ऋग्वेदातील पाऊसगाणी

प्रतिमा दुरुगकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

‘पाऊस’ प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला त्यात आनंद दिसतो, कुणाला उत्साह दिसतो, कुणाला विरह दिसतो तर कुणाला अश्रू दिसतात. ऋग्वेदकालीन आपल्या पूर्वजांना तो कसा दिसला असेल? यासाठी आपल्याला पर्जन्यसूक्ते पाहावी लागतील. प्रारंभीच्या काळात मानवाला निसर्गातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल, भय, आदर वाटत असणार. त्या शक्तीमध्ये त्याने देव व दानव यांच्या कल्पना केल्या. सूर्य, नद्या, पाऊस त्यांना मदत करणाऱ्या होत्या. त्यांना त्यांनी देवत्व बहाल केले. कवींनी या देवतांना सुंदर कल्पनांनी नटविले. हे त्या काळातील काव्य सहजस्फूर्त, साधे, सोपे आणि मोहक आहे. या देवतांना आपल्या पूर्वजांनी नातीही बहाल केली. उदा. उषा ‘द्यौस्‌’ (स्वर्ग)ची कन्या आहे. सूर्याची पत्नी आहे. अग्नी व पूषन्‌ हे इंद्राचे भाऊ व मरुतगण त्याचे मित्र आहेत. पर्जन्याला ‘पिता’ म्हटलेले आहे. गर्भिताथीने पृथ्वी त्याची पत्नी आहे. पर्जन्यसूक्ते पाचव्या मंडलात असून सूक्ताचे ऋषी अत्री आहेत. त्यापैकी काही निवडक सूक्त व त्याचा स्वैर अनुवाद पुढे दिला आहे. पर्जन्यसूक्त त्रिष्टुप्‌, जगती, अनुष्टुप या छंदात लिहिली आहेत. 

अच्छा वद तवसं भीर्भिराभिः स्तुहि पर्जन्यं नमसा विवास। 
कनिक्रदद्व्रृषभो जीरदानू रेतो दधात्योषधीषु गर्भम्‌।।१।।

स्वैर अनुवाद
सामर्थ्यशाली अशा पर्जन्याला उद्देशून सर्व जण प्रार्थना करा. त्याची स्तुती करा आणि नमस्कार करून त्याची पूजा करा. गर्जना आणि वर्षाव करणारा पर्जन्य जणू वृषभ म्हणजे सामर्थ्य व सृजन यांचे प्रतीक आहे. तो वनस्पतीच्या ठिकाणी गर्भ स्थापन करतो.

रथीव कशयाश्वाँ अभिक्षिपन्नाविर्दुतान्कृणुते वर्ष्यां अह। 
दुरात्सिंहस्य स्तनथा उदीरते यत्पर्जन्यः कृणुते वर्ष्यं नभः।।२।।

स्वैर अनुवाद
ज्याप्रमाणे एखादा सारथी चाबकाच्या फटकाऱ्यांनी त्याच्या घोड्यांना पुढे चालवितो, अगदी तसेच पर्जन्यदेवता ही सारथी तिच्या वर्षा दूतांना म्हणजे मरुतगणांना किंवा मेघांना प्रकट करते. जेव्हा पर्जन्य आभाळाला वर्षायुक्त करतो तेव्हा लांबवरून सिंहांच्या गर्जना ऐकू येतात.

प्र वाता वान्ति पतयन्ति विद्युत उदोषधीर्जिहते पिन्वते स्वः। 
इरा विश्वस्मै भुवनाय जायते यत्पर्जन्यः पृथिवीं रेतसावति।।३।।

स्वैर अनुवाद
वारे वाहू लागतात. वीजाही पडू लागतात. वनस्पतींना अंकुर फुटतात. अंतरिक्ष पाझरू लागते. अशा वेळी पर्जन्य पाण्याने पृथ्वीला अभिमुख होतो. आवेगाने पृथ्वीवर कोसळतो. आपल्या बीजाने पृथ्वीला धारण करण्यास समर्थ बनवितो आणि मग पृथ्वीसुद्धा विश्वासाठी नवनिर्मितीसाठी, सृजनासाठी समर्थ होते.

अभि क्रन्द स्तनय गर्भमा धा उदन्वता परि दीया रथेन। 
हृतिं सु कर्ष विषितं न्यञ्चं समा भवन्तूद्वतो निपादाः।।४।।

स्वैर अनुवाद 
हे पर्जन्यदेवा, तू तुझ्या जलरुपी रथातून सर्व ठिकाणी संचार कर. गर्जना कर, गडगडाट कर. गर्भ ठेव. तुझ्या हातातील खाली तोंड केलेल्या पखालीचे मुख तू सैल केले आहेस त्यामुळे आमच्या येथे पुरेशी जलवृष्टी झाली आहे. आता तू तुझ्या पखालीचे तोंड खेचून बंद कर आणि जिथे तू वर्षला नाहीस तिथे जा. सर्व उंच-सखल भूभागात वर्षाव कर. 

(संदर्भ ः ‘ऋग्वेदसूक्तानि’
संपादन ः शिल्पा सुमंत)
 

संबंधित बातम्या