‘खेलो इंडिया’ यशस्वी?

किशोर पेटकर
गुरुवार, 31 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी
देशात क्रीडा संस्कृतीचा विकास आणि प्रसार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ ही स्पर्धा सुरू केली. यंदा पुण्यात झालेल्या या स्पर्धेचे हे दुसरेच वर्ष, पण या दोन वर्षांत स्पर्धा सुरू करताना ठरवलेल्या उद्देशांची पूर्तता आहे का? की ही स्पर्धा केवळ पांढरा हत्ती ठरतोय? याचे विश्‍लेषण... 

आकाशवाणीवरून प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘खेलो इंडिया स्थानिक पातळीवरील खेळाडूंना जागतिक पातळीवर चमकण्यासाठी व्यासपीठ मिळवून देते.’  हो, ‘खेलो इंडिया’ स्पर्धा त्याच उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केली आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे पर्व रंगले. बालेवाडी-पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अमाप उत्साह दिसला. ३१ जानेवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत पहिल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे पंतप्रधान मोदी यांनी उद्‌घाटन केले. तेव्हा १६ खेळ होते आणि २०९ सुवर्णपदके. खेळाडूंचा वयोगट १७ वर्षांखालील होता. शालेय पातळीवरील क्रीडा संस्कृतीला खतपाणी घालणारी स्पर्धा ही ओळख ‘खेलो इंडिया’द्वारे देशाला झाली. यंदा स्पर्धेचा आवाका वाढला. २१ वर्षांखालील आणखी एक वयोगट आला. याचाच अर्थ महाविद्यालयीन पातळीवरील क्रीडापटूंनाही प्रोत्साहन लाभले. साहजिकच स्पर्धेचे नामकरण ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धा असे झाले. १८ खेळांचा समावेश झाला. ४०३ सुवर्णपदकांसाठी पुण्यात जोरदार चुरस अनुभवायला मिळाली. स्पर्धेचे दुसरे पर्व कमालीचे यशस्वी ठरले. अगदी तळागाळातील क्रीडापटूंना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरण्याची संधी मिळाली. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी त्याचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आमच्या क्रीडांगणावरील स्थानिक ‘इकोसिस्टीम’ भक्कम असेल, तरच आमचा पाया मजबूत होईल. तेव्हाच आमचे युवा देशात आणि जगभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील.’ ‘खेलो इंडिया’ने देशातील युवा क्रीडापटूंना नवी आश्‍वासक दिशा दाखविली आहे. केवळ खेळून भागत नाही. मैदानावर यशाला गवसणी घालण्यासाठी खडतर परिश्रम, त्याग, चिकाटी, शास्त्रोक्त प्रशिक्षण यांची गरज भासते. आवश्‍यक आर्थिक सुबत्ताही हवी. पैशांशिवाय प्रगती अशक्‍यच. दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धांसाठी प्रवास, समतोल आहार यांची सांगड घालण्यासाठी खर्चही खूप येतो. अशा परिस्थितीत गुणवान युवा क्रीडापटूंचे पालक हतबल ठरतात. मुलांची क्रीडा मैदानावरील वाढ खुंटते. अकाली कोमेजलेली क्रीडा गुणवत्ता देशात खूप आहे. शालेय पातळीवर खेळून झाले, की गरिबीमुळे मुलांना क्रीडांगणावरील वाट मोडावी लागते. संसाराचा गाडा चालवावा लागतो. उपाशीपोटी खेळून काही पुढे सरकता येत नाही. जीवन सैरभैर बनते. त्यामुळे जास्त वेळा शहरी भागातील मुलेच प्रगतिपथावर दिसतात, तर ग्रामीण मुलं संसाररुपी चक्रव्यूहात अडकतात. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून केंद्र सरकारला हे प्रतिकूल चित्र बदलायचे आहे, त्यास गेल्या वर्षीपासून प्रेरक सुरुवात झालेली आहे. देशात ‘खेलो इंडिया’द्वारे क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ठोस अशी सकारात्मक पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे.

आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ
शालेय पातळीवर खेळत असताना मुलांना फक्त खेळायचे असते, त्यानंतर व्याप्ती वाढत जाते. तुटपुंजी मिळकत असलेल्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचा आणि जोडून येणाऱ्या क्रीडा गुणवत्तेचा खर्च झेपत नाही. त्यासाठी ‘खेलो इंडिया’ने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘खेलो इंडिया’द्वारे देशभरातील एक हजार प्रतिभाशाली खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यांना दर वर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती आठ वर्षांसाठी दिली जाणार आहे. त्यामुळे शालेय पातळीवरूनच खेळाडूंना पैशांची चणचण भासणार नाही. ते केवळ सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घेऊन क्रीडा मैदानावर घाम गाळू शकतील. पहिल्या वर्षी १७ वर्षांखालील गट, यंदा २१ वर्षांखालील गट यांना मिळालेले यश पाहून, ‘खेलो इंडिया’ प्रशासन पुढील वर्षीपासून १२ वर्षांखालील खेळाडूंचा गट सुरू करण्याचा विचार करत आहे. तसं झाल्यास आणखीनच चांगले होईल. प्राथमिक शालेय पातळीपासून क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन लाभेल. मुलं आणखी जोमाने मैदानावर येतील. अभिनव शॉ या अवघ्या दहा वर्षीय मुलाने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. देशातील तो सर्वांत युवा विजेता आहे. असे कितीतरी ‘अभिनव’ देशात लपलेले आहेत. १२ वर्षांखालील गटातील क्रीडापटूंना  संधी मिळाल्यास लहान वयापासूनच ‘चॅंपियन’ घडविला जाईल.

ग्रामीण गुणवत्तेचे यश
पुण्यातील ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ग्रामीण भागातील गुणवत्तेचा जयजयकार पाहायला मिळाला. केवळ शहरी भागातील मुलंच ‘स्मार्ट’ असतात ही बाब ग्रामीण मुलांनी खोटी ठरविली आहे. देशातील ग्रामपातळीवरील क्रीडांगणे गुणवत्ता आणि प्रतिभासंपन्न आहेत. देशातील परिपूर्ण गुणवत्ता ग्रामीण भागात लपलेली आहे. ती हुडकणे आवश्‍यक ठरते. त्यासाठी शासनाला गावागावांत जावे लागेल. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय मुलांनी चमक दाखविली. त्याचा खास उल्लेख पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केला. पुण्यातील स्पर्धेत भाजीपाला विकणाऱ्याची मुलगी पदक विजेती ठरली. एक सुरक्षा रक्षक, ज्याला राहण्यास घर नाही. त्याच्या मुलाने ‘खेलो इंडिया’त पदक जिंकले. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार. लहान वयातच वडिलांच्या छत्रास मुकली. आई आणि भावाच्या मदतीने क्रीडा मैदानावर झळकली. आपल्या देशात क्रीडा संस्कृती नसल्याचा उल्लेख वारंवार होतो. त्यात तथ्यही आहे. व्यावसायिकतेचा अभाव यामुळे भारतीय क्रीडापटू पिछाडीवर राहत असत. आता चित्र बदलत आहे. त्यात ग्रामीण गुणवत्तेचा मोलाचा वाटा आहे. केवळ शहरात राहून विकास साधता येत नाही, तर ग्रामीण भागात ‘विकासगंगा’ नियोजनबद्धरीत्या पोचली, तर तेथील कणखर मुलं देशाचे नाव रोशन करू शकतात, हे सिद्ध झालेले आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना ‘ग्रासरूट’ पातळीवरच हवी. पुढे योग्य दिशा गवसली, की खेळाडूची प्रतिभा बहरते, त्यास धुमारे फुटतात. जम्मू-काश्‍मीरमधील बावलीन या जिम्नॅस्टने आवश्‍यक सुविधा नसतानाही ‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकमध्ये तीन सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकली. अशी कितीतरी मुले संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

खेळासाठी एक तास
‘खेलो इंडिया’ समारोपास महत्त्वपूर्ण घोषणा झाली. पुढील वर्षीपासून शाळेत खेळाचा एक तास करण्याचे  जाहीर करण्यात आले. मैदानावर यश काही झटपट मिळत नाही. शाळेत असताना अभ्यासाबरोबर खेळाचा सराव, प्रशिक्षण यांची सांगड घालणे खूपच कठीण असते. त्यात ‘बालमन’ गोंधळते. अभ्यास, की खेळ या द्विधावस्थेत सापडल्याने एकतर अभ्यासाकडे दुर्लक्ष किंवा क्रीडा मैदानाकडे पाठ झाल्याचे पाहायला मिळते. शाळेतच खेळण्यासाठी एक तास मिळत असेल, तर चांगली गोष्ट आहे. आता शालेय प्रशासनास दक्ष राहावे लागेल. शारीरिक शिक्षण (पीई) शैक्षणिक पातळीवर बंधनकारक आहे, पण हा विषय किती गांभीर्याने घेतला जातो हा संशोधनाचा विषय ठरावा. खेळासाठी मिळणाऱ्या एका तासाचा नियोजनबद्ध वापर व्हायला हवा. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपजत क्रीडा प्रतिभेला गोंजरण्याचेच काम व्हावे हीच या योजनेमागील प्रामाणिक भूमिका राहायला हवी. महाराष्ट्र सरकार खेळाडूंसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याच्या विचाराधीन आहे. ही काळाची गरज आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी खेळाडू भरकटू शकतात. मार्गदर्शन केंद्रामध्ये खेळाडूंच्या कारकिर्दीची योग्य निगराणी राखली जाणार आहे. फक्त ही योजना लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, क्रीडापटूंची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठीही राज्य सरकार धोरणात्मक उपाययोजना करणार आहे. स्पर्धा, सराव, प्रशिक्षण यात गुंतून राहिल्यामुळे मुलांना अभ्यासाला वेळ देता येत नाही. त्याचे प्रतिकूल परिणाम परीक्षांत दिसतात. काही वेळा खेळाडूंना परीक्षांचे वेळापत्रकही चुकते. काही शाळा क्रीडापटूंच्या हजेरपटावरील गैरहजेरीबाबत एकदम  कडक धोरण घेते. त्यात सवलत मिळाली, तर युवा क्रीडापटू व त्यांचे पालक निश्‍चितच दुवा देतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, शालेय क्रीडापटूंसाठी क्रीडा गुण खूपच मौल्यवान ठरतात. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. ‘खेलो इंडिया’च्या प्रशस्तिपत्रकांचाही शासन दरबारी सन्मान व्हायला हवा. क्रीडा गुण, क्रीडा पुरस्कार, सरकारी नोकरीसाठी ‘खेलो इंडिया’ प्रशस्तिपत्रक ग्राह्य ठरल्यास तो दुग्धशर्करायोग ठरेल.

महाराष्ट्र, हरियानाची प्रगती
पुण्यातील ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने पदकांचे द्विशतक पार केले. देशातील राज्ये आणि संघराज्ये मिळून ३६ पैकी २९ राज्य-संघराज्यांच्या खेळाडूंनी पदके जिंकली. २४ राज्यांनी किमान एक पदक जिंकले, ईशान्येकडील त्रिपुरा राज्यानेही एक सुवर्णपदक जिंकले. याचाच अर्थ देशातील प्रत्येक राज्यात क्रीडा जागर होत आहे. गतवर्षी ‘खेलो इंडिया’त हरियानाने सर्वाधिक ३८ सुवर्णपदकांसह एकूण १०२ पदके जिंकली, तर यंदा महाराष्ट्राने ८५ सुवर्णपदकांसह २२८ पदकांची कमाई करून अव्वल स्थान मिळविले. हरियानास यंदा ६२ सुवर्णपदकांसह १७८ पदके मिळाली. पुण्यातील स्पर्धेत १७ व २१ वर्षांखालील वयोगटातील सुमारे सहा हजार युवा क्रीडापटू सहभागी झाले. चौदा दिवसांत पुणे ‘क्रीडामय’ बनले होते. राष्ट्रीय पातळीवरील विचार करता, महाराष्ट्राची ‘खेलो इंडिया’तील प्रगती आश्‍वासक आहे. यंदा जास्त पदके मिळाली, तो दर्जा कायम राखण्यासाठी शासनालाही प्रयत्नशील राहावे लागेल. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात अफाट गुणवत्ता आहे. क्रीडा संस्कृतीचा विकास आणि प्रसार याद्वारे राज्य शासनास लपलेली गुणवत्ता शोधणे शक्‍य आहे. हरियानात क्रीडापटूंना पदके जिंकल्यानंतर मोठी आर्थिक रक्कम मिळते. ऑलिंपिक, आशिया पातळीवर खेळताना हरियानवी क्रीडापटूंचे लक्ष्य केवळ पदकावरच केंद्रित असते. आर्थिक पाठबळ त्यास प्रमुख कारण असते. पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यातील क्रीडा गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशमान होताना दिसते. तेथे मोठ्या प्रमाणात सुविधा आहेत. खेळाडू म्हणजे देशाची संपत्ती. तिच्या जोपासनेसाठी परिपूर्ण प्रयत्न अत्यावश्‍यक आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), तसेच सेनादलाच्या प्रयत्नांमुळे देशातील ईशान्येकडील क्रीडा गुणवत्ताही देशाचे नाव प्रकाशमान करताना दिसते. ‘चॅंपियन’ काही एका रात्रीत तयार होत नाही. वेळीच राज्य शासनाच्या सुविधा मिळाल्या तरच ऑलिंपिक, आशियाई पदक जिंकण्याचे स्वप्न पाहता येतील. 

चित्र बदलत आहे...
भारतीय क्रीडांगणाचा विचार करता, नकारात्मक गोष्टी खूप दिसतील, त्याचवेळी बऱ्याच सकारात्मक बाबीही आहेत. निराशेची जळमटे फेकून नव्या उत्साहाने प्रयत्न केले तरच यश मिळेल. ‘खेलो इंडिया’ ही एक सकारात्मक सुरुवात आहे. गतवर्षीच्या ‘खेलो इंडिया’त खेळलेली युवा नेमबाज मनू भाकर हिने वर्षभरात आंतरराष्ट्रीय मैदानावर मोठी झेप घेतली. अन्य क्रीडापटूही प्रगतिपथावर दिसले. वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा याने ब्यूनॉस आयर्समधील युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नेमबाज मेहुली घोष हिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जलतरणपटू श्रीहरी नटराज जागतिक  तरण तलावात आशास्थान ठरला आहे. कितीतरी उदाहरणे आहेत. फक्त गरज आहे, योग्य मार्गदर्शन आणि पाठबळाची. केवळ निराशावाद जपत अपयशाला दूषण देण्याचे दिवस कधीच मागे पडले आहेत. एका स्पर्धेत अपयशी ठरल्याने आकाश कोसळत नाही. झोकून दिल्यास निश्‍चित यशप्राप्ती होईल. केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड हे ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज. २००४ मधील अथेन्स ऑलिंपिकमध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले. तेव्हा त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांचा आदर्श बाळगत  २००८ मधील बीजिंग ऑलिंपिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदकास गवसणी घातली. देशाला वैयक्तिक गटात मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरले. क्रीडा मैदानावर आदर्श हवेतच. अगोदरच्या क्रीडापटूंची यशस्वी कामगिरी पाहूनच पुढील पिढी प्रेरित होते. ऑलिंपिकमध्ये पूर्वी केवळ हॉकीतच भारताने सोनेरी दिवस अनुभवले. आता नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, टेनिस, वेटलिफ्टिंग हे भारताचे ऑलिंपिकमधील पदक विजेते खेळ ठरले आहेत. त्यात अन्य खेळाचीही भर पडू शकते. हे काम ‘खेलो इंडिया’ निश्‍चितच करू शकेल. गेल्या वर्षी जाकार्ता-पालेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण १५ सुवर्णांसह एकूण ६९ पदके जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९९० मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला केवळ एक सुवर्णपदक मिळाले होते. २८ वर्षांनंतर भारताने मोठी मजल मारताना एका सुवर्णपदकावरून तब्बल १५ सुवर्णपदकांना गवसणी घातली. हे बदललेले चित्र अतिशय स्फूर्तीदायक आहे. भारतीय क्रीडापटूंकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस भूतकाळात जमा झालेले आहेत. जागतिक पातळीवर भारत एक शक्ती या नात्याने पुढे सरकत आहे. देशातील क्रीडाशक्ती प्रबळ होत आहे आणि त्यास खतपाणी घालण्याचे काम  ‘खेलो इंडिया’द्वारे होत आहे.

‘पांढरा हत्ती’ बनू नये...
‘खेलो इंडिया’ उपक्रमाचे कौतुक करताना एक भीतीही जाणवत आहे. देशात सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. प्रत्येक राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, तेथे साधनसुविधा, स्टेडियम यांची निर्मिती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेगवेगळ्या राज्यात आयोजन होते. त्याचे चांगले परिणाम दिसलेले आहे. बालेवाडी-पुण्यातील क्रीडा सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. २००८ मध्ये या ठिकाणी युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते. हैदराबाद, गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे उभ्या राहिलेल्या सुविधाही जागतिक दर्जाच्या आहेत. मात्र अन्यत्र आश्‍वासक चित्र नाही. गोव्यात ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे, पण या चिमुकल्या राज्याची तयारी निराशाजनक आहेत. स्पर्धा वारंवार पुढे ढकलली जात आहे. केरळमधील राष्ट्रीय स्पर्धेच्या बाबतीतही असेच घडले होते. आपण ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकण्याची स्वप्ने पाहत आहोत, पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वारंवार पुढे जाणे खेळाडूंसाठी क्‍लेशदायक असते. साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. ‘खेलो इंडिया’च्या बाबतीत हे टाळायला हवे. नियमानुसार ही स्पर्धा दरवर्षी व्हायलाच हवी. त्यासाठी सुरुवातीस केवळ सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यांचाच विचार व्हावा. अन्य राज्यांना यजमानपद देताना किमान पाच वर्षांचा कालावधी साधनसुविधांच्या उभारणीसाठी मिळावा. केंद्र सरकारची योजना हाच नजरेने ‘खेलो इंडिया’कडे पाहिले जाऊ नये. स्पर्धा ‘लाल फिती’च्या कारभारात अडकली, तर हा बहुमूल्य उपक्रम केवळ ‘पांढरा हत्ती’ बनेल. भविष्यात केवळ औपचारिकतेपूरते आयोजन होण्याचा संभाव्य धोका टाळायला हवा, त्यासाठी केंद्र सरकार, क्रीडा व युवा व्यवहार खाते, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना जागरूक राहावे लागेल.  

संबंधित बातम्या