चविष्ट मिठाई

उमाशशी भालेराव 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळीचा सण जवळ आला, की दिवाळीखास फराळ बनविण्याची लगबग सर्वांच्या घरी सुरू होते. दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळी भेटायला येतात. त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी काहीतरी फराळाचे तयार हवेच. सर्वांचे तोंड गोड करायला हवे. नेहमी आपण लाडू, करंजी, शंकरपाळी बनवतोच. या खेपेस थोड्या वेगळ्या मिठाया करुन पाहू.

काजूकतली
साहित्य : २ वाट्या काजू, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा (मावा), जायफळ पूड पाव चमचा, चांदीचा वर्ख. 
कृती : मिक्‍सरमधून काजूची पूड करुन घेणे. खवा थोडा परतून भाजून घ्यावा. एका पातेल्यात साखर व थोडे पाणी घालून एकतारी पाक करुन घ्यावा. त्यात काजूची पूड घालून शिजवावे. साधारणः घट्ट गोळा झाला, की गॅसवरून खाली उतरवून त्यात भाजलेला खवा घालून नीट घोटून घ्यावे. जायफळ पूड घालावी. नंतर पोळपाटाला तूपाचा हात लावून हा गोळा पातळ लाटून घ्यावा व नंतर वड्या कापून वरती वर्ख लावावा. (पिस्त्याची बर्फीही अशीच करतात. फक्त त्याच जायफळ घालू नये)

बदाम बर्फी
साहित्य : २ वाट्या बदाम, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा, २ चमचे साजूक तूप, वेलची पूड.
कृती : बदाम भिजत घालून नंतर त्यांची साल काढून मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावी. हा वाटलेला गोळा तूपावर थोडा भाजावा. साखरेचा दोन तारी पाक करुन त्यात खवा व बदामाचा वाटलेला गोळा घालून शिजवावे. घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवून चांगले घोटावे. वेलची पूड घालावी. पोळपाटाला तुपाचा हात लावून हा गोळा लाटून घ्यावा व नंतर वड्या कापाव्यात. आवडल्यास वरती वर्ख लावावा.

आंबा बर्फी
साहित्य : १ कप हापूस आंब्याचा पल्प, दीड कप किसलेले पनीर, दीड कप साखर, १ कप मिल्क पावडर, पाव कप दूध, १ चमचा तूप, केशर, पिस्ते बदामाचे काप (सजावटीसाठी)
कृती : दूध व मिल्कपावडर एकत्र कालवून ठेवावे. मॅंगोपल्प मिक्‍सरमध्ये फिरवून घेणे व नंतर मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवावे. नंतर त्यात किसलेले पनीर व साखर घालून पुन्हा ४-५ मिनिटे शिजवावे. नंतर मिल्क पावडर, दूध यांचे मिश्रण घालून सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर तुपाचा हात लावलेल्या ताटात पसरावे. आवडीप्रमाणे वरती बदाम पिस्ते काप पसरावेत व त्यानंतर वड्या कापाव्यात.

मावा बर्फी
साहित्य : मावा (खवा) २ वाट्या, साखर दीड वाटी, केशर, वेलदोडा पूड, चारोळी, बदाम, पिस्ते.
कृती : माव्याच्या गुठळ्या हाताने मोडून मावा सारखा करुन घ्यावा. कढईत अथवा जाड बुडाच्या भांड्यात साखरेचा थोडे पाणी घालून पक्का पाक करावा. पाकाची साखर दिसू लागली, की पाक पक्का झाला असे समजावे. त्यात मावा घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. सगळीकडून बुडबुडे येऊ लागले, की लगेच उतरवावे. थंड होईपर्यंत सतत घोटत राहावे. नंतर वेलचीपूड व केशर घालावे. तुपाचा हात लावलेल्या ताटलीत हे मिश्रण ओतावे व नीट पसरून घ्यावे. थोड्या वेळाने हे मिश्रण आणखी थोडे घट्ट दिसल्यावर त्यावर चारोळ्या व बदाम पिस्त्याचे काप पसरावेत. या वड्या घट्ट होण्यास थोडा वेळ लागतो. 
(टीप - तीन भाग करुन, खाण्याचा रंग घालून तिरंगी बर्फी बनवता येते.)

गाजर बर्फी
साहित्य : २ वाट्या गाजराचा कीस (गाजरे छान लाल रंगाची घ्यावीत.), २ वाट्या साखर, २ वाट्या साखर, १ वाटी खवा, पाव वाटी साजूक तूप, वेलची पूड, काजू बदाम पिस्ते यांचे काप.
कृती : गाजराचा कीस तुपावर परतून वाफवून घ्यावा. नंतर तो कीस व साखर एकत्र शिजत ठेवावे. शिजत आल्यावर त्यात खवा घालून नीट एकजीव करुन पुन्हा शिजवावे. गोळा घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. तुपाचा हात लावलेल्या ताटलीत ओतून नीट पसरवून घ्यावे. त्यावर आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ते यांचे काप घालावे व नंतर वड्या कापाव्यात. (याच प्रमाणे दुधी भोपळा वा लाल भोपळ्याची बर्फी पण बनवता येते.)

खजूर बर्फी
साहित्य : बिया काढलेले खजूर १ कप, काजू बदाम पिस्ते यांची पावडर १ कप, २ चमचे साजूक तूप, गरजेप्रमाणे थोडी पिठीसाखर, वेलची पूड.
कृती : बिया काढलेल्या खजुराचे तुकडे करुन मिक्‍सरमधून एकजीव कुरन घ्यावे. २ चमचे साजूक तुपात सुकामेव्याची पूड मंद आचेवर २ मिनिटे परतून घ्यावी. नंतर एका ताटलीत खजुराचा लगदा, सुकामेवा पावडर, थोडी पिठीसाखर व वेलची पूड सर्व एकत्र नीट मळून घ्यावे व तुपाचा हात लावलेल्या ताटलीत पसरून वड्या कापाव्यात. (साखर नको असल्यास वगळता येते किंवा गोडीसाठी ३-४ चमचे पिठीसाखर घालावी.)

झटपट कलाकंद
साहित्य : कंडेन्स मिल्क ४०० ग्रॅम (४०० ग्रॅमचा डबा मिळतो) २५० ग्रॅम पनीर (अंदाजे दोन कप) किसून घेणे. वेलची पावडर, केशर, आवडीप्रमाणे सुकामेवा.
कृती : कंडेन्स मिल्क व किसलेले पनीर एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. एकजीव होऊन घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवावे. वेलची पावडर घालावी. तुपाचा हात लावलेल्या ताटलीत पसरावे. वरती केशर व आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे. तासभर फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्यावर वड्या कापाव्यात. 

बालुशाही
साहित्य : २ वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी आंबट दही, चिमुटभर सोडा, पाकाकरता साखर (अंदाजे ३ वाट्या), तळण्यासाठी तूप.
कृती : मैद्यात अर्धी वाटी तूप, दही व चिमुटभर सोडा घ्यावा. त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून कणकेप्रमाणे भिजवावे व मळावे. अर्धा तास हा गोळा झाकून ठेवावा. नंतर त्याचे लहानसे लाडवाएवढे गोळे करावेत व हे गोळे हाताने दाबून चपटे करावेत. हे चपटे गोळे मंद आचेवर तुपात तांबूस रंगावर तळून घ्यावेत. दुसरीकडे साखरेचा पक्का पाक करुन घ्यावा. त्यात हे तळलेले चपटे गोळे घालून ४-५ मिनिटे ठेवून नंतर तुपाचा हात लावलेल्या ताटलीत काढून घ्यावेत. पाक सुकला की बालूशाही तयार!

संदेश
साहित्य : अर्धा किलो पनीर किसून घेणे, १ वाटी साखर, केशर, वेलची पूड व सुकामेव्याचे काप.
कृती : कढईत पनीर व साखर एकत्र मिसळून कोरडे होईपर्यंत परतावे. नंतर त्यात वेलची पूड व केशर घालावे. पनीर कोरडे होताच कढई खाली उतरवावी. पनीर थोडे गरम असतानाच त्याचे गोळे करुन त्यांना आपल्या आवडीप्रमाणे आकार द्यावा. वरुन बेदाणे, काजू, बदाम, पिस्ते यांचे काप घालावेत. (ही बंगाली मिठाई सर्वांना खूप आवडते.)

चॉकलेट बर्फी
साहित्य : २ वाट्या खवा, १ वाटी साखर, ३ चमचे कोको पावडर, ४ चमचे दूध, वेलची पूड, तूप, वर्ख.
कृती : खवा व साखर एकत्र करुन चांगले मळावे व हे मिश्रण पुरण वाटण्याच्या यंत्रातून वाटून काढावे. नंतर हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. तूप सुटू लागले, की उतरवावे. वेलची पूड घालावी. या मिश्रणाचे चार भाग करावेत. पैकी तीन भाग तुपाचा हात लावलेल्या ताटलीत ओतून, नीट पसरून थंड होण्यास ठेवावे. उरलेल्या चौथ्या भागात कोको पावडर व दूध घालून पुन्हा मंद आचेवर घोटून हे मिश्रण शिजवावे. मिश्रण घट्ट होताच ताटलीतील बर्फीवर पसरून ओतावे व हा वरचा थर नीट सारखा करुन घ्यावा. वर वर्ख लावावा व वड्या पाडाव्यात. ही दोन रंगी चॉकलेट बर्फी छान दिसते व मस्त लागते.

ब्रेडची मिठाई
साहित्य : ३ वाट्या ब्रेडचा चुरा, १ वाटी खवलेले ओले खोबरे, १ वाटी खवा, ३ वाट्या साखर, अर्धी वाटी दूध, वेलची पूड, केशर वा खाण्याचा केशरी रंग, सुकामेवा.
कृती : ब्रेड स्लाईसच्या कडा कापून टाकणे व मिक्‍सरमधून ब्रेडचा चुरा करुन घेणे. खवा मंद आचेवर परतून घेणे. नंतर ब्रेडचा चुरा, खवलेले खोबरे व साखर व दूध एकत्र करुन शिजवणे. घट्ट होत आले, की त्यात परतून ठेवलेला खवा मिसळून एकजीव करुन घट्ट होईपर्यंत शिजवणे. केशर, वेलची पूड घालणे. (खाण्याचा केशरी रंग घालणे ऐच्छिक आहे. पण रंग घातल्यास केशरी बर्फी छान दिसते.) घट्ट शिजलेला गोळा तुपाचा हात लावलेल्या ताटात काढून नीट पसरावे. वरती आवडीप्रमाणे सुकामेव्याचे ताप घालावा. नंतर गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

पुरण पाक
(जरा वेगळ्या प्रकारची पण करण्यास सोपी अशी ही मिठाई आहे.)
साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, २ वाट्या ओले खोबरे खवलेले, ३ वाट्या साखर, वेलची पूड, सुकामेवा.
कृती : चण्याची डाळ शिजवून, पाणी काढून कोरडी करुन घ्यावे. व मिक्‍सरमधून एकदा फिरवून घेणे. ही वाटलेली चण्याची डाळ, खोबरे व साखर एकत्र करुन शिजवणे. सतत ढवळत राहणे. शिजून गोळा घट्ट झाला, की त्यात वेलची पूड घालावी. तुपाचा हात लावलेल्या ताटलीत गोळा पसरून घालावा. वरती आवडीप्रमाणे सुकामेव्याचे काप पसरावेत व वड्या कापाव्यात. वेलची पूड घालण्याऐवजी आवडत असल्यास व्हॅनिला इसेन्स घालावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या