खिंडीतला गणपती

प्रतिमा दुरुगकर 
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

विशेष
पुणे शहराच्या मध्यवर्ती वस्तीत एक प्राचीन गणेश मंदिर आहे. अनेक दंतकथा, आख्यायिका, इतिहास या मंदिराशी निगडित आहेत. या काहिशा अपरिचित वारसास्थळाविषयी...

पुणे म्हटले, की शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग, कसबा गणपती... इ. ठराविक ठिकाणेच सर्वांच्या नजरेसमोर येतात; पण पुण्यात याहूनही जुनी, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची वारसास्थळे आहेत. जंगलीमहाराज रोडवरील पाताळेश्‍वर मंदिर हे इसवी सन आठव्या शतकातील वारसालेणे आहे. बाणेर येथील बाणेश्‍वर गुहा तर याहूनही जुना वारसा सांगतात. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाजवळील गणेशखिंडीत असेच एक मंदिर ४०० वर्षापेक्षा जुना वारसा जपते आहे. ‘खिंडीतील गणपती’ नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर खरे तर श्री पार्वती नंदन गणपती देवस्थान आहे. 

जुन्या पुण्याच्या वेशीवर, खिंडीत असलेला हा गणपती म्हणजे गावाची रक्षकदेवता होती. हे मंदिर बघण्यासाठी आम्ही एके दिवशी संध्याकाळी निघालो. सेनापती बापट रोड विद्यापीठ रोडला जेथे मिळतो तेथे डावीकडे थोडे आत हे मंदिर आहे. पटकन दिसत नाही, कारण देवस्थानाभोवती एवढे अतिक्रमण झाले आहे, की मंदिर त्या गजबजाटात जीव मुठीत घेऊन उभे आहे. प्रथम डावीकडे वळलो, की रस्त्याच्या डाव्या बाजूला तीन मोठ्या दगडी दीपमाळा दिसतात. त्या कुंपणात बंदिस्त केल्या आहेत. या दीपमाळा खूप सुंदर आहेत, पण सध्या या दीपमाळा व मंदिर यामध्ये रस्ता व घरे झाल्यामुळे एरवी मंदिरासमोर ताठ मानेने उभ्या असणाऱ्या या दीपमाळा मला खूप केविलवाण्या वाटल्या. 

उजवीकडे वळल्यावर घरांच्या गर्दीत मंदिर अक्षरशः शोधावे लागते. एका घरावर ‘श्री पार्वतीनंदन गणपती देवस्थान’ अशी छोटी पाटी दिसली. तिकडे वळलो. घरांच्या दाटीवाटीतून पुढे गेलो आणि समोर एकदम मंदिराचे स्थापत्यदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार दिसले. त्या दगडी प्रवेशद्वारातून आत गेलो आणि मंदिराच्या प्रांगणात आलो. समोरच लाकडी सभा मंडप होता. खूप छान निगा राखल्याने पॉलिश केलेला तो लाकडी सभा मंडप चकाकत होता. सभा मंडपात लाकडी बाकेही होती. सभा मंडपात छोट्याश्‍या उंदराचे दगडी शिल्प लक्ष वेधून घेत होते. हे गणपतीचे लाडके मूषकराज. मस्तपैकी मोदक खात होते. सभामंडपातून मंदिरात गेलो. मुख्य मंदिर दगडी आहे. पेशवाईमध्ये एकूणच राजकीय व आर्थिक स्थिरता आल्यामुळे अनेक मंदिर बांधली गेली. त्या काळातील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी गाभारा व अंतराळ आणि लाकडी सभामंडप. खिंडीतील गणपतीचे मंदिरही असेच आहे. दगड सांधण्यासाठी चुना व शिसे यांचा वापर केलेला दिसतो. मंदिरातील गणपतीची मूर्ती आकाराने मोठी आहे. चांदीचे दागिने मूर्तीवर छान शोभत होते. हे एक जागृत देवस्थान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा मार्गावरील मुख्य मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगडी बॅकेट आणि तटबंदीवरील कमळे यावरूनही तज्ज्ञ मंदिराचा काळ ठरवितात. या मंदिराचा कळसही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो आतून पोकळ आहे व तेथे २०-२५ माणसे आरामात बसू शकतात. रॅंडच्या वधाच्या वेळी चाफेकर बंधूंनी आणि सेनापती बापट भूमिगत असताना त्यांनी या जागेचा उपयोग केला होता. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या उजवीकडे जुने शमीचे झाडे आहे. ते बाजीरावांच्या काळातील आहे असे म्हणतात. या झाडाखालीच पूर्वी विहीर होती. आता मात्र हे झाड व बुजविलेली विहीर सभागृहाच्या खोलीत बंदिस्त झाली आहे. आत जाऊन आम्ही ती पाहिली. 

अशी वारसास्थळे केवळ बघितली किंवा स्थापत्यदृष्ट्या अभ्यासली तरीही ती भेट अपूर्णच राहते, असे मला वाटते. जेव्हा आपण त्याच्या इतिहासात डोकावतो तेव्हा त्या स्थापत्याशी निगडित घटना, कथा, दंतकथा, ऐतिहासिक नोंदी आपणास दिसतात. त्यातून त्या काळातील पटच नजरेसमोर उलगडतो. काही कथा किंवा दंतकथा आपले छान मनोरंजन करतात. परंतु नीरक्षीर विवेकाने आपण इतिहास आणि कथा वेगवेगळ्या करायला हव्यात. 

या खिंडीतल्या गणपतीचा इतिहास खूप जुना आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांची नोंद सापडते. आदिलशहाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरविला. तेथे जमिनीत पहार ठोकली व त्यावर चप्पल पालथी घातली. याचा अर्थ हे गाव आता संपले. जमीनदोस्त झाले, असे सांगितले. परंतु शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांनी या पुण्यनगरीत येऊन येथे सोन्याचा नांगर फिरविला. जिजाबाई श्रावणी सोमवारी पाषाण येथील सोमेश्‍वराला जाताना त्यांना खिंडीत एका चंद्रमौळी मंदिरात एक कर्मठ ब्राह्मण अनुष्ठानास बसलेला दिसला. सश्रद्ध जिजामाता तेथे थांबल्या. ते गणपतीचे मंदिर होते. याच ब्राह्मणास दृष्टान्त झाला, की मी ओढ्याकाठी शमी वृक्षाखाली आहे. मला बाहेर काढून प्राणप्रतिष्ठा करावी. ब्राह्मणाने जिजाऊ बाईसाहेबांना हे सांगितल्यावर त्याप्रमाणे कसब्यात उत्खनन करताच गजाननाची स्वयंभू मूर्ती मिळाली. मातोश्रींनी तेथे भव्य मंदिर उभारले. खिंडीतील या मंदिरात दृष्टान्त झाला म्हणून जिजाऊंनी याही मंदिराचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधली, शेजारी विहीर खणली. आता वाटसरू तेथे विसावू लागले. भक्त वाढू लागले. पुढे कालगतीनुसार मंदिराभोवती जंगल वाढले. परिसरात दरोडेखोरांचा उपद्रव सुरू झाला. तरीपण या देवस्थानात आश्रयाला आलेले वाटसरू सुरक्षित असत असे म्हणतात. त्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या काळात पुन्हा या मंदिरास ऊर्जितावस्था आली. त्या सुमारास पाषाणमध्ये शिवरामभट चित्राव हे सिद्धपुरुष राहात होते. त्यांच्या नजरेस मंदिराची जीर्णावस्था आली. त्यांनी मंदिराची डागडुजी केली. विहीर स्वच्छ केली आणि त्याचवेळी त्यांना विहिरीत धनाचे हंडे सापडले. जमिनीत सापडलेले धन राजाचे या न्यायाने त्यांनी ते पेशव्यांना नेऊन दिले. बाजीराव पेशव्यांनी ते घेण्यास नकार दिला. शेवटी असे ठरले, की या धनाचा विनियोग खिंडीतील गणपतीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करावा व उरलेल्या रकमेतून आणखी एक मंदिर बांधावे. त्यानुसार याच पैशातून ओंकारेश्‍वरचे मंदिर बांधले गेले. एवढे करूनही धन शिल्लक राहिले. शेवटी शिवरामभटांच्या विनंतीवरून श्रीमंत नानासाहेबांनी ते सरकार जमा करून घेतले व त्याच्या व्याजातून ३६ देवस्थानांना वार्षिक उत्पन्न चालू केले. आजही श्री पार्वती नंदन देवस्थानाला पर्वती देवस्थानाकडून ५ रु. १४ आणे अनुदान दरवर्षी मिळते. पेशवेमंडळी मोहिमेवर कूच करताना वेशीवरच्या या जागृत देवस्थानाचे शुभाशीर्वाद घेत असत. राक्षसभुवनाच्या लढाईवर जाण्यापूर्वी माधवराव पेशव्यांनी या गणपतीचे दर्शन घेतल्याची नोंद सापडते तसेच पुत्रप्राप्तीनंतर दुसऱ्या बाजीरावांनी येथे दक्षिणा दिल्याचीही नोंद आहे. पेशव्यांच्या काळात पुण्याची व्यापारपेठ भरभराटीला आली होती. आसामपासून व्यापारी पुण्यात येत. तेव्हा ते या मंदिरात वास्तव्य करीत असत. प्रसिद्ध ५६ विनायकांपैकी हा ५५ वा होय. 

त्यानंतर भारतावर इंग्रजांचे राज्य आले. पुण्यातही इंग्रजांचा जुलमी कारभार सुरू झाला. १८९७ साली रॅंड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा खून करण्याचा कट चाफेकर बंधूंनी लोकमान्य टिळकांच्या मदतीने आखला. त्या कटाचे नियोजन, सराव ही सर्व या मंदिरातच झाली. मंदिराचा कळस पोकळ असून आत २०-२५ माणसे बसू शकतात. त्यामुळे खलबते करण्यास ही उत्तम जागा मिळाली. शिवाय भोवताली जंगल, त्यामुळे प्रॅक्‍टिस करणेही सोईस्कर झाले. गव्हर्नरांच्या बंगल्यात (आजच्या पुणे विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगमध्ये) व्हिक्‍टोरिया राणीने मेजवानी आयोजित केली होती. रॅंड तेथे गेला होता. रात्री उशिरा तेथून परतत असताना चाफेकर बंधूनी या मंदिराच्या परिसरातच रॅंडचा खून केला व खंडेराव साठे यांच्यासोबत लोकमान्य टिळकांना सांकेतिक भाषेत निरोप पाठविला ’खिंडतला गणपती नवसाला पावला!’ 
  
 रानडे घराण्याचा या गणपतीच्या देवस्थानाशी खूप जुना संबंध आहे. हे रानडे मूळचे दीक्षित. काशीमध्ये रामचंद्र दीक्षित राहात होते. तो पेशवाईचा काळ होता. पेशव्यांचे मामा पेठे यांनी या रामचंद्र दीक्षितांना पुण्यात आणले. यांनी पेशवाईत तलवारही गाजविली. पानिपतच्या लढाईत ही दीक्षित मंडळी पेशव्यांबरोबर गेली होती. त्या काळी जंगलात दरोडेखोरांचा सुळसुळाट असे. त्यांना रान आडवे म्हणत. ते वाट अडवून लूट करीत. आपल्या सैन्याला या रान आडव्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पेशव्यांनी दीक्षितांची नेमणूक केली. हे दीक्षित पुढे जाऊन रान आडव्यांचा बंदोबस्त करीत व मागून सैनिक सुरक्षितपणे पुढे जाई. तर असे हे रान अडव्यांचा बंदोबस्त करणारे म्हणून रानडे झाले. शिवणे येथे या रानड्यांचा १८६० मध्ये बांधलेला जुना वाडा आहे. या रानडे मंडळीतही  या जागृत देवस्थानासंबंधी एक घटना प्रसिद्ध आहे. रानडेंच्याकडे अशी प्रथा होती, की लग्न झाल्यावर नवीन वधू -वरांना घेऊन श्री पार्वतीनंदन देवस्थानात यायचे तेथे दर्शन घेऊन तेथे स्वयंपाक करून सर्वांनी नैवेद्य दाखवून भोजन करायचे व मग शिवण्याला जायचे. एकदा या प्रसंगी घरातील प्रमुखाला दृष्टांत झाला, की येथे लवकरच दरोडा पडणार आहे. तेव्हा रानडे मंडळींनी ताबडतोब मंदिरातून सर्व सामानासकट बाहेर पडून शिवण्यातील वाडा गाठला. दरोडेखोर आले पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तर असे हे श्री पार्वतीनंदन गणपती देवस्थान! एक दुर्लक्षित वारसास्थळ.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या