारळाचे दूध घालून पीठ भिजवावे. त्यानंतर चकल्या कराव्यात व मध्यम आचेवर तळाव्यात.

रव्याची चकली 
साहित्य : दोन वाट्या रवा, २ वाट्या ज्वारीचे पीठ, ४ टेबल स्पून तेल, ओवा, तीळ, तिखट, मीठ, हिंग, तेल.
कृती : कढईत तेल गरम करावे. त्यात रवा घालून गुलाबी रंगावर भाजावा. गॅस बंद करावा. मग त्यात तिखट, मीठ, ओवा, हळद, हिंग घालावे. ज्वारीचे पिठात पाणी घालून भिजवून अर्धा तास ठेवावे. अर्धा तासानंतर चकल्या तयार करुन मध्यम आचेवर तळाव्यात.

रव्याची चकली प्रकार २
साहित्य : एक वाटी रवा, ४ चमचे तांदळाची पिठी, २ चमचे तेल, तिखट, मीठ, जिरे तीळ.
कृती : दीडवाटी पाणी उकळून त्यात तीळ, जिरे, मीठ, तिखट, हळद घालावी. रवा व तांदूळ पिठी कोरडीच भाजून त्या पाण्यात घाला व ढवळा. २-३ चमचे तेल घालून पुन्हा ढवळून झाकून ठेवावी. थंड झाले, की पाण्याच्या हाताने हे पीठ मळावे व चकल्या कराव्यात.

रव्याची चकली प्रकार ३
साहित्य : अर्धा वाटी बारीक रवा, दीड वाटी तांदळाची पिठी,  दीड वाटी पंढरपुरी डाळ्यांची पावडर, २ टेबल स्पून तूप, १ चमचा तिखट, मीठ, १ चमचा तीळ, जिरे, हिंग.
कृती : अडीचवाट्या पाणी उकळा, त्यात रवा घालून तो ढवळत राहावे. तो ३-४ मिनिटांनी घट्ट होईल. मग गॅस बंद करावा. तांदूळपिठी, डाळ्यांचे पीठ, तिखट, मीठ, तीळ, जिरे, हिंग व तुपाचे मोहन घालावे. शिजवलेला रवा घालावा. चांगले मिक्‍स करावे. गोळ्याच्या चकल्या कराव्यात आणि मध्यम आचेवर तळाव्यात. गोळा करताना जरा पाण्याचा हात घ्यावा.

मैदा व मूगडाळ चकली 
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, २ वाट्या मैदा, तीळ, ओवा, तिखट, मीठ, तेल.
कृती : डाळ धुवा. त्यात १ वाटी पाणी, हळद, हिंग घालून २ शिट्या होऊ द्याव्यात. तसाच मैदा पण पुरचुंडी बांधून २ शिट्या कराव्यात. शिजल्यावर डाळ घोटून घ्यावी. मैदा सारखा करून चाळून घ्यावा. त्यात तिखट, मीठ, ओवा, तीळ व जिरे घालून घोटलेली डाळ घालावी व गोळा भिजवून चकल्या कराव्यात. मोहन घालू नये. तशाच चांगल्या कुरकुरीत होतात.

मैदा व मूगडाळ चकली प्रकार २
साहित्य : मैदा ४ वाट्या, १ वाटी मूगडाळ, हळद, हिंग, तेल, तिखट, मीठ.
कृती : डाळीत हळद, हिंग घालून शिजवून घ्यावी. गार झाल्यावर घोटून घ्यावी. मैद्यात तीळ, मीठ, हिंग, तिखट व अर्धा वाटी तेलाचे मोहन घालावे. घोटलेली मूगडाळ घालून गोळा करावा. चांगले मळून चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात. या चकल्यांमध्ये जिरे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर वाटून घातल्यास मस्त चव येते. पालक प्युरी, टोमॅटो, सॉस व टोमॅटो प्युरी घालून पण मस्त लागतात.

सोया + बेसन चकली
साहित्य : एक वाटी सोयाबीन पीठ, १ वाटी बेसन, १ चमचा तिखट, अर्धा चमचा मिऱ्यांची भरड, हळद, जिरे, ओवा, १ चमचा धनेपूड, पावच सोडा.
कृती : सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्यात पाणी घालून भिजवावे. हे मिश्रण १५-२० मिनिटे. झाकून ठेवावे. त्याच्या चकल्याकरव्यात आणि मग त्या तळाव्यात.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या