आरोग्यदायी आंबा

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आंबा विशेष 

‘आंबा पिकतो I रस गळतो II 
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो II
‘ 
या बालगीतापासून आंब्याची जादू आपल्या मनावर राज्य करत असते. तुमचे आवडते फळ कुठले? या प्रश्नाला मराठी माणसाचे उत्तर ’आंबा’ हेच असते. अशा या फळांच्या राजाचा मधुर स्वाद, त्याची गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते. पिकलेल्या रसदार आंब्यात आणि त्यापूर्वीच्या त्याच्या कच्या कैरीच्या स्वरूपात पोषक अन्नघटकांची रेलचेल असते. जगभरातील एकूण आंबा उत्पादनाच्या अर्धे उत्पादन हे भारतात होते. मात्र भारतीयांना आंबा इतका प्रिय आहे, की या उत्पादनाच्या ९० टक्के हिस्सा हा भारतात फस्त होतो आणि केवळ १० टक्के निर्यात होतो. आकारात वैविध्य असलेला आंबा, ५ सेंमी ते १० सेंमी लांब, तर ४ ते १० सेंमी रुंद अशा आकारात दिसून येतो. त्याचे वजनही १५० ग्रॅम ते ७५० ग्रॅमपर्यंत भरते. बहारदार आंब्यात आढळणाऱ्या सर्वसाधारण अन्नघटकांकडे नजर टाकली, तर तो आरोग्याला किती पोषक आणि उपयुक्त आहे हे ध्यानात येते.       

आरोग्यविषयक लाभ

 •   आरोग्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे आंबा हा बदाम, अक्रोड अशा सुका मेव्या आणि साजुक तुपापेक्षा अधिक पौष्टिक ठरतो.
 • आंब्यात नैसर्गिकरीत्या भरपूर तंतुमय घटक असतात. या वनस्पतिजन्य तंतूंमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात. त्याचबरोबर जीवनसत्त्वे, खनिजे, पॉलिफीनॉलिक फ्लेविनॉइड तत्त्वे असलेले ॲण्टिऑक्‍सिडंट्‌स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. एका मान्यताप्राप्त संशोधनानुसार आंब्याच्या या गुणधर्मामुळे गुदाशय, स्तन आणि प्रोस्टेट यांच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच रक्ताच्या कर्करोगालाही दूर ठेवता येते. 
 •   आंब्यात जीवनसत्त्व अ, अल्फा आणि बीटा कॅरोटिन तसेच बीटा क्रिप्टोझॅन्थिन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते, त्वचा मृदू आणि तजेलदार राहते. त्याचप्रमाणे तोंडाच्या आणि आतड्यांच्या आंतरिक आवरणाचे आरोग्य सुधारते.
 •   आंब्याच्या नित्य सेवनाने फुफ्फुसाच्या आणि तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षण होते. आंब्यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब आणि हृदयाचे स्पंदन सुधारते आणि हृदयविकाराला आळा बसतो. 
 •   आंब्यातील क जीवनसत्वामुळे साथीच्या आजारांबाबतची प्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यासह श्वसनाच्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.
 •   क जीवनसत्वामुळे चयापचय क्रियेत निर्माण होणारी शरीरातील दूषित द्रव्ये उत्सर्जित होण्यास मदत होते. क जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. लहान मुलांच्या आणि किशोरवयीन वर्गाच्या मुलामुलींच्या हाडांची योग्य रीतीने वाढ होते. 
 •   आंब्यातील बी-६ जीवनसत्त्वाच्या उत्तम उपलब्धतेमुळे मेंदूतील जीएबीए या संप्रेरकद्रव्याची निर्मिती होऊन बौद्धिक शक्ती प्रखर होते.
 •   बी -६ मुळे रक्तातील होमोसिस्टीन या द्रव्याच्या पातळीत घट होते. होमोसिस्टीनची पातळी वाढल्यास त्याचा हृदयाच्या आणि मेंदूतल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू होण्याची शक्‍यता असते. फळांचा राजामुळे ही शक्‍यता दुरावते.
 •   आंबा खाऊन शरीराला मिळणाऱ्या तांब्यासारख्या खनिजाचा वापर रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये होतो. त्याचप्रमाणे चयापचय क्रियेत आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या पाचकरसांच्या निर्मितीसाठीसुद्धा तांबे उपयुक्त ठरते.
 •   आंब्याच्या सालीत विशेष वनस्पतिजन्य पदार्थ असतात. यांना फायटोन्यूट्रिअंट्‌स म्हणतात. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक ॲण्टिऑक्‍सिडंट्‌ससुध्दा आढळतात.

आंबा आणि मधुमेह
मधुमेहामध्ये आंबा खाऊ नये म्हणून उपदेश केला जातो. आंब्यातल्या अती गोडव्यामुळे हा समाज आहे. मात्र अमेरिकन डायबेटिस असोसिएशन आणि मेयो क्‍लिनिकमधील मधुमेह तज्ज्ञांच्या मते, आंब्याचा ग्लायसेमिक लोड खूप कमी असतो, त्यामुळे त्यातून रक्तातली साखर जास्त वाढत नाही. शिवाय त्यात शरीरासाठी पोषक असलेल्या ऑण्टिआक्‍सिडंट आणि फायबरमुळे मधुमेहींच्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनी अजिबात आंबा खाऊ नये असे म्हणणे रास्त ठरणार नाही. 
खबरदारी

मेंदूत किंवा शरीरातील रक्तवाहिन्यात रक्ताची गाठ निर्माण झाल्यास, ती विरघळविण्यासाठी रुग्णांना वॉरफॅरीन नावाचे औषध वापरले जाते. आंब्यात अ जीवनसत्त्व अधिक असल्यामुळे या औषधाची कार्यक्षमता जास्त होते. त्यामुळे रक्त जास्तीच पातळ होऊन रुग्णाला रक्तस्त्राव होऊ शकतो. या कारणाने वॉरफॅरीन घेत असलेल्या रुग्णांनी आंबा खाऊ नये.

कैरीमध्ये किंवा न पिकलेल्या आंब्यामधून एक तीव्र द्रवपदार्थ पाझरतो. कैरीचा ’चिक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाचे अनेकांना वावडे असते. या व्यक्तींना चिकाची रीॲक्‍शन येऊ शकते. यात बहुधा तोंड, ओठ, ओठांच्या कडा, जीभ या भागांवर खाज सुटणारे फोड येतात. क्वचित प्रसंगी थोडे गंभीर परिणाम होऊन ओठ सुजणे, तोंडात जखमा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या, मळमळ, जुलाब होऊ शकतात. या व्यक्तींनी कच्चे आंबे, कैऱ्या खाऊ नयेत. 

कच्ची कैरी कापून त्याला तिखट-मीठ लावून किंवा तशीच खाल्ली जाते. कैरीचे लोणचे ही मराठी माणसांची खास आवड आहे. मात्र हे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यास घशात खवखव होऊन खोकला येण्याचा त्रास अनेकांना होतो. लोणचात असलेले मिठाचे प्रमाण पाहता, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी ते खाऊ नये. 

कृत्रिमरीत्या आंबे पिकविणे
रसमधुर आंब्यांची लोकप्रियता पैशांमध्ये वटविण्यासाठी नैसर्गिकरीत्या पिकू देण्याऐवजी कृत्रिमरीत्या पिकवले जातात. आंबे पिकण्याआधी ते कैरीच्या स्वरूपात असताना त्यामध्ये आम्ल असते. पिकल्यानंतर आंबे गोड लागतात. फळातील बी परिपक्व झाले, की त्या झाडामध्ये नैसर्गिक एथिलीन तयार होते आणि ते झाडाच्या अंतर्गत रसवाहिन्यांमध्ये पसरते. हे एथिलीन फळामध्ये पोचले, की फळाच्या पेशींना सूचना जाते. त्यामुळे आंब्याच्या गरातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. काही काळाने या साखरेचे विघटन होऊन, सालीतील रंगद्रव्ये बदलतात आणि फळ पूर्ण पिकते. अशा नैसर्गिकप्रकारे आंबा पिकताना आंब्याचा रंग बदलून तो हिरव्याचा पिवळा, शेंदरी किंवा लालसर होतो. हवामानातील आर्द्रता आणि तापमान यावर पिकण्याची नैसर्गिक क्रिया अवलंबून असते. आंब्याला अढी घातली की, ते पिकतात. पण लवकर पैसा मिळवण्यासाठी कृत्रिमरीत्या ते पिकवून फेब्रुवारीपासूनच ’आंब्यांचे बाजारात आगमन’ अशा बातम्या दरवर्षी नित्यनेमाने पहायला आणि ऐकायला मिळतात.
आंबे पिकवण्याच्या कृत्रिम पद्धतीत कॅल्शियम कार्बाईडवापरून पिकविणे, आंब्यातील सालीवर सुदान रेड, मेथॅनॉल यलो लेड क्रोमेट अशा कृत्रिम रंगांचा किंवा काही तीव्र रासायनिक पदार्थांचा फवारा मारून ते पिवळे बनवून पिकल्याचा भास आणणे अशा पद्धती वापरल्या जातात. 

कसे ओळखावे 
बंगळुरू येथील असोसिएशन ऑफ फूड सायन्टिस्ट्‌स टेक्‍नॉलॉजिस्टस यांनी कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांबाबत विशेषतः आंब्याबाबत काही सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. 

 • कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा सुगंधित दरवळ, तो खातानाची चव आणि त्याच्या रसाचा स्वाद नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळांसारखा नसतो. 
 • नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याच्या सालीवर सुरकुत्या असतात. कृत्रिमतेने पिकवलेल्या आंब्यात त्या दिसत नाहीत.
 • कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याच्या फळांची वरची साल चमकदार आणि पिकलेली दिसते पण आत तो हिरवा असतो.
 • कृत्रिमरीत्या पिकवलेली आंब्याची फळे नैसर्गिकपणे पिकलेल्या फळांपेक्षा जास्त कोरडी असतात. त्यात रस अगदी कमी असतो.
 • कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा सर्व बाजूंनी समानरित्या पिवळाधमक दिसतो. नैसर्गिक आंब्यात सोनेरी, पिवळा, हिरवा, लाल अशा रंगांच्या छटा एकमेकात मिसळलेल्या आढळतात. 
 • आंबे खाण्यापूर्वी मिठाच्या किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यात धुऊन स्वच्छ केल्यास त्यावरील कीटकनाशके व रसायने निघून जातात.
 • हंगाम नसताना कुठलीही फळे खरेदी केली तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे टाळण्यासाठी एप्रिलचा महिन्याच्या अखेरीपर्यंत आंबे खरेदी करू नयेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात ते खरेदी करावेत. 

दुष्परिणाम

 • कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या आंब्यात अर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश राहतात. याचा परिणाम मेंदूवर होऊन डोक्‍यात जडपणा येणे, स्पर्शज्ञान आणि इतर संवेदनांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. 
 • आंबा पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक फवाऱ्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (कार्सिनोजेनिक) असतात. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांना कर्करोग होऊ शकतो.
 • कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा नियमितपणे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये या रसायनांमुळे मूत्रपिंडे, यकृत यांच्यात दोष निर्माण होऊन या महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते. कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकवण्याचे काम करणाऱ्या मजूर वर्गात चक्कर येणे, मूड बदलणे, गोंधळल्यासारखे होणे, स्मृती कमी होणे असे असंख्य आजार आढळून आले आहेत. 
 • गर्भवती स्त्रियांच्या सेवनात असा आंबा येऊन कॅल्शियम कार्बाईड पचनसंस्थेद्वारे गर्भाशयात जाऊन बाळामध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकतात.
 • या रसायनांमुळे असे आंबे खाल्ल्याने उलटी, जुलाब, सतत मळमळणे, चक्कर येणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात.

संबंधित बातम्या