श्रीलंका-रामायणाच्या पाऊलखुणा

अनुराधा मोहन शेडगे
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

भारताच्या दक्षिणेकडील नितांत सुंदर, निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं, वन्यजीवसंपदेने नटलेले एक टुमदार द्वीपराष्ट्र म्हणजे श्रीलंका! आकाराने मोत्यासारखा असल्याकारणाने हा देश ‘हिंद महासागरातील मोती’ म्हणून ओळखला जातो. सन १९७२ पर्यंत श्रीलंकेचे नाव ‘सिलोन’ होतं जे बदलून ‘लंका’ ठेवलं गेलं. पुढे १९७८ मध्ये त्याच्या पुढे सम्मानसूचक ‘श्री’ शब्द जोडून ‘श्रीलंका’ करण्यात आलं. 

गदिमांनी आपल्या गीतात श्रीलंकेचे वर्णन ‘रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ असं केलंय आणि त्याचा खरा प्रत्यय आपल्याला तिथं गेल्यावर पावलोपावली येतो. कोलंबो हे श्रीलंकेच्या राजधानीचे शहर, तर कॅंडी, नुआरा एलिया ही थंड हवेची ठिकाणं. सिंहली ही येथील स्थानिक भाषा आहे. विषुववृत्तावर असणाऱ्या या द्वीपावरील वातावरण सतत बदलणारे आहे. कधी ऊन, कधी थंडी, तर कधी पाऊस ! नयनरम्य सागरकिनारे, ऐतिहासिक स्थळं पर्यटकांना खुणावणारी आहेत. भारतीय इतिहासाच्या अतिशय प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख असल्यामुळे आपल्याला तर या देशाबद्दल एक वेगळंच कुतूहल वाटतं. श्रीलंकेत जवळजवळ २० हजार हत्ती आहेत. जगातले आगळेवेगळे अनाथालय कोणते असेल तर ते श्रीलंकेतील ‘पिनावला’ येथील हत्तींचे अनाथालय. येथे हत्तीच्या शेणापासून कागद निर्मिती केली जाते. कोलंबोवरुन कॅंडीला जाताना डोंगराळ प्रदेश, हिरवीगार वनश्री, मधूनच कोसळणाऱ्या पांढराशुभ्र धबधब्याचे नजारे मोहक आहेत. कॅंडी येथील प्रसिद्ध व सुंदर असे ‘टूथ रेलीक टेंपल’, गौतम बुद्धांचा दात ठेवलेले मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरातील दगडी खांबांवर केलेले कोरीव काम व हस्तीदंताची सजावट आकर्षक आहे. या मंदिराजवळच कॅंडी सरोवरदेखील आहे. घनदाट झाडींमध्ये असलेले आणि बाजूने वाहणाऱ्या महावेली नदीमुळे अजूनच खुलणारे कॅंडी येथील ‘रॉयल बोटॅनिकल गार्डन’ हे आशिया खंडातील सर्वांत मोठे गार्डन आहे. कॅंडी येथे संध्याकाळी होणारा ‘कॅंडी कल्चरल शो.’ म्हणजे एक उत्तम श्रीलंकन सांस्कृतिक नृत्याविष्कार आहे. नुवारा एलियाला जाताना राम्बोडा गाव लागते, जेथे श्री हनुमान मंदिर आहे. असे म्हणतात, की हनुमानाने श्रीलंकेत प्रथम पाऊल या ठिकाणी ठेवले होते. नुवारा एलिया पर्वतातून निघालेल्या ‘केलानी’ नदीला कोलंबोची जीवनरेखा मानलं जातं. चढ असलेल्या नागमोडी वळणाच्या रस्त्यांवरून नुआरा एलियाकडे जाताना दुतर्फा पसरलेले चहाची मळे आहेत. अल्ल्हाददायक अशा थंड हवेत या ठिकाणी ‘टी फॅक्‍टरी’ ला भेट देऊन विविध प्रकारच्या चहाचा आस्वाद आपण घेऊ शकतो. जगातील सर्वोत्कृष्ट चहा श्रीलंकेत बनतो. येथील ‘सिलोन चहा’ हे सर्वांत जास्त निर्यात केले जाणारे उत्पादन आहे.

‘नुवारा एलिया’ हे एक डोंगराळ शहर आहे. १४ वर्षातून एकदाच उमलणाऱ्या ‘नेल्लू’ च्या नावावरून या जागेचे नाव ‘नुवारा एलिया’ पडले. रामायणातील अशोकवन म्हणजे ते हेच नुआरा एलिया ! रामायणातील उल्लेखानुसार रावणाने सीतेला याच ठिकाणी ठेवले होते. येथे सीतामातेचे जुने व नवे मंदिर आहे. बाजूलाच राम लक्ष्मण सीता यांचे एक मंदिर आहे. बाजूनेच सुंदर नदी वाहते. त्या नदीपलीकडे मोठया खडकावरील मोठी खळगी म्हणजे हनुमानाची पावले असल्याचे मानले जाते. जी पुढे छोटी छोटी होत गेलेली दिसतात. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हनुमानाने लंका जाळल्याची साक्ष म्हणजे डोंगरावर काही ठिकाणी दिसणारी काळी माती. असे म्हणतात येथील ‘हक्‍गला’ गार्डन म्हणजे लक्ष्मणासाठी हिमालयात संजीवनी आणण्याकरता गेलेल्या हनुमानाने उचलून आणलेला पर्वत. निळ्याशार समुद्र आणि मऊसूत रेती असलेला बेंटोटा बीच वॉटर स्पोर्टससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. येथील कोसगोडा या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र आहे. 

कासवाच्या मादीने अंडी घातल्यापासून ते पिल्लं समुद्रात जाईपर्यंतचा प्रवास येथे पाहायला मिळतो. येथील मडूगंगा नदीतून नदीची जैवविविधता तसेच मॅन्ग्रोव्हज बघत बघत छोट्या टापुंमधून बोट राईड करताना कमालीची मजा येते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो एक देखणं आणि तरुण शहर आहे. येथील गगनचुंबी इमारती पर्यटकांना आकर्षित करतात. हे शहर खरेदीसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारचे चहा, मसाले, सुती साड्या, आयुर्वेदिक औषधे, इ. अनेक गोष्टी खरेदी करण्यासारख्या आहेत. भारतीय रुपयाची किंमत श्रीलंकेमध्ये अधिक असल्याने येथे स्वस्त दरात खरेदीचा मनसोक्त आनंद लुटता येतो. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या अद्‌भूत द्वीपावर एकदातरी भेट द्यायलाच हवी.

संबंधित बातम्या