सेरेनाची का सटकली?

मुकुंद पोतदार 
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कव्हर स्टोरी
 

पराभवामुळे सेरेनाची संधी हुकली, पण याच सेरेनाने दोन महिन्यांच्या आत ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुन्हा अंतिम फेरी गाठली. अमेरिकन ओपन या मायदेशातील ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पुन्हा एकदा ‘सुपरमॉम’ची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सामन्यानंतर नव्हे, तर सामना सुरू असताना तिने केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. जपानची नाओमी ओसाका तिची प्रतिस्पर्धी होती. याच नाओमीने मार्च महिन्यात मायामीतीली स्पर्धेत सेरेनाला हरविले होते. 

अँजेलिकच्या तुलनेत नवखी असलेली नाओमी कारकिर्दीतील पहिल्याच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सेरेनाला किती झुंज देईल, याची उत्सुकता होती. विंबल्डनच्या तुलनेत सेरेनाला मायदेशात सुपरमॉम बनण्याची जास्त संधी होती, पण तिला सामन्यावर पकड मिळविता आली नाही. नेहमीसारखा ताकदवान खेळ तिला करता आला नाही. त्यातच प्रशिक्षक पॅट्रिक मौरातोग्लोऊ यांना नियमबाह्य कोचिंगबद्दल ताकीद देण्यात आली. त्यामुळे सेरेनाचा तोल सुटला. त्यातच सामना हातातून निसटू लागल्यामुळे तिची एकाग्रता ढळली. रॅकेट फेकल्यामुळे ताकीद मिळाल्यानंतर ती आणखी संतापली. त्यातूनच मग पंच कार्लोस रॅमोस यांच्यावर ती भडकली. तसे पाहिले तर टेनिसपटू कोर्टवर संतापण्याचे प्रकार नवे नाहीत. ते पंचांवरच राग काढतात, कारण त्यांचा निर्णय पटलेला नसतो. पण सेरेनाची सटकली होती. त्यामुळे आपण काय बोललो याचे तिला भानच राहिले नसावे. 

‘तू चोरटा आहेस. तू माझी माफी मागितली पाहिजेस. कधी म्हणतोयस सॉरी, बोल...’ 
असे सेरेनाचे वक्तव्य होते. विंबल्डनपूर्वी पराभवाकडे इतक्‍या खिलाडूवृत्तीने पाहिलेल्या, मातृत्वानंतर मृत्यूच्या दारातून परतलेल्या सेरेनाने विलक्षण संदेशही दिला होता. यावेळी मात्र तिच्या कारकिर्दीला डाग लागेल असा दुर्दैवी प्रकार घडला. अशावेळी दोन महिन्यांत असे काय घडले हे जाणून घ्यायला हवे. 

स्वतःच्या अपेक्षांमधील फरक 
यातील पहिला मुद्दा म्हणजे सेरेनाच्या स्वतःच्या अपेक्षा. विंबल्डनमध्ये सेरेनाने पुनरागमनानंतर प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिची ही एकूण चौथीच स्पर्धा होती. अंतिम फेरीतील प्रवेशामुळे चकित झाल्याचे; कारण तशी अपेक्षा नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे तिने ट्विट करून चाहत्यांचे आणि खास करून मातांचे आभार मानले होते. 

बाळंतपण अन्‌ दुर्धर आजार 
सेरेनाने गेल्या वर्षी २ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. तिचे नाव तिने ‘ऑलिंपिया’ ठेवले. बाळंतपण गुंतागुंतीचे ठरल्यामुळे तिच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात तिचे पती अलेक्‍सिस ओहानियन यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर तर काळीज चर्रर्र होते. ते म्हणतात, ‘आम्हाला मुलगी झाल्यानंतर सेरेनाची प्रकृती ढासळली. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्याआधी तिचा किस घेऊन मी तिला गुडबाय केले. त्यावेळी आम्हा दोघांपैकी एकालाही माहीत नव्हते, की आपण पुन्हा भेटू की नाही.. तिने केवळ जगावे इतकेच आम्हाला वाटत होते. आता दहा महिन्यांनी ती विंबल्डनच्या अंतिम फेरीत गेली आहे. ती लवकरच ट्रॉफी उंचावेल. खरे तर तिचे सर्वांत मोठे बक्षीस (लाडकी लेक) घरी वाट बघतेय. ती आणखी बऱ्याच ट्रॉफी जिंकेल हे आमच्या कुटुंबालाही ठाऊक आहे. तिने आत्ता कुठे सुरुवात केली आहे. मला तिचा याहून दुसऱ्या कारणासाठी इतका अभिमान वाटणार नाही.’ 

सेरेनाला झालेला आजार दुर्धर होता. तिच्यावर एकूण पाच शस्त्रक्रिया झाल्या. स्वतः सेरेनाने म्हटले होते, की आजारपण लक्षात घेता इतका चांगला खेळ करणे मला अनिवार्य नव्हते. पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटते आहे. 

अशी सेरेना टेनिसचाच नव्हे तर जीवनाचा आनंद लुटत असताना इतकी सटकणे धक्कादायक ठरते. याचे कारण तिने पुढे जाऊन पंचमंडळी निर्णय देताना स्त्री-पुरुष भेद करतात. सारख्याच प्रकारच्या शिस्तभंगाबद्दल पुरुषांना ढील दिली जाते, पण महिलांवर कारवाईचा बडगा उगारला जातो, असा दावा केला. इतके दिवस पुरुष आणि महिला खेळाडूंच्या बक्षीस रकमेतील तफावत हा वादाचा मुद्दा होता. यावेळी सेरेनाने उपस्थित केलेला मुद्दा सामान्य क्रीडाप्रेमींना नवा असला तरी आजी-माजी खेळाडू, तज्ज्ञ यांना या वादातील प्रमुख मुद्दे नवे नव्हते. अनेक प्रशिक्षक लढत सुरू असताना सांकेतिक हातवारे करून कोचिंग करतात आणि हे सर्रास घडते. अनेकदा पंच याकडे दुर्लक्षसुद्धा करतात, पण म्हणून रॅमोस यांनी ताकीद द्यायला नको होती, अशी अपेक्षा मात्र बाळगता येणार नाही. प्रशिक्षकांकडे माझे लक्षच नव्हते, असा सेरेनाचा दावा आक्षेपार्ह ठरू शकतो, कारण मग टेनिसमध्ये नियमांना काय अर्थ राहणार आणि मग नियम असतील तर त्याचे पालन करायला नको का आणि नियम मोडले तर कारवाई (नियमानुसारच...) व्हायला नको का असे प्रश्‍न निर्माण होतात. 

इथे आणखी एक मुद्दा सांगायला हवा आणि तो म्हणजे सेरेनाने कितीही दावा केला तरी पॅट्रिक यांनी कोचिंग केल्याचे मान्य केले होते. यामुळे सेरेना नकळत का होईना पण खोटे बोलली असे म्हणणे परिस्थितीला धरून होईल. सेरेनाच्या वक्तव्यावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटणे अटळ होते. ज्यांनी व्यावसायिक टेनिसची मुहूर्तमेढ रोवली त्या अमेरिकेच्या बिली जीन किंग यांनी सेरेनाला परखड वक्तव्याबद्दल शाबासकी दिली. दुसरीकडे महिला टेनिसमध्ये पॉवरगेमची मुहूर्तमेढ रोवलेल्या मार्टिना नवरातिलोवा यांनी सेरेनावर टीका केला. पुरुष खेळाडूंना ढिल दिली जाते म्हणजे महिलांनाही मिळायला हवी अशी अपेक्षा सेरेनाने बाळगणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. 

नवरातिलोवा यांची प्रतिक्रिया साधकबाधक आहे. त्यांचे मत टेनिसमध्ये प्रमाण मानले जाते. सेरेनाच्या संदर्भात ते आणखी समर्पक ठरणे आणि चपखल लागू होण्याचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, महिला टेनिसपटू म्हणजे काही शोभेच्या बाहुल्या नाहीत. त्यासुद्धा ताकदवान खेळ करू शकतात हे दाखवून देताना नवरातिलोवा यांनी पॉवरगेमची मुहूर्तमेढ रोवली. कोणत्याही खेळात कामगिरीचे, विक्रमाचे मापदंड उंचावत राहतात. याच पॉवरगेमला सेरेनाने नवे परिमाण दिले. ‘सेरेना स्लॅम’ असा अनोखा पराक्रम तिने केला. 
सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे सेरेनाने पंचांवर केलेली आगपाखड आणि त्यानंतर केलेला स्त्री-पुरुष भेदाची दावा या अनुषंगाने आणखी एक मुद्दा मांडता येईल. सेरेनाने म्हटले आहे, की पुरुष खेळाडू जेव्हा कोर्टवर आकांडतांडव करतात तेव्हा त्यांना मोकळीक मिळते, पंच निरुत्तर होतात. आता पुरुष खेळाडू आणि पंचांशी वाद असे म्हटल्यावर सर्वप्रथम नाव आठवते ते अमेरिकेच्या जॉन मॅकेन्रो यांचे. त्यांचे पंचांशी झालेले वाद हे टेनिसच्याच नव्हे तर एकूण क्रीडा इतिहासातील महत्त्वाचे पान ठरले आहे. मॅकेन्रो यांचे कुरळे केस, ते कपाळाभोवती घालायची ती लालभडक बॅंडाना, डावखुरे असल्यामुळे त्यांचे मुळातच नेत्रदीपक आणि शैलीदार असे फुटवर्क, सर्व्ह-व्हॉलीचा खेळ अशी सारी वैशिष्ट्ये त्यांनी पंचांशी वाद घालण्यामुळे झाकोळली गेली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. किंबहुना तसे ताशेरे तज्ज्ञांनी ओढलेले नाहीत. मुख्य म्हणजे आज निवृत्तीनंतर इतक्‍या वर्षांनीसुद्धा समालोचक म्हणून त्यांना असलेले आदराचे स्थान कायम आहे. 

तसे पाहिले तर मॅकेन्रो त्याआधीसुद्धा पंचांवर भडकले होते. पण १९८१ च्या विंबल्डन स्पर्धेतील त्यांचा गुस्सा खेळाच्या इतिहासातील एक अध्याय ठरला. त्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. पहिल्याच फेरीत अमेरिकेचे देशबांधव टॉम गुलिक्‍सन यांच्याविरुद्ध तिसऱ्या गेममध्ये १-१ बरोबरी व मॅकेन्रो १५-३० अशा पिछाडीवर होते. तेव्हा त्यांचा एक शॉट बाहेर गेल्याचा कौल पंचांनी दिला. त्यावर मॅकेन्रो त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, की चेंडू लाइनवर पडल्यामुळे पांढऱ्या खडूची पावडरसुद्धा उडाली. तू काही गंभीर माणूस असू शकत नाहीस. Chalk came up all over the place, you can’t be serious. असे मॅकेन्रो यांचे इंग्रजीतील वाक्‍य होते. पंच आपले काम गांभीर्याने करीत नाहीत असा त्याचा आशय होता. मग तुम्ही गंभीर असूच शकत नाही, चेंडू लाइनवरच पडला. संपूर्ण स्टेडियममधील प्रत्येकाला हे माहीत आहे आणि तुम्ही बाहेर पडल्याचा कॉल देता... तुम्ही जगाला कलंक आहात, याची कल्पना आहे का तुम्हाला... त्यावेळी पंच एडवर्ड जेम्स नम्रपणे इतकेच म्हणाले, की मिस्टर मॅकॅन्रो, मी तुम्हाला एका गुणाचा दंड करीत आहे. 

त्यानंतर अशाच एका प्रसंगी मॅकेन्रोने आपली रॅकेट कोर्टवर फेकून दिली. तेव्हा जेम्स यांनी ‘मिस्टर मॅकेन्रो, आपण आपल्या रॅकेटचा गैरवापर करीत आहात,’ असे बजावले. मॅकेन्रो संतापून म्हणाले, की तू एक अकार्यक्षम मूर्ख माणूस आहेस, तू जगाला ओझे आहेस. मॅकेन्रो यांच्या या वक्तव्यानंतर पंचांनी त्यांना आणखी एका गुणाचा दंड केला. मॅकेन्रो यांनी आपल्या खेळावर मात्र त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी दोन सेटमध्ये सामना जिंकला. मग बियाँ बोर्गला हरवून त्यांनी विंबल्डन जेतेपदही मिळविले. ऑल इंग्लंड क्‍लबने मात्र हे खपवून घेतले नाही. विजेत्याला सन्माननीय सदस्यत्व देण्याची परंपरा विंबल्डनने मोडली. त्याच्या निषेधार्थ  मॅकेन्रो यांनी चॅंपियनशिप डिनरवर (बक्षीस समारंभानंतर दुसऱ्या दिवशी होणारी मेजवानी) बहिष्कार घातला. अर्थात यात त्यांचाच तोटा झाला, कारण त्या वर्षी महिला एकेरीत ख्रिस एव्हर्ट जिंकली होती. विंबल्डनच्या परंपरेनुसार या मेजवानीप्रसंगी दोन्ही विजेते डान्स करतात. त्यामुळे एव्हर्टसारख्या टेनिससुंदरीबरोबर स्टेप्स घेण्यास मॅकेन्रो मुकले. 

याच मॅकेन्रो यांचे You can’t be serious हे वक्तव्य त्या काळात विनोदी पुस्तके, विडंबन, टीव्हीवरील जाहिराती, पॉप साँग, यांचा भाग बनले. पुढे जाऊन मॅकेन्रो यांनी आपल्या आत्मचरित्राला हेच नाव दिले. 

याच मॅकेन्रो यांचा गुस्सा इतका हीट झाला की टेनिसप्रेमी त्यांचा शॉट लाइनवर पडण्याची, पंच तो आउट ठरविण्याची, मग मॅकेन्रो पंचांवर भडकण्याची वाट पाहू लागले. त्यांना ‘सुपरब्रॅट’ असे विशेषण लावले गेले. याच मॅकेन्रो यांचा गुस्सा मिमिक्रीचा विषय बनला. सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याच्याकडे त्यासाठी फर्माईश केली जाते. 

अर्थात मॅकेन्रो यांचे उदात्तीकरण करण्याचा यामागे उद्देश नाही. सांगायचा मुद्दा असा, की सेरेना ही तिच्या आत्मचरित्राचे नाव ‘तू चोर आहेस’ असे देऊ शकेल का, तर याचे उत्तर नकारात्मकच येईल. मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे दडपण सेरेनाने घेतले होते. ते तिला असह्य झाले होते. एरवी तिने हा सामना वाद न घालता गमावला असता तरी जगाने तिला शाबासकीच दिली असती. मातृत्वानंतर टेनिसमध्ये इतक्‍या उच्च पातळीवर पुनरागमन करणे सोपे नाही. सेरेनाने ते करून दाखविले होते. एका मोसमात दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत अंतिम फेरी ही कामगिरी लक्षवेधीच ठरते. सुपरमॉम बिरुद सार्थ ठरविण्यासाठी सेरेनाने जिंकणे अनिवार्य होतेच असे नाही. मीडियाने आपल्या गरजेपोटी ही संज्ञा रूढ केली आहे. 

अशावेळी सेरेनासारख्या खेळाडूने याचे दडपण घेणे, त्यामुळे तोल ढळू देणे, स्वतःच्या आणि खेळाच्या प्रतिमेला तडा जाऊ देणे धक्कादायक ठरते. खेळाडू हा खेळापेक्षा मोठा असू शकत नाही असे म्हटले जाते, पण काही खेळाडू कामगिरीच अशी करतात की ते त्या खेळाचा चेहरा बनतात. अलीकडच्या काळात फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये मायकेल शूमाकर, गोल्फमध्ये टायगर वूड्‌स, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, फिरकी गोलंदाजांमध्ये शेन वॉर्न अशी काही उदाहरणे पाहिल्यास त्या व्यक्तींमुळे खेळाची उत्क्रांती झाल्याचे दिसून येते. या क्रीडापटूंना देवत्व प्राप्त झाले. खेळातील एक सूत्र मात्र कायम असते आणि ते म्हणजे कोणताही खेळाडू नियमाला अपवाद असू शकत नाही. नियम हे सर्वांनाच सारखे असतात. खेळाडू जसे चुकतात, तसेच पंचही चुकू शकतात. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा कधी तुम्हाला, तर कधी प्रतिस्पर्ध्याला फटका बसतो. म्हणून पंचांना चोर म्हटल्याचे टेनिसच नव्हे तर इतर कोणत्याही खेळात उदाहरण सापडत नाही. सेरेनाचे सटकणे म्हणून शोचनीय ठरते. त्यातही ज्या नाओमीने तिसरीत असताना सेरेनावर निबंध लिहिला, तिचा फोटो लावून रंगविला, त्या नाओमीसाठी आणि तिच्यासारख्या जगभरातील असंख्य मुलींसाठी सेरेना रोलमॉडेल आहे. 

फुटबॉलमध्ये गोल केल्यानंतर आनंदाच्या भरात जर्सी काढून सेलिब्रेट करण्यावर बंदी आहे. असे करणाऱ्या खेळाडूला रेड कार्ड दाखविले जाते. नियमावर बोट ठेवून काम करण्यास इतर क्षेत्रांत अपवाद असू शकतील, पण खेळात तसे करणे स्वैराचारास आमंत्रण देण्यासारखे ठरेल. सेरेनाच्या सटकण्यातून हाच संदेश उदयोन्मुख खेळाडूच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींना मिळाला आहे.

ता. १४ जुलै २०१८ 
स्थळ ः लंडनजवळील ऑल इंग्लंड क्‍लबचे सेंटर कोर्ट. 
प्रसंग ः विंबल्डनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना. 
संदर्भ ः सेरेना आणि जर्मनीची अँजेलिक केर्बर ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवर दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने आल्या होत्या. २०१६ मध्ये सेरेनाची सरशी झाली होती. तेव्हा कोर्टवर उतरलेली सेरेना सुपरवूमन होती. महिला टेनिस म्हणजे सेरेनाचा ‘वन वूमन शो’ असे समीकरण बनले होते. यावेळची सेरेना मात्र ‘मॉम’ बनली होती. चॅंपियन बनून तिने ‘सुपरमॉम’ बनावे अशी तिची, चाहत्यांची आणि तज्ज्ञांचीही अपेक्षा होती.

चला असाच कल्ला करीत राहूयात. गेले दोन आठवडे सुरू असलेली ही स्पर्धा जगातील सगळ्या मातांतर्फे आवाज उठविणारी ठरली. तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरी करत असाल, तुम्ही तुमचे काम नक्कीच समर्थपणे पार पाडू शकता. मीसुद्धा तुम्हा सर्व जणींपेक्षा काही वेगळी किंवा सरस नाही. आपण दररोज जी प्रत्येक गोष्ट करतो ती अगदी अशाच धडाक्‍यात करीत राहूयात... 
- सेरेना विल्यम्स, अमेरिकेची टेनिसपटू 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या