जिद्द व प्रतिभा

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
गुरुवार, 22 मार्च 2018

कव्हर स्टोरी

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी इंग्लंडमधील केंब्रिज येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७६ होते. या ७६ वर्षांपैकी ५० हूनही अधिक वर्षे त्यांनी अपंगत्वात घालवली. या काळात त्यांचा चेहरा सोडून बाकीचे सर्वच शरीर लुळे झालेले होते. परंतु अशा परिस्थितीतही ते जगातील सर्वांत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या जिद्दीला आणि प्रतिभेला जगात तोड नाही. 

स्टीफन हॉकिंग यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे ‘हॉकिंग रेडिएशन’. स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध करून दाखवले की ब्लॅक होल अथवा कृष्ण विवरे किरणोत्सारी उत्सर्जित करतात. कृष्ण विवरांना ब्लॅक होल म्हणण्यामागे कारण आहे. काळा रंग त्यावर पडलेला प्रकाश शोषून घेतो व तो परावर्तित करत नाही. त्याप्रमाणेच ब्लॅक होल अथवा कृष्ण विवरांमधील गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की त्यात प्रकाश जरी गेला तरी तोही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ब्लॅक होलमधून काहीही बाहेर पडू शकेल असे शास्त्रज्ञांना वाटत नव्हते. परंतु हॉकिंग यांनी ब्लॅक होलला तापमान असते आणि त्यातून म्हणूनच किरणोत्सारही होऊ शकतो हे गणिती रूपाने सिद्ध करून दाखवले. या किरणोत्सारालाच ‘हॉकिंग रेडिएशन’ असे म्हटले जाते. या शोधामुळे शास्त्रज्ञांच्या ब्लॅक होलविषयीच्या मूलभूत संकल्पनांना धक्का बसला. परंतु या शोधामुळे भौतिकशास्त्राच्या क्वांटम मेकॅनिक्‍स व सापेक्षता सिद्धांत (थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी) या दोन वेगवेगळ्या शाखांना एकत्र आणण्यात हॉकिंग यांना यश मिळाले. क्वांटम मेकॅनिक्‍स आपल्याला सूक्ष्म कणांचे - अणू आणि रेणूंचे - वर्तन स्पष्ट करते तर साक्षेपता सिद्धांत प्रचंड मोठ्या वस्तूंचे - ग्रह, तारे आणि आकाशगंगाचे - वर्तन आणि गुरुत्वाकर्षण स्पष्ट करतो. हॉकिंग यांनी ब्लॅक होलसारख्या प्रचंड मोठ्या वस्तूभोवती अतिशय लहान कणांचे वर्तन समजण्याचा प्रयत्न केला. ब्लॅक होलच्या कडेला इंग्रजीत ‘इव्हेंट होरायझन’ असे म्हटले जाते. या सीमेच्या आत एखादी वस्तू गेली तर ती बाहेर पडणे अशक्‍य असते. आता आपण या सीमेच्या आजूबाजूला काय होते याचा विचार करू. क्वांटम मेकॅनिक्‍सनुसार ब्रम्हांडातील कुठलीही जागा संपूर्णपणे रिकामी असू शकत नाही. जी गोष्ट आपल्याला रिकामी वाटते तिथेही आभासी सूक्ष्म कण असतात. हे कण दोन प्रकारचे असतात - अधिक प्रभार (पॉझिटिव्ह) असलेले आणि उणे प्रभार (निगेटिव्ह) असलेले. हे कण आपल्या विरुद्ध प्रभार असलेल्या कणांशी जोडी बनवतात व त्यामुळे त्यांची ऊर्जा न्यूट्रल बनते. ब्लॅक होलच्या सीमेजवळ जेव्हा असे दोन कण एकत्र येऊ पाहतात तेव्हा त्यातील उणे प्रभार असलेले कण ब्लॅकहोलमध्ये शोषून घेतले जातात व अधिक प्रभार असलेले कण ब्लॅकहोलपासून दूर फेकले जातात. हे दूर फेकले जाणारे कण म्हणजेच हॉकिंग रेडिएशन अथवा हॉकिंग किरणोत्सारी होय. क्वांटम मेकॅनिक्‍स व साक्षेपता सिद्धांत ब्लॅक होलमधील प्रक्रिया समजून घेण्यासाठी यशस्वी रित्या एकत्र आणता आल्याने विश्वातील अनेक कोडी यो दोन थिअरींचे एकत्रीकरण करून सोडवता येतील असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. किंवा या दोन थिअरींना एकत्र करून एक नवीन थिअरी बनवता येईल व त्यामुळे विश्वातील अनेक गुपिते आपल्याला कळतील असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. 

स्टीफनचा जन्म ८ जानेवारी १९४२ ला  इंग्लंडच्या ऑक्‍सफर्ड शहरात झाला. त्यांचे आई आणि वडील दोन्हीही अतिशय हुशार होते. वयाच्या १७ व्या वर्षी स्टीफन ऑक्‍सफर्ड विद्यापीठात दाखल झाले. तिथे फर्स्ट क्‍लास मिळवून ते केंब्रिज विद्यापीठात कॉस्मॉलॉजी शाखेत दाखल झाले. तिथे त्यांना सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करायचे होते. पण नशिबाने त्यांना डेनिस विलियम शियामा यांच्या बरोबर काम करावे लागले. त्याच सुमारास जयंत नारळीकर केंब्रिज विद्यापीठात फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्‍टरेट करत होते! एवढेच नव्हे तर १९६४ मध्ये फ्रेड हॉयल आणि जयंत नारळीकर यांच्या संशोधनाला स्टीवन हॉकिंगनी खुले आव्हानही दिले. त्याच सुमारास -१९६३ मध्ये त्यांना ‘अमीयोट्रॉपिक लॅटरल स्लिरोसिस’ (ALS) हा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याचे निदान करण्यात आले. या आजारामुळे त्याचे हात पाय व अखेरीस संपूर्ण शरीर लुळे पडणार होते. आणि एवढेच नव्हे तर अशी व्यक्ती फार काळ जगतच नाही. डॉक्‍टरांनी त्यांना फक्त दोन वर्षाचे आयुष्य शिल्लक आहे असे सांगितले. १९६०च्या दशकाअखेरी त्यांना व्हीलचेअर वापरणे भाग पडू लागले. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना मृत्यूने मात्र अजून गाठले नव्हते. स्टीफन हॉकिंगचे शरीर लुळे पडत असले तरीही त्यांचा मेंदू मात्र तेवढाच तल्लख होता. हात आणि पायाचा वापर न करता आल्याने ते आता गणितीय समीकरणे नुसत्या कल्पनाशक्तीने सोडवू लागले. एका अर्थी त्यांच्या शारीरिक शक्तीची भरपाई त्याच्या मेंदूने केली. १९७० च्या दशकात स्टीफनची वाचाही जवळजवळ गेली होती. फक्त जवळच्या माणसांनाच ते काय बोलत आहे हे समजत असे. इतरांशी बोलण्यासाठी त्यांना सतत कुणीतरी जवळच्या माणसाची आवश्‍यकता भासे. १९८५ मध्ये त्यांना न्यूमोनिया झाला व त्यात त्यांची वाचा संपूर्णपणेच गेली. आता जवळच्या माणसांनाही ते काय बोलत आहे हे समजणे शक्‍य नव्हते. हात आणि पाय तर लुळे पडलेच होते. हाताची बोटेच फक्त हलवता येत होती. आणि चेहराच काय तो काम करत होता! १९८६ मध्ये ‘इक्वलायझर’ नावाच्या सॉफ्टवेअरची मदत घेऊन एका छोट्या संगणकाच्या मदतीने त्यांना लोकांशी संवाद साधता येऊ लागला. संगणकामध्ये रेकॉर्ड केलेला आवाज होता. जो शब्द हाताच्या बोटाने स्टीवन निवडत तो शब्द संगणक ‘बोलून’ दाखवत असे. अशा प्रकारे त्यांना एका मिनिटाला १५ शब्द बोलता येत असत. या संगणकाचा वापर करून स्टीफन आता व्याख्यानेही देऊ लागले. परंतु हळूहळू स्टीफनच्या हाताची बोटेही लुळी पडली आणि तो मार्गही निघून गेला. २००५ मध्ये गालाच्या हालचाली करून ते संगणकाच्या मदतीने बोलू लागले. परंतु त्याचा वेग केवळ एका मिनिटाला १ शब्द इतका हळू होता. पुढे लंडनमधील ‘स्विफ्ट-की’ या कंपनीच्या मदतीने सॉफ्टवेअर बनवून त्याच्या साहाय्याने स्टीवन संवाद साधू लागले. आयुष्याच्या अखेरीस त्यांना श्वास घेण्यातही त्रास होत असे वारंवार इस्पितळात भरती करावे लागत असे. 

इतक्‍या प्रचंड अडचणी झेलूनही त्याने आपले आयुष्य जितके शक्‍य होईल तितके इतरांसारखे जगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन लग्ने केली. पहिली बायको जेन वाइल्डला १९९५ मध्ये घटस्फोट देऊन त्याने एलेन मेसनशी लग्न केले. एलेन मेसन त्यांची काळजी घेणारी नर्स म्हणून काम करत होती. पुढे २००६ मध्ये एलेन मेसनशीही त्यांचा घटस्फोट झाला. स्टीफन हॉकिंग यांना ३ मुलेही झाली. त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक लेखांमध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आठवणींवरून स्पष्ट होते की स्टीफन हॉकिंग आपले संपूर्ण आयुष्य स्वतः:च्या मनाप्रमाणेच जगले. संपूर्णपणे लुळे असूनही ते जगभर फिरत असत व तंत्रज्ञानाचा वापर करून व्याख्याने देत असत. अटलांटिक मॅगझिनमधील एका लेखाला शॉन करोल या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या आठवणीत स्टीफन हॉकिंग यांची लॉस एंजलिसमधील अशीच एक आठवण लिहिलेली आहे. स्टीफन जिथे जात तिथे त्यांना विशिष्ट प्रकारचा चहाच लागत असे! स्टीफन त्यांच्या खास व्हॅनमध्ये व्हिलचेअरमध्ये बसून असत. त्यांच्या बरोबर असलेली माणसे दुकानात जाऊन चहाची विविध पाकिटे उचलून आणून त्यांना दाखवत असत. त्यातील एक पाकीट ते निवडत. निवडलेले पाकीट मग विकत घेतले जाई! 

स्टीफन हॉकिंग नावारूपाला येण्यात अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके. १९८८ मध्ये त्यांनी ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे पुस्तक लिहिले. भौतिकशास्त्रातील व खगोलशास्त्रातील अनेक कठीण संकल्पना या पुस्तकात त्यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितल्या होत्या. हे पुस्तक जगभरात प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले. इंग्लंड व अमेरिकेत हे पुस्तक बेस्टसेलर बनले व पुढील कित्येक महिने बेस्टसेलर लिस्टमध्ये राहिले. या पुस्तकाच्या कोट्यावधी प्रति खपल्या व त्याची अनेक भाषात भाषांतरेही झाली. १९९२ मध्ये या पुस्तकावर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाची स्पिलबर्ग यांनी निर्मिती केली. या पुस्तकानंतरही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या जीवनावर  मध्ये ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हा चित्रपट त्यांची पत्नी जेन हॉकिंग यांनी लिहिलेल्या ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीवन’ पुस्तकावर आधारित आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रकाशित केले आहे. 

आजपर्यंत अनेक लोकांना असे वाटत आले आहे की स्टीफन हॉकिंग जर अपंग नसते तर आज ते तेवढे प्रसिद्ध नसते. पण माझ्या मते हे सत्य नाही. स्टीफन हॉकिंग लोकप्रिय झाले ते त्यांच्या ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकामुळे. हे पुस्तक ते अपंग असल्यामुळे लोकप्रिय झाले नाही. कदाचित त्यांच्यावरील चित्रपट मात्र ते अपंग असल्याने बनवले गेले असल्याची शक्‍यता आहे. परंतु हे चित्रपट ते लोकप्रिय झाल्यानंतर बनवले गेले आहेत, त्याच्या आधी नाही. तसेच स्टीफन हॉकिंग यांचे ब्लॅक होल संशोधनातील योगदान अमूल्य आहे यातही शास्त्रज्ञांमध्ये दुमत नाही. जे लोक स्टीफनच्या प्रसिद्धीविषयी संशय व्यक्त करतात त्यांना स्टीफन हॉकिंगविषयी पुरेशी माहिती नाही असेच म्हणावे लागेल. किंबहुना माझ्या मते जर ते अपंग नसते तर त्यांनी कदाचित अधिक व्याख्याने दिली असती व अधिक प्रसिद्धीही मिळवली असती. खुद्द स्टीफन हॉकिंग यांना आपल्या अपंगत्वाविषयी काय वाटले ते जाणून घेणे आवश्‍यक आहे. जेव्हा स्टीफन हॉकिंग यांना आपल्या आजाराविषयी कळले तेव्हा त्यांना नैराश्‍याचा झटका आला होता. परंतु ते त्यातून सावरले. पुढे त्यांनी आपल्या अपंगत्वाबद्दल बोलताना १९८४ मध्ये सायन्स डायजेस्ट मध्ये लिहिले आहे - ‘माझ्या अपंगत्वामुळे माझ्या कामावर - थिअरॉटीक फिजीक्‍समधील कामावर फारसा परिणाम झालेला नाही. किंबहुना माझ्या अपंगत्वामुळे मला संशोधन करण्यास अधिक वेळ मिळाला. मी अपंग नसतो तर मला कॉलेजमध्ये शिकवावे लागले असते व इतरही अनेक कामे करावी लागली असती.’ स्टीफन हॉकिंग यांचा आपल्या अपंगत्वाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यातून दिसतो. 

प्रचंड बुद्धिमत्ता, अपार जिद्द आणि जीवनाविषयीची आसक्ती या महान शास्त्रज्ञात दिसते!! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या