‘लोक काय सांगतात...’

डॉ. श्रीराम गीत 
शुक्रवार, 15 जून 2018

कव्हर स्टोरी
 

इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील १६ लाख कुटुंबांमध्ये एकदाचा सुटकेचा निःश्‍वास टाकला गेला. काही हजार म्हणजे, नेमके सांगायचे तर ६६ हजार घरांत आनंदोत्सवाला सुरुवात झाली. म्हणजे, ६३ हजार स्टेट बोर्डाचे, तर तीन हजार सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी ९० टक्के पार करणारे निघाले. ८५ ते ९० टक्केवाले त्यापेक्षा जास्त होते. त्यांची संख्या जवळपास ९० हजार आहे. अर्थातच यानंतरच्या फर्स्ट क्‍लासमधील साडेपाच लाख व सेकंड क्‍लासमधील सव्वाचार लाखांच्या घरात असलेल्यांना नेहमीप्रमाणेच पडणारा यक्षप्रश्‍न सतावू लागला आहे. हा यक्षप्रश्‍न म्हणजेच सायन्स घ्यावे की कॉमर्सचा रस्ता पकडावा! 

नव्वद टक्केवाल्यांपैकी काही विचारी, सुज्ञ किंवा जगाच्या दृष्टीने वेडपट निघतात. त्यांनी आर्टसला जायचा निर्णय घेतलेला असतो. त्यांचा निर्णय कसा ठरणार हे कळायला किमान सहा-सात वर्षे जावी लागणार असतात. मात्र ८५ टक्‍क्‍यांच्या पुढच्यापैकी जेमतेम पाच टक्के म्हणजेच सात आठ हजार जणांची त्यांच्या स्वप्नातील वाटचाल बारावीनंतरच सुरू होते. उरलेल्यांपैकी बहुतेकांना पुन्हा नव्याने प्रश्‍न सामोरे येऊ लागतात. ते अगदी यक्षप्रश्‍न नसले, तरी झोप मात्र उडवतात. त्याची कारणे अगदी साधीशी असतात.. 

 • आयआयटीचा क्‍लास लावला अन्‌ पदरात काय पडले, तर दुय्यम इंजिनिअरिंग कॉलेज. 
 • ‘नीट’साठी नको एवढा खर्च केला आणि फक्त पात्रता पार करण्याइतपतच मार्क पडले. 
 • अट्टहासाने सायन्स घेतले; पण बारावीमध्ये ‘पीसीएम’ वा ‘पीसीबी’मध्ये पात्रतेइतपत म्हणजे १५०/३०० मार्कच पडले. 
 • मुलगा/सायन्स सोडून द्यायचे म्हणताहेत. 
 • कॉमर्स आवडीने घेतले, सीए करायचे म्हणून अन्‌ तेच नको असे चाललेय तिचे. 

साधारणपणे वय वाढले, शिक्षण संपले की एक वाक्‍य आयुष्यभर पाठ सोडत नाही. ‘लोक काय म्हणतील?’ मात्र तोपर्यंतचे एक वाक्‍य आता मला मात्र नक्की चांगले पाठ झाले आहे. 

‘लोक असे म्हणतात’, ‘लोक असे सांगतात’ 

मघाशी याआधी दिलेली निकालाची आकडेवारी पाहिली तर जवळपास अकरा-बारा लाखांना या वाक्‍याचा अगदी नित्यनियमाने येती दोन-तीन वर्षे सामना करावा लागतो. ९० टक्‍क्‍यांच्या पुढचे ६६,००० + ८५ टक्‍क्‍यांच्या पुढचे ९०,००० + साडेपाच लाख + सव्वाचार लाख अशी ही सारी विद्यार्थी मंडळी व त्यांचे पालक सध्याच्या व्हॉटस ॲपच्या जमान्याप्रमाणे ‘लोक असे म्हणतात’ ही वाक्‍ये फॉरवर्ड करत असतात, काय काय वाक्‍ये असतात या ‘लोकांची?’ 

 • सायन्स घेतले म्हणजे जास्त स्कोप असतो. 
 • सायन्समुळे ना लॉजिक सुधारते! 
 • कॉलेजमध्ये फुकटचा वेळ जातो. 
 • कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी असतो ना? 
 • त्यापेक्षा ते ‘टाय अप वाले कॉलेज कम क्‍लास’ कसे मस्तच! 
 • व्होकेशनल घ्यायलाच लागते. 
 • कॉम्प्युटर किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स घेतले की खूप छान असते बारावी सायन्सला! 
 • सीएसाठी अगदी अकरावीपासूनच तयारी हवी असते. 
 • यूपीएससीची तयारी दहावीपासूनच करायला हवी. 
 • आयआयटीसाठीचा क्‍लास तर आठवीतच लावतात म्हणे. 
 • फॉरिन लॅंग्वेज तर खूप उपयोगी पडते. 
 • ‘नीट’ची परीक्षा देण्यासाठी फक्त अकरावीपर्यंतचे गणित लागते. बारावीचे गणित नकोच ते! दोन्हीचा अभ्यास कसा झेपणार तो? 
 • स्पोर्टस मॅनेजमेंट केले, की छान पगाराची नोकरी मिळते. आयपीएलवाल्यांना त्यांची गरज असते. 
 • सर्वांत जास्त चर्चेत असलेले वाक्‍य म्हणजे, ‘सायन्समधून कुठे पण जाता येते. म्हणून आत्ता तरी सायन्सच घेणार आहे.’ 

यंदापासून बोर्डाने, सरकारने, शिक्षणमंत्र्यांनी आवर्जून एक नवीन पायंडा पाडला आहे. निकालाच्या धामधुमीत त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. पास झालेल्यांची टक्केवारी ८९.४१ टक्के आहे. मात्र सर्व अनुत्तीर्णांना अनुत्तीर्ण न म्हणता उरलेल्या १०.५९ टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेवर कौशल्यास पात्र असा शेरा असणार आहे. थोडक्‍यात कपाळावरची लाल रेघ काढून त्यांना कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. 

PMKVY किंवा पंतप्रधान कौशल्यविकास योजना याकरिता भारतभरातील अनेक संस्थांतून यासाठी अभ्यासक्रम सुरू आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कोर्सला प्रवेश घ्यायचे असे जे विद्यार्थी ठरवतात त्यांना ‘लोक असे सांगतात’ म्हणून परावृत्त केले जाते. अरे पुन्हा दहावी देऊन पास हो अन्‌ कॉलेजात जा. पदवीशिवाय काही अर्थ नाही बघ असा सल्ला देणारा बी.ए., एम. ए., बी. एड. करून गेली पाच वर्षे बेरोजगार असतो. बेरोजगार पीएच. डी. झालेल्यांनी उपोषण केल्याचे फोटोपण सर्व वृत्तपत्रात झळकले होतेच. तरीही दहावीला पहिल्या प्रयत्नात दोन विषयात कमी मार्क पडलेल्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी ‘लोक काय सांगतात’ याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. प्रथम कौशल्य विकास, उमेदवारी, नोकरी किंवा व्यवसाय व नंतर मुक्त विद्यापीठातून पदवी हा राजरस्ता आहे. त्याचा जरूर विचार करावा.

या प्रत्येक वाक्‍यानंतर ठराविक उत्तर असते, ‘असे लोक म्हणतात.’ पण ते का म्हणतात? ते खरे कसे? त्यावर विश्‍वास का ठेवायचा? तसेच केले तर नेमके यश कसे मिळते? असे यश मिळालेले एखादे तरी नाव सांगता काय? यापैकी एकाही प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर सोडाच; पण साधेसे उत्तरसुद्धा आजवर मला मिळालेले नाही. माझ्या ‘डॉक्‍टरच व्हायचेय’, ‘इंजिनिअरच व्हायचेय’ व ‘आर्मी जनरल व्हायचेय’ ही तीन पुस्तके प्रकाशित होऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही त्यांना तितकीच मागणी आहे. मात्र ‘असे लोक म्हणतात’ हे वाक्‍य दिवसातून एकदा तरी मी ऐकतच असतो. 

आता आपण लोकांचे का ऐकायचे म्हणून यातील एकेक वाक्‍य थोडेसे तपासून पाहिले तर? निदान ऐकावे जनाचे करावे मनाचे या नेमक्‍या वाटेची माहिती तर नक्की मिळेल ना? 

पहिले वाक्‍य व शेवटचे वाक्‍य एकत्रित पाहू या! जास्त स्कोप व सायन्स घेतले तर कुठेपण जाता येते याचा अर्थ असतो, कॉमर्स किंवा आर्टस पण दोन वर्षे सातत्याने, क्‍लास लावून, अभ्यास करून शिकलेले इकॉनॉमिक्‍स व अकाउंट्‌स हे विषय एका महिन्यात शिकून जुलैमध्ये तेरावीचा त्याच विषयांचा अभ्यास करणारा यशस्वी विद्यार्थी शोधावा लागतो. खरे तर असा विद्यार्थी सायन्समध्येही नक्की यशस्वी झालेलाच असतो. त्याला सायन्स आवडत नाही हे कळल्याने - जमत नाही हे समजल्याने नाही - तो हा बदल करत असतो. अशा लाखात एखाद्याने कॉमर्सकडे वळून पहिल्या प्रयत्नात सीए पास केल्याची उदाहरणे मला छान माहिती आहेत. मात्र सायन्स घेऊन बघू - वाजली तर पुंगी नाहीतर गाजर खाऊन टाकू म्हणणारे तोंडघशी पडतात. खरेतर डॉक्‍टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ होण्यापेक्षा वेगळे काहीही जास्त स्कोप सायन्समध्ये नाहीत. एनडीएला जायचे म्हणून सायन्स घेतले असे सांगणारे ७०-७२ टक्के वाले दहावीचे विद्यार्थी नित्यनियमाने भेटतात. बारावीपर्यंत त्यांची दमछाक होऊन ४५ टक्के होतात. पण एनडीएला कोणतीही बारावी चालते. मात्र गणित गरजेचे असते हे लक्षात घेतले जात नाही. तीच गोष्ट आर्किटेक्‍चरची! गणित व बारावी पुरेशी असते. गरज असते ती ‘नाटा’ पास होण्याची. सायन्स घेतले तर ‘नाटा’चा अभ्यास होत नाही. त्याचा क्‍लास लावला तर ‘पीसीएम’चा कळत नाही. 

कॉलेजमध्ये फुकट वेळ जातो. तिथे शिकवत नाहीत. अटेंडन्स कंपल्सरी असतो. टायअप कॉलेज कसे मस्तच! कॉलेज प्रवेशासाठी रडारड करणारे, कॉलेज एकदम किती फालतू ठरवतात. कॉलेजची फी भरून ती वसूल करण्याची गरजसुद्धा विद्यार्थी-पालकांना वाटत नाही. कॉलेजच्या पाचपट ‘टायअप’ची फी भरणारे तिथे काही कळलेच नाही म्हणून गेले पंधरा दिवस रोजच भेटत आहेत. बारावीचा निकाल व जेईईचा निकाल लागल्यापासून हे कवित्व रोजच ऐकत आहे. तरीही आता दहावीवाले सांगत आहेत. ‘असे लोक सांगतात..’

व्होकेशनल म्हणजेच सर्वस्व. त्याचा अट्टहास करायचाच. त्यात छान मार्क मिळवायचेच. अहो पण जेईई, सीईटी, बारावीमध्ये अभ्यास आहे. फिजिक्‍स, केमिस्ट्री, गणिताचा! मार्क ही फक्त त्याचेच धरणार आहेत ना? बारावी ४५ टक्के, सीईटी ५० व जेईई ९ असे मार्क मिळवलेले एक चिरंजीव नुकतेच समोर आले. त्यांना विचारले, ‘तुझे विषय काय होते?’ उत्तर होते, ‘माझा काँप्युटर सायन्स विषय होता बारावीला. मला हॅकिंग छान येते. प्रोग्रॅमिंग आवडते.’ स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा हा राजरस्ता आहे. मात्र ‘असे लोक सांगतात,’ म्हणून व्होकेशनल घेतले जातेच. 

सीए, यूपीएससी, आयआयटी, आयसर ही नावे साऱ्यांसाठी नाहीत. हुशारी उपयुक्त; मात्र सातत्य, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती, जिद्द व परिपूर्ण अभ्यास यांची या साऱ्यासाठी गरज जास्त! यातील आपल्या मुलामुलींत काय काय व किती आहे याचा क्षणभर विचार केला तर? नाहीतर लावला क्‍लास अन्‌ पोचले तिथे; ही अपेक्षा वल्गना ठरते व नैराश्‍याची कायमची पसरण सुरू होते. आपण फॉरिन लॅंग्वेज आठवी ते दहावी शिकतो. नंतरचे पुन्हा अकरावी-बारावीत शिकवले जाते. हे पण आपल्या गावी नसते. मात्र एखादी लॅंग्वेज शिकलेले बरे ‘असे लोक सांगतात.’ म्हणून आपण ती शिकत राहतो. प्रत्यक्षात कोणतीही फॉरिन लॅंग्वेज तीन ते साडेतीन वर्षे शिकून तिचा व्यावसायिक उपयोग होतो. मग अकरावी-बारावी नीट अभ्यास करून, चांगले मार्क मिळवून त्या शिक्षणाचा रस्ता धरला तर? कदाचित आर्टससाठीचा एक विषय म्हणून हे ठीक आहे. अन्य शाखांतील पालकांनी क्षणभर विचार केला तर? 

मेडिकलचा ध्यास, जिद्द, हट्ट जरूर घ्यावा. पण त्यातील स्पर्धा समजून घ्यावी. ही स्पर्धा आमदार, खासदार बनण्यापेक्षासुद्धा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याइतकी अतितीव्र आहे. एवढेच इथे नमूद करावेसे वाटते. मग या स्पर्धेसाठी फिजिक्‍स हा विषय महत्त्वाचा आहे. त्यातील बारावीचा अभ्यास करताना गणिताचा उपयोग होतो. गणितातील मार्कांपेक्षा म्हणजेच बारावीच्या गणितापेक्षा त्या उपयोगासाठी गणित ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरते. किंबहुना गणिताची भीती नसेल त्यांनी बारावीपर्यंत गणित घेतले तर त्याचा फायदा अनेक परीक्षांत होतो. सीए, यूपीएससी, एमबीए प्रवेशपरीक्षा, बॅंकांच्या प्रवेशपरीक्षा, इंडियन मिलिटरी अकादमी या साऱ्यामध्ये हा उपयोग होतो. मात्र इथेही ‘लोक सांगतात’, आणि ‘पीसीबी’वाले गणित सोडून देतात. मेडिकल नाही मिळाले तर काय करायचे याचे उत्तर मात्र लोक देत नाहीत व ती उत्तरे ऐकली तर विद्यार्थी व पालकांना ती आवडत नाहीत, पसंत तर अजिबातच नसतात.

असा हा लोकांचा सांगावा. 
मनोमन नीट ऐकावा. 
त्याचा अर्थ शोधावा. 
पहिल्या दीड लाखांनी 
(म्हणजे ८५ टक्के व जास्त) 
तीव्र स्पर्धेचा नीट अंदाज घ्यावा. 
उरलेल्या दहा लाखांनी बारावीचा काठ आताच्याच मार्कांनी गाठावा. 
प्रत्येकाची कहाणी सुफळ, संपूर्ण व्हावी 
एवढाच या लेखाचा ठेवा... 

संबंधित बातम्या