न थांबणारा पाऊस...

रोशन मोरे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
 

प्रत्येकाच्या वाट्याला विशिष्ट पाऊस येत असतो. कुणाच्या वाट्याला आलेला पाऊस रिमझिम, तर मध्येच जोरदार कोसळणारा असतो. काहींच्या वाट्याला अनेक दुष्काळांनंतर आनंदाचे क्षण घेऊन येणारा असतो... पण माझ्या वाट्याला आलेला पाऊस हा न थांबणारा, सतत ओलाचिंब करणारा आहे. रिमझिमपासून त्यानं धारण केलेलं रौद्ररूप मी माझ्या अगदी लहानपणापासून पाहिलं आहे. त्यामुळं अनेकांना रोमॅंटिक वगैरे वाटणारा पाऊस मला बिलकूलच तसा कधी वाटला नाही. 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माझं गाव! वर्षाविहारासाठी ताम्हिणीमध्ये लोक भटकंती करायला येतात. तिथून केवळ १८ किलोमीटरवर. माझं गाव म्हणजे पावसाचं माहेरघर. न थांबता सतत कोसळणारा पाऊस मी इथंच अनुभवला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भातपेरणी झाल्यानंतर पावसाची वाट पाहण्यात वेगळीच मजा असायची. शेतीतली सगळी कामं उरकलेली असायची. कधी एकदा पाऊस येतोय असं व्हायचं. उन्हाचा वाढलेला कडाका एकदम पावसानं गायब होईल, या विचारानं मनाला गारवा अनुभवता यायचा. जून महिना आला, तरी महाराष्ट्रात इतर ठिकाणी पावसाची सुरुवात होईल की नाही याची शाश्‍वती नसते. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला काळे ढग दाटून पावसाच्या हलक्‍या सरी पडायला इथं मात्र हमखास सुरुवात होते. 

पाऊस आला, की फाटी (सरपण), पेंढा घरात घेण्याची एकच गडबड व्हायची. पेंढा घरात माळ्यावर रचला जायचा. येणारा पाऊस हा वेगळाच आनंद घेऊन येतो. मात्र क्षणाक्षणाला त्याचं बदलाणारं रूप पाहिलं की काळजात कसं तरी व्हायचं. जसजसा हा पाऊस वाढत जायचा तसतशी त्याची भीतीच वाटायची. सततची त्याची रिपरिप नकोशी होऊन जायची.

जूनच्या सुरुवातीला पावसाचं असणारं रूप जुलै महिन्याचा सुरुवातीला पार बदलून जातं. भातलावणीची एकच गडबड आणि त्यात हा मुसळधार कोसळणारा पाऊस! त्यामुळं प्रत्येक पावसाळ्यात आजोबांच्या तोंडून ऐकलेलं वाक्‍य ‘गेल्या शंभर वर्षांत असा पाऊस पडला नव्हता’ आता मलाही तोंडपाठ झालं आहे. पण एकसारख्या पडणाऱ्या पावसाची वेगळी गंमत असायची. पावसाचा जोर वाढला म्हणजे भातलावणीची कामं थांबवावी लागत होती. घरची सगळी चिंताग्रस्त असायची, की आता काम कसं उरकायचं. पण मला मात्र गंमत वाटायची, बरं झालं हा कोसळतोय, नाहीतर आपल्याला काही आराम मिळाला नसता; पण एक दोन दिवसात थांबेल असा वाटणारा पाऊस थांबायचा नाही. दिवस- रात्र एकसारखा कोसळायचा. सगळी कामं आडून बसायची. गावात येणाऱ्या एसटीदेखील गावापासून लांब ओढ्याच्या पलीकडंच थांबायची. शाळेला अघोषित सुट्टीच असायची, आणि शाळेत गेलो तरी दुपारच्या सुट्टीतच घरचे हजर व्हायचे. दिवसभर चुलीच्या भोवतीबसून राहावं लागतं होतं. जास्त पाणी शेतात गेलं तर काही खरं नाही, शेतातलं पाणी बांध फोडून बाहेर काढता येईल का? या विचारानं मोठ्या माणसांचा जीव खालीवर व्हायचा. जनावरं आंबीच्या ओढ्याला आलेल्या आवरात (पुरात) वाहून जायची.  या दिवसात कोणी आजारी पडलं तर मोठी पंचायत. त्याला दवाखान्यात कसं घेऊन जावं. एसटी गावात येईलच याची खात्री नसायची. एसटी ज्या सालतरच्या खिडींतून येत असायची तिथं जर दरड कोसळली तर बाहेर जाण्याचा मार्गच बंद व्हायचा. अंगारा धुपारा आणि झाडपाल्याचं औषध यावर जेवढं निभवता येईल तेवढं निभवलं जायचं. त्यामुळे चार दिवस पडणाऱ्या पावसाचं कौतुक वाटणाऱ्यांना वास्तवामधला पाऊस न थांबता सतत पडतच असेल, तर जिवाची कशी दैना होते. याचं भानच नसतं... 

भातलावणी झाली आणि ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाचा मूडपण बदलत असायचा. त्याची सततची रिपरिप बंद होऊन दिवसभरात एक-दोन मोठ्या सरी कोसळायच्या. वातावरण मात्र दिवसभर हा जोरदार कोसळणार असंच असायचं. त्यामुळं दोन सरी जरी कोसळून गेल्या, तरी पुन्हा हा येणार या भीतीनं घरातून बाहेर जायचं टाळलं जायचं. 

पाऊस किती महिने पडतो हे विचारलं तर त्याचं उत्तर आपण देऊ शकू का? कारण जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने; पण या महिन्यांत पाऊस किती पडतो? जूनचा पाऊस जुलै उजाडला तरी येत नाही, हा अनुभव आता नेहमीचा होतो आहे ना! आणि जुलैमध्ये जरी तो आला तर चार दिवस पडून कुठं गायब होतो देव जाणे! शहरात आल्यापासून मला नेहमी वाटतं, गावाकडं विश्रांती न घेता सतत पडणारा पाऊस का गायब झाला? अजूनही तो गावाकडं तसाच पडतोय मग इकडं पडायला त्याला काय होतंय? काळ्या ढगांची गर्दी करत मी येतोय, अशी सिंहगर्जना करणारा हा पाऊस न बरसताच का निघून जात असावा? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं मी माझ्यापरीनं शोधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र लहानपणी माझ्या वाट्याला आलेला पाऊस कमी होतोय, हे नक्की.

संबंधित बातम्या