नदी सुधार म्हणजे काय?

केतकी घाटे  
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

विशेष

‘सेपियन्स’ या पुस्तकाचा लेखक युवाल हारारी म्हणतो, ‘‘आपल्यापैकी प्रत्येक जण एका काल्पनिक आज्ञेला (imaginary order) धरून जगत असतो.’’ यात काय चूक किंवा बरोबर हे न शोधता त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही हे मान्य आपण करू. त्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पंथात मोडतो : आस्तिक, नास्तिक, विकासवादी, पर्यावरणप्रेमी, विवेकवादी, तत्त्ववादी, स्त्रीमुक्तिवादी इत्यादी. तसेच असा कुठलाही पंथ मान्य नसणारेदेखील असतात. पण तोदेखील एक पंथच आहे की! 

मुद्दा असा आहे, की या आपल्या काल्पनिक आज्ञावलीमुळे आपले किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांचे किंवा इतर सृष्टीचे काही भले होते आहे की नुकसान? सध्या राज्यात, देशात जे नदी सुधार प्रकल्पांचे लोण आलंय त्याबाबतीतदेखील हाच कूटप्रश्‍न दिसतो. ‘नदी सुधार’ म्हणजे नक्की काय ?

विविध विचारधारांचे विविध पंथ 
नदी ही सगळ्यांचीच आहे त्यामुळे कोणी एका पंथाने यावर निर्णय घेऊन उपाययोजना करावी हे योग्य वाटत नाही. शासन जरी असले तरी ते राबविणारे अधिकारीदेखील कुठल्या ना कुठल्या पंथाचेच असतात. नदी ही तिची स्वतःचीदेखील आहे यावर शेवटी चर्चा करू. परंतु तूर्त निदान तिच्यावर सर्व पंथाचा समान हक्क आहे हे तरी मान्य करून पुढे जाऊ. या लेखाचे प्रयोजन एवढेच की यातून आपण सर्वसमावेशक, एकांगी विचार नसलेला, असा मार्ग काढू शकतो काय? 

सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा
सर्वसामान्य नागरिकांची मागणी एवढीच आहे, की नदी स्वच्छ, सुंदर दिसावी. इथे सर्वसामान्य नागरिक म्हणजे सर्वांत मोठा गट. त्यांनी नदीचा ‘अभ्यास’ असा केलेला नाही. त्यामुळे नदी स्वच्छ सुंदर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. नदीचे नैसर्गिक सौंदर्य काय हे त्यांना ठाऊक नाही. स्वाभाविकपणे ते ही जबाबदारी शासनावर सोडतात. परंतु लोकप्रतिनिधी नागरिकांमधूनच आलेले असल्याने त्यांची भूमिकादेखील साधारण अशीच. यांच्यातल्या धार्मिक लोकांची मागणी अशी, की त्यांना नदीपर्यंत जाऊन धार्मिक विधी करता येतील अशी केवळ सोय असावी. नदीची आपण माता/आई म्हणून जरूर पूजा करतो परंतु ही भावना आचरणात आलेली दिसत नाही. उलट आपण नदी एक ‘सिंक’ म्हणून, म्हणजेच सांडपाणी/कचरा टाकण्याची एक जागा म्हणून वापरत आलो आहोत. नदीत जाणारे सत्तर ते ऐंशी टक्के सांडपाणी हे घरगुती वापरातून तयार होते. त्याचे दुष्परिणाम माणसाला घातक आहेत. विषमज्वर, जुलाब, अतिसार, कॉलरा इत्यादी अनेक रोग अशा दूषित पाण्यामुळे होतात. ही जबाबदारी शासनाने घेतली असली तरी शासन ते योग्यप्रकारे करते का हे आपण तपासतो का? 

शासनाचा दृष्टिकोन
शासन चालते विविध अधिकाऱ्यांच्या जोरावर. हे अधिकारी, त्यांच्या औपचारिक शिक्षणाबरोबर, वैयक्तिक आयुष्यात अनुभवातून काय शिकले, त्यांच्या प्रेरणा कोणत्या, त्यांची मूल्ये कोणती इत्यादी गोष्टींवर अनेक निर्णय अवलंबून असतात. सर्वसाधारण दिशा बघता बरेचसे अधिकारी हे विकास म्हणजे पायाभूत सुविधा आणि त्यातली भव्यता वाढवत ठेवण्यात यश मानणारे आहेत. त्यामुळे नदीतील प्रदूषण आवाक्‍याबाहेर गेलं, की सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारायचे; परंतु सांडपाणी थेट नदीत जाणार नाही किंवा सांडपाण्यातले घातक घटक कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. लोकसंख्या मर्यादित होती तोवर फारशा उपाययोजना कराव्या लागत नव्हत्या. पूर्वी जे काय सांडपाणी नदीत जात होतं ते शुद्ध करण्याची नदीत क्षमता होती. अर्थात तेव्हा सांडपाण्याचे घटकही वेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थ, आपल्याच कुटुंबातील दोन पिढ्यांपूर्वी असणारा शाम्पूचा वापर आणि आत्ताचा वापर यात फरक आहे.
जीवनशैलीतील बदलामुळे केवळ नदीतील प्रदूषण वाढत आहे याची सर्वसामान्य नागरिकांना जाणीव आहे का? असली तर अजूनही ते सगळी जबाबदारी शासनावरच टाकू इच्छितात, की काही प्रमाणात स्वतः त्याकरता उपाययोजना करू इच्छितात? यात शासनाचा कार्यभाग काय तर ही बदललेली परिस्थिती उलगडून जनतेला सांगणे आणि केवळ जनतेच्याच हातात असणाऱ्या गोष्टींची जबाबदारी जनतेवरच टाकणे. उदाहरणार्थ, जरी जनतेला पटलं की शाम्पू वापरणे नदीकरता धोकादायक आहे, तरी ती रोग-पश्‍चात उपाय योजनाच होते. शाम्पू तयार करणाऱ्या कारखानदारीला आपण थांबवणार का? शासन हे का करत नाही कारण शासनकर्ते एका विशिष्ट आणि व्यापक आज्ञेचे पालक आहेत असं ते मानतात. काय आहे ही सर्वोच्च आज्ञा तर ‘अर्थव्यवस्था ! त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारखानदारी थांबवणे म्हणजे प्रगतीवर घाला असल्याने शासन हे करत नाही. आणि ही आज्ञा जिला मान्य नाही ती व्यक्ती अर्थातच तिथे काम करू शकत नाही. काही व्यक्ती तरीही काम करताना दिसतात. त्या खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकत नाहीत पण छोटे छोटे बदल घडवत राहतात. परदेशात दिसते तशी स्वच्छ आणि सुंदर नदी यांना हवी आहे. कमी खर्चात नदी सुधार यांना फारसा मान्य दिसत नाही किंवा असे उपाय सांगणारे लोक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. आता पुढचा मुद्दा असा येतो की यात अयोग्य ते काय? आणि कुणासाठी अयोग्य? या आज्ञेचे पालन करणाऱ्यांना तर हे योग्यच वाटते. मग अयोग्य कुणाला वाटते तर काही पंथांना. नदीचा विचार करता इतर पंथ कोणते तर पर्यावरणवादी, धर्मवादी, सजग नागरिक, सजग अभियंते किंवा स्थापत्यकार इत्यादी. 

पर्यावरणवाद्यांची भूमिका
पर्यावरणवादी म्हणजे जे पर्यावरण या विषयात शिक्षण घेऊन पर्यावरण संवर्धनाची भूमिका मांडत आहेत असे. यातले बरेचसे औपचारिक शिक्षण न घेता पर्यावरणकरता काम करणारेदेखील आहेत यांना पर्यावरणप्रेमी म्हणूयात. पण एकंदर या पर्यावरणवाल्यांना माणसाचा केवळ भौतिक विकास काही फारसा मान्य नाही. म्हणजेच शासन आणि सर्वोच्च आज्ञा ‘अर्थव्यवस्थेच्या, विरोधातील’ ही भूमिका. त्यातून हा विकास जर निसर्गाला पिळून काढणारा असेल तर निश्‍चितच मान्य नाही. त्यामुळे शासन विरुद्ध पर्यावरणवादी हा झगडा सतत राहतो. परत पर्यावरणवाद्यांमध्ये काही जहाल मतवादी आहेत तर काही मवाळ. जहाल म्हणजेच विरोध करण्यावर भर असणारे आणि मवाळ म्हणजे काही आपापल्यापरीने काम करणारे आणि जो ऐकेल अशाच व्यक्तीला सल्ला देणारे. यातल्या जहाल गटापासून दूर राहणे शासन पसंत करते तर मवाळ गट आपणहून शासनापासून दूर राहतो. थोडक्‍यात काय पर्यावरणवाद्यांची भूमिका शासनाला कळावी अशी सोयच आपल्या समाजात नाही. आपला आवाज शासनाने ऐकावा याकरिता त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. तर पर्यावरणवाद्यांची नदीबाबतली भूमिका काय तर प्रस्तावित नदी सुधार प्रकल्प होऊ नये हा आग्रह. का होऊ नये तर यात नदीचा परिसंस्था म्हणून विचारच नाही. नदी शहरातून वाहत नाही; तर ‘आपण’ नदीच्याकाठी वस्ती केली आहे, हे आपण विसरलो आहोत. पर्यावरणशास्त्रानुसार नदीचा विकास म्हणजे नदीचं पात्र, तिचे काठ, तिच्यातले अनेक आसरे, विविध भौतिक आणि जैविक बाबी आणि या सगळ्याशी वर्षानुवर्षे घट्ट नातं सांगणाऱ्या जैवविविधतेचा विकास. आणि नेमक्‍या ह्याच गोष्टी शासनाने नदी सुधार प्रकल्पातून वगळलेल्या दिसतात. आणि नदीच्या नैसर्गिकपणाच रूपांतर कृत्रिमपणात करण्याकडे कल आहे. आता हे इथे निश्‍चित मान्य करायला हवं, की सध्याची नदीची स्थिती काही फार बरी नाही. तिच्यात काही काळापूर्वीचा नैसर्गिकपणा राहिलेला नाही. हा नैसर्गिकपणा शहरापासून जरा दूरवर मात्र दिसतो. पुण्याच्या किंवा कुठल्याही एखाद्या शहराच्या बाहेर नदी जशी सुंदर स्वच्छ दिसते तशी शहरात दिसत नाही. मुख्य म्हणजे तिचे काठच बदलले आहेत. अनेक शहरात नदीला भिंती बांधून नालाकरण केले आहे. यामुळे अनेक नैसर्गिक प्रक्रिया बदलल्या. यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्यात बाधा आलीच, बरोबरीने तिची कार्यदेखील थांबली. आता या बदललेल्या रुपाला बदलण्याची घाई अनेक जणांना आहे. त्यातलेच एक म्हणजे सर्व मानवी वस्त्या नीटनेटके करणारे वास्तू-विशारद किंवा विकसक. हा आपला पुढचा पंथ.

नियोजनकार आणि विकसकांची भूमिका 
वास्तू-विशारद किंवा विकसक नदीकरता चोख अभियांत्रिकी उपाययोजना सुचवत आहेत. याकडे सौंदर्य दृष्टीने बघण्याची कला अर्थातच यांच्याकडे आहे. मुख्य म्हणजे ही मंडळी ना जहाल आहेत ना मवाळ. यातली बरीचशी मंडळी सर्वोच्च आज्ञेचे पालन करणारी आहेत आणि त्यामुळेच शासनाशी जुळवून घेणारी आहेत. यांनी नदी स्वच्छ सुंदर करण्याकरिता अचूक गणितं मांडली आहेत. सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून पाइपच्या सहायाने ते एका ठिकाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया करून नदीत सोडण्याचे योजिले आहे. नालीकरण उंच करून नदीला दोन भिंतीतून वाहून नेण्याची योजना आहे. ही सर्वसाधारण कल्पना अनेक देशात राबवली जाते. एरवी पाणी पसरून वाहतं ते बंदिस्त केलं की भरपूर दिसतं. भूजल-अभियंतेदेखील या योजनांचा भाग असतात. त्यामुळे पुरासारख्या घटनांमध्ये नदीत येणाऱ्या पाण्याचं गणित मांडून योजना केली जाते. ती अचूक असावी असं मान्य करायला फार हरकत नाही. बरोबरीने ही सगळीच योजना मुख्यतः शहरात राहणाऱ्या ‘नागरिकांकरिता’ आहे. त्यामुळे इथे ठिकठिकाणी बसण्याची सोय, कट्टे, हिरवळ, कॅफे, मॉल्स, नदीकाठच्या देवळांना लागून असलेल्या घाटांचे पुनरुज्जीवन इत्यादी मनोरंजक आणि आरामदायक गोष्टींची रेलचेल असेल.

नैसर्गिक सौंदर्य की कृत्रिम सौंदर्य?
या योजनेत अनेक पंथांना अडचण वाटत नाही, कारण सगळेच जण नदीकडे एक संसाधन म्हणून बघत आहेत. ती आपण आपल्याला हवी तशी बदलू शकतो ही एक धारणा आहे. या धारणेचे लोक नदी स्वच्छ-सुंदर करू इच्छितात, परंतु ही सौंदर्यदृष्टी जरा वेगळी आहे. नदीच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याकडून तिला कृत्रिम सौंदर्याकडे नेण्याची ही योजना आहे. शहराबाहेरील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेली नदी सुंदर नसते काय? तिथे बसायला जागा नसतात काय? तिथे सुंदर किंवा सावलीची झाडे नसतात काय? तर निश्‍चितच असते हे कुठलाही नागरिक मान्य करेल. कदाचित हा अनुभव निसर्गप्रेमींना अधिक भावेल परंतु हा अनुभव महत्त्वाचा नाही काय? शहरात एरवी सर्वत्रच मनोरंजक आणि सोयीसुविधांनी युक्त गोष्टी असतात. असायलाच हव्यात. परंतु नदी या नैसर्गिक संस्थेकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो काय? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असे आहे कारण नदीकडे नदी म्हणून बघणे आपल्याला कोणीही शिकवले नाही. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आराखडे बनवणारे वास्तू-विशारद, अभियंते इत्यादी नियोजनकार आणि ते राबविणारे शासन किंवा विकसक यांच्या हातात आहेत. यांच्यातल्या कुणीही त्यांच्या अभ्यासक्रमात नदी किंवा कुठल्याही परीसंस्थेचा विचार आराखड्यात अंतर्भूत ‘का’ आणि ‘कसा’ करायचा हे शिकलेले नाहीत. परिणामी नदीसारख्या नैसर्गिक परिसंस्थेलादेखील कृत्रिमतेकडे नेण्याचा आग्रह दिसतो. हा पूर्णतः मानवकेंद्री दृष्टिकोन होतो. नदी केवळ शहरातून वाहते म्हणून तिला लगेच सुख-सोयी-मनोरंजनयुक्त करणे हे शास्त्रीयदृष्ट्या कितपत योग्य आहे? 

नदीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिल्यास ...
नदी ही एक नैसर्गिक संस्था आहे. शास्त्रीयदृष्ट्या तिच्या शहरातून वाहणाऱ्या तुकड्याकडे वेगळं बघता येत नाही. उगमापासून मुखापर्यंत म्हणजेच डोंगरापासून समुद्रापर्यंत असा तिचा प्रवास असतो. या दरम्यान ती विविध भूरुपांमधून वाहते. मुख्य म्हणजे तिचा पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त किमान प्रवाह हा या भूरुपातून येतो ज्यावर नदीतले सगळे जैविक घटक अवलंबून असतात. पाणलोट क्षेत्राच्या जमीन वापरानुसार तसेच तिथे असणाऱ्या जंगलाच्या, विविधतेच्या स्थितीनुसार नदीची गुणवत्ता ठरते. प्रवाह, पूर, पूर-क्षेत्रे, नागमोडीपणा, काठ, काठांवरची दाट जंगले, पात्रातल्या आसऱ्याची विविधता आणि संलग्न जैवविविधता म्हणजेच नदी ! यातले सगळे घटक हे कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या कालमानात नैसर्गिकपणे बदलत असतात. या सगळ्या परिस्थितीमुळे तसेच इतर जिवांना पिण्यायोग्य आणि वापरासाठी पाणी मिळते. मानवाकरता ही नदीची मुख्य सेवा आहे. बरोबरीने इतरही काही सेवा नदी देत असते. जसे की पूर नियंत्रण, पाण्याचं शुद्धीकरण, नदीकाठी शेतीयोग्य सुपीक जागा इत्यादी. अर्थात या सर्व सेवा नदी नैसर्गिक स्थितीत असेल आणि तिचा वापर करणारी लोकसंख्या मर्यादित असेल तर अधिक लाभदायक ठरतात. उदाहरणार्थ पूर नियंत्रण परिणामकारक तेव्हाच ठरेल जेव्हा नदीचे काठ, पूर-क्षेत्रे, काठावरचे जंगल, तिच्या काठच्या पाणथळजागा शाबूत असतील. आणि ही नैसर्गिक स्थिती राखली तर ही सेवा चिरंतन उपभोगण्याची संधी मानवाला असते. अशी सेवा कृत्रिमरीत्या तयार करणे अशक्‍य वाटते. ही सेवा नदी वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या आणि अखंड देत आहे. इथे कुठेही देखभालीचा खर्च नाही. नदी सुधार योजना या सर्व गोष्टींना पर्याय उपलब्ध करून देणार आहे का? ही प्रस्तावित सुधारणा आणि सौंदर्य देखभाल न करता किती काळ टिकणार? नदीच्या सेवा घडण्यासाठीदेखील नदीला लाखो ते करोडो वर्षे लागली आहेत. हा कालखंड बघता या सेवा जपणे आणि नदी शक्‍य तितकी नैसर्गिक ठेवणे मानव जातीच्या हिताचे वाटते.
पूर्वीचा मानव जसा या निसर्गावर थेट प्रत्यक्ष अवलंबून होता तसा आताचा आधुनिक मानव नाही, परंतु अप्रत्यक्षरीत्या याच निसर्गावर अवलंबून आहे याची जाणीव आपल्यापैकी अनेक जणांना नाही. थोडक्‍यात काय तर नदीसाठी किंवा कुठल्याही एका नैसर्गिक संस्थेसाठी सर्व पंथांनी मिळून ‘शाश्‍वत मूल्याधारित उपाययोजना’ करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. याकरिता सर्व पंथांनी एकत्र येऊन आपापल्या मूल्यांची चर्चा करणे हीच पहिली पायरी असू शकेल. नदीची बाजू मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

फोटो फीचर

संबंधित बातम्या