वेगळी कल्पना, दमदार आशय...

विनायक लिमये 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नाटक
नावीन्यपूर्ण कल्पना सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. पण ही कल्पना नाटक, चित्रपटांत वापरताना तिचे ‘नवीनपण’ पुरेसे ठरत नाही. तर त्याला आशयाचीही साथ लागते. ‘नाट्यसंपदा कलामंच’ने सादर केलेेले ‘चि.सौ.कां. रंगभूमी’ हे नाटक असे प्रभावित करते.

एखादी कल्पना नावीन्यपूर्ण असेल तर त्याकडे सगळ्यांचे लक्ष जाणे स्वाभाविकच असते; पण नाटक चित्रपट आणि कुठल्याही कलेच्या सादरीकरणात कल्पना नुसती नावीन्यपूर्ण असून चालत नाही, तर ज्या कल्पनेच्या बळावर डोलारा उभा करायचा असतो तो तितकाच आशयही दमदार असावा लागतो. नाट्यसंपदा कलामंच या संस्थेने सादर केलेले ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेले तर आहेच, पण त्यातील दमदार आशयामुळे ते सगळ्यांना प्रभावित करते. 

संपदा जोगळेकर - कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. रंगभूमी ही भरत मुनींची कन्या, ही अफलातून कल्पना करून त्यांनी या नाटकाचा सगळा डोलारा उभा केला आहे. रसिकराज म्हणजे सगळ्या प्रेक्षकाचा प्रतिनिधी हा तिचा पती. या दोघांच्या संसारातून हे नाटक उलगडत जाते. संसारातले रुसवे-फुगवे आणि भांडणे या दोघांच्या संसारातही होतात. अगदी दोघे काही काळ दुरावतातही. या दोघांमध्ये पुन्हा समेट घडविण्यासाठी थेट नारदमुनी पृथ्वीवर येतात आणि मग या दोघांची दुरावलेली मने पुन्हा जवळ येतात. हा संसार पुन्हा बहरू लागतो. 

यातील रंगभूमीची भूमिका स्वतः संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी केली असून, तिच्या पतीची अर्थात रसिकराजाची भूमिका राहुल मेहेंदळे यांनी केली आहे. या दोघांच्या संसारातल्या विविध प्रसंगांत आणि त्यांच्या बोलण्यातून मराठी रंगभूमीचा प्रवास कळत जातो. या दोघांनी वेगवेगळ्या प्रसंगांत जो विविध भूमिकांचा सतत बदलता आलेख दाखवला आहे, त्यामुळे फारच बहार येते. या दोघांची त्यात कसोटी लागते आणि त्यात तो प्रचंड मार्कांनी उत्तीर्ण होतात. ‘नटसम्राट’चे एक स्वगत ज्या पद्धतीने राहुल सादर करतात त्यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळते. त्याला तितकीच समर्थ साथ संपदा जोगळेकरांची मिळते. त्यांनी ‘ती फुलराणी’मधील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हे गाजलेले स्वगत ज्या पद्धतीने सादर केले आहे ते पाहिल्यावर या गुणी अभिनेत्रीची ताकद लक्षात येते. या दोघांनी या नाटकात जी धुवांधार बॅटिंग केली आहे, ती पाहताना आगळीच मजा येते. त्यानंतर बदलेल्या रंगभूमीची भूमिका करणाऱ्या शर्वरी कुलकर्णी यांनी नेमकी समज दाखवून आपल्या नृत्यकौशल्याची त्याला जोड देऊन आपली भूमिका वेगळ्याच पद्धतीने ठसवली आहे. 

या तिघांच्या बरोबरीला आहेत ते म्हणजे या नाटकातील गायक आणि गायिका. नचिकेत लेले, केतकी चैतन्य आणि अवधूत गांधी व शमिका भिडे या चौघांनी इथे केवळ नुसती गाणीच सादर केली आहेत असे नाही, तर सुंदर अभिनय करून या गाण्यातील आशय नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यत पोचवला आहे. हे संगीत नाटक असूनही इथे केवळ नाट्यगीतांचा भडीमार होत नाही, तर रसिकराज आणि रंगभूमीच्या संसारात जे प्रसंग घडतात त्यातून ही नाट्यपदे सादर होतात. ही पदे सादर झाल्याने अनेक नाट्यरसिकांना जुन्या नाटकांचा विलक्षण आनंद मिळणार आहे. 

संपदा जोगळेकर यांनी नाटक गुंफताना विष्णूदास भावे यांच्या नाटकापासून ते प्र. के अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकापर्यंत अनेक नाटकांचा वेध घेतला आहे. रंगभूमीच्या इतक्‍या वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाचा वेध यापूर्वी ऋषिकेश जोशी यांनी ‘नांदी’ नाटकातून घेतला होता, इथेही संपदा जोगळेकर तेच करतात, पण इथे जो वेगळेपणा आहे तो कल्पनेतला आणि त्याच्या पूर्णपणे वेगळ्या सादरीकरणातला आहे. या नाटकाचे आणखी दोन भाग निघून या नाटकाची त्रिनाट्यधारा होऊ शकते, कारण एकाच नाटकात हे सारे मांडताना दुसऱ्या अंकात लेखिकेला नाट्यप्रवासाचा बराच भाग भरभर घ्यावा लागल्याचे जाणवते, तिची त्यात गडबड उडाल्याचेही जाणवते. पण वेळेची मर्यादा लक्षात घेतल्यास हे स्वाभाविक आहे. काही नाटके इथे यायला हवी होती असे वाटून त्याबद्दल चुटपूट लागते, मात्र एकत्रित परिणाम साधताना प्रेक्षक एका वेगळ्याच विश्‍वात जातात आणि दुसऱ्या अंकात जे प्रश्‍न लेखिका रंगभूमीच्या माध्यमातून उभे करते त्याने प्रेक्षक अंतर्मुख होतात. या नाटकाचे लेखन गद्य आणि पद्य यांचा सुरेख मेळ आहे. लेखिकेने पती आणि पत्नीच्या संवादात ‘तुझा माझा झाला आहे समजुतीचा करार’, या वाक्‍याने शेवट होणारे दोन ते तीन प्रसंगातले संवाद लिहिताना त्यात जी काव्यमयता आणली आहे ती नाटकाची रंगत वाढवते. त्याचबरोबर बदललेली रंगभूमी आपण का बदललो हे सांगत असताना जे यमक साधत नारदमुनींशी बोलते तेही असेच दाद घेणारे आहे. लेखनाच्या आघाडीवर हे नाटक भाषेची ताकद आणि सौंदर्य किती विलोभनीय ठरते ते लख्खपणाने सांगते. 

यातील छोटी भूमिका करणारा शाहीर असो की अन्य कुणी अभिनेता यात कुणीच कुठे कमी पडत नाही. प्रत्येक जण समरसून काम करतात. त्यामुळे हा संसार प्रेक्षकाला आपल्याबरोबर घेतो. दिग्दर्शक म्हणून संपदा जोगळेकर यांचे हे यश आहे. यातले गायक आणि त्यांचा अभिनय ही नाटकाची भक्कम बाजू ठरल्या आहेत. नेपथ्य आणि वेशभूषा यातही बाजी मारली आहे. सध्याच्या वाहिन्यांच्या व त्यावरील मालिकांच्या गर्दीत हे नाटक वेगळेपणा देते. त्यामुळे याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्‍यक आहे. रंगभूमी का महत्त्वाची आणि तिचे वेगळेपण काय हे या नाटकाच्या लेखनात मांडले गेले आहेच; पण ते या संपूर्ण प्रयोगातून योग्यपणे ठसविले जाते. 

रंगभूमी आणि रसिकराजाच्या संसारातल्या विविध प्रसंगांत ग्रामोफोन आणि रेडिओच्या आगमनाचा ज्या पद्धतीने उल्ल्लेख येतो ते फारच लाजबाब. या वेळी विनोदनिर्मिती तर साधली आहेच, पण रंगभूमी या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेत कशी समृद्ध होत गेली त्याचाही तपशील कळतो. संगीत नाटकाचे सम्राट बालगंधर्वांची दखल घेताना लेखिकेने प्रसंगांची जी चपखल रचना केली आहे, त्यामुळे मजा येते. 

लेखन, गायन, वादन आणि नेपथ्य तसेच वेशभूषा आणि रंगभूषा अशा सर्व आघाड्यांवर गुणवंत कामगिरी करणाऱ्या या ‘चि. सौ. कां रंगभूमी’चा संसार इतका जमून आलेला आहे, की प्रेक्षक म्हणून आपण या संसाराचे शेजारी व्हायलाच हवे.

श्रेयनामावली 
चि. सौ. कां. रंगभूमी

निर्माता ः अनंत वसंत पणशीकर आणि यशवंत देवस्थळी 
लेखिका आणि दिग्दर्शक ः संपदा जोगळेकर - कुलकर्णी
कलाकार ः नचिकेत लेले, केतकी चैतन्य, अवधूत गांधी, शमिका भिडे, अमोल कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी, अनिरुद्ध देवधर आणि राहुल मेहेंदळे व संपदा जोगळेकर

संबंधित बातम्या