रुचकर भाज्या

सुनीता थोरात 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
ताटातल्या भाजीशिवाय जेवणाला लज्जत येत नाही. आपल्याकडे वर्षभर विविध फळभाज्या, पालेभाज्या उपलब्ध असतात. याच भाज्यांच्या काही पाककृती....

बटाटा भाजी
साहित्य : चार ते पाच बटाटे, हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा तुकडे १ टेबलस्पून, आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून, कढीपत्ता ७-८ पाने, कांदा २, जाडसर धनेपूड १ टीस्पून, कोथिंबीर ३ टेबल स्पून, तेल गरजेनुसार, मीठ गरजेनुसार.
कृती : प्रथम बटाटे उकडून सोलून मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. एका कढईत तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद व कढीपत्त्याची फोडणी करावी. बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा भाजला, की त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी. नंतर बटाट्याच्या फोडी घालून वरून मीठ, धनेपूड घालावे. हलक्‍या हातांनी भाजी परतावी. फोडी तुटू देऊ नये. मंद गॅसवर झाकण ठेवून भाजीला एक वाफ आणावी. कोथिंबीर घालून भाजी घाली उतरवावी.

भरली वांगी
साहित्य : पाच ते सहा मध्यम आकाराची वांगी, (वांगी काटेरी हवी. २५० ग्रॅम),पाव कप सुके/ओले खोबरे, २ टेबलस्पून पांढरे तीळ कूट, शेंगदाण्याचा कूट ४ टेबलस्पून, कांदा, लसूण मसाला २ टेबलस्पून, गोडा मसाला १ टीस्पून, लसूण पेस्ट १ टीस्पून, कोथिंबीर चिरून २ टेबलस्पून, मोहरी, जिरे, हिंग, हळद फोडणीसाठी, मीठ चवीनुसार, तेल पाव कप, पाणी गरजेनुसार.
कृती : प्रथम वांगी देठ काढून देठाच्या बाजूने उभ्या चिरा देऊन पाण्यात घालावी, म्हणजे काळी पडणार नाहीत. एका प्लेटमध्ये खोबरे व तिळाचा कूट घेऊन त्यात कांदा-लसूण मसाला, शेंगदाणा कूट, गोडा मसाला, लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ घालून हातांनी मिश्रण करावे. या सर्व मसाल्यांच्या घट्टपणासाठी १ टेबलस्पून तेल घालावे. १ टेबलस्पून मसाला बाजूला ठेवावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. भरलेली वांगी पातेल्यात सोडावीत. बाजूला ठेवलेला मसाला घालावा. हलक्‍या हातांनी वांगी हलवून प्लेटमध्ये पाणी ओतावे. ही प्लेट पातेल्यावर झाकावी. मंद आचेवर ३-४ मिनिटे वाफ आणावी. पूर्ण झाकण लावून मंद आचेवर वांगी शिजवावीत. आवडीनुसार रस ठेवून भाजी उतरवावी. वरून कोथिंबीर घालून सजवावी.

दुधी भोपळा भाजी
साहित्य : कोवळा दुधी भोपळा चिरून १ कप, हरभरा/मूग डाळ २ टेबल स्पून, हिरवी मिरची वाटून/तुकडे ५-६ मिरच्या, आलं लसूण पेस्ट १ टीस्पून, ओलं खोबरं १ टेबल स्पून, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार, पाणी गरजेनुसार, जिरे, मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी.
कृती : एका कढईत तेल घालावे. तापले, की नंतर मोहरी, जिरे, हिंग, हळद घालावी. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, वाटलेले खोबरे परतावे. नंतर दुधी भोपळ्याचे तुकडे व भिजवलेली हरभरा डाळ व मीठ घालून परतावे. कढईवर झाकण ठेवावे व प्लेटवर पाणी घालावे. मंद आचेवर शिजू द्यावे. बोटांनी फुटणारी डाळ होईल तोपर्यंत शिजवावी. मंद आचेवर चांगली शिजते. गॅस बंद करावा. दुधी भोपळ्याची भाजी सर्व पथ्यामध्ये चालणारी व सौम्य असल्याने फुलक्‍यासोबत खाता येते.

चवळीची उसळ
साहित्य : चवळी अर्धा कप, कांदे २ मध्यम चिरलेले, टोमॅटो १ बारीक चिरून, लसूण ८-१० पाकळ्या, लाल तिखट १ टेबलस्पून, गोडा मसाला दीड टी. स्पून, धने-जिरे पूड १ टी. स्पून, कढीपत्ता ७-८ पाने, कोथिंबीर २ टेबल स्पून, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.
कृती : उसळ करायच्या आदल्या रात्री चवळी निवडून धुवून भिजवावी. दुसऱ्या दिवशी भिजवलेले पाणी टाकून पुन्हा स्वच्छ धुवून कुकरमध्ये २ वाट्या पाणी घालून चवळी शिजवावी. एका कढईत तेलाची फोडणी करावी. मोहरी, जिरे, हिंग, हळद व कढीपत्ता घालावा. बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा भाजला, की टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो मऊ पडू लागला, की ठेचलेला लसूण, लाल तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला घालून परतावे. उकडलेली चवळी पाण्यासहित घालावी. चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर उकळून मिश्रण दाट होईल. पाणी आटू द्यावे. कोथिंबीर घालून उसळ खाली उतरवावी. फुलक्‍यासोबत खूप छान लागते.

मटकीची रस्सा भाजी
साहित्य : मटकी १ कप, कांदा १, टोमॅटो १, आलं लसूण पेस्ट दीड टीस्पून, खोबरं कुटून २ टीस्पून, कांदा लसूण तिखट मसाला २ टेबल स्पून, गरम मसाला १ टीस्पून, हळद पाव टीस्पून, कोथिंबीर १ टेबलस्पून, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार, पाणी गरजेनुसार, जिरे, मोहरी, हिंग फोडणीसाठी, कढीपत्ता ७-८ पाने.
कृती : मोड आलेली मटकी धुवून, स्वच्छ करावी. कढईत तेलावर भाजून घ्यावी. दुसरीकडे एका पॅनमध्ये कांदा व टोमॅटो बारीक चिरून तेलावर भाजून थंड करावे. मिक्‍सरला पेस्ट करावे. एका पातेल्यात तेल घालावे. तेल तापले, की मोहरी, जिरे, हिंग, हळद व कढीपत्त्याची फोडणी करावी. नंतर त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट घालावी. तेलात चांगली भाजावी. पेस्ट भाजल्यावर खोबऱ्याची पूड, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला व मटकी घालावी. गरम पाणी ओतावे. मीठ घालून मटकी चांगली शिजू द्यावी. भाजी रस घट्ट किंवा पातळ हवा तसा ठेवू शकतो. मटकी शिजली, की कोथिंबीर घालून खाली उतरवावे. मटकीची रसभाजी भातासोबत, फुलक्‍यासोबत छान लागते. 
टीप : या भाजीत गरम पाणी ओतल्याने मटकी लवकर शिजते व टेस्ट छान होते.)

दोडक्‍याची रस्साभाजी
साहित्य : अडीचशे ग्रॅम दोडके, मूगडाळ/चणाडाळ पाव कप, तिळाचे कूट २ टेबलस्पून, लाल तिखट २ टीस्पून, काळा मसाला २ टेबल स्पून, ओले खोबरे १ टेबल स्पून, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार, पाणी गरजेनुसार, मोहरी, जिरे, हिंग, हळद फोडणीसाठी.
कृती : दोडक्‍याच्या शिरा काढून फोडी करून घ्याव्यात. मूग किंवा चणाडाळ १ तास आधी भिजत घालावी. कढीत तेल घालून फोडणी करावी. मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत भिजवलेली डाळ घालून वाफ आणावी. तिखट, काळा मसाला, मीठ घालून मिक्‍स करावे. त्यात दोडक्‍याच्या फोडी घालाव्यात. गरजेनुसार पाणी घालावे. दोडक्‍याचे काप शिजल्यानंतर ओल्या नारळाचा चव व तिळाचे कूट घालून उकळी येऊ द्यावे. शेवटी कोथिंबीर घालून भाजी मिक्‍स करावे. ही भाजी अगदी भाकरी, फुलके, पुलावसोबत छान लागते.

शेवगा फ्राय
साहित्य : चार शेवग्याच्या शेंगा, पाव कप शेंगदाण्याचा जाडसर कूट, लसूण पेस्ट १ टेबल स्पून, बारीक खोबरं १ टेबल स्पून, २ कांदे, लाल तिखट १ टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, तेल गरजेनुसार, मीठ गरजेनुसार.
कृती : प्रथम शेवग्याच्या शेंगा धुवून एका शेंगेचे ४-५ तुकडे करावे. एका पातेल्यात थोड्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून या शेंगा शिजवून घ्याव्यात. एका पॅनमध्ये तेल घालावे. तेल तापले, की त्यात कांदा परतावा. कांदा गुलाबी झाला, की लसूण पेस्ट, सुके बारीक खोबरे घालून परतावे. नंतर त्यात जाडसर कूट घालावा. हे मिश्रण परतत असतानाच लाल तिखट, हळद, गरम मसाला व मीठ घालून परतावे. शेवटी शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. पळीभर शेंगा शिजवलेले पाणी घालावे. कढईला झाकण लावावे. २-३ मिनिटांनंतर गॅस बंद करावा. शेवगा फ्राय चपाती, भातासोबत सर्व्ह करावी.

पनीर वाटाणा काळा मसाला
साहित्य : वाटाणा दीड कप, पनीरचे क्‍यूब पाव कप,२ टीस्पून हरभरा डाळ, २ टी. स्पून बाजरी, सुके खोबरे कीस २ टेबलस्पून, गरम मसाला २ टीस्पून, लाल तिखट दीड टेबलस्पून, धने-जिरे पूड दीड टीस्पून, हळद पाव टीस्पून, आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून, कांदा १ मोठा, मीठ चवीनुसार, पाणी गरजेनुसार, तेल गरजेनुसार.
कृती : प्रथम कांदा बारीक चिरून पॅनमध्ये तेलावर काळा होईपर्यंत भाजावा. सुके खोबरे भाजून घ्यावे. हरभरा डाळ व नंतर बाजरी भाजावी. कांदा, खोबरे, डाळ व बाजरी मिक्‍सरला वाटून पेस्ट करावी. पातेल्यात तेल तापायला ठेवावे. तेल तापले, की काळा मसाला घालून चांगला भाजावा. आलं लसूण पेस्ट घालावी व भाजून घ्यावी. त्यात गरम मसाला, लाल तिखट, धने जिरे पूड, हळद घालावी व परतावे. तेलावर फ्राय केलेला वाटाणा व पनीर घालावे. (वाटाणा तेलावर भाजला, की पटकन शिजतो) दाटसर भाजीनुसार गरम पाणी घालावे. उकळी येऊन वाटाणा शिजला, की गॅस बंद करावा. कोथिंबीर वरून पसरावी. पुरी, फुलके, भातासोबत सर्व्ह करावे.

डाळ-पालक 
साहित्य : पालक १ गड्डी, तूरडाळ अर्धा कप, कांदा १ चिरून, टोमॅटो १ बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट दीड टीस्पून, फोडणीसाठी मोहरी, जिरे प्रत्येकी एक टीस्पून, हिंग चिमूटभर, हळद पाव टीस्पून, हिरवी मिरचीचे तुकडे २ टेबल स्पून, लाल तिखट १ टेबल स्पून, तेल गरजेनुसार.
कृती : पालक निवडून स्वच्छ धुवून चिरावा. प्रेशर कुकरला पालक व डाळ वेगवेगळी शिजवून घ्यावी. शिजल्यावर डाळ व पालक एकत्र करून पळीने घोटून घ्यावी. पातेल्यात तेल घालून ते तापले, की मोहरी, जिरे, हिंग व हळदीची फोडणी करावी. कांदा घालावा. नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतावे. हे भाजले, की टोमॅटो परतावा. नंतर आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ घालून परतावे. पाणी घालावे. उकळी आली, की दाटपणाचा अंदाज घ्यावा. या भाजीला दाटसर रस्सा छान वाटतो. कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. ही भाजी पुरी व पुलाव सोबत छान लागते.

वांगी बटाटा रस्सा भाजी
साहित्य : चार वांगी मध्यम साईजची, चार बटाटे, कांदा २, लाल तिखट दीड टेबलस्पून, सुके खोबरे कुटून ३ टेबल स्पून, आले लसूण पेस्ट ३ टेबल स्पून, तेल गरजेनुसार, मीठ गरजेनुसार, चिंच व गूळ चवीनुसार, गोडा मसाला १ टीस्पून, जिरे, मोहरी प्रत्येकी पाव टीस्पून, हिंग चिमूटभर.
कृती : वांगी, बटाटे, कांदे यांच्या चौकोनी फोडी कराव्यात. प्रथम पातेल्यात तेल तापले, की मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करावी. प्रथम पातेल्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. तेलावर परतून वाफ आली, की वांगी व कांद्याच्या फोडी घालाव्यात. पातेल्याला झाकण ठेवून दोन वाफा द्याव्यात. भाजीत आलं लसूण पेस्ट घालून भाजी परतावी. नंतर कांदा, लसूण मसाला, कुटलेलं खोबरं घालून परतावे. भाजीला किती रस पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालावे. गोडा मसाला, चिंच, गूळ व मीठ घालून उकळी येऊ द्यावे. गॅस पूर्ण मंद करावा. मंद आचेवर भाजी चांगली शिजते. भाजी शिजल्यावर कोथिंबीर घालून रस्सा उतरावा. ही भाजी भात, फुलक्‍यासोबत खाऊ शकतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या