परिवर्तनशील शैक्षणिक बदल

प्रा. डॉ. दीपक ताटपुजे
शुक्रवार, 15 जून 2018

कव्हर स्टोरी
‘संगणकीय प्रणालींद्वार निर्मित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आधारे संगणकीय विचार क्षमता (कॉम्प्युटेशनल थिंकिंग) विकास’ या मूलभूत तत्त्वावर येत्या काही वर्षात कोणत्याही क्षेत्रातील शैक्षणिक बदलांचा वेग वाढत जाणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीशी निगडित या बदलांचा घेतलेला वेध.
 

‘ईवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेने येत्या काही वर्षात पासष्ठ टक्के (६५%) नवीन रोजगार पदांची निमिर्ती होऊन त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या कौशल्यांचे स्वरूप हे पारंपरिक कौशल्यापेक्षा पूर्णत: वेगळे असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध संशोधन अहवालात म्हटले आहे. आजच्या प्रचलित आणि सार्वत्रिक शिक्षण पद्धतींसाठी हेच मोठे आव्हान सर्वच स्तरावर असल्याने शिक्षण व्यवस्था मूलभूत बदलांच्या उंबरठ्यावर उभी आहे.

आजच्या बालवाडीत असणाऱ्या मुलांसाठी इ.स. २०३० च्या पदवीधर वर्गासाठी कोणती तंत्रज्ञानाधारित जीवन कौशल्ये विकसित करावी लागतील, या काळाचा वेध घेणाऱ्या संशोधनाचा अहवालही नुकताच मायक्रोसॉप्टने  ’मॅकेन्सी’च्या  सहकार्याने तयार करुन प्रसिद्ध केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील नव्याने निर्मित होणाऱ्या पदांच्यासाठी कौशल्ये विकसित होणारी शिक्षण व्यवस्था व त्यासाठी बालवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व टप्यांवरील बदलांचा विद्यार्थी ’करिअर प्लॅनिंग’ वर होणाऱ्या परिणामांची माहिती घेणे विद्यार्थी-पालकांनी घेणे यामुळेच अत्यावश्‍यक झाले आहे. बदलत्या कौशल्यांमुळे रोजगार क्षमतांचे स्वरुपातही मोठे परिर्वतन होते आहे. त्यामुळेच विशिष्ट कालावधीसाठी केलेले करिअर मॅपिंग ही ‘करिअर प्लॅनिंग‘ची पहिली पायरी आहे. मूलभूत अभ्यासक्रमांबरोबर त्याच्याशी निगडित पूरक कौशल्यांची जोड अन्य अभ्यासक्रम, प्रशिक्षणद्वारे देणे म्हणजेच करिअर प्लॅनिंग. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये बहूआयामी कौशल्य प्राप्त युवकांची आवश्‍यकता भासत असल्याने करिअर प्लॅनिंगला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञान कौशल्य, गुणवत्ता कौशल्य, परदेशी भाषा कौशल्यासह रोजगार क्षमतांक (एम्प्लॉयबीलीटी कोशंट) महत्त्वाचा असल्याने करिअर प्लॅनिंगची प्रक्रिया काळजीपूर्वक करणे अत्यावश्‍यक झाले आहे. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, नॅनोटेक्‍नॉ, क्कांटम कॉम्प्यूटिंग, बायोटेक्‍नॉलॉजी, क्‍लाउड कॉम्प्यूटिंग, थ्री-डी प्रिटींग, ॲटोनॉमस व्हेईकल्स आदी क्षेत्रातील वेगाने होणारा विकास हा आंतरशाखीय शैक्षणिक पद्धतींमध्ये येत्या काळात मोठा प्रभाव टाकणार असल्याने याचा परिणामही लक्षात घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी तंत्रज्ञानावर आधारीत सेवांवर अवलंबून राहण्याची सर्वसामान्य व्यक्तींच्या वाढत्या सवयींमुळे या सेवा निर्माण करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मनुष्यबळांच्या नवीन कौशल्यांची निर्मित ही विद्यार्थ्यांच्या करिअरवर मोठा परिणाम करणारी ठरत आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या ‘सेवा उत्पादनाचा‘ वापर करण्याचे जीवन कौशल्य विकसित करणारे शिक्षण आणि शिक्षण पद्धती यामुळेच नव्याने निर्मित होत आहे. मायक्रोसॉप्ट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली २१व्या शतकातील शिक्षण पद्धती (व्टेंटी फर्स्ट सेन्चुरी लर्निंग डिझाईन) नुकतीच प्रसिद्ध झालेली क्‍लास ऑफ २०३० तसेच गुगलने विकसीत केलेले कॉम्प्युटेशनल थिकिंग, मूनशॉट थिकिंग आदी विचारधारेसह विकसित झालेल्या शैक्षणिक पद्धती ही याचीच प्रतिनिधिक उदाहरणे आहेत. प्राथमिक शिक्षण स्तरावरील ‘ज्ञानरचनावाद‘ आधारीत कृतीशील उपक्रम, उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण (इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन), प्रकल्पाधारीत शिक्षण पद्धती (प्रोजेक्‍ट बेसड्‌ एज्युकेशन), प्रश्नाधारीत शिक्षण पद्धती (प्रॉब्लेम बेसड्‌ एज्युकेशन), प्लीप क्‍लासरुम, मशिन लर्निंग आदी निवडक उपक्रम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत. या सर्व उपक्रमांचा समाज रचनेवर मोठा परिणाम दिसत असून बुद्धिवादी मध्यमवर्ग मोठ्या  प्रमाणात ग्रामीण व निमशहरी भागातून महानगरांकडे स्थलांतरीत होतो आहे. याच भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी ग्रामीण भागात रुलर सोशल इनोव्हेशनचे (ग्रामीण सामाजिक सर्जनशीलता) अनेक उपक्रम जगभरात आंतरराष्ट्रीय संस्थांनी ग्रामीण भागाशी जोडल्याची ही निवडक उदाहरणे दिसून येतात. ग्रामीण उद्योजकता आणि आयटी उद्योग यांची परिमाणे स्थानिक बाजारपेठेशी निगडित न राहता तंत्रसाक्षरतेवरती विकसीत करणे ही काळाची प्रमुख गरज आहे.

व्यावसायिक शिक्षण, तंत्रशिक्षण आणि विज्ञान शिक्षणाला उद्योजकीय शिक्षण उपक्रमांची जोड ही युवा पिढीच्या जीवन कौशल्य विकासासाठी पूरक ठरत आहे. यामुळेच तंत्रउद्योजकता, कृषीउद्योजकता, ग्रामीण उद्योजकता आदी शाखा युवकांना आकर्षित करत आहेत. आपल्या देशात अनेक माहिती तंत्रज्ञानातील नामवंत कंपन्या या पूरकसेवा क्षेत्रात काम करत असल्याने स्टार्टअप विकासामध्ये या कंपन्यांच्या सहभागासाठी अनेक मर्यादा आहेत. ‘माहिती तंत्रज्ञान पूरक उद्योग स्टार्टअपसाठी मूलभूत उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, ज्याचा अत्यंत चांगला उपयोग मलेशिया आणि सिंगापूर या देशांनी करुन घेतला आहे.

अनेक आघाडीच्या आयटी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाला पूरक अशा ‘नवसंकल्पना उत्पादकांसाठी‘ आयडीएशन लॅब्ज (संकल्पना विकास प्रयोगशाळा) तयार केल्या असून पहिल्या पिढीच्या उद्योजकांसाठी यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आहे. पहिल्या टप्प्यातील या यशस्वी आरेखनानंतर ही संकल्पना व्यावसायिकदृष्ट्या सुदृढ करण्यासाठी इनक्‍युबेशन सेंटरमध्ये दाखल होते. विविध प्रकारच्या ‘टेक्‍नॉलॉजी प्लॅटफॉर्म‘साठी या संकल्पनेचे प्रमाणीकरण झाल्यानंतर उद्योजक हा इमरशन कॅम्पमध्ये येऊन आपल्या विकसित संकल्पनेचे आधारभूत व्यवसायिकरणाची संपूर्ण अंदाज घेतो. या नंतर ‘व्हेंचर कॅपीटॅलिस्ट‘ यांच्या बरोबर होणाऱ्या ‘पीचीन सेशन‘द्वारे भविष्यातील प्रॉफिट मेकिंग प्लॅन तयार करतो. कॉलेजस्तरावर नवयुवकांना प्रोत्साहीत करण्यासाठी ‘हॅकॅथॉन, स्टार्टअप ग्रींड‘ या सारखे होणारे इव्हेंट हे कार्यक्रमांपूरते मर्यादित न राहता संकल्पनांची व्यवसायिक क्षमता लक्षात घेऊन स्टार्टअप उभारणी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येते. गुगल या प्रख्यात कंपनीची ‘लॉन्चपॅड‘ ही स्टार्टअप योजना अनेक नवसंकल्पनांना विकसीत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण-संवादाच्या माधमांमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झालेला असल्याने गुगल क्‍लासरुम, मायक्रोसॉप्ट वननोट सारखी अनेक ॲप्स्‌ शिक्षण माध्यमासाठी उपलब्ध आहेत, व्हिडिओ कॉलींग, सोशल मिडीया, मेसेंजर, मशिन लर्निंग टूल्स, ऑनलाइन कॉन्परन्सेस आदींचा वापर हा जीवन कौशल्यांचा एक प्रमुख भाग बनला आहे. सहविचार शिक्षण (कोलॅबोरेटिव्ह लर्निंग) आणि मुक्‍स (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) या दोन माध्यमांनी शिक्षण पद्धतीची परिमाणेच बदलून टाकली आहेत. घरापासून सामाजिक जीवनापर्यंत (स्मार्ट होम्स टू स्मार्ट सिटी) झालेला हा बदल यामुळेच शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रचंड वेगाशी विद्यार्थी आणि पालकांनाही अनेक आव्हाने निर्माण करतो आहे. या परिस्थितीमुळेच पालकांमध्ये आपल्या पाल्याच्या करिअर निवडीविषयी अत्यंतिक जागृता निर्माण झाली आहे.

प्रचंड आव्हाने आणि अनेक संधी घेऊन येणाऱ्या या परिर्वतन शिक्षण बदलांचा वेध सर्जनशीलतेने घेणे हीच काळाची प्रमुख गरज बनली आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या