शुभशकुनी करंजी

सुनीता मिरासदार 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळीत घरोघरी खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट करंज्या आवर्जून केल्या जातात. घरच्या घरी करंज्या करताना करंजीचे बाह्य आवरण रवा, मैदा, कणीक यांचे असले, तरी आतले सारण वेगवेगळे पदार्थ वापरून करता येते. यंदाच्या दिवाळीत करता येतील अशा करंज्यांचे विविध प्रकार...

केशरी करंजी
साहित्य : दोन वाट्या तांबड्या भोपळ्याचा कीस, अर्धी वाटी खवा, अर्धी वाटी नारळ चव, एक वाटी साखर, काजू बेदाणे, वेलची पूड एक चमचा चारोळी तूप
कृती : एक वाटी कणीक, एक वाटी बारीक रवा, दोन चमचे तांदूळपिठी, तीन चमचे गरम तुपाचे मोहन मीठ घालून दूध पाण्याने पीठ भिजवून ठेवावे. पॅनमध्ये दोन चमचे तुपावर भोपळा कीस, नारळचव घालून परतावे. खवा मोकळा करून घालावा. साखर घालून थोडे शिजवावे. सारण मऊ मोकळे करून थंड होण्यास ठेवावे. काजू, बेदाणे, चारोळी, वेलची पूड घालावी. पिठाची थोडी जाडसर पुरी लाटून सारण घालून करंजी करावी. गरम तेलात खरपूस तळावी.

नारळ-खवा करंजी
साहित्य : दोन वाट्या नारळ चव, एक वाटी खवा (१०० ग्रॅम), दीड वाटी पिठी साखर, काजू बदाम, पिस्त्याचे काप, वेलची जायफळ पूड, तीन वाट्या कणीक, अर्धी वाटी तांदूळ पिठी, चार चमचे गरम तूप, मीठ दूध-पाणी वापरून पीठ घट्ट भिजवून ठेवावे.
कृती : पॅनमध्ये नारळ चव हलके भाजून घ्यावा. खवा मोकळा करून नारळ चवमध्ये घालून थोडा भाजावा. सुकामेवा, वेलची जायफळपूड सारणात घालून मऊ गोळा करावा. थंड होण्यास ठेवावे. पिठाची पुरी लाटून त्यावर नारळ खव्याचे सारण घालून करंजी तयार करावी. करंजीला मुरड घालून रिफाइंड तेलात तांबूस रंगावर मंद आचेवर तळून काढावी. गरम, खुसखुशीत नारळ खवा करंजी सर्वांना आवडते.

तीळगूळ करंजी
साहित्य : एक वाटी खमंग भाजलेल्या तिळाचा कूट, एक वाटी गूळ चिरून, अर्धी वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, दोन चमचे खारीक पूड, एक चमचा खसखस वेलची पूड
कृती : एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, तीन चमचे गरम तेलाचे मोहन, मीठ घालून दूध पाणी वापरून पीठ घट्ट भिजवून ठेवावे. एक चमचा तुपावर खोबरे कीस घालून थोडा भाजावा. गरम किसात खसखस, खारीक पूड, वेलची पूड, गूळ घालून मिसळावे. गरम असतानाच दुधाचा हात लावून मळून मऊ सारण तयार करावे. पिठाची थोडी जाडसर पुरी लाटून सारण घालून करंजीचा आकार द्यावा. कातणीने कातून सर्व करंज्या तयार कराव्यात. गरम तुपात मंद आचेवर लालसर तळून काढाव्यात. गुळामुळे करंजी खमंग लागते. साजूक तुपाबरोबर खाव्यात.

कवठ करंजी
साहित्य : एक पिकलेला मोठा कवठ, एक वाटी नारळ चव, एक चमचा खसखस भाजून, अर्धी वाटी पंढरपुरी डाळे, एक चमचा वेलची पूड, एक चमचा चारोळी, तूप साखर
कृती : एक वाटी बारीक रवा, एक वाटी मैदा, एक चमचा बेसन, तीन चमचे गरम तुपाचे मोहन, मीठ घालून दूध - पाण्याने पीठ घट्ट भिजवून ठेवावे. कवठाचा गर काढून त्यात नारळचव साखर (एक वाटी) डाळे एकत्र करून मिक्‍सरमधून थोडे बारीक करावे. दोन चमचे तुपावर वाटलेला कवठ गर, नारळचव घालून परतावे. गोळा मऊ झाला, की सारणात वेलची पूड, चारोळी घालून सारण तयार करावे. पिठाची पुरी लाटून सारण घालून करंजीचा आकार द्यावा. कात्रीने कातून सर्व करंज्या तयार कराव्यात. गरम तुपात खरपूस तळाव्यात. कवठाचा स्वाद करंजी खाताना मधुर, चांगला वाटतो. दोन दिवसात संपवाव्यात.

मक्‍याची करंजी
साहित्य : दोन वाट्या मक्‍याचा कीस, एक वाटी नारळ चव, दीड वाटी पिठी साखर, एक चमचा वेलची पूड, काजू- बेदाणे, तूप, एक वाटी मैदा, एक वाटी रवा, दोन चमचे बेसन (साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे)
कृती : रवा, मैदा, बेसन, तीन चमचे गरम तुपाचे मोहन, मीठ घालून दूध पाण्याने पीठ घट्ट भिजवून ठेवावे. एक चमचा तुपावर मका कीस घालून परतावा, कीस थोडा कोरडा झाला, की नारळचव, पिठीसाखर घालून थोडे परतावे. वेलची, काजू, बदाम, बेदाणे घालून करंजीला आकार द्यावा. करंजीला हाताने मुरड घालावी. तूप तापवून मंद आचेवर लालसर करंज्या तळाव्यात. वेगळ्या चवीची करंजी चवदार लागते. (खवा सारणात घालू शकता.)

खमंग बेसन करंजी
साहित्य : एक वाटी बेसन, दोन चमचे खसखस, दोन चमचे नारळ चव, तूप, बदामाचे पांढरे काप, काजू काप, एक चमचा चारोळी, दोन वाट्या मैदा, एक वाटी कणीक, मीठ, दूध, एक वाटी पिठीसाखर
कृती : मैदा, कणीक, तीन चमचे गरम तुपाचे मोहन, मीठ घालून दूध पाण्याने पीठ भिजवून ठेवावे. पॅनमध्ये दोन चमचे तुपावर बेसन खमंग भाजावे. खसखस नारळचव घालून थोडे भाजावे. पिठीसाखर, बदाम, काजू, चारोळी, जायफळ पूड घालून मऊ सारण तयार करावे. पिठाची पुरी लाटून सारण घालून पुरी बंद करावी. हाताने मुरड घालून गरम तेलात तळावी. बेसनामुळे करंजी खमंग चवदार लागते.

गुलकंदाची शाही करंजी
साहित्य : दोन वाट्या मैदा, दोन चमचे बारीक रवा, तीन चमचे तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ
सारण : एक वाटी गुलकंद, एक वाटी नारळचव, एक चमचा खसखस भाजून पूड, बदाम काप, चारोळ्या, एक चमचा वेलदोडे पूड, दोन चमचे पिठीसाखर, तूप
कृती : मैदा, रवा, तूप, मीठ एकत्र करून दूध + पाणी वापरून घट्ट भिजवून ठेवावे. एक चमचा तुपावर नारळ चव घालून परतावे. गुलकंद, पिठीसाखर घालून पुन्हा परतावे. सारण मऊ गोळा झाले, की त्यात बदाम काप, चारोळ्या, खसखस पूड, वेलदोडेपूड घालून मिसळून सारण थंड होण्यास ठेवावे. पिठाची पुरी लाटून सारण घालून कडा बंद करून कातणीने कापाव्यात. सर्व करंज्या करून गरम तुपात मंद आचेवर बदामी रंगावर तळून काढाव्यात. करंजीला गुलकंदाचा स्वाद छान लागतो.

पनीर - नारळ करंजी 
साहित्य : दोनशे ग्रॅम पनीर, एक वाटी नारळ चव, एक वाटी साखर, एक चमचा वेलची पूड, काजू - बदाम काप, मनुका एक वाटी, मैदा अर्धी वाटी, बारीक रवा, अर्धी वाटी कणीक, तीन चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ
कृती : रवा, मैदा, कणीक, तूप, मीठ एकत्र करून दूध - पाणी वापरून पीठ घट्ट भिजवून ठेवावे. पॅनमध्ये एक चमचा तुपावर नारळ चव, साखर घालून शिजवावे. सारण थोडे कोरडे झाले, की पनीर किसून घालावे. मंद गॅसवर थोडे परतावे. वेलची पूड, बदाम, काजू काप, मनुका घालून सारण थंड होण्यास ठेवावे. भिजवलेले पीठ चांगले मळून घ्यावे किंवा कुटून घ्यावे. (मिक्‍सरमधून थोडे फिरवले तरी चालते.) पिठाची पुरी लाटून पनीरचे सारण घालून करंजीचा आकार द्यावा. कातणीने करंजी कातून घ्यावी. गरम तुपात मंद आचेवर करंजी तळावी. गरम करंजी छान लागते. वेगळ्या चवीची मऊसर करंजी छान लागते.

पंचरत्नी करंजी
साहित्य : बी काढून खजूर एक वाटी, एक वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, दोन चमचे तीळ भाजून कूट, दोन चमचे शेंगादाणे कूट, एक चमचा खसखस भाजून
कृती : दोन वाट्या कणीक, एक वाटी मैदा, तीन चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, दूध - पाण्याने कणीक घट्ट भिजवावी. खजुराचे तुकडे करून एक चमचा तुपावर थोडे परतावेत. त्यात खोबरे कीस घालून परतावे. मिक्‍सरमधून बारीक करावे. तिळकूट - शेंगादाणे कूट खसखस, खोबरे, वेलची पूड घालून सारण तयार करावे, बेदाणे घालू शकता. पिठाची पुरी लाटून सारण भरून करंजी करावी. खरपूस तळावी.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या