पाऊस वाटा...

रोहित हरीप
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

पावसाची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली हे आठवायचं म्हटलं, की लहानपणापासूनची पावसाची अनेक रूपं मनात गर्दी करून उभी राहतात. अगदी पहिला पाऊस वगैरे तर आठवत नाही, पण आमच्या नगरच्या जुन्या वाड्यात पहिल्या पावसानंतर हिरवागार होणारं अंगण आठवतं. आमच्याकडच्या भागातला पाऊस तसा तुरळक... एखादा दिवस जरी पाऊस पडला तरी गावातले लोक सुट्ट्या घेऊन घरी बसायचे. रस्त्यावर शुकशुकाट व्हायचा! या भागात तेवढंच काय ते पावसाचं अप्रूप, मुळात पाऊस कमी असल्यानं शाळेला सुट्ट्या वगैरे मिळण्याचं सुख आम्हाला कधी मिळालं नाही. 

नंतर पुण्याला आल्यावर पावसाचे अनेक संदर्भ नव्यानं कळले. वाढत्या वयाबरोबर आपल्या जाणिवा बदलतात हे पहिल्यांदा कळलं ते पावसामुळं! पाऊस म्हणजे चिखल, गिचगिच अशा पोरकट संकल्पना मागं पडून पाऊस एकदम हवाहवासा वाटू लागला तो याच वयात! पावसाच्या कविता, पावसातलं भिजणं, पावसातला गुलाबीपणा, पावसातील भटकंती अशा विविध अंगानं पाऊस खुलला तो पुण्याला आल्यावरच! 

पुण्यात आल्यावरच सह्याद्रीचं आणि तिथल्या पर्जन्यधारांचं वेड लागलं. 

मग मात्र पाऊस ही काय चीज आहे ते कळू लागलं. सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरताना तुफान पावसाची धुवाधार रूपं बघायला मिळाली. सुखद आणि रोमॅंटिक वाटणारा पाऊस घाबरवू शकतो, हे सह्याद्रीमध्ये फिरतानाच कळलं.

पावसाला अनेक विशेषणं वापरली जातात. तुफान, महामूर, संततधार, धुवाधार, रिमझिम, भीज-पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, ऊन-पाऊस, तुरळक सरी, पावसानं झोडपलं अशी व इतर अनेक... 
पावसाची ही सगळी विशेषणं शब्दशः अनुभवायला मिळाली ती सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांत! 
पावसालापण त्याचं एक व्यक्तिमत्त्व असतं.. आपल्याकडं म्हणतात ना, की बारा मैलांवर भाषा बदलते; पावसाचं तसंच नाही का? आमच्या नगरकडचा पाऊस हा कितीही कोसळला तरी कोरडाच वाटतो, तर तोच पाऊस पुण्यात बरसला की रोमॅंटिक वाटतो. अर्थात हा सगळा जाणिवांचा खेळ आहे. 

मुंबईमधला पाऊस तर मुंबईकरांसारखाच चाकरमाना!... 

तो पावसाळ्यातल्या चार महिन्यांत त्याच्या वेळेला नित्यनियमानं कोसळत राहतो. मग रस्ते नद्या झाल्या काय किंवा रेल्वे बंद पडल्या, तरी पावसाला त्याच्याशी घेणंदेणं नसतं. त्याला दिलेलं काम तो कसूर न करता करत राहतो. 

कोकणातला पाऊस अक्राळ विक्राळ! संततधार पाऊस बघायचा तर कोकणातच जायला हवं. आजूबाजूच्या नद्या-नाल्यांना फूस लावून हा पाऊस मुक्तहस्ते उधळत असतो. कोकणातील माणसंही या पावसाचा बाऊ न करता त्यांची कामं अव्याहत सुरूच ठेवतात. 

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पाऊस म्हणजे एक वेगळे प्रकरण! कोकणातून उसळी मारून वर देशावर येणारे धुक्‍याचे लोट आणि तोंडावर समोरून आपटणारा पाऊस हे इथलं वैशिष्ट्य! मॉन्सूनच्या चार महिन्यांत आपल्याला पाऊस कुठंही नाही भेटला, तरी या घाटमाथ्यांवर हमखास भेटतोच! 

मराठवाड्यातला पाऊस म्हणजे इथला पाऊस दिसतो, पण जाणवत नाही अशी गत. पावसाळ्यात इथल्या नद्या भरून वाहतात. धरणं भरतात पण तरी पाऊस म्हणावा तसा भेटत नाही. 

दिल्लीतला पाऊस बघितला तेव्हा कळलं आपण खरंच सुखी. आपल्याकडं जूनमध्ये येणारा पाऊस तिकडं पार जुलैमध्ये उगवतो आणि घाईघाईनं येऊन एकदाच काय तो धुमाकूळ घालून पुन्हा गायब होतो. 

शाळेत असताना भूगोलाचे मास्तर सांगायचे, ॲमेझॉनच्या खोऱ्यात रोज संध्याकाळी ६ वाजता पाऊस पडतो. ॲमेझॉनच्या खोऱ्यात अजून नाही गेलो, पण आपल्याकडं पावसाला हमखास गाठायचं असेल, तर या सह्याद्रीतल्या कुठल्याही घाटमाथ्यावर जाऊन बसायचं. पाऊस हमखास भेटणार. 

पावसाबरोबरची ही गट्टी जमून आता बराच काळ लोटला आहे. पण आजकाल पावसाबद्दल एक प्रकारच्या त्रयस्थपणाची जाणीव मनात स्थिरावली आहे. पूर्वी पाऊस कोसळायचा आणि आपण पावसात भिजण्यासाठी लगेच सरसावायचो. आता पाऊस पडत असताना तो खिडकीमधूनच बघायलाही शिकत आहे. पूर्वी पावसाच्या आणि माझ्या नात्यात एक मोकळेपणा होता. पण आता त्यात एक प्रकारचा हिशोबीपणा आला आहे. पाऊस पडला, की नजर लागते ती पावसाच्या आकडेवारीकडं, किती एमएम पाऊस झाला? पावसाची सरासरी किती? धरणं भरली की नाही? 

पावसापेक्षा धरणातल्या पाणीसाठ्यांकडं आपलं जास्त लक्ष असतं. 

बदलत्या काळाबरोबर पावसाबद्दलच्या बदलत्या जाणिवाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत हे नक्की... 

हवामान बदल, जमिनींचं होणारं वाळवंटीकरण, पावसाचं कमी होणारं प्रमाण, तापमान वाढ, मॉन्सूनचं बदलतं रुप... असं काही वाचलं, की आपला लाडका पाऊस एक दिवस खरंच गायब तर होणार नाही ना, अशी भीती उगीचच काळीज कुरतडत राहते. आता तर पावसाची खबर देणारा भोलानाथही दुर्मिळ झाला आहे. 

त्यामुळं आम्ही अनुभवत असलेला पाऊस आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंतही तसाच पोचू दे, ही वरुणराजाच्या चरणी प्रार्थना!

फोटो फीचर

संबंधित बातम्या